जिवतीची पूजा
श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुळाचार आहे.श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस “सवाष्ण करणे” म्हणतात.
श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत.प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.
श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.
त्या दिवशी स्वयपाकांत मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी ई. करावा.देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.
सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
जिवतीची पुजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे.
श्रावण महिन्यातील कहाणी जिवतीची…….
एक आटपाट नगर होते. तिथल्या राजाला मूल नव्हते. सर्व सुखे हात जोडून उभी असली तरी त्याचा जीव रमत नव्हता. राणी कष्टी होती. ती सारखी आसवे ढाळी. माझी कूस उजव म्हणून देवाला विनवी. पण तिची व्यथा संपली नाही. मग तिने एका सुइणीला बोलावले. म्हणाली , ‘ मला कोणाचे तरी नाळ-वारीचे मूल आणून दे. तुला सोने-नाणे देईन. ‘ सुइण कबूल झाली. राणीने गरोदरपणाचे सोंग केेले. नऊ मास पूर्ण होत आले असता गावातील एक ब्राह्माणी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. सुइणीने तो नाळ-वारेसहीत राणीच्या कुशीत नेऊन ठेवला आणि ब्राह्माणीला म्हणाली की बये , तुला वरवंटा निपजला. इथे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा झाला. राजाला जगण्यात अर्थ गवसला. राणीच्या कुशीत बाळाचा ट्यॅहा फुटला.
ब्राह्माणी मुलाच्या आशेने झुरू लागली. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करू लागली. ‘ जिथे माझा बाळ असेल तिथे तो खुशाल असो ‘ म्हणत सर्व दिशांना तांदूळ उडवू लागली. ते तांदूळ राजवाड्यात राजपुत्राच्या अंगावर पडू लागले. ब्राह्माणीने हिरवे लुगडे , हिरव्या बांगड्या र्वज्य केेल्या. ती कारलीच्या मांडवाखालून जाईना. तांदुळाचे धुवण ओलांडीना. मुलगा मोठा झाला. राज्याचा राजा झाला. एक दिवस ब्राह्माणी त्याच्या नजरेस पडली. तिचे देखणे रूप पाहून त्याच्या मनात पाप उत्पन्न झाले. तिच्या दारातील वासराच्या शेपटीवर त्याचा पाय पडला. गाय वासराला म्हणाली , ‘ जो आपल्या आईची अभिलाषा धरायला कचरत नाही , तो तुझ्या शेपटीवर सहज पाय देईल. ‘ राजाला पश्चाताप झाला.
पुढे तीर्थयात्रा करून त्याने सर्व प्रजेला जेवायला बोलावले. ब्राह्माणीही तेथे आली. राजा पंक्तीत तूप वाढू लागला. तिच्या पानापाशी तो येताच तिला पान्हा फुटला आणि त्याची धार राजाच्या तोंडात उडाली. राजाला राग आला. पण त्याची राणीआई त्याला म्हणाली , ‘ बाळ , हीच तुझी खरी आई. ‘ राजा आईच्या पाया पडला. आई-वडिलांना वाडा बांधून दिला. जिवती त्या सर्वांवर प्रसन्न झाली.
अशी ही जिवतीची कहाणी.
आजही श्रावण आला की पहिल्या शुक्रवारी भिंतीवर केशराने अथवा गंधाने जिवतीचे चित्र काढतात. घराघरात भिंतीवर मुलालेकरांच्या गराड्यात रमलेल्या जिवतीचा कागद लावतात. पूजा करतात. तेरड्याआघाड्याची पानेफुले आणि दुर्वांची माळ करून देवीला घालतात. कणकेचे पाच दिवे करून देवीला ओवाळतात. ‘ माझे बाळ जिथे आहे त्या दिशेला मी अक्षता टाकतेय , हे जिवतीआई , तू त्याचे रक्षण कर. ‘ अशी मनोमन प्रार्थना करतात. पुरणावरणाच्या जेवणाने पुजेची सांगता करतात.
काळ बदललाय. जगणे बदलले. रोजचे संदर्भ बदलले. तरी आईची माया तशीच राहिली. ही माया आटत नाही तोवर जिवती प्रसन्नच राहणार. ती तशीच राहो ही तुम्हाआम्हा सर्वांची प्रार्थना. ती सुफळ संपूर्ण होवो.
pc:google