‘समर्थन-एक साथ’©️अनुजा बर्वे.
आई मुलांना पाठींबा -साथ देत असतेच
पण ….
लेकही जेव्हा आईच्या विचारांचं समर्थन करते, तिला सक्षमपणे पाठिंबा देते तेव्हा ती ‘आईची आई’ च तर होते की !!👍
खरं नाही नं वाटतै ??😲😲
कथाबीज सत्य आहे, ज्यावर शब्दारोपण करून कथा फुलवली
आहे.😊
‘समर्थन-एक साथ’
“हॅलोss, हं, बोला ना आई”
“खूप कामात आहेस का ? नंतर करू फोन??”
“काम होतच राहिल, बोला तुम्ही”
“लवकर यायला जमव की गं थोडं! मला बोलायचंय तुझ्या आईबद्दल! लक्षात आहे नं? “
नेत्राला पलिकडून बोलणारया सासूबाईंच्या सूरातली अधीरता चांगलीच जाणवली.
“हो, हो, !! निघेनच लवकर आॅफिसमधून !ठीकै ??”
उरलेलं काम पटापट हातावेगळं केलं नेत्रानं. उद्या उरकण्याच्या अावश्यक त्या कामांचे पेपर्स अनुक्रमे लावून एका फाईलीत घालून ,फाईल ड्राॅवर मध्ये ठेवली तिनं नि ड्राॅवर लाॅक करून ती निघाली.
अस्वस्थता दाटून आली होती मनात पण ट्रेनमधल्या विंडोवर
डोकं टेकून बसलेल्या नेत्राला वारयाच्या सुखद गारव्याने विसावल्यागत झालं.
‘काय सांगतील सासूबाई ?’
‘माझ्या आईला घेतील का समजून?’
‘केवळ लेक म्हणून नाही, तर एक ‘स्त्री’ म्हणूनही आईच्यापाठी खंबीर ऊभी राहून मी आईच्या विचारांना दिलेला दुजोरा सासूबाईंना मानवला असेल का ?‘
‘आम्ही माय-लेकींनी मिळून घेतलेल्या निर्णयाला सपोर्ट करतील का त्या ?🤔’
एकेका स्टेशनापाठोपाठ झालेल्या ट्रेन मधल्या वाढत्या गर्दीप्रमाणे नेत्राच्या मनातही असंख्य प्रश्नांची गर्दी झाली.
‘चैतन्य’ सदनात रहायला जाण्याचा निर्णय घेणं आईसाठी किती ‘अपरिहार्य’ होतं हे अगदी सविस्तरपणे सासुबाईंना सांगतानाचा प्रसंग नेहाच्या डोळ्यांसमोर तरळला.
“नेत्रा, अगं गेल्या पाऊणेक महिन्यात तुझ्या आईचा एक्कही फोन नाही😮 काय झालंय ? सगळं ठीक आहे नं ??”
“आई, तेच बोलायचं होतं तुमच्याजवळ ! थोडं अवघडल्या सारखं वाटतंय पण सांगावंसंही वाटतंय”
“अगंs, म बोल की !! विनासंकोच सांग अगदी ! बोललीस की मोकळं वाटेल बघ “
“माझी आई वृध्दाश्रमात , साॅरी , त्या संचालकांना वृध्दाश्रम असा उल्लेखही केलेला आवडत नाही , ‘चैतन्य सदनात’ जाऊन राहिलेय.
तिच्या ह्या निर्णयाला माझा पूर्ण पाठींबा आहे”
“काsssय ? 😳अगं पण का ?”
“ थोडं पहिल्यापासून सांगते. आईच्या माहेरची परिस्थिती तशी बेताची ! पाठीवर दोघी बहिणी. आर्थिक गरजेपायी वयाच्या १८ व्या वर्षापासूनच आईची नोकरी सुरू झाली. विशी जेमतेम गाठली असेल नसेल तोच माझ्या अप्पांकडून मागणी घातली गेली.
‘हो-नाही’ म्हणण्याचा चाॅईस आपल्याला नाही हे जाणण्याएवढी समजूत असल्याने आई लग्न करून ठाण्याच्या ‘अप्पांच्या’ घरात आली देखिल. आईचा ‘समजूतदारपणा’ तिच्या पाठीशी ‘भोग’ म्हणून उभा राहिला की ‘अप्पांच्या’ रूपातला ‘भोग’ तिनं समजूतदारपणे स्विकारला, हे एक कोडंच आहे”
“अप्पा अंमळ कडक वाटतात खरे! पण कायम चेहरयावर हास्य पांघरलेल्या तुझ्या आईच्या मनातली अस्वस्थता मात्र नाही जाणवली कधी “
“ तेच सगळं शेअर करायचंय मला. अप्पांचे आई-वडिल नि अप्पा , यांच्या तालावर नाचण्यात अख्खं आयुष्य वेचलं आईने !कमावती अन् क्रीयाशील असूनही ना आर्थिक सत्ता , ना घरात अधिकार ! जिच्यामुळे घराला ‘घरपण’ होतं तिलाच
‘हे घर माझं आहे ‘ असं सांगत अप्पा जेरीस आणायचे.
श्वासावर यमाचा नि रोजच्या जगण्यावर अप्पांचा अधिकार आहे हे मान्य करून जगणारया माझ्या आईला ‘साथ’ देण्याचं माझ्याही मनात होतंच नि पाऊण महिन्यापूर्वी ती ‘वेळ’ आली”
“म्हणजे गं ? नि हे तू आत्ता सांगतेयस ?”
“ आई, विश्वास ठेवा प्लिज ! तुमच्यापासून लपवायचा हेतु नव्हता, पण शब्दांची जुळवाजुळव करता येत नव्हती ,नीट समजावून सांगायला !😔
त्यादिवशी आईच्या तोंडून हे👇ऐकून मी आवाक् झाले अक्षरश:!
‘ज्याचा त्याचा आपलाआपला जीवनप्रवास असतो गं! माझी तक्रार नाही गं आयुष्याबद्दल काही, पण मरायच्या आधी चार मुक्त श्वास घ्यावेसे वाटू लागलेत एवढं खरं !आर्थिक सत्ता वगैरे नसल्याची खंत नाही नि ती करत बसण्याइतका वेळ तरी हाताशी आहे की नाही तेही अज्ञातच ! पण निवासखर्च नि सरणखर्च नक्की भागेल एवढं दरमाही पेन्शन माझ्या अधिकारातलं आहे. घर ‘अप्पांचं’ आहे तेव्हा आता ते पूर्ण त्यांच्या ताब्यात देऊन मी ‘चैतन्या सदना’त रहायला जायचा निर्णय मनाशी पक्का केलाय.कुणाकुणाला हा एकप्रकारे ‘घटस्फोट’ वाटू शकतो पण तसं नाही. सगळेच प्राणीमात्र including मनुष्यप्राणी गरजेनुसार स्थलांतर करतात तद्वत्
माझं पहिलं स्थलांतर माहेरहून सासरी नि आता हे दुसरं स्थलांतर किंवा व्यवस्थांतर ! ‘
हे सगळं माझी आईच बोलतेय नं नक्की 🤔 ह्या संभ्रमाने हैराण होऊनही मला तिच्या ह्या निर्णयाचा खूप्पच अभिमान वाटला😊 अन् अप्पांना हे ठासून सांगण्यापासून ते ‘चैतन्य सदनात’ पाऊल पडेपर्यंत मी आईच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले”
“😶..😷”
सासूबाईंची ही स्तब्ध अन् मूक प्रतिक्रिया तशी अपेक्षित होतीच नेत्राला.
“तुम्हाला काय वाटलं आई हे सगळं ऐकल्यावर ? मी योग्य तेच केलं नं ?Take your time हं, तुमचं मत द्यायला”
थांबलेली ट्रेन एकदम रिकामी व्हायला लागल्याने आपलं शेवटचं स्टेशन आल्याचं लक्षात येऊन नेत्राची विचारशृंखला तुटली नि लगबगीनं खाली उतरलेल्या नेत्राला कधी एकदा घरी पोचतोय असं होऊन गेलं.
“ लवकर यायचं जमवलंस ते छानच झालं हो !हातपाय धुवून घे, कीचनमध्येच बसू. मी चहा टाकते एकीकडे”
नेत्रासाठी दार उघडून सासूबाईंनी आपला मोर्चा कीचनकडे वळवला.
‘ सासूबाईंची बहुतेक सकारात्मक प्रतिक्रिया येणार’ असं त्यांच्या सुरातच जाणवलं नेत्राला. गेल्या दहावर्षांच्या सहवासात एवढी जवळीक नि ओळख तर नक्कीच झाली होती दोघींची !!😊
“नेत्रा , परवा १ महिना होईल नं तुझी आई ‘चैतन्य सदनात’ गेलेल्याला ? परवा सकाळी लवकर निघून आपण दोघी तिथे सदनात जाऊया . मी फोन लावून १ दिवसासाठी गाडी रेंट केली सुध्दा ! घरातली जबाबदारी तुझ्या -माझ्या नवरयावर सोपवू .
एक दिवस चालतंय की ! 😃
मस्त ‘लेडिज डे-आऊट’ करून “चैतन्यमय” होऊ तिघी, कसं ?🤓”
कीचनमध्ये डायनिंगटेबलवर बसलेली नेत्रा
‘साश्रु नेत्राने’ पहातच राहिली सासूबाईंच्या
उत्फुल्ल मूर्तीकडे !!!😌
©️अनुजा बर्वे.