भगवान दादा ©मुकुंद कुलकर्णी

आम्ही कॉलेजात शिकत असताना सोलापूरात कल्पना टॉकीजला भगवान दादांचा अलबेला लागला होता . आम्ही चार पाच मित्रांनी तीन ते सहा आणि सहा ते नऊ असे लागोपाठ दोन शो पाहिले होते . तिसराही पाहिला असता पण , त्या काळात रात्री नऊ ते बारा घरी कळू न देता बाहेर असणे शक्य नव्हते !
 
अलबेला भगवानदादा आणि गीता बाली या अफलातून जोडीच्या जबरदस्त नृत्यांमुळे तुफान गाजला होता . दिल धडके नजर शरमाए , धीरे से आ जा रे , शोला जो भडके , शाम ढले खिडकी तले , बलमा बडा नादान , दीवाना परवाना , भोली सुरत दिल के खोटे , किस्मत की हवा कभी नरम , हसीनोंसे मुहब्बत का , मेहफिलमे मेरी कौन ये दिवाना आ गया , मेरे दिल की घडी , अशी सी. रामचंद्र यांनी अजरामर केलेली एकापेक्षा एक सरस गाणी होती त्या चित्रपटात . पडद्यावर गाणे सुरू झाले की , पैशांचा पाऊस पडत असे . लोक खिशातला चिल्लर खुर्दा , चार आणे , आठ आणे उधळत . वेगळाच माहौल असे त्या काळात . हिंदी चित्रपटसृष्टीत एवढी सुंदर म्युझिकल कॉमेडी क्वचितच .
 भगवानदादांचा चोरीचोरी सिनेमातला रोल ही अफलातून होता . अतिशय उत्तम कॉमेडी सेन्स असलेल्या फार थोड्या हिंदी चित्रपट कलाकारांपैकी एक होते भगवानदादा . त्यांचा चेहरा विलक्षण बोलका होता . गाण्याच्या ठेक्यावर भगवानदादांचे पाय थिरकायला लागले की , लोक अक्षरशः मॕड होत . सगळ थिएटर झिंग झिंग झिंगाट होत असे ! आपली स्वतःची अशी वेगळी नृत्यशैली त्यानंतर शम्मी कपूरची होती .
आपल्या सुप्रसिद्ध नृत्यशैलीने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या पन्नासच्या दशकातील सुपरस्टार भगवान दादांना  इ.स.1951 च्या अलबेला चित्रपटाने  प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले .
दि.1 अॉगस्ट 1913 रोजी भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान ऊर्फ भगवान दादा यांचा जन्म सिंधुदुर्ग येथे झाला . भगवान दादांचे वडील कापड गिरणीत मजूर होते . भगवान दादांनीसुद्धा काही दिवस मिलमध्ये काम केलं , पण त्यांची स्वप्न रुपेरी पडद्याची होती . कारकीर्दीची सुरूवात त्यांनी मूकपटातल्या छोट्या मोठ्या भूमिकातून केली . रापलेल्या चेहऱ्याच्या , बटबटीत डोळ्यांच्या , पहेलवानी शरीरयष्टीच्या भगवान दादांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली . त्यांना कुस्तीची आवड होती . त्यांच्या शरीरयष्टीला साजेशी भूमिका त्यांना
‘ क्रिमिनल ‘ या मूकपटात मिळाली . पण विलक्षण बोलका चेहरा आणि अफाट विनोदबुद्धी यामुळे त्यांना काही सामाजिक चित्रपटातून चांगल्या भूमिका मिळाल्या . ‘ अलबेला ‘ ह्या सुपर डूपर हिट चित्रपटाशिवाय ‘ चोरी चोरी ‘ आणि ‘ झनक झनक पायल बाजे ‘ हे त्यांचे खूप गाजलेले चित्रपट .
भगवान दादा त्यांच्या खास नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध होते . खांदे उडवत हाता पायांची माफक हालचाल करत खास भगवान दादा शैलीतली त्यांची गाणी जबरदस्त लोकप्रिय होती . ‘ अलबेला ‘ या चित्रपटात मा.भगवान आणि गीता बाली या जोडीने जबरदस्त हल्लागुल्ला केला होता . त्या चित्रपटाला मिळाली , एवढी जबरदस्त प्रसिद्धी फार थोड्या चित्रपटांना लाभली असेल . शम्मी कपूर , बिग बी , गोविंदा , मिथुन हे नंतर आपल्या नृत्यशैलीने चाहत्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले नायक भगवान दादांच्या नृत्यशैलीपासून प्रेरणा घेत लोकप्रिय झाले .
इ.स.1938 च्या बहादुर किसान या आपल्या पहिल्या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली . इ.स.1938 ते इ.स.1949 या दरम्यान त्यांनी पिटातल्या प्रेक्षकांसाठी अनेक लो बजेट ॲक्शन व स्टंटपटांची निर्मिती केली . कामगार वर्गातल्या प्रेक्षकांकडून या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळत असे . इ.स.1941 साली त्यांनी ‘ वनमोहिनी ‘ हया जबरदस्त गाजलेल्या तामीळ चित्रपटाची निर्मिती केली .
इ.स.2016 साली भगवान दादांच्या जीवनावर शेखर सरतांडेल दिग्दर्शित ‘ एक अलबेला ‘ हा मराठी चित्रपट आला होता . त्या चित्रपटात मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी भगवान दादा आणि गीता बालीच्या भूमिका केल्या होत्या .
इ.स.1942 सालच्या एका चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी भगवान दादांनी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांना एवढ्या जोराची थप्पड मारली होती की , त्यांच्या डोळ्यात कायमचा दृष्टीदोष निर्माण झाला , आणि त्यांची कारकीर्द नायिकेच्या ट्रॕकवरून खलनायिकेच्या ट्रॕकवर वळली .
इ.स.1942 साली भगवान दादा चित्रपट निर्मितीकडे वळले .
‘ जागृती पिक्चर्स ‘ ह्या आपल्या संस्थेसाठी इ.स.1947 साली त्यांनी चेंबूर येथे जमीन खरेदी करून आपला ‘ जागृती स्टुडिओ ‘ उभा केला . आपला मित्र राज कपूर याच्या सल्ल्यावरून भगवान दादा सामाजिक चित्रपटांच्या निर्मितीकडे वळले . इ.स.1951 साली त्यांनी ‘ अलबेला ‘ ह्या चित्रपटाची निर्मिती केली . भगवान दादा , गीता बाली ही जोडी आणि सी.रामचंद्र यांचे संगीत यांनी ह्या चित्रपटातून इतिहास निर्माण केला . ‘ शोला जो भडके ‘ हे अलबेला चित्रपटातील गाणं तुफान गाजलं होतं . आलबेला चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत .
‘ सदाबहार ‘ अशीच गाणी आहेत ही . त्यानंतर इ.स.1953 साली भगवान दादा , गीता बाली या जोडीचा ‘ झमेला ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला . पण अलबेला एवढे यश हा चित्रपट मिळवू शकला नाही . तसेच इ.स.1956 सालचा ‘ भागम भाग ‘ हा खूप छान विनोदी चित्रपट बॉक्स अॉफिसवर फारसे यश मिळवू शकला नाही . किशोर कुमार या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत होता . किशोरकुमार शशिकला या जोडीचा हा चित्रपट अपेक्षेएवढा चालला नाही . भगवान दादांचीसुद्धा या चित्रपटात भूमिका होती .
कारकीर्दीच्या शिखरावर असताना जुहू बीचवर भगवान दादांचा पंचवीस खोल्यांचा बंगला होता . त्यांच्याकडे प्रत्येक वारासाठी वेगवेगळ्या अशा सात अलिशान गाड्यांचा ताफा होता .
भागम भाग नंतर भगवान दादांचा एकही यशस्वी चित्रपट आला नाही . आपला बंगला गाड्या सर्व काही भगवान दादांना विकावं लागलं . काय मिळतील त्या भूमिका त्यांना स्वीकाराव्या लागल्या . ‘ झनक झनक पायल बाजे ‘ आणि
‘ चोरी चोरी ‘ हे चित्रपट सोडले तर त्यांना नाव घेण्यासारख्या भूमिकाही मिळाल्या नाहीत . परिस्थितीच्या फटक्याने रावाचा रंक झाला . अफाट श्रीमंतीत लोळलेले भगवानदादा कफल्लक झाले . जुहू बीचवरील प्रशस्त बंगल्यातून भगवानदादा दादर येथील चाळीत एका खोलीत राहू लागले .
दादर येथील लालूभाई मेन्शन या चाळीत भगवानदादा रहात . गणेशोत्सवात त्यांच्या घरावरून जाणाऱ्या मिरवणूकीत अलबेला चित्रपटातील ‘ भोली सूरत दिलके खोटे ‘ या गाण्यावर त्यांनी चार पावले टाकल्यावरच मिरवणूक पुढे जात असे .
भगवानदादा हे पहिले असे नायक होते की , जे डमी न वापरता सर्व ॲक्शन सीन स्वतः करीत असत .
भगवानदादा हे हिंदी चित्रपट सृष्टीचे पहिले डान्सिंग स्टार होते .
राज कपूर हे भगवानदादांचे चांगले मित्र होते . त्यांच्याच सांगण्यावरून भगवानदादा स्टंटपटांकडून सामाजिक चित्रपटांकडे वळले .
इ.स.1951 साली आवारा , बाजी आणि अलबेला या चित्रपटांनी चंदेरी दुनियेवर राज्य केले होते .
‘ हंसते रहना ‘ हा चित्रपट भगवानदादांसाठी रडवणारा ठरला , भगवानदादांच्या ऱ्हासाचे कारण ठरला . या चित्रपटासाठी भगवानदादांनी आपली सर्व संपत्ती लुटली , अगदी पत्नीचे दागिनेसुद्धा गहाण ठेवले होते . किशोरकुमार त्या चित्रपटाचा नायक होता . किशोरकुमारच्या विक्षिप्तपणाचा भगवानदादांना चांगलाच फटका बसला . हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नाही , आणि भगवानदादा अक्षरशः देशोधडीला लागले .
‘ बाँबे टू गोवा ‘ ह्या बच्चन यांच्या पहिल्या चित्रपटात
‘ देखा न हाय रे सोचा न ‘ या गाण्यावर बच्चन यांना नाचायचे होते . ते काही बिग बी ना जमत नव्हते . भगवानदादांच्या स्टाईलने त्यांनी नाचायचा प्रयत्न केला . आणि पुढे तीच त्यांची स्टाईल झाली . आजही बॉलीवूडमधले टॉप कोरिओग्राफर्स ‘ भगवान दादा स्टेप्स ‘ या टर्मचा उपयोग करतात . गोविंदा , मिथुन हे स्टार्ससुद्धा भगवान दादांचे अनुकरण करत टॉपला पोहोचले .
ऋषीकपूर लहान असताना भगवान दादा त्याला डान्सिंग शिकवायचे ऋषीकपूर कायम त्यांच्या ऋणात होता .
दादांनी तीनशेहून जास्त चित्रपटात काम केले पण त्यांची प्रमुख भूमिका असलेला एकही मराठी चित्रपट नाही .
संगीतकार सी.रामचंद्र , गीतकार आनंद बक्षी , सुप्रसिद्ध गायक हेमंतकुमार यांना हिंदी चित्रपट सृष्टीत स्थिरावण्यास भगवान दादांची खूप मदत झाली .
शूटिंगच्या दरम्यान भगवान दादा उभ्या उभ्याच ‘ पॉवर नॕप ‘ घेत असत .
इ.स. 2002 साली त्यांच्या मृत्यूनंतर आपल्या शोक संदेशात पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी म्हणतात , ” भगवान दादाने अपनी अदाकारी और नृत्यके विशेष अंदाज के माध्यमसे हिंदी सिनेमामे हास्य अभिनेताओंकी पूरी पिढिको प्रेरित किया है . “
भगवान दादांच्या पडत्या काळात त्यांच्या सर्व निकटवर्तीयांनी त्यांची साथ सोडली . सी.रामचंद्र , ओमप्रकाश आणि राजेंद्रकृष्ण हे त्यांचे मित्र मात्र दादर येथील चाळीतल्या एका खोलीत सुद्धा त्यांना भेटायला येत . अत्यंत विपन्नावस्थेत दि.4 फेब्रुवारी 2002 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला . आपल्या निखळ विनोदी अभिनयाने कायम प्रेक्षकांना रिझवणाऱ्या ह्या आनंदी कलाकाराचा शेवट मात्र अत्यंत करुण झाला . भगवान दादांना आदरपूर्वक श्रद्धांजली !
©मुकुंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu