पु.ल.देशपांडे © मुकुंद कुलकर्णी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व
” इथे सखे नि सोबती …… कुणी इथे कुणी
तिथे ……. !
लेखन , संगीत , प्रयोगनिर्मिती , सादरीकरण , चित्रपट या सर्व अंगांनी मराठी मनाला कायम भुरळ घालणारा जबरदस्त आविष्कार म्हणजे पुलं ! मनावर नैराश्याचं मळभ आलं असेल आणि ते दूर करायचं असेल तर पुलंना पर्याय नाही . पुलंचं कुठलंही पुस्तक उघडा , कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात करा , सकारात्मक ऊर्जेचा सात्त्विक आनंद गॅरंटीड ! नैराश्य कुठल्या कुठे पळून गेलं समजणारही नाही . विनोदी लेखसंग्रह , हृदयस्पर्शी व्यक्तिचित्रं , आनंददायी त्याचबरोबर ज्ञानवर्धक प्रवासवर्णनं , कथा , कविता , नाटक मराठी साहित्यातील दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृतींची समीक्षा , बोरकरांसारख्या अफाट प्रतिभा लाभलेल्या कवींच्या कवितांचे वाचन , विलक्षण आनंददायी नाटकं , चित्रपट , त्यांचं संगीत , गोड चालींनी नटलेली अनेक भावगीतं , सबकुछ पुल अशा असा मी असामी , बटाट्याची चाळ , वाऱ्यावरची वरात इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण , किती प्रकारे समृद्ध केलं पुलंनी आपलं भावविश्व ! जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी बोललं जातं , लिहिलं जातं , वाचलं जातं तिथे तिथे तमाम रसिकांना पुलंच्या शतकोत्तर दुसऱ्या जयंतीच्या पुलकित शुभेच्छा !
मराठी वाचकांसाठी अवीट आनंदाचा ठेवा म्हणजे पुल .झाले बहु होतील बहु परंतु या सम हा ! पुल हा अथांग सागर आहे , त्याला गवसणी घालणे केवळ असंभव . सखाराम गटण्याचे शब्द फिरवून , ” हे म्हणजे काजव्याने सूर्याचे स्मरण करण्यासारखे आहे . ” असे म्हणण्यास हरकत नाही .
साहित्य , संगीत , चित्रपट , नाटक , एकपात्री प्रयोग , कथाकथन , खवय्या , उत्तम वक्ता सर्व क्षेत्रात मुक्त संचार आणि सर्व क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असे हे अलौकिक व्यक्तीमत्व . खऱ्या अर्थाने सर्वगुणसंपन्न . नभोवाणी , दूरचित्रवाणी या क्षेत्रातही यशस्वी . आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या . इ.स.1958 मध्ये आकाशवाणीने पुलंना मिडिया ऑफ मास कम्युनिकेशनच्या अभ्यासासाठी लंडनला बीबीसी कडे पाठवले होते . इ.स.1959 मध्ये भाई भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले . बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता तो . त्या कार्यक्रमात द्रुतगतीने तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्राविण्य दाखवून दिले होते . दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते . काही काळ पुलंनी प्राप्तीकर विभागात नोकरी केली होती . साहित्याचा समृद्ध वारसा पुलंना आपले आजोबा वामन मंगेश दुभाषी यांच्याकडून आला असावा . पुल बहुश्रुत होते त्यांना मराठी , इंग्रजी , हिंदी , संस्कृत , कानडी , बंगाली , कोकणी अशा अनेक भाषा अवगत होत्या .
पुलंचा जन्म मुंबईचा , त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले . त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झाले .इ.स.1946 साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले . त्यांचे सहजीवन समृद्ध आणि परिपक्व होते . मेड फॉर इच अदर ! भाईंचे वडील कोल्हापूरचे आई कारवारी आणि बहिण कोकणात दिलेली त्यामुळे घरात भोजनात विविधता असे . यातूनच पुलंमधला खवय्या घडला . मिष्किलपणा आणि अभिजात साहित्याची उत्तम जाण हा वारसा पुलंना आईकडून मिळाला .
पुलंनी जवळपास चाळीस वेगवेगळी पुस्तके लिहिली . त्यांच्या अनेक पुस्तकांच्या वीसाहून जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत . आजही पुल बेस्ट सेलर्सच्या लिस्टवर आघाडीवर असतात . अत्यंत निखळ , उच्च अभिरुचीसंपन्न , दर्जेदार विनोद हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे . असा मी असामी , खिल्ली , खोगीरभरती , गोळाबेरीज , नस्ती उठाठेव , बटाट्याची चाळ , मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास , हसवणूक ही त्यांची विशेष गाजलेली काही पुस्तकं . अपूर्वाई , पूर्वरंग , जावे त्यांच्या देशा , वंगचित्रे ही त्यांची अत्यंत वाचकप्रिय प्रवासवर्णने . अपूर्वाई किंवा पूर्वरंग च्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे पुलंचे प्रवासवर्णन हे टूरिस्ट गाईड प्रमाणे स्थळमहात्म्य सांगणारे वर्णन नसून , प्रवासात भेटलेल्या माणसांचे आणि प्रवासातल्या ‘ मी ‘ चे वर्णन आहे .
तुका म्हणे आता , अंमलदार , भाग्यवान , तुझे आहे तुजपाशी , सुंदर मी होणार , तीन पैशाचा तमाशा , मोठे मासे छोटे मासे , आम्ही लटिके ना बोलू , फुलराणी ही त्यांची काही गाजलेली नाटकं आणि एकांकिका .
पुलंच्या अफाट कर्तृत्वाला चित्रपटसृष्टीही वर्ज्य नाही . वंदे मातरम् , देवबाप्पा आणि गुळाचा गणपती ही ठळक उदाहरणं . ‘ गुळाचा गणपती ‘ हा तर सबकुछ पुलं . कथा , पटकथा , संवाद , संगीत हे तर पुलंचं कार्यक्षेत्रच . त्याव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन ही पुलंचच . खऱ्या अर्थाने हा ‘ सबकुछ पुलं ‘ चित्रपट . योग असा की , या चित्रपटाच्या प्रिमियरचं आमंत्रण पुलंना मिळालंच नाही , आणि हा प्रिमियर पुलंना चक्क तिकीट काढून पहावा लागला ! सबकुछ पुलं अशा या ‘ गुळाचा गणपती ‘ या चित्रपटावर पुलंची प्रतिक्रिया मोठी मार्मिक होती , ” पण प्रेक्षक सोडून हं ! “
एका कोळीयाने , कान्होजी आंग्रे , स्वगत हे काही त्यांचे सुप्रसिद्ध अनुवाद . मुक्काम शांति निकेतन हा पत्रलेखन संग्रह .
व्यक्ती आणि वल्ली , गणगोत , गुण गाईन आवडी , मैत्र , आपुलकी ही त्यांची सुप्रसिद्ध व्यक्तीचित्रे . रसिक हो ! सज्जन हो ! मित्र हो ! श्रोते हो ! ही गाजलेली भाषणे . असा मी असामी , बटाट्याची चाळ , वाऱ्यावरची वरात हे एकपात्री प्रयोग ही पुलंची साहित्य संपदा .
चितळे मास्तर , नंदा प्रधान , सखाराम गटणे , नारायण , अंतू बर्वा , नाथा कामत , रावसाहेब , हरीतात्या , हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका , नामू परीट या सारख्या त्यांच्या व्यक्ती चित्रणाचे गारुड मराठी मनावरून कधीच पुसले जाणार नाही .
गणगोत मधील आप्पा , ऋग्वेदी , म्युझिक डा(यरे)क्टर केशवराव भोळे , दिनेश , चिंतामणराव कोल्हटकर , चोभे , दया छाया घे , रामूभय्या दाते , इंटरनॅशनल दीक्षित , बळवंत मोरेश्वर पुरंदरे , मास्तर नसलेले फणसळकर मास्तर , बाय , रा.ज.देशमुख ( आणि मंडळी ) , रावसाहेब , मला दिसलेले विनोबा , हिराबाई . आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या माणसांचे केवळ अप्रतिम वर्णन .
साहित्य अकादमी , संगीत नाटक अकादमी , इत्यादी अनेक पुरस्कारांबरोबर पुलंना भारत सरकारने इ.स.1966 साली पद्मश्री व इ.स.1990 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवले .
अनेक सेवाभावी संस्थांना पुलंनी अर्थसहाय्य केले . अनेक समाजोपयोगी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे .
पी जी वुडहाऊस हे पुलंचे बेहद्द आवडते लेखक . वुडहाऊसच्या निधनाची बातमी कळल्यावर पुलंची प्रतिक्रिया , ” आय थॉट ही वॉज इम्मॉर्टल . ” ( उतार वयात आपल्या कन्येच्या दुर्देवी मृत्यूचा आघात सहन करावा लागल्यानंतर वुडहाऊस यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आय थॉट शी वॉज इम्मॉर्टल ) नेमकी हीच भावना पुलंच्या लक्षावधी चाहत्यांची आहे . वुडहाऊस बद्दल लिहिताना पुलंनी म्हटले आहे , ” वुडहाऊस हे एक व्यसन आहे …. वुडहाऊस आवडतो म्हणजे अथपासून इतिपर्यंत आवडतो . हे आपल्या बालगंधर्वांच्या गाण्यासारखे आहे …. ते संपूर्णच आवडायचे असते . अशा व्यसनांनी न बिघडता ज्यांना रहायचे असेल , त्यांनी अवश्य तसे रहावे . अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मात मानवतेचे कल्याण आहे , असा आग्रह धरणाऱ्यांनी या भानगडीत पडू नये (ते पडत नसतातच ! ) त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते . अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वैताग घेऊन ही माणसे जगत असतात …. कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिहिले नाही . जीवनाच्या सखोल तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही …. विनोदी लेखन हा त्याचा स्वधर्म होता . तो त्यांनी निष्ठेने पाळला . ” तंतोतंत हेच वर्णन पुलंना लागू पडते .
पुल , भीमसेन जोशी , कुमार गंधर्व , वसंतराव देशपांडे यांचे मैत्र हा तर वेगळ्या पुस्तकाचाच विषय ठरावा . महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटात पुलंचं व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्याचा एक चांगला प्रयत्न झाला आहे , पण पुलं हे व्यक्तिमत्त्वच एवढं अफाट आहे की , नव्वद मिनिटांच्या दोन भागात त्याला न्याय देणं केवळ अशक्य आहे .
बाकीबाब यांच्या कोकणी कविता सुनीताबाई आणि पुल हार्मोनियमवर सादर करीत तो आनंदयात्री अनुभव असे .
पुलंच्या हजरजबाबीपणाचे किस्से तर अगणित आहेत .
माणिक वर्मा यांचे लग्न ठरल्याचे कळताच पुलंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया , ” हिने तर वर्मावरच घाव घातला . “
वसंत सबनीसांनी पुलंना शरद तळवलकरांची ओळख करून दिली , ” हा माझा मित्र शरद तळवलकर . ” ” हो का ? अरे व्वा ! चांगला मनुष्य दिसतो , नव्हे हा चांगला असणारच याच्या नावावरूनच कळतय एकही काना , मात्रा , वेलांटी , उकार काही नाही म्हणजे हा माणूस सरळ असणारच ! “
कोल्हापूरला नाटकाचा प्रयोग असताना नाटकात काम करणारी एक अभिनेत्री कोल्हापूरी साजाचे रंगात येऊन वर्णन करीत होती , ” भरगच्च तर इतके की , एक साज घातला गळ्यात की दुसरं काही घालायलाच नको . ” भाईंची मिष्किल प्रतिक्रिया , ” खरं सांगतेस की काय ? “
एका समारंभात पुलंच्या एका बाजूला श्री ना.ग.गोरे आणि दुसऱ्या बाजूला भुजंगराव कुलकर्णी बसले होते .पुल म्हणाले , ” आफतच आहे एकीकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग ! “
पुलंचा एक चाहता , ” माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही ” माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोरच तुमचाही फोटो ठेवलाय त्यावर पुल म्हणाले , ” अहो असं काही करू नका नाहीतर लोक विचारतील , ज्ञानेश्वरांनी ज्याच्याकडून वेद म्हणवून घेतला तो रेडा हाच का म्हणून ? “
वाऱ्यावरची वरात , रविंद्रनाथ नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग . दुसऱ्या दिवशी लालजी देसाई बोहल्यावर चढायचे होते . लालजींचा हात धरून पुल रंगमंचावर आले आणि म्हणाले , ” उद्या याची वरात निघणार आहे पण तो आजच वाऱ्यावर स्वार होऊन आला आहे . “
आणीबाणी नंतरचा काळ प्रचार धुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची तुलना भग्वद्गीतेशी केली होती . गीतेचे अठरा अध्याय असताना अशी तुलना का केली असावी असा प्रश्न पडला आणि गीता उघडताच ” संजय उवाच ” असे शब्द आढळले आणि सगळा उलगडा झाला . ही होती पुलंची प्रतिक्रिया ! ” त्यांना आता कंठ फुटला आहे ” असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते .त्याचा समाचार घेताना पुल म्हणाले , ” गळा यांनीच दाबला आणि बोलू दिले नाही , आणि आता म्हणतात कंठ फुटला . ते असो ! पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही ! “
एकदा पुल कुटुंबीय आणि वसंतराव राधानगरी अभयारण्यात गेले होते . कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल गवा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला . तेंव्हा वसंतराव म्हणाले , ” भाई आय थिंक ही इज गोईंग टू चार्ज ” पुल म्हणाले रेड्याला कळू नये म्हणून इंग्लीशमध्ये बोलतोयस वाटतं ?”
पुल 75 अर्पण समारंभात जयंत नारळीकर आपल्या भाषणाच्या सुरूवातीला म्हणाले , ” बंधू भगिनीनो असे मी म्हणत नाही , कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे . ” पुलंची बोलण्याची पाळी आली तेंव्हा ते म्हणाले ,
” मला बंधू आणि भगिनी म्हणायला काहीच अडचण नाही . माझी पत्नीच मला भाई म्हणते ! “
आपल्या अनेक पैलूंसह लखलखीत चमकणारा हा महाराष्ट्राचा लाडका हिरा ! मराठी वाङमयाच्या क्षितिजावरील अढळ ध्रुव तारा असलेल्या ह्या सारस्वताला आदरपूर्वक प्रणाम !!
मुकुंद कुलकर्णी ©
9421454888
pc : google 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu