कवितेचे पान
कविता – स्वर्ग © चारुलता काळे
स्वर्ग
निळी निळाई, आकाशाची,
महासागरा मिठीत घेई.
आनन्दाने वेडा होऊन,
लाटा उधळित नाचे तोही.
लबाड ढग ते, जरा थांबुनी
चोरुन पहाती, त्या दोघांना.
शहाणा वारा, सावध होउन,
हळूच ढकलुन, देई त्यांना.
गडद निळाई, क्षितिजा वरती,
किना-यावरी, हिरवट होई.
हलकी फुलकी लाट फुटोनी,
रंग पांढरा खुलवुनी जाई.
निसर्ग जादू, न्यहाळताना,
भान विसरले, हरवुन गेले.
ब्रह्मानंदी रंगुन जाता,
स्वर्गाचे मज दर्शन झाले!
©चारुलता काळे
कविता – चांदणचुरा © गौतमी सिद्धार्थ
चांदणचुरा
बाई हा चांदणचुरा
पसरला गं अंगणी ।
श्वेत प्रकाशसागर
पदरी घेई धरणी ।।
डोळा दाटली आसवं
जीवाची होई काहिली ।
साजण माझा दुरदेशी
किती वाट मी पाहिली ।।
या गं चांदणचुर्यात
माझा चंद्र मी पाही ।
लवकर ये साजणा
मनी शितलता नाही ।।
तुझी रे छबी काढण्याचा
किती प्रयत्न मी रोज करी ।
आता पुरे झाली लपाछपी
समोर येण्याची हीच वेळ खरी
©®गौतमी सिद्धार्थ