ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात भाग ४© डॉ. मिलिंद न. जोशी

‘पेट्रोनाज टॉवर्स किंवा पेट्रोनाज ट्वीन टॉवर्स या नावाने ओळखली जाणारी ही जोड किंवा जुळी गगनचुंबी इमारत आहे. इ.स. १९९८ ते २००४ पर्यंत ही जगातील सर्वात उंच इमारत होती. नंतर तैपै १०१ व त्यानंतर बुर्ज खलिफा ह्या त्याहून उंच इमारती उभारल्या गेल्या. तरी देखील जगातील सर्वात उंच जोड इमारतीचा विक्रम मात्र पेट्रोनाज टॉवर्सच्या नावावर अजूनही अबाधित आहे. तसंच मलेशियातील ती अजूनही सर्वात उंच इमारत आहे. इमारतीची पायाभरणी १ जानेवारी १९९२ला होऊन, बांधकाम १ मार्च १९९३ला सुरू झालं. १ मार्च १९९६ला बांधकाम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन ३१ ऑगस्ट १९९९ला मलेशियाचे तत्कालीन पंतप्रधान महाथीर महंमद यांच्या हस्ते झालं. बांधकामाचा खर्च १.६ बिलिअन यू. एस. डॉलर्स इतका झाला. ८८ मजल्यांच्या ह्या इमारतीची उंची ४५१.९मी(१४८३फूट) असून त्यातील दोन्ही मनोऱ्यांमध्ये प्रत्येकी अडतीस उद्वाहक बसवण्यात आहे आहेत. केजर पेल्ली हे तिचे वास्तुविशारद असून थोर्णटन टोमॅसेट्टी व रॅनहील बेर्सेकुटु ह्यांनी संरचनात्मक अभियंता म्हणून काम पाहिले. इस्लामिक वास्तुरचनेवर आधारित आराखड्यानुरूप तिचं बांधकाम करण्यात आलं असून, बांधकामात प्रबलित सिमेंट काँक्रिटचा तर बाह्यभागात स्टील व काचेचा वापर करण्यात आला आहे. तिच्या बाहेरच्या बाजूस दिसणाऱ्या अर्धवर्तुळाकार रचना ह्या दिल्लीतील कुतुबमिनारच्या तळाकडच्या भागाशी साम्य दर्शवतात. दोन मनोऱ्यांपैकी एका मनोऱ्यात पेट्रोनाज कंपनीची कार्यालयं असून दुसऱ्या मनोऱ्यातील जागा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात आली आहे.’ अशी बरीच तपशिलात्मक माहिती त्यात दिली होती. त्यामध्ये काही भारतीय कंपन्यांचीही नावं वाचून समाधान वाटलं.

माहितीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आम्ही जिथे बसलो होतो तिथून पेट्रोनाज टॉवर्सचं अवलोकन करून दिलेली माहिती समजवून घेत होतो. पेट्रोनाज टॉवर्सच्या दोन्ही मनोऱ्यांना जोडणारा दुमजली स्कायब्रीज दिसत होता. त्याबद्दलही आकर्षण होतं. म्हणून त्याची माहिती वाचली. ‘दोन्ही मनोऱ्यांच्या ४१ व ४२व्या मजल्यांना हे स्कायब्रीज जोडतात. ते जगातील सर्वात उंचीवरील (जमिनीपासून १७०मी. किंवा ५५८फूट) दुमजली स्कायब्रीज आहेत. त्यांची लांबी ५८.४मी.(१९२फूट) असून त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते दोन्ही मनोऱ्यांना घट्टपणे जोडलेले नाहीत तर ते दोन्ही मनोऱ्यांतून आत-बाहेर सरकू शकतात. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ज्यावेळी मनोरे हलतात व आत किंवा बाहेर कलतात त्यावेळी अशी स्कायब्रीजची रचना त्यांना आधार व स्थिरता द्यायला उपयोगी पडते. तसंच आग किंवा इतर कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी अडकलेल्या माणसांना बाहेर पडण्याच्यावेळी, एका टॉवरमधून दुसऱ्या टॉवरमध्ये जाण्यासाठी देखील एक सुरक्षिततेचं साधन म्हणूनही त्या स्कायब्रीजचा उपयोग होऊ शकतो. अभ्यागत फक्त ४१व्या मजल्यावरील स्कायब्रीजवर जाऊ शकतात; ४२व्या मजल्यावरील स्कायब्रीज, पेट्रोनाज टॉवर्समधल्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. हे दुमजली स्कायब्रीज खालच्या बाजूने मध्यावरून, त्यांना आधार मिळण्यासाठी दोन्ही मनोऱ्यांच्या २९व्या मजल्यांना जोडलेले आहेत. आम्ही माहितीमध्ये दिलेल्या ४१,४२,२९ अशा मजल्यांची मोजणी करून सत्यता तपासण्याचा उगाचच निष्फळ प्रयत्न केला आणि मग तो प्रयत्न सोडून दिला. एव्हाना पावणेदहा होत आले होते. त्यामुळे आम्ही परत हॉटेलकडे निघालो. क्वालालंपूर स्थलदर्शनाच्या शेवटी संध्याकाळी परत तिथे येण्याचं ठरवलं.

 टॅक्सी चालक बोलका होता. आम्हाला त्याच्या उच्चारणातून बऱ्याच मलेशीय शब्दांचं मराठी, हिंदी शब्दांशी  साधर्म्य जाणवत होतं. के.एल. टॉवर, पेट्रोनाज टॉवर्सना तो ‘मेनार'(मिनार) संबोधत होता. तसंच पुस्तक, भाषा अशासारख्या शब्दांमध्येदेखील साम्य जाणवलं. राष्ट्रीय स्मारक, राजाचा राजवाडा दाखवून चालकाने आम्हाला बाटू केव्हजला नेलं.

बाटू केव्हज या नावाबद्दल काहीतरी गैरसमज झाला होता. मी ‘बाटू’ हा शब्द ‘बटू’चं मलेशीय उच्चारण समजत होतो आणि बटू म्हणजे छोटा, लहान. त्याअर्थी स्थलदर्शनाच्या नावाखाली काही लहानसहान गुहा दाखवायला टॅक्सी चालक नेत असावा, असा अंदाज बांधला होता. चालक ‘हिंदू केव्हज’, ‘हिंदू टेम्पल’ असंही अधूनमधून म्हणत होता; त्यामुळे ‘बाटू’ म्हणजे ‘बटू वामना’शी संबंधित काही धार्मिक स्थळ असण्याची शक्यता देखील वाटू लागली. रस्त्यात लांब अंतरावरूनच डाव्या बाजूस सोनेरी रंगाची  मूर्ती नजरेस पडली आणि टॅक्सी चालकाने त्या दिशेने अंगुलीनिर्देश करत बाटू केव्हज जवळ आल्याचं दर्शवलं.

त्याने बाटू केव्हजच्या समोर असलेल्या वाहनतळावर गाडी उभी केली. आम्ही टॅक्सीतून उतरलो आणि समोरच्या दृश्याने माझ्या बाटू म्हणजे बटू ह्या समजालाच धक्का बसला. समोर उजव्या बाजूस आम्हाला टॅक्सीतून, लांब अंतरावरून दिसलेली सोनेरी मूर्ती होती. लांबून तिच्या उंचीचा अंदाज आला होता पण जवळून पाहिल्यावर तिची भव्यता लक्षात आली. डाव्या बाजूस एक अतिउंच असा अनेक पायऱ्यांचा जिना दिसत होत्या. टॅक्सी चालकाने त्या पायऱ्यांच्या वरच्या टोकावर असलेल्या गुहांकडे आमचं लक्ष वेधलं आणि आम्हाला त्या पाहून यायला सांगितलं. बाजूलाच असलेल्या एका स्टॉलवर एक माहितीपत्रक विकत घेतलं. त्यात त्या ठिकाणाची त्रोटक पण उपयुक्त माहिती होती. काही फोटो देखील होते. बाजूच्या कट्टयावर बसून त्यातल्या माहितीचं सार्वजनिक वाचन केलं आणि समोरच्या २७२ पायऱ्यांच्या चढाईसाठी मानसिक तयारी केली. 

एका टप्प्यात सर्व पायऱ्या चढणं शक्य नव्हतं. अधूनमधून थांबत पायऱ्या चढून वर गेलो आणि आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य दिसलं. गुहेत विविध हिंदू देवतांच्या मूर्ती होत्या. गुहा मागच्या आतल्या बाजूस वरून उघडी आहे. गुहेत वानरसेनाही भक्तगणांच्या स्वागतासाठी सज्ज होती. देवदर्शन झालं. थोडा वेळ तिथे थांबलो आणि परतीची वाट धरली. २७२ पायऱ्या एक टप्प्यात उतरलो.

तिथून परतताना मेर्डेका स्क्वेअर, सेंट्रल मार्केट, मेनारा क्वालालंपूर(के.एल. टॉवर) पाहून चालकाने आम्हाला परत पेट्रोनाज टॉवर्सपाशी सोडलं. तिथून आम्ही हॉटेलला परत जाऊ शकत असल्याबद्दल त्याला खात्री होती. पेट्रोनाज टॉवर्सच्या खाली असलेल्या सुरिया(‘सूर्य’चं मलेशीय रूपांतर व उच्चारण) मॉलमध्ये शिरलो आणि पेट्रोनाज टॉवर्सच्या ४१व्या मजल्यावर जाण्यासाठीच्या प्रवेशासाठीची चौकशी केली; पण तिथे फक्त आगाऊ आरक्षणानेच ठराविक जणांनाच एकावेळी प्रवेश दिला जात असल्याचं समजलं. आमचं नंतरच्या दिवशीचं गेंटिंग हायलँड्स टूरचं आरक्षण केलेलं असल्यामुळे व त्यानंतरच्या दिवशी आम्हाला सिंगापूरला परतायचं असल्यामुळे आम्हाला ते शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच फिरलो. बाहेर पडलो आणि पेट्रोनाज टॉवर्सच्या पायथ्याशी उभं राहून त्याची भव्यता अनुभवली. हॉटेलला परतायच्या आधी हॉटेल जवळच्या ‘चायना टाऊन’ विभागात शिरलो. तिथेच जवळ असलेल्या श्री महामरिअम्मांन मंदिरात शिरलो आणि खास दक्षिण भारतीय मंदिराची प्रचिती आली; एक वेगळी अनुभूती मिळाली. क्वालालंपूर स्थलदर्शनाची सुरुवात देवदर्शनाने झाली होती. शेवटही देवदर्शनाने  झाल्याने प्रसन्न वाटलं.

(ह्या लेखातील ‘पेट्रोनाज टॉवर्स’बद्दलची तपशीलात्मक माहिती माझ्या ‘प्रतिकस्थळं’ ह्या नुकत्याच उपलब्ध झालेल्या पुस्तकात समाविष्ट झालेली आहे. प्रस्तुत क्रमशः लिखाणाच्या दृष्टीने आवश्यक म्हणून इथे दिली आहे.)

मागील लेखाची लिंक  :  ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात भाग ३ © डॉ. मिलिंद न. जोशी – Thinkmarathi.com

 

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com   
pc:google

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu