ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात भाग ३ © डॉ. मिलिंद न. जोशी
क्वालालंपूर आलं. ऑर्किडच्या देशातून आम्ही जास्वंदीच्या देशात आलो होतो. त्याच्या खुणा रस्त्यावरील दिव्यांच्या खांबांवरही दिसत होत्या. त्या दिव्यांच्या भोवती लाल जास्वंदीच्या फुलांच्या आकाराचं सुरेख, कलात्मक आच्छादन केलेलं होतं. पुदुराया बस टर्मिनसच्या बाजूला आमची बस थांबली. आम्ही उतरलो. समोरच आम्ही आरक्षित केलेलं ‘हॉटेल अंकासा’ दिसलं. हॉटेल काउंटरवरचे कर्मचारी मलेशियाच्या राष्ट्रीय पोशाखात दिसत होते. त्यांनी आमचं स्वागत केलं.अडीच वाजले होते. आम्ही काउंटरवर त्यादिवशीच्या पर्यटन शक्यतेची चाचपणी केली. उशीर झाल्यामुळे, अर्ध्या दिवसाच्या क्वालालंपूर शहर दर्शनाचीही शक्यता नसल्याचं समजलं. तेव्हढ्यात माझ्या मनात ‘पुत्रजया’ ह्या मलेशियाच्या मुद्दामच वसवलेल्या प्रशासकीय राजधानीची आठवण झाली. पुत्रजया संदर्भातील माहिती माझ्या वाचनात आली होती. क्वालालंपूरहून एक ते सव्वा तासात तिथे पोहोचता येतं, अशी माहितीही त्यात होती. पुत्रजयाची संध्याकाळची सुरेख छायाचित्रं पाहिली होती. त्यामुळे पुत्रजयासाठी हॉटेलमार्फत टॅक्सी ठरवली. टॅक्सी येईपर्यंत आम्ही फ्रेश झालो.
अर्ध्या तासात टॅक्सी आली. टॅक्सी चालक बोलका होता. त्याचं इंग्रजीही बरं होतं आणि आम्हाला समजत होतं. पावणेचारला आम्ही निघालो. पाचपर्यंत पुत्रजयाला पोहोचणं अपेक्षित होतं. चालक रस्ता चुकला. त्याच्या चेहेऱ्यावर ‘ गोंधळणे, ओशाळणे, संकोचणे, घाबरणे’ ह्याचं मिश्रण दिसू लागलं. मी त्याला त्याबद्दल विचारलं. त्याने रस्ता चुकल्याची व तो पुत्रजयाला प्रथमच जात असल्याची प्रांजळ कबुली दिली. मी त्याला धीर दिला; वाटेत एक-दोन ठिकाणी चौकशी केली आणि पुत्रजयाला सहाला पोहोचलो. थोडा वेळ पुत्रजयात टॅक्सीतूनच फिरलो आणि मग पुत्र मशीद ह्या पुत्रजयातील प्रमुख मशिदीसमोरच्या विस्तृत चौकात उतरलो. मशिदीला लागूनच, एका बाजूस मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांचं कार्यालय होतं, तसंच इतर प्रशासकीय इमारती त्या चौकाच्या बाजूंनी दिसत होत्या. अंधारु लागलं, तसं त्या परिसरातील सरकारी कार्यालयांवर सौम्य प्रकाशझोत पडले आणि तो सर्व परिसर अधिकच खुलून आला. गुलाबी ग्रॅनाईटचा वापर पुत्र मशिदीच्या बांधकामात करण्यात आला आहे. प्रकाशमान झाल्यावर, तर ती अधिकच सुंदर दिसू लागली. त्या परिसराची सायंकाळची सुरेख छायाचित्रं आंतरजालावर मी पाहिली होती आणि त्याची प्रचिती मी घेत होतो. एका विलक्षण अनुभवातून मी गेलो. तेव्हढ्यात मशिदीतून अतिशय सुरेल अशी बांग कानावर पडली आणि तो सर्व परिसर भारावला गेला. सुखद, मंद वारा सुटला होता. पंचेंद्रियांपैकी डोळे, सुरेख दृश्य पाहत होते; कान, सुरेल बांग ऐकत होते आणि त्वचा, सुखद हवेची अनुभूती घेत होती. बऱ्याच वेळाने आमच्या टॅक्सी चालकाच्या आवाजाने आम्ही भानावर आलो. तो अजूनही येताना रस्ता चुकल्याचा प्रसंग विसरला नव्हता. निघण्याची त्याने आम्हाला विनंती केली. परतीच्या प्रवासात क्वालालंपूरला वेळेत पोहोचणं त्याच्या प्राधान्यक्रमावर होतं. क्वालालंपूरला पोहोचल्यावर त्याने टॅक्सी पेट्रोनास टॉवर समोर उभी केली. आम्ही खाली उतरलो. मुख्यतः सफेद रंगाच्या प्रकाशयोजनेत ती भव्य वास्तू तेजस्वी दिसत होती. दिवसा परत येऊन त्या नजरसुखाचा आनंद घेण्याचं आम्ही नक्की केलं. पुढचे तीन दिवस क्वालालंपूरच्या वेगवेगळ्या भागांतून त्याचं दर्शन होत होतं. नंतर त्याने आम्हाला भारतीय जेवण मिळणाऱ्या उपहारगृहात नेलं. रात्रीचे साडेआठ झाले होते. आम्ही जेवणाचं पार्सल घेतलं आणि हॉटेलवर आल्यावर जेवलो.
जेवण झाल्यावर, खिडकीचे पडदे उघडले. समोर नेत्रसुखद रंगांमधला के. एल. टॉवर चमकत होता. नीट पाहिल्यावर त्याच्या मागे थोडया अंतरावर आम्ही नुकताच पाहिलेला पेट्रोनास टॉवरही दृष्टीस पडला. खाली उजव्या बाजूस, पुदुराया बस स्थानक दिसत होतं. तिथे बस स्थानकावर सर्वसाधारणपणे दिसणारी गडबड व लगबग दिसत होती. तेव्हढ्यात त्याच्या वरच्या बाजूने मोनोरेल मार्गस्थ झाली आणि तिचा ट्रॅक अंधारात उजळला गेला. आकाशात एका बाजूस चंद्रकोरीचं दर्शन झालं आणि त्या चित्राच्या पार्श्वभूमीवर एक विमान, दिव्यांची लुकलुक करत मार्गस्थ झालं आणि त्या चलचित्रास पूर्णत्व आलं. थोडक्यात खिडकीच्या काचेच्या तावदानातून दिसणारं खूप छान दृश्य मनपटलावर उमटलं. सामानातून कॅमेरा बाहेर काढण्याचा मोह टाळता आला नाही आणि त्या रंगसोहळ्याच्या काही प्रतिमा कॅमेऱ्यात नोंदल्या गेल्या. कॅमेऱ्यातील फोटोंमध्ये बस स्थानकाला लागून पलीकडच्या बाजूस एखाद्या बैठया मंदिरासारखी वास्तू दिसली. ‘झूम’ करून पाहिल्यावर त्याची खात्री झाली. तिथे एक हिंदू मंदिर होतं. दुसऱ्या दिवशी त्या मंदिराला भेट देण्याचं ठरवलं. पडदे लावून रात्र केली आणि झोपी गेलो.
नंतरच्या दिवशी साडेपाचलाच जाग आली. प्रभातसमय झाला होता. निद्रिस्त कुटुंबियांना कळू न देता हळूच पडदा सरकवून पडद्यामागे शिरलो आणि आदल्या रात्रीचं दृष्य परत पाहिलं. आता मंदिर व्यवस्थित दिसत होतं. साडेनऊला आदल्या दिवशीचाच टॅक्सी चालक आम्हाला क्वालालंपूर दर्शन घडवण्यासाठी न्यायला येणार होता. चटकन आटपून, ब्रेकफास्ट केला. क्वालालंपूर दर्शनाची सुरुवात देवदर्शनाने करायची आम्ही ठरवली होती. ‘गणेसर मंदिरा’त गणपतीबाप्पा व इतर देवतांचं दर्शन घेतलं. प्रसन्न वाटलं. चालक यायच्या आधी आम्हाला पेट्रोनाज टॉवर्स जवळून परत पाहायचा होता. त्याचा वरचा भाग सतत दृष्टीस पडत होता. त्याचा मागोवा घेत, त्याच्या दिशेने निघालो आणि पंधरा मिनिटांत त्याच्या समोर पोहोचलो. सूर्यप्रकाशात तो चमकत होता. आधी म्हटल्याप्रमाणे दिवसादेखील तो तितकाच सुरेख, आकर्षक दिसत होता. बाहेरूनच त्याचं अवलोकन केलं. त्याच्या संदर्भातील त्रोटक माहिती दिलेली माहितीपत्रकं ‘सॅक’मधून बाहेर काढली आणि त्याच्या समोरच्या कट्टयावर बसून त्याचं सार्वजनिक वाचन केलं.
(क्रमशः)
मागील लेखाची लिंक : ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात © डॉ. मिलिंद न. जोशी – Thinkmarathi.com
डॉ. मिलिंद न. जोशी
Email : [email protected]
pc:google