एरी मैं तो प्रेम दिवानी©नितीन सप्रे
वाणी जयराम यांच्या गौरवार्थ रचलेली शब्दांजली, पुरस्कारांची घोषणा होऊन उणेपुरे दहा दिवस उलटायच्या आत श्रद्धांजलीत रुपांतरीत करावी लागेल असं स्वप्नात हि कधी आलं नसतं मात्र नियती पुढे कुणाचं काही चालत नाही हेच खरं.
अनेकदा अनेकांना, आयुष्य भर प्रयत्न करूनही असाध्य राहणारी गोष्ट, कुणा एखाद्याला अगदी पोर वयात साध्य होते. विधात्या कडून गोड गळ्याची देणगी प्राप्त झालेली तामिळनाडूतल्या वेल्लोरची मुलगी कलैवाणी, अवघ्या पाचव्या सहाव्या वर्षीच शास्त्रीय संगीतातल्या रागदारीतला भेद जाणू लागते आणि वयाच्या आठव्या वर्षी तत्कालीन आकाशवाणी मद्रास केंद्रावरून तिचं गायन प्रसारित ही होतं. हे सगळं अकल्लपित, अचंबित करणारं असलं तरी सत्य आहे. या मुलीच्या बारशाच्या दिवशीच ज्योतिषानं पुढे ती मोठी गायिका होईल असं भविष्य कथन केलं होत. त्याला साजेसं नाव ठेवावं असही वडिलांना सुचवलं होतं. म्हणून या मुलीचं नाव कलैवाणी म्हणजे कलावती, बुद्धीमती ‘मां सरस्वती’ ठेवण्यात आलं. घरी त्याचं लघुरूप वाणी झालं. निव्वळ गायन, संगीतच नाही तर पेंटिगचा ही व्यासंग असलेल्या कलैवाणीनं आकाशवाणी पासून चित्रवाणी आणि पर्यंत आपलं नाव सार्थक केलं. वाणीनं कर्नाटक संगीतचा व्यासंग करावा असा आईचा आग्रह होता मात्र तिचा अनुराग जुळला चित्रपट संगीताशी. सिलोन रेडिओवर आपलं गाणं लागावं असं या लहान गुड्डीचं स्वप्न होत. योगायोग असा की वाणी यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पणातल्या ‘गुड्डी’ या चित्रपटातल्या ‘बोल रे पपिहारा’ या गाण्याची सिलोन रेडिओ ने त्याकाळी अक्षरशः पारायणं घातली आणि वाणी जयराम यांची स्वप्नपूर्ती झाली.
‘मीरा’रूप वाणी
पाणिग्रहणा नंतर वाणीला जयराम ची जोड लाभली. विलक्षण गोड गळा, सर्व सप्तकातून फिरणारा आवाज, उत्कृष्ट स्वर नियमन, सुरेल हरकती, तानकाम तसच अनवट रचना लीलया गाण्याच्या वैशिष्ट्यांमुळे चित्रपट सृष्टीत सुवर्ण महोत्सवी कारकीर्द वाणी जयराम यांनी गाजवली. दक्षिणेवर तर 12 वर्ष त्यांच अधिराज्य होतं. या दक्षिणी लतेनं तमिळ, कन्नड, मल्याळमसह राजस्थानी, गुजराथी, ओडिसी, बंगाली, मराठी आणि हिंदी भाषेत गायलेली कित्येक गाणी रसिकांच्या हृदयात आजही गुंजन करतात.
वाणी जयराम यांना भक्ती संगीतात अधिक रस होता. पार्श्वगायन सुरू करण्या आधी पासूनच त्या भक्ती संगीत गात होत्या. 1979 साली संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मीरा’ चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक होते गुलजार. वाणी जयराम यांच्या सूरात गुलजार यांना मीरा गवसली. वाणी जयराम यांना घेऊन ते या चित्रपटाचे संगीतकार पंडित रविशंकर यांच्याकडे गेले. पंडितजींना ही हेमा मालिनी साकारत असलेल्या मीरे साठी वाणी यांचा आवाज रुचला आणि इतिहास घडला. या चित्रपटातल्या मीराबाईंच्या रचनां पंडितजींनी अदभुत प्रासादिक स्वरसाजानं सजविल्या. वाणी जयराम यांच्या भावपूर्ण आणि अभिजात गायकीनं त्या अधिकच उठावदार झाल्या. ही भजनं गाताना त्या मीरारुपच होऊन गेल्या.’मीरा विरहिणीच्या भावशब्दाशी, कलैवाणीचा सूर झाला अद्वैत’. चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार यांची निवड त्यांनी संपूर्ण सार्थ ठरवली.
तत्कालीन मद्रास मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आकडेमोडीची खातेसुमारी करणाऱ्या वाणी, लग्नानंतर बदली घेऊन मुंबईत आल्या. गुणग्राहक पती जयराम यांनी त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकण्यास प्रवृत्त केलं. नेहमीच यशस्वी पुरुष मागे स्त्री असते असं नव्हे तर कधी कधी यशस्वी स्त्री मागे पुरुष ही असतो असं म्हणता येईल. वाणी जयराम यांनी उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडे तालीम सुरू केली. संगीताशी संगत करण्याच्या निर्धार करून, त्यांनी विशेष रुची नसलेल्या आकडेमोडी बरोबर काडीमोड घेत, संगीत पेशालाच गळ्याशी घेतलं.
स्वरानंद
‘गुड्डी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी त्यांना हिंदीत पहिली संधी दिली होती. ऋणानुबंध कसा असतो बघा. 1969 च्या सुमारास त्यांचा वसंत देसाई यांच्याशी परिचय झाला होता. त्यांचा आवाज ऐकून, देसाई यांनी कुमारजीं (पंडित कुमार गंधर्व) बरोबरच्या एका मराठी गाण्यासाठी वाणी जयराम यांना विचारले आणि तिथेच ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या. वसंत देसाई या मराठी संगीतकारानं कुमारजी आणि वाणी जयराम या दोन दक्षिणी गायकां कडून, रसिकांना अक्षय तुष्टता देणारं मराठी गीत दिलं, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत रुष्टता मोठी’. या नाट्यपदा व्यतिरिक्त ‘माळते मी माळते’, ‘उठा उठा हो सूर्य नारायण’ अशी काही चित्रपट गीतं, पाडगावकरांची ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, कुसुमाग्रजांची ‘हळूच या हो हळूच या’ ही बालगीतं, ‘बलसागर भारत होवो’ हे साने गुरुजींचं स्फूर्तीगीत, काही भावगीतं आणि भक्तिगीतं गाऊन त्यांनी ती चिरंतन केली .
गुड्डी’च्या यशा नंतर चित्रगुप्त, मदन मोहन, ओ.पी.नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, एस एन त्रिपाठी, सी रामचंद्र, जयदेव, नौशाद, आर.डी.बर्मन यांच्या सारख्या प्रतिथयश संगीतकारांबरोबर वाणी जयराम यांनी संगीतकाम केलं. मात्र एक एक गाण्याच्या पलीकडे जाऊन त्यांना अधिक गाणी मिळाली नाहीत. बऱ्याच काळा नंतर गुलजार यांनी त्यांच्या मीरा फिल्म साठी वाणी जयराम यांना साद घातली होती. या चित्रपटातली सर्व 14 गाणी वाणी जयराम यांनी गायली. ‘मेरे तो गिरिधर गोपाल दुसरों न कोई’ या रचने साठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा प्रतिष्ठित फिल्म फेअर पुरस्कार ही त्यांना देण्यात आला. १९७४ साली मुंबईहून चेन्नईला (मद्रास) आल्यावर एम.एस.विश्वनाथन, एम.बी.श्रीनिवासन, के.व्ही.महादेवन, एम.के..अर्जुनानं, जेरी अमलदेव, इलयराजा या दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी स्वरकाम केल.
संस्कार
वाणी जयराम या स्वरसाधने प्रमाणेच गृह साधनाही त्याच दक्षतेंनं करायच्या हे विशेष. दैनंदिन जीवनात अत्यंतिक साधी दिनचर्या आचरणाऱ्या वाणी एखाद्या सामान्य गृहिणी प्रमाणे स्वयंपाका पासून ते साफसफाई पर्यंत सर्व काम स्वतःच करत. गाण्या व्यतिरिक्त चरित्रं, आत्मचरित्रं आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचनात त्यांना रुची होती. राजहंसा प्रमाणे नीरक्षीर विवेक ठेवून यातून बरच काही शिकता येतं असं त्या म्हणत. ईश्वरा समोर आपण सर्वजण समान असून उचनीचता बाळगणं त्या गैर मानत. त्यानुसार आचरण ही करत. लहानपणी वाढदिवशी, आईच्या वयाच्या, त्यांच्या घरी घरकाम करणारीला ही त्या वाकून नमस्कार करीत असत.
पार्श्वगायन सुरू करण्या आधीपासूनच भक्ती संगीत गात असलेल्या वाणी जयराम काही वर्षांपूर्वी चंदेरी दुनियेच्या झगमगाटा पासून दूर झाल्या होत्या. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर जाणिवेतून, निखळ शुद्ध भक्ती संगीतावर त्यांनी लक्ष्य केंद्रित केलं होतं. ते अधिक प्रचलित करण्यासाठी त्या आपल्या परीनं सतत प्रयत्नरत होत्या. तमिळ, हिंदीत कविता ही त्या रचत होत्या. लौकिक जगातल्या पुरुषार्थासाठी हयातीत जाहीर झालेला पुरस्कार स्वीकारण्या पूर्वीच भूलोकीची अर्वाचीन कालखंडातील ही मीरा स्वरूप गानविदुषी ‘एरी मैं तो प्रेम दिवानी मेरो दर्द न जाने कोई’ आळवित अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान करती झाली.
©नितीन सप्रे
8851540881
pc:google
टीप: लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवरही उपलब्ध आहे.