व्हॅलेंटाईन डे – स्वप्नील गोसावी
दिवसभर गुलाबाची पोती उचलून उचलून चिंताचं अंग जब्बर ठणकत होतं. जणू कुणीतरी हाडांवर सुया टोचतय असं भनभनत होत त्याला.
“च्या आईला ह्या हॅलेन्टाईन च्या मायचा न्हीउन्सनी…गुलाब झाला म्हणून काय झालं? पाठीला रग लागायची तेवढी लागतीच लका..!”
शेठ कडून चिंत्याने पैक घेतलं. आता नीट जाऊन एक संत्र्याची चपटी मारायची न टाईट होऊन घर गाठायचं ह्या विचारानेच त्याच्या जीवाला तरतरी आली.
चपटी च्या तंद्रीत त्याची पावलं झरझर पळत होती, तेवढ्यात त्याला एक कवळी हाक ऐकू आली “वो मांमा ग्वूलाब घ्या की..”. 12-13 वर्षाचं पोरगं हातरुमालावर गुलाब पसरून बसलं होतं. गुलाबापेक्षा कैक पटीनं जास्त मऊपणा त्याच्या डोळ्यात लुसलूसत होता. पोराकडं बघून चिंताच्या काळजातून एक कळ अगदी आरपार गेली. मागच्या वर्षी कुठल्याशा आजारानं मेलेल्या बब्रू च्या पोटच्या पोराच्या आठवणीनं तो गारठून गेला.
“म्या तुज्या गुलाबाचं काय करू लेका.?”.
“घ्या की.. मामीला द्या.. मंडईतून खाली पडल्याले उचलून आणल्यात.. फक्त 10 रुपायला येक देतो”
ती सुकलेली गुलाब हातरुमालावर पाहून, चिंताला आपलं ‘सुकलेलं न नशिबानं तुडवलेलं आयुष्यच कुणीतरी पसरून ठिवलंय असा भास झाला’. त्यानं येक गुलाब घेतला, न बब्रू च्या आठवणीनं त्यानं शंभराची नोट त्या पोराच्या हातावर टेकवली. न लगेच आपल्या भणंग आयुष्याला पाठ दाखवून फिरल्यासारखा तो तरातरा निघाला. चपटी चा मूड च निघून गेला व्हता त्याचा. फाटक्या संसाराला मुक्यानेच कसलीच तक्रार न करता ठिगळं लावणाऱ्या बायकोची, कमळीची आठवण आली त्याला. तिचा रिकामा न सुना हात त्याच्या डोळ्यासमोर हलु लागला. त्याने मनातल्या मनात काही तरी ठरवून टाकलं.
पोरगं वारल्यापासून कमळी देहाच्या कुडीतून प्राण गेल्यासारखं, ‘कुणीतरी जगायचा रोजगार देत असल्यावाणी’ जगत व्हती. नवरा रोज ‘लावून’ यायचा, ताटात पडलेलं मुकाट गिळायचा न त्या दोघांचा दिवस अंधारात प्रकाश गुडूप व्हावा तसा गुडूप व्हायचा. पदराचं टोक आपल्या बोटांत गुंतवत ती डोळ्यात बब्रू ची आठवण घेऊन चितागत बसली होती.
अंगणात खाकरल्याचा आवाज आला तशी ती दचकून सावरली. चिंताने हात पाय खंगाळले नी तो घरात घुसला.हातातली पिशवी त्याने खुटीला टांगली. कमळी ने त्याला ताट वाढलं, न चिंताच्या जेवताना होणाऱ्या घशाच्या हालचाली कडे एकटक बघत त्याच्या घासाचा आवाज ऐकत बसून राहिली. चिंता जेवता जेवता चोरून तिच्या रिकाम्या हाताकडे पाहत होता पुन्हा पुन्हा..पुन्हा पुन्हा.
“‘ए कमळे झालं का टुकडा खाऊन?” गोदाक्काचा आवाज ऐकला तसा कमळी बाहेर गेली. चिंताने लगोलग उरलेली भाकरी दुरडीत टाकली कालवण एका घोटात पिऊन टाकलं, ताट खंगाळून स्वच्छ पुसलं. पिशवीतून कागदात गुंडाळलेला पुडा बाहेर काढला, तो त्या ताटात ठेवला. अन बाहेर येऊन दात कोरीत बसला.
गोदाक्का गेल्यावर कमळी निजा नीज करण्यासाठी आत गेली. पाहते तर ताटात पुडा….. तिने हळूच तो पुडा सोडला, पाहते तर काय…
लालेलाल बांगड्या…त्यामध्ये खुपसलेला सुकलेला गुलाब…न त्या गुलाबावर नागासारखं पसरलेला एक गजरा. टाचक्कन कमळी चे डोळे भरून आले, आपला अक्खा संसार त्या ताटात मांडलाय असं वाटून गेलं तिला.
तिनं साडी बदलली, हातात बांगड्या भरल्या, गुलाब आणि गजरा केसांमध्ये व्यवस्थित खोचला. अंगणात जाऊन चिंताला अगदी बिलगून बसली. आणि लहान मुलाने आईच्या खांद्यावर डोकं ठेवावं तेवढ्या निरागसपणे तिने चिंताच्या डोक्यावर मान टाकली. त्या शांत नी क्लान्त स्पर्शाने चिंताचा कण न कण शहारला. ‘संत्र्याच्या चपटीपेक्षाही’ जास्त नशा त्याच्या शरीरात धावली.
फाटक्या संसाराच्या नी आयुष्याच्या जाळातून निसटलेलं हसू त्याने ओठाच्या कोपऱ्यात दुमडलं. न मनातल्या मनात तो म्हणाला….
“च्यायला…हॅप्पी हॅलेन्टाईन कमळे..हॅप्पी हॅलेन्टाईन….!!!”
नाव– स्वप्नील गोसावी
ता.बार्शी जि. सोलापूर
उत्तेजनार्थ पारितोषिक (कथा)