अधिकस्य अधिकम् फलम् ?

भारतीय व इंग्रजी सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. मात्र हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे वर्ष ३५५ दिवसांचे असते.म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे.अधिक महिना असलेले वर्ष ३९६ दिवासांचे असते. इतर वर्षांत ३६५ दिवस ५ तास, ४५ मिनिट व १२ सेकंद असतात.
भारतीय पंचांगामध्ये अधिकमासाला ‘तेरावा महिना’ म्हटले आहे. सूर्य बारा राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. ३२ महिने, १६ दिवस व चार घटकांनंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, तो अधिक महिना मानला जातो व त्याला ‘मलमास’ असे सुद्धा म्हटले जाते. .त्याला पुढील चांद्रमासाचे नाव देतात. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो उदा. या वर्षी अश्विन हा अधिकमास आहे तो यापूर्वी १९८२, २००१ या वर्षी आला होता तसेच पुढील २०३९ , २०५८ ….याप्रमाणे असेल. तेच इतर महिन्याचे सर्वसाधारपणे. काही अपवाद असू शकतात. वैदिक काळात अधिक महिन्याला संसर्प, मलीमलूच असे म्हटले गेले आहे.
या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो.
हिरण्यकश्यपूला बारा महिन्यात कधीच मरणार नाहीस असे वरदान मिळाले होते म्हणून अधिक मासामध्ये श्रीविष्णूंनी श्रीनरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला त्यामुळे साहजिकच हा मास त्यांच्या स्तवनाचा आहे. म्हणून त्यास पुरुषोत्तम मास असेही संबोधिले जाते.या महिन्यांत उपास, यज्ञ , याग,हवन करण्यांत येतात तसेच श्रीमतभगवद्गीता, भागवतपुराण, श्री विष्णूपुराण ,पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप,
श्री विष्णूसहस्रनाम यांचे देवालयांत आणि घरोघरीही श्रद्धेने पठण केले जाते. रोजच्या अध्यामिक वाचनाने मन:शांती ही प्राप्त होते.
या महिन्यात दानाचे ही विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथांमध्ये तिथीनुसार अन्न, वस्त्र ,जडजवाहीर इ . चे दान करण्यास सांगितले आहे. हिंदू पद्धतीत ,मुलगी जावयाला लक्ष्मी -नारायण समजले जाते म्हणून अधिक मासामध्ये त्यांना भोजनास आमंत्रित करून ३३च्या पटीत अनारसे, मैसूरपाक , बत्तासे असे जाळीदार पदार्थ वाण म्हणून दिले जातांत.याला धोंड्या चा महिना असेल संबोधिले आहे कारण अधिक मासाच्या पंगतीत धोंड्याला महत्व आहे. पुरण घालून केलेल्या चौकोनी पदार्थाला दिंड म्हणतात ,तर त्याला गोल आकार दिला की धोंडा म्हणतात .हा धोंडा वाफेवर उकडून , गरम गरम वाढला जातो नि मधोमध फोडून मोदकाप्रमाणे साजूक तूप घालून खाल्ला जातो.
या अधिक मासाचेही कोणत्याही गोष्टीसारखे मार्केटिंग झाले आहे. आज बाजारात ,अनारसे , मैसूरपाक , बत्तासे ३३च्या पटीत आकर्षित पॅकमध्ये सजून बसले आहेत. कपडे, भांडी या दुकानांबरोबर सुवर्णपेढ्याही विविध भेटवस्तूंनी सजल्या आहेत. आधुनिक काळांत पुराणकाळातील दानमहात्म्य फक्त जावयाला वाण देण्यापर्यंत संकुचित झाले आहे.
लक्ष्मीनारायण जोडा वगैरे ठीक आहे पण ही पद्धत कां असावी याची मीमांसा माझ्या दृष्टीने करण्याचा प्रयन्न करत आहे , पटते कां बघा.
लहान वयांत लग्न झालेल्या मुली एकदा कां सासरी गेल्या की रांधा,वाढा,उष्टी काढा या सासरच्या एकत्र कुटुंबाच्या रगाड्याला जुंपल्या जात. बाराही महिने घरचे सण, परंपरा ,आन्हिके यांतच गुरफटून जात. सारा कारभार स्वयंपाकघर , परसदार आणि कधीतरी वेशीपर्यंतचे देऊळ ! हा एकच महिना असा की शुभकार्ये वर्ज्य .त्यामुळे मुलीला माहेरी जायची परवानगी.घरोघरच्या माहेरवाशिणी माहेरी येऊन आजच्या भाषेत रिलॅक्स होत असणार. आई वडीलही कोणती कार्ये नाहीत, म्हणून त्यांचे लाड करण्यास थोडेफार मोकळे असणार. आणि मग महिना संपताना ,जावईबापू येणार त्यांच्यासाठी ऐपतीप्रमाणे पक्वान्नाचे भोजन, म्हणून धोंडा ,सर्वात सोप्पा, पुरण आणि घरचे दूधदुभते म्हणून तुपास कमतरता नाही. तेव्हां अनारसेच विशेष करून वाण स्वरूपांत दिले जात कारण आधी करून ठेवता येणारी ही मिठाई शिवाय प्रवासांत (त्याकाळी बैलगाडी ) तुटणार नाही आणि हवेने खराब होणार नाही. हे कारण मीच ठरवित आहे,कारण गुगल केलं तिथेही काही नाही. पण त्यांवर खूप विचार करीत होते की जाळीदारच पदार्थ कां ? तेव्हां या उत्तरावर शिक्कामोर्तब करण्याआधी इतर काही मजेशीर कल्पना सुचल्या,एक सांगते. मिठाया खूप प्रकारच्या आहेत , प्रतीकात्मक गोड पदार्थ देण्याची परंपरा , की अशीच गोडी संसारात राहो. तर हे जाळीदार पदार्थ गोड आहेतच पण मधेमधे हवा असूनही सर्व अणुरेणू एकमेकांना जोडून आहेत आणि अतिशय खुसखुशीत आहेत. सर्वसाधारण गोड पदार्थांसाखे , मऊ , चिकट व पाणीदार नाहीत. तर हे पदार्थच वाण देतांना त्यांना असे सांगावयाचे आहे कां , की अशी हवा …आताच्या भाषेत Space जर पत्नीलाही मिळाली तर संसार गोड तर होईलच पण खुसखुशीतही होईल अनारश्यासारखा !! 😊
असो.
बाकी वस्त्रे , दागिने ऐपतीनुसार.तीन वर्षांतून एकदाच !! पुन्हां पोरगी तीन वर्षांनीं दिसणार ! ती सुद्धा त्यावेळी तिच्या घरी कांही अडचण नसेल तर ! परत जातांना मुलीच्या भावना काय असतील !!
आजच्या काळांत यांतील काय शिल्लक आहे? मुली आजकाल तीस -पस्तीस वयांपर्यंत लग्न करीत नाहीत. तोंवर आर्थिकदृष्ट्या सबल असतात. (इथे मी मध्यमवर्ग आणि त्या वरचे वर्ग यांबद्दल विचार मांडत आहे की जे या वाण प्रकारचे स्तोम माजवितात . आजच्या भाषेत show ! ) त्यांची निवड, आवड यांप्रमाणे सारे वॉर्डरोब , अगदी बुटांपासून केसांच्या रंगापर्यंत सारे कांही. जावई ही तसेच. लग्न झाल्यावर एका गावांत असतील तर वारंवार भेटी होतात, न पेक्षा रोज फोन /विडिओ कॉल आहेच. सासरीही अतोनात जबाबदारी, केवळ घरकाम , व्रतवैकल्य यांत दमणूक असले प्रकार नाहीत. तर अशा दोघांना वाण देणे हे परंपरा cum हौस या लेबलखाली येऊ शकेल. हौस करा बापडे पण जर थोडी सामाजिक जबाबदारी उचलली तर? शिवाय जेवढा जावई प्रिय तेवढीच सूनही. जशी आपली मुलगी सून म्हणून तिच्या सासरच्यांनी कदर करते तशीच दुसऱ्यांची मुलगी आपली सून , आपल्यावर ही प्रेम करते. माझ्यामते, सून -मुलगा , जावई -मुलगी सारे समान. वर्षभर कसले कसले days साजरे होतांत , शिवाय वाढदिवस , विवाहदिन असे खास दिवस !! त्यामुळे देवाणघेवाण सतत सुरु असतेच नाही कां ?
मग या निमित्ताने थोडीफार सामाजिक बांधिलकी निभावली तर? कोणत्याही नवीन विचाराची सुरुवात आपल्या घरांपासून करावी असे माझे वडील म्हणत आणि आचरणात ही आणीत.उदा. आजकाल लग्नांत अहेर नको हे सहजपणे स्वीकारले गेले आहे पण माझे लग्न हे मुंबईतील प्रथम लग्न की ज्या निमंत्रणपत्रिकेत “अहेर नको ” हे सर्वप्रथम लिहिले आणि पाळले गेले ते माझ्या वडिलांचाआग्रह म्हणून. त्या काळांत यांवर वादविवाद झाले, अग्रगण्य वर्तमानपत्रांतून चर्चा रंगली.
तर अशा वडिलांची मुलगी म्हणून मी यावर्षी माझ्या मुली जावयाला वाण दिलंच शिवाय मुलगे , सुनांनाही आणि ते हे की ,हिंदू नववर्ष स्वागत समिती , दहिसर , भारतांतील सीमारेषांवर तैनात असलेल्या जवानांसाठी दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम करते. यां उपक्रमाद्वारे सैनिकांना ,ज्यांचे आम्ही शतश: ऋणी आहोत , माझ्या मुलां, सुनां, जावयातर्फे दिवाळी फराळ पाठविला . माझे हे वाण या सर्वांना मनापासून आवडले, भावले की त्यांनी बॉक्समधून पाठविण्यासाठी सैनिकांना शुभेच्छा पत्रेही लिहिली.
मी हे केले, आपणही सामील झालांत तर ? अधिकस्य अधिकम् फलम् !!
पटतंय कां ?

…….नीला बर्वे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu