श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे अल्पचरित्र ..

श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे अल्पचरित्र आणि कठीण काळात मनाला सामर्थ्य  देणारे संतसाहित्य 
समर्थ रामदास स्वामी यांचे अल्पचरित्र 

श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचा आयुष्यक्रम आपण पाहिला तर तो जवळपास  ७३ वर्षांचा आहे . त्यांचा जन्म सन १६०८चा. आज आपल्याला परिचित  औरंगाबाद जिल्ह्यातील जांब या गावी ते जन्मले. त्यांचं जन्मनाव नारायण. आडनाव ठोसर. कुलदैवत श्रीराम तर कुलदेवता तुळजाभवानी. विशेष म्हणजे रामनवमी ही त्यांची जन्मतिथी आहे. 
समर्थांच्या मातेचं नाव राणूबाई. पित्याचं नाव सूर्याजीपंत. ते दोघेही सत्वशील आणि देवपरायण होते. कुळात बावीस पिढ्यांची श्रीरामाची उपासना होती. त्याशिवाय सूर्याजीपंत सूर्याचीही उपासना करीत. या कठोर उपासनेचे फलित म्हणून त्यांना दोन तेजस्वी पुत्र झाले. साक्षात सूर्यदेवानेच त्यांना दृष्टांत देऊन तसे वरदान दिले होते. त्यापैकी पहिला पुत्र हा माझा अंश असेल तर दसरा पुत्र हनुमंताचा अंश असेल, असेही सूर्यदेवाने दृष्टांतात सांगितले होते. त्याप्रमाणे राणूबाईंच्या पोटी हे दोन पुत्र जन्मले. पहिल्या पुत्राचं नाव होतं गंगाधर. पण तो वयाने ज्येष्ठ म्हणून श्रेष्ठ या नावानेच त्यास हाक मारली जाई. दुसरा पुत्र नारायण म्हणजेच पुढे जगाला सुपरिचित झालेले समर्थ रामदास होत. गंगाधर तथा श्रेष्ठ हे अखेरपावेतो जांब येथेच गोदावरी तिरी कायम वास्तव्य करुन राहिले. पण त्यांचा परमार्थमार्गातील अधिकार मोठा होता. समर्थांना त्यांच्या प्रती अखेरपावेतो आदरभाव व जिव्हाळा होता. श्रेष्ठ सन १६७७ (शके १५९९) मध्ये निधन पावले. 

वयाच्या साधारणपणे आठव्या वर्षीच नारायणास जांब येथील हनुमान मदिरात श्रीरामाचे दर्शन झाले आणि श्रीरामाने त्यास त्रयोदशाक्षरी मंत्रही दिला. तत्पूर्वीच नारायणाच्या वडिलांचे म्हणजे सूर्याजीपंतांचे निधन झाल्यामुळे ते पितृसुखास वंचित झाले होते. पितृवियोग  आणि श्रीराम तसेच मारुतीचा साक्षात्कार  या घटनांमळे नारायणाचं चित्त सैरभैर होऊन एकान्तवासाकडे वळलं होतं. स्वभावात विरक्ती येऊ लागली होती. म्हणून मग राणूबाईंनी नारायणाच्या लग्नाचा घाट घातला.   त्यावेळी नारायणाचे  वय होते बारा वर्षांचे. परंतु नारायणाचा जन्म मडके गाडग्यांचा प्रपंच करण्यासाठी झालेलाच नव्हता. त्यामुळे ऐन लग्नाच्या वेळी ‘सावधान’ हे शब्द कानी पडताच  त्यांनी मांडवातून थेट नाशिकची वाट जवळ केली .  त्यांना आता श्रीरामाच्या दर्शनाची आस  लागून होती. गोदावरीचा काठ धरुन त्यांनी अंगावरच्या हळदीच्या कपड्यानिशी  थेट नाशिक गाठलं आणि पंचवटीतील रामाचं मनोभावे दर्शन घेतलं. परतीची   वाट त्यांनी स्वतःहूनच पुसून टाकली होती. आता एकच ध्यास होता श्रीरामाच्या दर्शनाचा व त्यासाठी कठोर तपश्चर्येचा आणि विरक्तीचा. हा हेतू  मनी धरुन मोठ्या निश्चयाने त्यांनी नाशिकपासून अगदी नजिक असलेल्या गोदावरी-नंदिनी नद्यांच्या संगमावर एकान्ती असलेल्या टाकळी या गावाची निवड केली. हे साल होतं सन १६२०. 

१६२० ते १६३२ हा एक तपाचा काळ समर्थ रामदासांनी पूर्णतया तपश्चर्येत घालवला. गायत्री पुरश्चरण आणि त्रयोदशाक्षरी रामनामाचा अखंड जप हा त्यांच्या साधनेचा मुख्य भाग होता. या काळात त्यांनी तेरा कोर्टीचा नामजप केला होता. मनन, चिंतन तसेच वेद-वेदांग व धर्मग्रंथांचा अभ्यास हाही त्यांच्या दिनक्रमाचा भाग होता. समर्थ रामदासांनी याच तपस्या काळात श्रीरामास उद्देशून करुणाष्टकांची रचना केली असा जाणकारांचा कयास आहे. समर्थांच्या या प्रारंभीच्या काव्य रचनेत पराकोटीची आर्तता आहे. मराठी संत साहित्यात करुणाष्टकांना त्यामुळेच अढळ व मानाचं स्थान आहे. 

रामदासांची सन १६३२ मध्ये एक तपाची तपश्चर्या पूर्ण होऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांचं दर्शन झालं. वयाच्या २४व्या वर्षीच ते साक्षात्कारी पुरुष झाले  आणि त्यांनी तीर्थयात्रेस प्रयाण केलं. अखंड बारा वर्षे त्यांनी संपूर्ण भारतातील तीर्थस्थळांना भेट देऊन आसेतुहिमाचल भ्रमंती केली. हे भ्रमण आणि तीर्थाटन हा समर्थांच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा टप्पा आहे. कारण याच काळात  त्यांच्या पुढील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ जीवितकार्याची बीजे रुजलेली दिसतात. 

 भारत भ्रमंतीच्या काळात ते गावोगाव हिंडले. रानोमाळ-गिरिकंदरं त्यांनी तुडवली  आणि देशातील सर्वसामान्यांची रया जवळून पाहिली. ती मात्र संज्ञा बधिर  करणारी होती. यवन सत्तेने देशातील सर्वसामान्य माणूस जुलूम-अत्याचार अन्यायाने खचून गेला होता. त्याची प्रतिकाराची शक्तीच नष्ट झाली होती.  समाज मृतप्राय झाला होता. यवनांच्या धार्मिक आक्रमणाने वैदिक धर्म पार विस्कळित झाला होता. धर्मकर्माच्या सर्वच वाटा रक्तलांच्छित झाल्या होत्या. श्रद्धा आणि श्रद्धास्थानं डळमळून कोसळली होती. 

सतत बारा वर्षे समर्थ रामदासांनी सुलतानी धर्मांधता आणि सत्तांधता पाहिली.या अमानुषतेची जिवंत वर्णनं समर्थांनी आपल्या ‘अस्मानी सुलतानी’, ‘परचक्र निवारण’ या किंवा इतर स्फुट काव्यात मोठ्या प्रत्ययकारी शब्दात व्यक्त केली आहेत. ती ह्रदयद्रावक तर आहेतच पण आजही ती वाचताना मनास भयचकित व भयकंपित करतात. सतत बारा वर्षे अंतर्बाह्य हेलावून टाकणारी समाजस्थिती अनुभवल्यामुळेच त्यांच्या एकूण जीवित कार्यालाच नव्हे तर अध्यात्मिक बैठकीला एक वेगळी पण दृढ अशी दूरदृष्टी प्राप्त झाली. ती दृष्टी घेऊनच ते तीर्थाटन संपवून नाशिक येथील पंचवटीस परतले. याचवेळी २४ वर्षानंतर ते जांब येथे गेले. ज्येष्ठ बंधु श्रेष्ठ व माता राणूबाईंना भेटले त्यानंतर सन १६४४ला श्रीरामाच्या आदेशानुसार ते कृष्णाकाठी आपलं देवदत्त जीवितकार्य पार पाडण्यासाठी दाखल झाले.

एकीकडे देशात सर्वत्र माणसाचा माणूसधर्म, मनाचा मनोधर्म, समाजाचा समाजधर्म आणि धर्मरक्षकांचा आचारधर्म बुडत असतानाच दुसरीकडे धर्माचं विडंबन करणाऱ्या संधीसाधु बुवाबाजांनीही आपलं उखळ पांढरं करायला सुरुवात केली होती. मंत्र-तंत्र, फकिरी, गंडे-दोरे अशा गोष्टींना ऊत आला होता. माणसाची व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीची बिघडलेली घडी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रथम वैदिक धर्मावर आलेलं परचक्राचं सावट दर करणं आवश्यक होतं. त्यासाठी रामराज्यासारखी निकोप राज्य व्यवस्था यायला हवी होती. ती येण्यासाठी अनुकूलता हवी होती. समाजाची धारणा बदलणे जनमानसात स्वराज्याची राजकीय आस निर्माण  करुन रामरायासारखा प्रजाहितदक्ष राज्यकर्ता आणि हनुमंतासारखी निष्ठावान रयत निर्माण करणे गरजेचे होते.

रामदासांच्या सुदैवाने असा बदल घडवून आणणारं राजकीय स्फुरण  श्रीरामकृपेने उदयाला येत होतं. हे स्फुरण म्हणजेच शहाजीराजे यांचे सुपुत्र  बाल शिवाजी होत. ते क्षात्रतेजाने भारलेलं, शस्त्राला शस्त्रानेच उत्तर देऊन मुस्लिम राजवटीला एकामागून एक धक्का देणारं, अन्यायाविरुद्ध सर्व शक्तिनिशी दंड थोपटणारं एक रसरशीत व्यक्तिमत्व होतं. हे तळपणारं स्फुल्लिंग म्हणजे धर्म, राष्ट्र आणि संस्कृति यांचं रक्षण करणारं जणू विरोचित नेतृत्व होय, ही अटकळ मनाशी बांधून देवकार्यासाठी समर्पित वृत्तीने समरांगणी उतरलेल्या या पुरुषार्थाला आपलं आत्मिक शक्तीचं पाठबळ देण्याचं व्रत समर्थांनी स्वीकारलं. या ईशकार्याला ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान दिलं पाहिजे, या कर्तव्य भावनेने समर्थ रामदासांनी आपल्या परमार्थाला मुरड घालून मृतवत समाजाला प्रयत्नवाद, प्रपंचवाद आणि राष्ट्रधर्माची संजीवनी देण्याचं ठरवलं. स्वधर्म हरवून बसलेला समाज परमार्थच काय पण प्रपंचही करु शकणार नाही, मग राष्ट्रकार्य काय करेल, राष्ट्राची उभारणी कशी करेल ही वास्तवता समर्थांनी ओळखली होती.या जाणिवेतून त्यांनी मोठ्या जागतेपणाने आपलं जीवितकार्य ठरवलं आणि ते तडीस नेण्यासाठी सूत्ररुपाने ते वारंवार सतत मांडलं. समर्थांच्या वाङ्मयात, कार्यात आणि प्रत्यक्ष आचरणात ते सदैव व्यक्त झालेलं दिसतं.

समर्थ रामदासांनी समाजाला नेमकं काय शिकवलं असेल तर परमार्थातील व्यवहार आणि व्यवहारातील परमार्थ. तोच त्यांनी परखडपणे मांडला व आवर्जून सांगितला. त्यांनी त्याला सूत्ररुप दिलं. दासबोध, मनाचे श्लोक, अभंग आणि त्यांच्या इतर स्फुट काव्यातून ही सूत्रं जागोजाग दिसतात. त्यातील काही वेचक सूत्रे तर सदासर्वकाळासाठी मननशील ठरतील अशी आहेत. 

समर्थ रामदास यांनी कृष्णाकाठ जवळ करुन आपल्या जीवितकार्यास प्रारंभ केला त्यावेळी त्यांचं वय छत्तीस वर्षांचं होतं. बारा वर्षांची कठोर तपश्चर्या आणि त्यानंतरच्या बारा वर्षाचे भारत भ्रमण आणि तीर्थाटन यामुळे त्यांचं साधुत्व परिपक्व होतं. सन्यस्तवृत्ती शिगेला पोहोचली होती आणि विरक्ती हा स्वभावधर्म झालेला होता. यावेळी शिवरायांचं वय जेमतेम पंधरा वर्षांचं होतं.  माता जिजाबाई, दादोजी कोंडदेव आदि गुरुतुल्य व्यक्ती तसेच इतर ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचे संस्कार आणि पिता शहाजीराजे यांच्या विश्वासातील कर्तबगार वतनदारांचं व सरदारांचं पाठबळ यामुळे त्यांच्या क्षात्रतेजाला वेगळीच धार आली होती. 

स्वराज्य स्थापन व्हावे ही तर ‘श्रींची इच्छा होती. या इच्छेला अनुसरुन महाराष्ट्रात एकाचवेळी दोन स्वतंत्र पण एकमेकांना पूरक अशा महाप्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाल्या. एक होती राजकीय परिवर्तन घडवून आणणारी व त्यासाठी तळहातावर शिर घेऊन परचक्राला उलथून टाकणारी. ती छत्रपती शिवरायांच्या रुपाने अवतरली. त्यामुळेच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांच्या जरबी कर्तृत्वाला असंख्य धुमारे फुटले. इतकंच नाही तर या कर्तृत्वाचे जगाला थक्क करुन टाकणारे आविष्कार देशातील उद्दाम सत्ताधीशांनी पुढील काळात सतत ३०-३५ वर्षे हताश होऊन पाहिले.

दुसरी शक्ती होती ती या कर्तृत्वाला ईश्वरी अधिष्ठान देणारी. त्यासाठी निष्ठावंत पाईक निर्माण करुन समाजाला निर्भय करुन त्यास धर्म आणि कर्तव्यकर्माची जाग आणून देणारी. महाराष्ट्र धर्माची मुहूर्तमेढ रचणारी. समर्थ रामदासांच्या रुपाने ती कृष्णाकाठी अवतरली. बाह्यतः या दोन्ही शक्ती एकमेकांना समांतर कार्य करीत राहिल्या तरी त्या दोहोत आंतरिक सुसंवाद होता आणि त्या एकजीवही होत्या. जवळपास पस्तीस वर्षे या शक्तीपीठांनी महाराष्ट्र धर्म जागवला आणि देवकार्य म्हणून महाराष्ट्रात स्वराज्याचं तोरण बांधलं. इतकंच नव्हे तर पढील पिढ्यांनाही त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि आदर्श राजकारणाचा मूलमंत्र दिला. वस्तुपाठ घालून दिला. स्वराज्य स्थापनेला रामराज्याचं स्वरुप यावं म्हणून शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला त्यावेळी समर्थांना जो उत्कट आनंद झाला तो त्यांच्या ‘आनंदवनभुवनी’ या दीर्घ काव्यात अक्षरश: ओसंडून वाहताना  दिसतो. या उत्स्फूर्त काव्यात छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं मोल किती अमौलिक आहे याचं मोठं अमोघ वर्णन समर्थांनी केलं आहे. ‘आनंदवनभुवनी’ या दीर्घ काव्यातील काही ओव्या जशा उत्कट आनंदाने ओतप्रोत आहेत तशाच काही द्रष्टेपणाच्याही आहेत. समर्थांनी तीर्थाटनाच्या काळात मुस्लिम राजवटीच्या अमानुषतेच्या काळ्याकुट्ट  रात्री जे काही स्वप्न पाहिलं होतं ते सतत उरीपोटी जपलेलं होतं. तेच स्वप्न साकार झाल्याचा परमानंद त्या ओव्यात दाटलेला आहे. स्वराज्यामुळे महाराष्ट्र धर्माला जे मांगल्य प्राप्त झालं त्याचं वर्णन वाचताना जीवितकार्य सफल झाल्याची त्यांची सार्थकता ध्वनित होताना दिसते. समर्थांच्या काव्यात असा आनंदाचा उमाळा इतरत्र फारसा नाही. छत्रपती शिवरायांबद्दलचा जिव्हाळा या काव्यातून शब्दाशब्दात भरुन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हा जिव्हाळा किती आंतरिक होता याचा प्रत्यय घ्यायचा तर ही ५९ ओव्यांची काव्यरचना मुळातच वाचायला हवी.

समर्थ रामदास आणि शिवाजी राजे या दोहोंच्या मनात स्वराज्याबद्दलच्या ज्या आकांक्षा होत्या, जी स्वप्नं होती त्यात निर्विवाद एकरुपता होती. या दोहोंचे मार्ग जरुर भिन्न होते, परंतु ते एकमेकांना पूरकच होते. शिवरायांचा मार्ग क्षात्रधर्माला अनुसरुन होता. तो प्रत्यक्ष शत्रुशी युद्ध करण्याचा होता. पराक्रमाचा होता आणि प्रजेचा प्रतिपाळ करण्याचाही होता. म्हणूनच त्यांची जी राजमुद्रा आहे ती खूप बोलकी, आशयपूर्ण आणि सार्थ आहे.

समर्थ रामदासांचा मार्ग शिवरायांच्या पराक्रमाला पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा आहे. समाज मनात स्वराज्याची आस निर्माण करणे, त्यासाठी लोकांना बलोपासनेचा मार्ग दाखविणे, श्रीराम व हनुमान यासारखे आदर्श त्यांच्यापुढे ठेवून स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक राजनिष्ठा, स्वामीनिष्ठा समाजात निर्माण करणे व या सर्व सत्कार्याला धर्माचे आणि भगवंताचे अधिष्ठान देणे हे समर्थांच्या कार्याचे स्थूल स्वरुप होते. धर्मकारण आणि जनजागरण किंवा कुशल राजकारण असे त्यांच्या कार्याचे वर्णन करता येईल. समर्थांचा मूळ पिंडच सिद्ध साधकाचा, विरक्तीचा असल्याने त्यांनी पत्करलेला मार्गही प्रबोधनाचा , धर्मप्रसाराचा व त्याचबरोबर समाज परिवर्तनासाठी आवश्यक तेवढेच राजकारण करण्याचा होता. हे दोन्ही मार्ग एकमेकांना सुसंवादी होते. 

समर्थ व छत्रपती शिवरायांच्या अनेकदा भेटी झाल्या होत्या असं इतिहास तो शिवरायांनी रामदासांना गुरु मानलं होतं असंही इतिहास सांगतो. परंतु  राजकारणाच्या संदर्भात त्या दोहोत ज्या मसलती झाल्या त्याबद्दलचा उल्लेख  मात्र ऐतिहासिक कागदपत्रात फारसा दिसत नाही. कारण हा विचारविनिमय गोपनीयच रहावा अशी त्या दोहोंनी काळजी घेतलेली दिसते.’ काहीवेळा प्रगटपणे पत्रव्यवहार झाला असला तरी समर्थांच्या राजकारणाचा पुरावा  त्यात नाही, सलाहमशिवराही मोघम आहे. राजकारण करावे | परि कळोचि न द्यावे हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र त्यांनी कटाक्षाने पाळलेलं दिसतं. 

सन १६४४ ते १६८२ म्हणजे जवळपास ३७ वर्षांचा प्रदीर्घ काळ समर्थांनी स्वराज्यासाठी होऊ घातलेल्या चळवळीत प्राण फुंकले. त्याची विरक्तपणे पाठराखण केली. या काळात त्यांचं वास्तव्य मुख्यतः कृष्णेच्या खोऱ्यातच होतं. जवळपास २० वर्षे त्यांनी चाफळ येथेच आपल्या कार्याचं मुख्य केंद्र ठेवलं होतं. पण नंतर शिवाजी महाराजांच्या आग्रहास्तव त्यांनी आपला मुक्काम अखेरची काही वर्षे सज्जनगडावर हलवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान सन १६८० साली झाल्यानंतर समर्थांनी आपल्याही अवतारकार्याची आवराआवर करायला सुरुवात केली आणि सन १६८२च्या माघ वद्य नवमीस सज्जनगडावर त्यांनी समाधी घेतली. समर्थ आणि छत्रपती शिवराय यांच्या जीवितकार्याचे बंध कसे एकमेकांत गुंफलेले होते आणि ईशेच्छेने योजलेल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात या दोन महान पुरुषांना त्याच ईशेच्छेने कसे एकत्र आणून हे कार्य करवून घेतले या गोष्टीचं मोठं अप्रप वाटतं. या सर्व घटनांचे साक्षित्व कृष्णा काठच्या समर्थ स्थापित अकरा मारुतींनी केलं होतं. या सर्व घटनाचक्रामागील प्रेरणास्थान होतंचाफळ येथील श्रीराम मंदिर.. 

छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी यांनीही समर्थांशी आदरभावाचे संबंध राखलेले असले तरी राजघराण्यात जे संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे समर्थ उदास होते. संभाजी राजे यांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी त्यास समज देऊन शिवरायांच्या कर्तृत्वाची आणि मोठेपणाची आठवण करुन दिली आहे. पण त्यानंतर समर्थ फार दिवस जगले नाहीत. नियतीने काही वेगळंच ठरविलं होतं असं दिसतं. संभाजी राजे यांना लिहिलेल्या पत्रातील छत्रपती शिवरायांचा गौरव मात्र पुन्हा पुन्हा आठवावा असाच आहे. हे गौरवोद्गार असेः

 शिवराजास आठवावे । जीवित्व तृणवत् मानावे ।
 इहलोकी परलोकी राहावे । कीर्तिरुपे ।।
शिवरायाचे आठवावे रुप । शिवरायाचा आठवावा प्रताप ।
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।
 शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे कैसे बोलणे । 
शिवराजाची सलगी देणे । कैसे असे ।।

वस्तुतः समर्थ व शिवराय यांच्यातील संबंध लौकिकदृष्ट्या गुरु-शिष्याचे होते असं इतिहास आणि इतिहासकार सांगतात. पण या दोहोंचा एकूण व्यवहार जर सह्रदयतेने पाहिला तर त्यांच्यातील हे संबंध म्हणजे भावबंध होते असंच भावुक मनाला वाटत राहतं. खरं म्हणजे हे गुरु-शिष्यातील संबंध जिवाभावाचे, आतंरिक जिव्हाळ्याचे आणि म्हणूनच पारलौकिक वाटतात. श्रद्धावान माणसाचं भावजीवन ते समृद्ध करतात.

इतिहास असं सांगतो की, छत्रपती शिवरायांना समर्थांनी जेव्हा अनुग्रह दिला त्यावेळी प्रसादचिन्ह म्हणून समर्थांनी शिवरायांना श्रीफळ दिलं. त्याशिवाय आणखी तीन वस्तू शिवरायांना दिल्या होत्या. त्यापैकी एक वस्तू होती मूठभर माती. दुसरी होती दोन मुठा घोड्याची लीद आणि तिसरी होती चार मुठा खडे. या तिन्ही वस्तू म्हणजे राजवैभवाची प्रतिकं होत. माती म्हणजे भूप्रदेशाची मालकी. राजसत्ता. घोड्याची लीद म्हणजे अश्वशाळा आणि घोडदळाचे स्वामित्व आणि खडे म्हणजे गड-किल्ल्यांवरची हुकूमत  असा या प्रतिकाचा अर्थ आहे. शिवरायांच्या ठायी या राजवैभवाच्या सर्व खुणा आहेत हे समर्थांनी द्रष्टेपणाने फार पूर्वीच जाणल्या होत्या. इतकंच नव्हे तर शिवरायांच्या ठायी राजयोगाची सर्व लक्षणं जन्मतःच असल्याचंही त्यांनी ओळखलं होतं, ही खात्री असल्यानेच समर्थांनी अवघ्या विशीतल्या शिवरायांना उद्देशन लिहिलेल्या पहिल्या पत्रात शिवरायांचा उल्लेख ‘श्रीमंत योगी’ या शब्दात केलेला दिसतो, या  पत्राचा मायना होता
निश्चयाचा महामेरू । बहतजनामी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।। 

समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी राजे यांचे परस्पर संबंध हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. परस्परांबद्दलचा आदर, जिव्हाळा, काळजी है सारे भाव आणि त्यांचे बंध मोठे अकृत्रिम, अलौकिक, हृद्य आहेत. दोहोंना एकमेकांपासून विलग करुन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेणे केवळ अशक्य आहे. समर्थांचं एकूण चरित्र हे शब्दांच्या ओंजळीत साठवता येणारं नाही. ते बहुआयामी आहे. खरं तर ते अवतार कार्य आहे. 

( समर्थांचा अल्पपरिचय – श्रीसमर्थ स्थापित अकरा मारुती – लेखन व संकलन गुरुदास ) या पुस्तकातून साभार .. 

समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले मनाचे श्लोक , दासबोध, करुणाष्टके आजही आपल्याला जगण्यासाठी कशाप्रकारे बळ देतात त्याविषयी थोडेसे…  

लहानपणी आजी आम्हाला मनाचे श्लोक, करुणाष्टके म्हणायला सांगत असे, तेंव्हा फक्त ते पाठ करायचे आणि म्हणायचे एवढेच कळे , पण आज त्या मागचा उद्देश कळतो आहे, करोनाच्या या काळात जेंव्हा आपले मन खचते , आता पुढे काय असा प्रश्न पडतो तेंव्हा हेच श्लोक आपल्याला मानसिक ताकद  देतात.

आजकाल काही कठीण प्रसंग आला की  लगेच काही जण आत्महत्येचा  विचार करतात , कारण कदाचित परिस्थितीला तोंड देऊन हातपाय न गाळता कसे लढता  येईल हे त्यांना शिकवले गेलेलेच नसते. 
पूर्वीचे लोक बरेचदा सांगतात  की आमच्याकडे एक काळ असा होता की एक वेळ अन्न  मिळणे पण कठीण होते , अगदी पाणी पिऊनही दिवस काढले आहेत आम्ही, पण कधी आत्महत्येचा विचार नाही केला कारण आम्हाला आधिपासून शिकवले गेले होते की  लक्ष-चौऱ्यांशी योनीनंतर मनुष्य जन्म मिळतो आणि तो आयुष्यात येणाऱ्या संकटाना घाबरून संपवण्यासाठी नाही तर त्या संकटाना सामोरे जाऊन , हातपाय न गाळता धीराने तोंड देण्यासाठी आहे. 

खरंच आहे की आपल्या  साधू संतांनी अशा प्रकारचे उपदेश आपल्या साहित्यातून केले आहेत आणि पिढ्यान पिढ्या ते साहित्य आपल्याला जगण्याचे बळ देते आहे. पण हल्ली विदेशी गोष्टींच्या नादात आपल्याकडच्या या  मौल्यवान  गोष्टी आपण गमावून बसलो आहोत.   विसरलो आहोत. 

इथे आम्ही काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच खंबीर बनवायला मदत करतील, या कदाचित  आपल्याला माहीतही  असतील पण कामाच्या रगाड्यात आपल्या डोक्यातून निघून गेल्या असतील त्याची पुन्हा उजळणी करून देण्याचा प्रयत्न  केला आहे.

समर्थ  रामदास स्वामी हे श्रीरामाचे निस्सीम भक्त . ते मारुतीचा अवतार आहेत असेही म्हणतात. त्यांनी लिहिलेले मनाचे श्लोक, करुणाष्टके , दासबोध कदाचित हल्लीच्या मुलांनी वाचलेही नसतील, पण आता आपली जबाबदारी आहे की या गोष्टींची त्यांना ओळख करून द्यायला हवी, कारण हे नक्कीच त्यांना त्यांच्या पुढच्या खडतर आयुष्यात मार्गदर्शन करतील. आणि वाईट परिस्थितीत खचून न जाता त्या परिस्थितीशी दोन हात करायला शिकतील .

मनाच्या श्लोकांचेच उदाहरण घेऊया –

रामदास स्वामी म्हणतात,

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

हा श्लोक जेव्हा मुले   म्हणायला शिकतात तेंव्हा आपोआपच त्यांच्या  मनावर बिंबवले जाते की हे मना  कोणत्याही प्रकारची वासना तू करू नको. कोणतीही वासना असो ती दुष्टच असते , सुरुवातीला ती सुख दाखवते पण अंती  दुःखच भोगायला लावते . कोणतेही पाप हे माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत असते , त्यामुळे ते माणसातील पाप बुद्धीच नष्ट करायला लावतात. मनाला कधीही नीती सोडून कोणतेही काम करू नको असे सांगितले आहे की कोणतेही काम करताना आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केले पाहिजे. पूर्ण विचार करूनच मग कोणताही  निर्णय घयावा, कोणतेही काम करावे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

या श्लोकातही  मनाला रागाला आवर  घालायला सांगितले आहे , क्रोध हा माणसाचा शत्रू आहे , रागामुळे द्वेष, मत्सर निर्माण होतात आणि माणसाच्या अधःपतनाला सुरुवात होते. मनाचे  श्लोक शिकलो कि आपोआपच क्रोध ,मत्सर ,द्वेष बाजूला ठेऊन शांत बुद्धीने निर्णय घेण्याची,  वागण्याची आपल्याला सवय लागते.

करुणाष्टके :
करुणाष्टके ही रामदास स्वामींनी आपल्याला चांगल्या गोष्टींची शिकवण देण्यासाठीच सांगितली आहेत. करुणाष्टकांमध्ये अगदी ३४ कडव्यांमध्ये त्यांनी माझं मन कसे भरकटत जाते आणि त्या मनाला तू सांभाळ असे रामरायाला सांगितले आहे. म्हणजे हे देवा मी वागतोय ते कदाचित मला कळत नाही पण मी जर चुकीचे वागत असेन तर तू मला मार्ग दाखव , चुकीच्या मार्गावरून मला योग्य मार्गाला लाव असे सांगत आहेत. आपल्या अंगातील अहंभाव नाश  पावून देवा मी तुझ्या शरणात आलो आहे , माझा सांभाळ कर , मला योग्य मार्ग दाखव हे आपल्या मनाला वाटते आणि आपण आपोआपच शांत चित्ताने कितीही दुःख आले तरी ते सोसायला , सामोरे जायला तयार होतो.

समर्थांचे मनाचे श्लोक, करुणाष्टके , दासबोध असोत अथवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आपल्या संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले संत साहित्य आपल्या आयुष्यात आपल्याला नक्कीच योग्य मार्ग दाखवतात आणि उत्तम समाज घडवण्यात मोलाचे योगदान करतात. 

जय श्री राम !  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu