“आई पाहिजे”

“आई पाहिजे”
सकाळी थोडे चालणे, मग हलकासा व्यायाम…यातच सात वाजून जायचे…मग गरमागरम वाफाळलेल्या चहाचा घोट घेत…वर्तमान पत्र वाचत बसणे …हा पुष्पाताईचा सकाळचा दिनक्रम…आताशा पेपरात वाचण्यासारखे काहीच नसते…त्यामुळे जाहिराती पासून सगळे वाचायचा जणू त्यांना छंदच जडला…
दिनकर रावांचे निधन झाल्यानंतर… काय करावे…? ह्या प्रश्नाचे उत्तर.. हा पेपर वाचन..! तेवढाच विरंगुळा..! आणि वेळ जायचे माध्यम्..! आजही असाच पेपर वाचून झाल्यानंतर….त्यानीं त्यांचा मोर्च्या जाहिरातीकडे वळवला…

एक वेगळीच जाहिरात त्यांच्या दृष्टीस पडली…..
“आई पाहिजे….?”
नावातच कुतूहल…..वाचायला सुरुवात केली…’उच्च शिक्षित ,सुख संपन्न घरातील… ज्यांना मुलबाळ नाहीत…किंवा ज्यांची मुले परदेशात स्थाईक झाली…किंवा मुले गावात आहेत …पण सोबत आई नको …..अशा एकटे पणाचा कंटाळा आलेल्या…भरल्या घरात राहवेसे वाटणाऱ्या… आईची… दोन अनाथ मुलांना… नितांत गरज आहे..”
संपर्कासाठी पत्ता आणि मोबाइल नंबर….
पुन्हा पुन्हा जाहिरात वाचली ….तसाच पेपर घेतला …आणि शेजारच्या बंगल्यात गेले…सुधारकर भाऊजी आणि वासंती बंगळीवर बसून गप्पा मारत होते….सुधाकर भाऊजींचा स्वभाव फारच मिस्कील….
पुष्पताईंना पाहून म्हणाले…अरे वहिनी सकाळी सकाळी..! आम्हाला जेवायला बोलवायचा बेतबित आहे की काय…? आमचे आजचे सकाळचे जेवण तिकडेच वाटतं…? पुष्पाताई लटक्या रागात म्हणाले…
भाऊजी नेहमी कशी काय मस्करी सुचते हो तुम्हाला..? पुन्हा नरमाइच्या सुरात म्हणाले…भाऊजी ..! आजचा पेपर वाचला काहो..! सुधाकरराव म्हणाले…हो वहिनी वाचला..!वहिनी..! आम्ही पेपर वाचतो….आणि तुम्ही पेपराचे पारायण करता….अगदी जाहिराती सगट…! आणि खो खो हसायला लागले…
वासंतीने पण त्यांच्या सुरात सूर मिसळला….आणि ते तिघेही खो खो हसायला लागलो…
मग पुष्पाताई म्हणाल्या… वासंती ही जाहिरात पहिली का ग…?कोणती हो पुष्पाताई…? आणि त्यांनी पेपर पुढे केला…हवेत जरा गारवाच होता…वासंतीने बायजाबाईला चहा करायला सांगितला… आणि जाहीरात वाचू लागल्या….खरंच वेगळीच जाहीरात आहे ..! आजपर्यंत तरी अशी जाहिरात… माझ्यातरी वाचनात आली नाही बाई ..!
आणि त्यांनी पेपर सुधाकर रावांकडे दिला… त्यानीं सुद्धा जाहीरात वाचली …. म्हणाले हे तर नवलच …! इथे मुलांना आईबाप नकोत…वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली…आणि ह्या मुलांना आई पाहिजे..?
त्यासाठी चक्क जाहीरात…!
काय गौडबंगाल आहे देवच जाणो…..?
पण वाहिनी या जाहिरातीचा आणि आपला काय समंध…?
आपला नाही भाऊजी… माझा..!
म्हणजे …?
समजलो नाही मी….?
भाऊजी तुम्हाला तर माहिती आहे…मी माहेरी एकटी आणि हेही त्यांच्या घरी एकटेच….दोघांचेही आईवडील या जगात नाही….हे होते तेव्हा आम्ही वेळेचे छान नियोजन केले होते….
अनाथ आश्रम…वृद्धाश्रम यांना भेटी….त्यांच्या अडचणी…गरजू मुलांना मदत…त्याच्या शिकवण्या…. वेळ भुर्रकण निघून जायचा….हे गेले..…आता माझं कशा कशात लक्ष लागत नाही….एवढा मोठा आठ खोल्यांचा भव्यदिव्य बंगला… समोरचा तो बगीच्या…सारं सारं खायला उठते हो…!

हे नेहमी म्हणायचे….मला वाटते पुष्पा …माझ्या आधी तुला देवाच्या घरचे बोलावणे यावे…मी काय मनमौजी माणूस…कुठे ही आणि कसाही रमतो…एकदा जेवून घराच्या बाहेर पडलो की …,मी… आणि माझी समाज सेवा …चोवीस तास कमी पडतात मला…
पण तू पडली कुटूंब वत्सल …मुलं ,घर या विश्वात रमणारी…आता मुलं पण नाहीत इथे….. मी आहे म्हणून घेतेस समाजकार्यात भाग….पण मी जर आधी गेलो तर…तुझे सगळेच थांबेल.. मग मुलांचे आणि माझे फोटो पाहण्यात… आणि अश्रू गाळण्यात दिवस जातील….खूप भावनाविवश व्हायचे तेव्हा …
कधी स्वप्नातही वाटलेच नाही हो….यांच्या सारख्या माणसाला हृदय विकाराचा झटका येईल ….? सगळे कसे होत्याचे नव्हते झाले हो…!
गेले हे एकटीला सोडून… थोडाही माझा विचार नाही आला …
खूप कंटाळा आला आता या एकटेपणाचा ….तुला सांगते वासंती….मी एका खोलीत टेबलवर यांचा फोटो ठेवला…..बाकी सर्व भिंतीवर… मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडाचे छान छान फोटो लावून ठेवले….दिवसातून बऱ्याच वेळा मी त्या खोलीत जाते…
सगळ्यांशी मूक संवाद साधते…
हितगुज करते…
डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत…जुन्या आठवणींना उजाळा देत दिवस काढते….रात्र तर अजूनच भयाण वाटते ग..!

आधी माझ्याकडे सखू यायची कामाला…काम करून झाले की लगेच जायची…म्हणून मी आताशी तिच्या लेकीलाच बोलावते …नववीत नापास झाली ती…मागच्या वर्षी …तर पट्ठीने शाळाच सोडून दिली…मग मीच सखूला म्हणाले …सखू आता तू कामाला न येता तुझ्या लेकीला पाठवत जा…हळूहळू जमेल तसे काम करेल….आणि फावल्या वेळात अभ्यास घेत जाईन मी तिचा….सखुला ही ते पटले…
तुला सांगते वासंती…सखू जेवण बनवुन जायची …तर एक वेळचे जेवण दोन वेळा पुरायचे…आताशी तिची मुलगी येते…तेवढीच सोबत…चार घास जातात.. त्या निमित्याने पोटात…म्हणूनच विचार करते वासंती….जावे का या जाहिरातीच्या ठिकाणी…?
म्हणूनच मुद्दाम तुमचा दोघांचा सल्ला घ्यायला आले बघ…हे सगळं खरं वहीनी…पण …अश्या प्रकारची जाहिरात फसवी पण असू शकते न….?
पहिल्यांदाच असे काही वाचनात आले… म्हणून म्हणतो…वासंती पण म्हणाली ..नका बाई असे धाडस करू…! तिथे गेल्यावर जर कळले.. की… त्यांना घरकाम करायला बाई पाहिजे…..तर किती यातना होईल तुमच्या मनाला..! मुलांना कळले तर तेही दुःखी होतील… खरच…. ताई …काढून टाका डोक्यातले हे खूळ….

पण वासंती…. अग जाऊन पाहायला काय हरकत आहे….? ही जाहीरात खरी असेल…आणि त्या दोन अनाथ मुलांची… आई होण्याचे भाग्य मला लाभणार असेल तर….?
एक वेगळीच अनुभुती …अनुभवते वासंती मी…ही जाहीरात वाचल्यापासून …का कोण जाणे…? पण मला सारखे वाटते….त्या दोन जीवांना खरंच एका आईची गरज आहे…आणि मीच ती होणारी आई… ! कल्पनेनेच भारावून गेले बघ…! ठीक आहे पुष्पाताई … जा तुम्ही….,पण शांत डोक्याने पूर्ण विचार करून निर्णय घ्या….बाकी आम्ही आहोतच तुमच्या सोबतीला….

घरी आले…सखूच्या पोरीला नास्ता करायला सांगितला…आज कशा कशातच मन लागत नव्हते…डोळ्यासमोर ती जाहिरात….अन दोन अनाथ मुलं दिसत होती…कशीबशी आंघोळ केली…देवाच्या डोक्यावर पाणी घातले….आज पूजेत सुद्धा लक्ष लागत नव्हते….ड्रायव्हर ला फोन करून बोलावून घेतले….छानशी प्युवरसिल्क ची साडी नसले… हे गेल्यानंतर पहिल्यांदाच इतकी छान तयार झाले….
आणि निघाले… त्या कधी न पाहिलेल्या ….दोन अनाथ मुलांची …आई होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी……
फोन करायची तसदी मुद्दामच घेतली नाही….अचानक समोर उभी पाहून…. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव …अचूक टिपता यावे म्हणून….
दारावरची बेल वाजवली…एका सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या स्त्री ने दार उघडले…स्त्री यासाठी कारण तीच्या गळ्यात साधेच…पण नाजूकसे मंगळसूत्र होते…
नमस्कार , मी पुष्पा सोनकुसरे…आणि मी हळूच पेपर पुढे केला…ही जाहीरात वाचून आले….अच्छा …! या …या ..आई आत या…प्लीज…मी आता गेले…अजय… ये… अजय …लवकर बाहेर ये…हे बघ कोण आले…? अजय सर्व आवरून…लगेच बाहेर आला…
अजय ह्या आई..!
आई हा अजय ..! माझा नवरा..!
बसा न आई …तुम्ही उभ्या का..? मी बसले…
तो म्हणाला…आई मला अत्यन्त महत्वाची मीटिंग आहे…त्यामुळे मी निघतो…तुम्ही सुचिताशी बोलून घ्या…तसेही घरातले सगळे निर्णय तीच घेते…. माझ्या जवळ आला….नमस्कारासाठी पायाला स्पर्श केला….
सुचिता येतोय ग..! आई येतोय…! म्हणून निघून गेला….सुचिता आलेच म्हणून ….त्याला दारापर्यंत सोडायला गेली…मी तर त्या दोघांच्या ‘आई आई’ या शब्दाने भारावून गेले…किती वेळा उच्चारला असेल शब्द…”आई” ….
बाई ग …! नुसता कानात गुंजतो आहे आवाज तो…! दोन महिने झाले भारतात येऊन…पुढ्यात उभ राहून कोणीतरी आज पहिल्यांदा… आई म्हणून साद् घालत होत… पाखराचे पंख लावून…माझे मन… त्या अनाथ जीवांवर…मनोमन मायेची पाखर घालत होते… त्याला बाय करून …सुचिता माझ्या बाजूला येऊन बसली….अनुसया बाई म्हणून हाक मारली…एक चाळीस ,पंचेचाळीस वर्षाची विधवा समोर आली…तिला चहा बिस्कीट आणायला सांगितले …मग मीच विषयाला सुरवात केली…
ही जाहीरात… ” आई पाहिजे…?” या विषयी काही सांगाल का…? सुचिता सांगू लागली…
आई …मी आणि अजय दोघेही अनाथ आहोत….आम्ही दोघे एकाच आश्रमात लहानाचे मोठे झालो…अजय अभ्यासात खूप हुशार होता…अनाथ आश्रमातील सरांनी मग त्याच्याकडे विशेष लक्ष दिले…अजय दहावी, बारावी दोन्ही वेळेला मेरिट मध्ये आला…IIT ची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन…नामांकित कंपनी मध्ये इंजिनीअर म्हणून कामाला लागला…
मीही इंजिनीअर आहे….हे घर, गाडी आणि नोकर सगळं कंपनी ने दिले…मीही नोकरी करत होते…अशातच आम्हाला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली….दोन महिने झाले असतील…ऑफिस ला जायला निघाले…गाडी स्टार्ट होत नव्हती…म्हणून गाडीला किक मारायचे निमित्य झाले…आणि आमचं बाळ गेलं….खूप खच्चून गेलो होतो आम्ही….अनुसया बाईंनी त्यावेळी खूप सांभाळून घेतले…
तेव्हा अजय म्हणाला… सुचिता…तुला किंवा मला…दोघांपैकी कुणालाही आई असती तर ही वेळ आलीच नसती…..डोळ्यात तेल घालून तुझ्याकडे लक्ष ठेवले असते बघ….
आता पुन्हा पाळी चुकली…तीन महीने होत आले…तो मला आता नोकरी करू द्यायला तयार नाही…आधी बाळ …मग तुला जे करायचे हे कर म्हणतो…”आई “..या शब्दानेच खूप हळवा होतो तो…आता तर मी आई होणार आहे…
मग काय ..? चाललाय आराम…खाओ पियो मज्जा करो… होणाऱ्या बाळाच्या आईला जपणे …याशिवाय त्याला काहीच दिसत नाही…अनुसया बाई आहेच माझ्यावर लक्ष ठेवायला…
पण आई अजयचे बोलणे..”आपल्याला आई असती तर”…हे माझ्या काळजाला छेदून गेलं…आणि…माझ्या डोक्यात ही कल्पना आली…अजयला बोलून दाखवली ..त्यालाही ते पटलेले…..मग ही जाहीरात दिली…विचार केला …आलेच कोणी तर ठीक…नाहीतर काय….? फार फार तर जाहिरातीचे पैसे वाया जातील…?
आणि आई तुम्ही पहिल्याच आल्या….तसेही आजकाल आपण tv, पेपर मध्ये वाचतोच या बाबतीत….आई आता तुम्ही सांगा ..तुमच्या बद्दल…मी सांगू लागले….
यांना जाऊन आठ महिने झाले….खूप मोठ्या कंपनीत नोकरीला होते…दोन मुलं आहे….एक मुलगा एक मुलगी….आणि नातवंड …
मूलं मोठी झाली…पदेशातलं भारी पगाराचे पैकेज खुणावत होतं…आणि दोघांच्याही डोक्यात US ला जाऊन… MS करायचे खूळ भरले…पंखात बळ आलं होतं…उंच भरारी घ्यायचे स्वप्न पाहत होते…मग त्यांचे पंख छाटण्याचे पातक आम्ही नाही केले…
शिकायला गेलेली ही दोन्ही पोरं…लग्न करून तिकडेच स्थाईक झाले…सुरवातीला यायचे दर वर्षी…आताशा…दोन दोन, तीन तीन वर्षे येत नाही…हे होते तर काही वाटायचे नाही…
पण आता खूप एकटं एकटं वाटत…हे गेल्यावर सहा महीने गेले मी तिकडे…पण तिथल्या मातीत माझी नाळ काही रुजली नाही…या मातीशी एकरूप झालेली मी … या मातीचा गंध …इकडे यायला खुणावत होता…आले परत…
मुलगा म्हणाला आई राहा इथे…इथल्या भारतीय लोकांमध्ये मिसळली कि बरं वाटेलं तुला…सून पण म्हणाली आई राहा…मी आहे …तुमची नातं आणि नातू आहे…शिवाय ताई आहे…नका जाऊ…
तुम्ही तिकडे गेल्या तर …आम्हाला सारखी तुमची चिंता वाटत राहणार…पण नाही जमले ग…आले निघून..आज भरल्या घरात एकटी आहे मी…
तुमची ही जाहिरात वाचली….विचार केला तुम्हाला आई पाहिजे…आणि मला भरलं घर…पाहुयात या दोन अनाथ जीवांची आई व्हायचे…माझ्या भाग्यात आहे का …? आणि सकाळी सकाळी फोन न करताच आले बघ….
बरं येते मी…अस म्हणून… उठणार…तर ती म्हणाली …
आई कुठे निघालात..! अग कुठे काय…? घरी..! खूप वेळ झाला बोलताबोलता..! कळलेच नाही बघ..! नाही आई …तुम्ही आता जेवूनचं जायचे…अजयचा पण मेसेज येऊन गेला…म्हणाला दोन पर्यंत जेवायलाच येतो…आईला थांबवून ठेव…जेवून निवांत बोलू…
का कोण जाणे …पण मला तिचे मन मोडवले नाही गेले….थांबले…अनुसया बाई मधेमधे काहीतरी खायला घेऊन येत होत्या… गप्पांच्या ओघात दोन कसे वाजले…कळलेच नाही…
बरोबर दोन वाजता दारावरची बेल वाजली…अनुसया बाईनी दार उघडले…
दारात अजय….बॅग ठेवली…आई आलोच म्हणून ….फ्रेश होऊन …पाचच मिनिटात आला…आधी जेवयलाच बसलो…जेवणं आटोपली…झक्कास जेवण बनवले होते …अनुसया बाईनी…खूप दिवसात पाहिल्यांदा… पोटभर जेवल्या सारखे वाटच होते…. बडी सोप हातावर ठेवत अजय म्हणाला…
काय सुचिता….?
आवडली का आई….?
होय अजय खूप आवडली…
पण अजय…आईला आपण दोघे आवडलो कि नाही…हे तीच सांगू शकेल…?
अग असं काय बोलतेस…सुचिता …?
खूप आवडले तुम्ही दोघे मला…अजयजी… खूप नशीबवान आहात तुम्ही…सुचिता सारखी समंजस, सुशील बायको मिळाली तुम्हाला… अजय म्हणाला …
सुचिता… आईला तू आवडली…
पण मी नाही बरं का..?
काय हे अजयजी…?
अहो आत्ताच बोलले न…
दोघेही खूप आवडले म्हणून…

अहो आई तुम्ही मुलं आवडली म्हणता….आणि अहो जाहो करता…तस नाही अजयजी….पुन्हा जी…सॉरी सॉरी…अजय तुही खूप आवडला रे बाबा…
बरं निघते मी आता….भेटू लवकरच..!
ये आई लवकरच का ग…?आजच ये न राहायला..! नाही अजय…घरी काही जबाबदाऱ्या घेऊन ठेवल्या…त्या पूर्ण कराव्या लागतील…काय जबाबदाऱ्या आहे आई…..? सांग तरी….चुटकी सरशी मार्ग काढतो बघ…
अरे माझी कामवाली आहे सखू…तिच्या मुलीची जबाबदारी आहे…खर सांगू अजय तशी ती बालमजूर…सुरवातीला तीच्याकडून काम करून घेतांना मला जरा जडच जात होत…पण ही सखू …तिला तिच्या सोबत घेऊन जायची…दिवसभर धुनी भांडी करून थकून जायची बिचारी…
नववीत नापास झाली…शाळा दिली सोडून…मग मीच सखुला म्हणाले…तुझ्या लेकीला पाठव…काम झाले की, मी तिचा अभ्यास घेत जाईन… येते ती आताशी…बाहेरून दहावीचा फॉर्म भरणार आहे तिचा…फावल्या वेळात आमचा अभ्यास चालू असतो…तशी हुशार आहे रे…थोडे लक्ष दिले तर नक्की पास होईल…
मी इकडे आले तर तिच्या अभ्यासाचे काय…? हाच मोठा प्रश्न पडला मला…एकदा हाती घेतलेले काम अर्थवट सोडलेले…तुझ्या काकांना कधीच रुचलेच नाही…
बस इतकच आई…माझ्याकडे एक मार्ग आहे बघ…तू सखुला तिकडे घरकाम करायला ठेवले…आताही तिला यावेच लागेल…इतकेमोठे घर, बाग हे सर्व रोजच्या रोज साफ व्हायला पाहिजे…ती हे सगळे काम करून …इकडे येईल…इथे तू तिचा अभ्यास घे…सुचिताला पण नवीन मैत्रीण मिळेल…घर लांब पडत असेल तर …आपण तिला एक सायकल घेऊन देऊ…
वाह…! किती पटकन सोल्युशन काढलं रे तू अजय..! मी आताच सखुला फोन करून बोलवून घेते…
चला तर मग निघते मी आता….खरच तुमच्या दोघांसोबत …वेळ कसा गेला कळलेच नाही…तेवढ्यात सुचिता म्हणाली… सॉरी अजय…तुला आईंना सोडवायला जावे लागेल…मी त्यांच्या ड्राइवर ला केव्हाच पाठवून दिले…ओके बॉस म्हणत…त्याने किल्यांचा जुडगा हातात घेतला…बोटात चाबी गरागरा फिरवत …छान गोड अशी शीळ वाजवतच बाहेर आला… मला भेटून त्याला आनंद झाला…. हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते….

त्याने गाडी काढली….सुचिता नमस्कारासाठी वाकणार….मीच तिला थांबवले….आताशी पुन्हा तिला दिवस गेले होते… तिसरा लागला होता….पुन्हा निमित्याला कारण नको बाई…! आजकाल फार जपावं लागतं…
आधीच पोरींचं एक बाळ गेल…
“देवा सगळं सुखरूप होऊ दे रे बाबा”..! मनोमन त्याची प्रार्थना करून झाली…सुचिता गाडी जवळ आली…टाटा केला…तिला आराम करायच्या सूचना देऊन…मी आणि अजय निघालो…सखू घरी येऊन तयारच होती…
सखुला अजयची ओळख करून दिली….आणि पेपर च्या जाहिराती पासून… इथपर्यंतचा सगळा इतिहास सांगितला…तिला हे पटले…तिनेही लेकीला अजयकडे पाठवण्याचे कबूल केले….ठराविक सामान घेऊन…मी निघाले…नव्या …भरल्या घरात…दोन अनाथ जीवांचे…आई व्हायचे स्वप्न पूर्ण करायला……

“आई,आई “करतांना दोघेही थकत नव्हते…हे गेल्यानंतर कधीही kitchen मध्ये …न गेलेली मी…आजकाल kitchen मध्ये रमायला लागली…त्या दिवशी सुट्टी होती…अजय घरीच होता…माझी kitchen मधील खुडबुड बघून म्हणाला…
आई हे ग काय करते…?तुला जेवण बनवणारी मेड म्हणून नाही आणले ग..? जा बाहेर….मस्त आराम कर…आणि सुचिताची काळजी घे…बस..बाकी काही करू नको…अरे राजा ..! आरामच करते रे बाबा..! पण काय आहे न..! माझं होणार नातवंड छान गुटगुटीत…. गोरेपान आणि सुदृढ व्हायला पाहिजे न..! म्हणून चांगलचुंगलं करून खाऊ घालते..! माझ्या लेकीला…आणि तिचे डोहाळे पण पुरवायचे आहेत न…
तू नको लक्ष देऊ…जा तू …बाहेर जाऊन बस…आणि हो तुझ्यासाठी ….छान केशर घालून शिरा करते…सुचिता कालच बोलली मला…तुला केशर घातलेला शिरा खूप आवडतो म्हणून…धन्य हो माते…! म्हणत त्याने हात जोडले…बाहेर जाऊन पेपर वाचत बसला…शिऱ्याची डीश घेऊन…सोफ्यावर बसले….चार वेळा सांगितले…अजय शिरा खाऊन घे….पण हा पेपर वाचण्यात मग्न
शेवटी घेतला चमचा …भरवला शिऱ्याचा घास….मग सॉरी सॉरी म्हणायला लागला….घे आता गुपचूप खाऊन…भरवते मी….तू कर त्या पेपराचे पारायण…आणि माझी मीच हसायला लागले…..माझ्या या लटक्या रागाने… सुचिता सुद्धा खो खो हसायला लागली…
एक दिवस पुष्पाताई
…सुचिता आणि अजयला म्हणाल्या…अजय, सुचिता दोन दिवस तिकडच्या घरी जाईन म्हणते…काकांचे वर्षश्रद्धा आहे परवा… तर अजय म्हणाला …आई त्यासाठी तिकडे जायची काय गरज आहे…?आपण काकांचा फोटो आणु… किंवा तिकडेच जाऊन पूजा करू…नंतर अनाथ आश्रमात जाऊन …काकांच्या नावाने दानधर्म करू…मी नेहमी असेच करतो…सुचिताचा , माझा आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही तिकडेच साजरा करतो…
आणि आई तुला पण पाहायचा होता ना ग आश्रम..! त्या निमित्याने तू ही बघून घे..! पण आई माझी ही कल्पना तुला आवडली असेल तरच ..! जबरदस्ती नाही बर का…? होय रे बाळा…खरच खूप आवडली तुझी कल्पना….नक्की न ! थांब मी आता आश्रमात फोन करूनच विचारतो…त्यानां कशाची गरज आहे ते…त्यानुसार आपण त्यानां सामान देऊ…मी नेहमी असेच करतो…आई तू पूजेच्या सामानाची यादी करून दे….मी सगळं सामान घेऊन येतो बघ, आज उद्या मध्ये…
मग म्हणाला , ऐ आई…! तुझा कधी असतो ग वाढदिवस…?आपण तुझा ही वाढदिवस मस्त आश्रमात मुलांसोबत साजरा करू..!
आठ जानेवारी तारीख आहे बघ… पण माझ्या वाढदिवसाचे काही विचारु नको…अरे माझी जन्म तारीख वेगळीच…आणि शाळेच्या दाखल्यावर वेगळीच…आम्ही नाही केला कधी वाढदिवस साजरा…मग मुल मोठी झाली ….ते आणत होते…केक…ते गेले US ला… तसा नाहीच साजरा केला कधी …शेवटचा कधी केला हेही आठवत नाही बघ….पण मुलं फोन मात्र आठवणीने करतात दरवर्षी…
अजय श्राद्धाचे सगळे सामान घेऊन आला…ठरल्याप्रमाणे पूजा करून…आम्ही आश्रमात गेलो…दिवसभर तिथे घालवून…बरंच काही दान देऊन घरी आलो….
आजपर्यंत मी मुलांना अजय आणि सुचिता बद्दल …काहीच सांगितले नव्हते…देवदर्शन करत फिरते असेच सांगितले होते…आज बाबांचे श्राद्ध …दोघांचेही फोन येतील… तेव्हा सगळे सांगून टाकायचे ठरवले…तेवढ्यात मोबाईल ची रींग वाजली…फोन मुलाचाच होता….कसे झाले श्राद्ध पूजन …कधी आलीस देवदर्शन करून…तब्बेतीची चौकशी करून झाली….मग मी हळूच त्याला… सुचिता आणि अजय यांच्या…

आई या संकल्पने बद्दल सांगितले….मी त्याच्याच कडे राहते हेही सांगितले …सुरवातीला त्याला हे नाहीच पटले…मग अजयने मोबाईल घेतला आणि बोलायला सुरवात केली..,दादा मी अजय बोलतो…सॉरी आपण एकमेकांना ओळखत नाही…पण तरीही मला तुमच्याशी बोलायचे आहे…दादा आई माझ्याकडेच असते…तीन महिने झाले…
खरं तर ती माझ्याकडे असते हे म्हणणे चुकीचेच ठरेल रे दादा….कारण मी आता आईजवळ असतो….आम्ही दोघे अनाथ होतो….आई नावाच्या या देवतेमुळे आमच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली..!
तिच्यात भोवती आम्ही आमच हरवलेलं बालपण जगतोय रे दादा..!
खूप खूप खुश आहोत आम्ही..! “आई नावाचा हिरा गवसला आम्हाला..!” खऱ्या अर्थाने आयुष्याला आता पैलू पडत आहे…
दादा प्लीज…आमचा हा आनंद नको हिरावून घेऊ…
आई सदैव तुमचीच असणार आहे….तुम्ही इथे नसतांना या दोन अनाथ जीवांवर …तिच्या मायेची पाखर घालू दे दादा…दादा प्लीज….

ज्या दिवशी आईला आमच्या बद्दल अविश्वास वाटले…तो दिवस माझ्या आणि सुचिताची आयुष्यातील शेवटचा दिवस असेल…
खूप खूप प्रेम करतो आम्ही तिच्यावर…आणि आई या शब्दावर..! बघा दादा …विचार करा….आणि त्याने जोरात हुंदका दिला…माझ्या हातात फोन दिला…त्याचा हुंदका , त्याची भावना US परंत पोहचली बहुतेक…! लगेच मला म्हणाला …आई तू खुश आहेस न तिकडे…? मी लगेच म्हणाले …हो रे राजा..! उलट US वरून आल्यानंतर दोन महिने खूप कंटाळवाणे गेले बघ…आता पुंन्हा भरलं घर…आई चा पाढा म्हणणारे पोरं …मस्त चाललंय माझं… खरंच नका काळजी करू आता… ठीक आहे…काळजी घे म्हणून त्याने फोन ठेवला….
हे गेल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी होती…मी अजयला म्हणाले…अजय , सुचिता दिवाळीला तिकडे जाईन म्हणते…एक दोन दिवसात…अजय म्हणाला हो.. हो…जा …जा…..तुला कोण अडवते…! कधी चालली बोल…! उद्या किंवा परवा जाईन म्हणते..!
अजय लगेच म्हणाला…
सुचिता ..ये ..सुचिता…अग बाहेर ये जरा..! काय झालं अजय..! का इतका कळवळून बोलतोस…अग आई चालली… तिकडच्या घरी..! दिवाळी साजरी करायला..! आपली पण बॅग भर..! तिच्या मागे मागे आपणही जाऊ..! मला तरी नाही जमणार ..! तिच्या शिवाय दिवाळी साजरी करायला..!
मलाही नाही जमणार अजय…चल आपली बॅग भरू… आई कधी जायचे ….?
काय रे पोरांनो..! खरंच किती प्रेम करताय रे..? कशी करू तुमच्या प्रेमाची उतराई …! डोक्यात विचार आला ….देवा किती तरी मुलं आहेत… जे आपल्या जन्मदात्यांना सांभाळत नाही…
आणि ही दोघे…..कोणता ऋणानुबंध आहे माझा नि त्यांचा…त्या वरच्यांलाच ठाऊक… शेवटी नाहीच गेले…छान आनंदात पार पडली दिवाळी …हे गेल्या नंतरची ही पहिलीच दिवाळी…ही दोन पोर नसती तर काय केलं असत देवच जाणे..?
अजयने सखूच्या पोरीला दिवाळीला कपडे, फटाके आणि मिठाई दिली…मी पैसेच दिले…हव नको ते घेता यावं म्हणून….
आताशी सुचिताला सातवा महिना लागला होता…मी अजयला म्हणाले …अजय… सुचिताचे डोहाळे जेवण करायचे म्हणते….तुझं काय म्हणन आहे रे….? आई तू जे ठरवशील ते…मस्त दणक्यात होऊन जाऊदे डोहाळे जेवण मग….आणि सुचिताचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम …थाटामाटात पार पडला…त्या नंतर सुचिताच्या चेहऱ्यावर वेगळीच तेजी दिसत होती….मी तर बाई नजरच काढली….माझीच मेलीची लागायची दृष्ट्.
दुपारी चार साडेचार ची वेळ असेल..पुष्पाताई हातात चहाचा कप घेऊन…सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या…सुचिता खुर्चीत बसून …बालाजी तांबे यांचे… गर्भसंस्काराचे पुस्तक वाचत बसली होती…
इतक्यात दारावरची बेल वाजली…अनुसयाबाई ने दरवाजा उघडला…दारात अजय…खूपच थकलेला दिसत होता…ड्राईव्हरने त्याच्या हाताला धरूनच त्याला घरात आणले …अजयने सोफ्यावर बसून… पुष्पताईच्या मांडीवर डोके ठेऊन…तिथेच झोपला…अंगात चांगलाच ताप होता…ड्राइवर म्हणाला…साहेबांना ऑफिस मध्ये थोडी कणकण वाटत होती… त्यामुळे लवकरच निघालो….येतांना डॉक्टरकडे जाऊनच आलो…
ह्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी…आणि आराम करायला सांगीतला…किल्ली जागेवर ठेऊन तो निघून गेला…सुचिता म्हणाली… आई… याला रात्रीच थोडा ताप होता…मी सकाळी बोलले सुद्धा…

अजय आज ऑफिस ला नको जाऊस म्हणून….पण नाही ऐकले….गेला…बघा न आई आता तापाने कसा फणफणला…थोडीशी घाबरूनच गेली ती…
मी सुचिताला म्हणाले…अग बाळा..! उतरेल ताप..! जाऊन आला न तो डॉक्टर कडे..! तू आता याला काहीतरी खायला दे..! आणि मग गोळ्या देऊन… बेडरूम मध्ये घेऊन जा..! आराम करू दे..! बरं वाटेल बघ..! नाहीतर पुसून देते मी त्याचे अंग..! तू अजिबात टेंशन घेऊ नको…
अजय चल बाळा बेडरूम मध्ये जाऊन आराम कर बरं…. तर म्हणाला ..नको ना ग आई…! तुझ्या मांडीवरच झोपु दे ग…! मग म्हणाला… आई बरंच झालं …आज मला ताप आला….एक वेगळंच सुख अनुभवतोय मी…आई… आज नवीनच अनुभूती आली बघ ..आईच्या उबदार मांडीची… वात्सल्याने डोक्यावर, चेहऱ्यावर फिरणाऱ्या आईच्या हाताची सर…या जगाच्या पाठीवर कशा कशात नसेल ग…आणि अजूनच कमरेला घट्ट विळखा घातला…
मी त्याच्या केसांवरून मायेने हात फिरवत राहिली….डोळ्यात आनंदाच्या अश्रूंनी तुफान गर्दी केली होती…कधी कोसळतील याचा नेम नव्हता… त्याला दिसू न देता डोळ्याला पदर लावला…स्त्री आणि ममता …! स्त्री आणि वात्सल्य….! स्त्री, आणि प्रेम….! स्त्री नावाची किती सूंदर कलाकृती निर्माण केली त्या ईश्वराने नाही…..! मनोमन त्या परमेश्वराला धन्यवाद दिले…
गोळ्या खाऊन पुन्हा मांडीवरच विसावला तो… हळूच म्हणाला… आई…माझी एक मैत्रीण आहे…तिला कविता करायचा छंद आहे…खूप वर्षांपूर्वी तिची एक कविता वाचली होती…ती म्हणे स्कुटी चालवतांना पडली …तिला खूप लागल होत …आईच्या मांडीवर डोके ठेऊन झोपल्यावर…इतके लागूनही तिला त्या क्षणी कविता सुचली….आणि तेव्हाच कागदावर उतरवली…माझी तर पाठच झाली…थांब तुला कविताच म्हणून दाखवतो…सुचिता तू पण ऐक..आणि कविता म्हणायला सुरवात केली…..आणि इतक्या तापातही त्याने कविता वाचन सुरु केले…..

” माऊली”
माझी माय माऊली
पिंपळाची साऊली
तिच्या छायेत विसावा
देह तान्हुला दिसावा
मागणे हे देवाला
माझी माय माऊली ll१ll
तिच्या मांडीवर शीर
तिचे थरथरणारे कर
फिरे माझ्या माथ्यावर
शीण जाई कुठे दूर
माझी माय माऊली…..ll2ll
तिच्या हृदयाची पोकळी
सदाचीच का मोकळी?
माया तिची ना आटली
प्रीत कंठात दाटली
माझी माय माऊली….. ll3ll
माझी माय माऊली
पिंपळाची साऊली……….

माझ्या हात त्याचा केसांवरून फिरून…त्याला थोपटत होता….तो शांत झोपी गेला…माझ्या डोळ्यासमोरून बरंच चित्र सरकून गेलं…किती तरी वर्षात माझ्या दोन्ही मुलांपैकी…एकानेही जरा मोठे झाल्यानंतर …मांडीवर डोके ठेऊन विसावले नव्हते…
कसं आहे न…जी गोष्ट आपल्याला सहज मिळते…त्याची किंमतही तशी कमीच असते…प्रत्येकाचा गुणधर्मच आहे तो…त्या विषयी माझी…माझ्या मुलांबद्दल तक्रार अजिबात नाही…खरंच खूप समजदार आहेत दोघे पण…अजय आणि सुचिता दोघेही आईच्या प्रेमाला पारखे झालेले….म्हणून त्यानां जास्त किंमत वाटते…इतकंच…माझीच मला समजूत घालू लागले…..
सुजिताचे आता दिवस भरत आले होते…आठ जानेवारी डॉक्टरांनी तारीख सांगितली….तेव्हा पासून अजय जॅम खुष हता….कारण आठ जानेवारी माझा पण वाढदिवस होता…मध्यरात्री अचानक सुचिताच्या पोटात दुखायला लागले…दवाखाण्यात भरती केले…बरोबर आठ जानेवारीला पहाटे सात वाजून वीस मिनिटांनी …एका छान ,गोंडस, गुटगुटीत आणि काळेभोर जावळ असलेल्या मुलीला जन्म दिला…सिझेरियन झाले… बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप होते…
अभिनंदन अजय …! आई खूप खूप अभिनंदन..! आणि त्याने मला उचलून गिरकीच घेतली…! त्याच्या आनंदाला उधाण आल होत…सुचिता हळूहळू शुद्धीवर आली…पुन्हा अभिनंदनाच्या वर्षावात सगळे न्हाऊन निघालो…
अजयने US ला फोन करून ही बातमी सांगितली…सगळेच खूष होते…अजय म्हणाला… दादा लगेच बारस्याची तारीख काढतो….तुम्ही सगळेच या इकडे…तसेही तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता लागली आहे…मला आई तर मिळाली …पण आता…दादा…वहीनी… ताई…भाऊजी…आणि भाचे कंपनी यांना भेटायचे वेद लागले आहे…अभिनंदानाच्या वर्षावातच फोन ठेवला…..
अजय ,आई आत्ता यतोय… म्हणून बाहेर गेला…. बर्फी घेऊन आला…मला म्हणाला…आई डोळे मिट बरं… हे रे काय नवीनच अजय….? मिट ग आधी डोळे….गंमत आहे …मी डोळे मिटले…दार उघडल्याचा आवाज आला…काय रे उघडू का….? नाही एक मिनिट …मग मला तसेच डोळे बंद करून…. एका जागेवर उभे केले ….
हं आई ! उघड पाहू डोळे आता… काय आश्चर्य…? समोर भला मोठा कैके…? आणि डॉक्टर सहीत सर्व स्टॉप उपस्थित…..एकच गलका….HAPPY BIRTHDAY TO YOU
” आई” …..
सुचिताने आणि अजयने त्या लहानग्या जीवाला…माझ्या हातात दिले…म्हणाले आई तुमचे वाढदिवसाचे गिफ्ट…सांभाळा आता तुमच्या नातीला…त्यासाठी तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो…
बारस्याची तारीख ठरली…US वरून सगळेच आले…दणक्यात बारसे आटोपले…अजय आणि सुचिताच्या लेकीचं नाव ठेवले
‘सुजया’…
त्या दोघांच्या प्रेमाच सुंदर प्रतीक…
सुचिता आणि अजयच्या प्रेमाने सगळेच भारावून गेले…US वरून मुलांनी नव्या भाचीसाठी बरंच काही आणलं होतं…अजयनेही सर्वांना छान छान गिफ्ट …आठवण म्हणून दिल्या…चांगले पंधरा दिवस राहून …परतीच्या प्रवासाला निघाले…म्हणाले आई तुही चल आमच्या बरोबर ….तुझंही तिकीट काढतो…नाही रे बाबा…
आता तर मला माझ्या या नव्या नातीची जबाबदारी स्वीकारायची आहे….पण आम्ही लवकरच येऊ…काय अजय जायचे न आपण US ला….? होय आई नक्की जाऊ…लवकरच….
जातांना मुलं म्हणाली…आई सुरवातीला जेव्हा तू आम्हाला… सुचिता, अजय बद्ल सांगितले…तेव्हा मनाला रुचतच नव्हते ग….पण आता आम्ही खरच निश्चिंत आहोत बघ… आईची काळजी घ्या ….असे म्हणणे म्हणजे….या दोघांच्या प्रेमाचा अपमान करण होईल…
अग आम्ही सुद्धा घेणार नाही… इतकी काळजी घेतात तुझी….हि दोघे….पाहीले आम्ही …”याची देही ,याची डोळा” तेव्हा इतकच म्हणतोय….एकमेकांची काळजी घ्या….असं म्हणून सगळ्यांनी….
ONE BYE ONE वाकून आईला नमस्कार केला….
अजय , सुचिता खरंच तुमचे दोघांचेही खूप खूप धन्यवाद…..आणि तुमच्या ‘आई पाहिजे’ ……? या कल्पनेला सलाम…..
सुचिता लगेच म्हणाली….खरं तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे…..तुमच्यामुळे आम्हाला एक प्रेमळ आई तर मिळालीच …..पण बहीण, भाऊ, वहिनी ,भाऊजी …भाचे सगळेच मिळाले….हे दोन अनाथ जीव ….कुटूंब नामक एका रेशमी धाग्यात गुंफले गेले….कायमचे…
अनाथ असलेले सुचिता आणि अजय आता खऱ्या अर्थाने सनाथ झाले होते..अनाथ आश्रम हे एकमेव त्यांच्या दोघाचंही माहेर…पण आता त्यांना एक हक्काची आई मिळाली होती…आणि त्याला जोडून दादा… वाहिनी…एक गोड… हट्ट करणारी…पण भरभरून प्रेम करणारी बहीण…जिजाजी…आणि भाचे कंपनी…
US म्हणजे आता त्याच्यासाठी पर्यटनाचे स्थळ नसून …हक्काचं घर होत…खरतर दोनतीन वर्षातून एकदा येणारे …दादा वाहिनी आणि बहिणाबाई आता वर्षादोन वर्षातून एकदा येत होते…सुचिता आणि अजय पण पुष्पाताई ला घेऊन मुद्दाम जात होते…सर्वात महत्वाचे सुजयाला काका…काकू …आत्या…मामा…आणि भावंड मिळाली होती…
सुजया आता पाच वर्षांची होत आली होती…पुष्पाताई म्हणाल्या… अजय…सुजयाचा पाचवा वाढदिवस साजरा करू…आज पर्यंत तिचे सगळे वाढदिवस अनाथ आश्रमातच केले होते…
अनाथ आश्रमात आपण साजरा करूच…पण शेजारच्या तिच्या मित्र मैत्रिनींना बोलऊ… ती शेजारी सगळ्याकडे जाते…मग तीचे भाबडे मन मलाच प्रश्न विचारते… आजी मी सगळीकडे जाते ग बर्थडे साजरा करायला…माझा मात्र तुम्ही त्या अनाथालयात करता…या वर्षी माझ्या मित्र मैत्रिनींना बोलऊ या…ये आजी तू बाबांना सांग ग…बाबा तुझं फार ऐकतात…आणि हो आई पण…
अजय म्हणाला ठीक आहे आई …आपण सुजया चा पाचवा वाढदिवस जोरात करू…आई US वरून दादा वाहिनी, ताई सगळ्यांना बोलवायचे काय ग..? नको अजय आपण घरातल्या घरात करू…,शेजारचे लहान मूल तेवढे बोलयू…आणि शाळेत साजरा करू…बरं बाई तू म्हणशील तसे…
आणि तो दिवस उजाडला आठ जानेवारी…सुजयाचा वाढदिवस…आणि पुष्पताईंचा पण वाढदिवस…रात्री सुजया आणि पुष्पाताई बेडरूम मध्ये झोपायला गेल्यावर अजय आणि सुचिताने…भल मोठं पोस्टर बाहेरून दाराला लावलं…”हैप्पी बर्थडे सुजया”….”हैप्पी बर्थडे आई”….
नंतर किचनच्या ओट्यावर…चहा साखर च्या डब्यात…दुधाच्या पातेल्याच्या झाकणावर….सगळीकडे हैप्पी बर्थडे सुजया आणि आई…
सकाळी आजी नाती दोघी उठल्या…दारावर भल मोठं पोस्टर बघून खूप खुश झाल्या…दोघीनाही हा कन्सेप्ट नवीनच होता…मग पुष्पाताई गॅस जवळ गेल्या…तिथेही अशीच चिट्ठी…आता चहा ठेवायला पातेलं घेतलं…पाणी घातलं… साखरेचा डबा उघडला पुन्हा चिट्ठी…चहाचा डबा त्यातही चिट्ठी…फ्रीझ उघडला दुधाचे पातेले काढले…झाकणावर पुन्हा चिट्ठी…”सुजया आणि आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”…”खूप सुखी राहा”…”उदंड आयुष्य लाभो”….
सुचिता स्वयंपाक घरात आली…पुष्पाताई साडीच्या पदराने डोळे पुसत होत्या…डोळे अश्रूंनी तुडूंब भरले होते…सुचिता भांबावून गेली…आज आईचा वाढदिवस …आणि आईच्या डोळ्यात पाणी…काय चुकले असेल आपले…विचार करतच जवळ गेली…म्हणाली आई काय झाले…?आज आमच्यासाठी द्विगुणित आनंद देणारा दिवस…आणि तुमच्या डोळ्यात अश्रू…आई आमच्या कडून काही चूक झाली का…? आई अगदी आमचे कांन उपटून टाकायचा देखील तुम्हाला हक्क आहे…पुष्पाताईने सुचिताला जवळ घेतले…म्हणाल्या बाळा हे आनंदाश्रू आहेत ग..! पाहिलं वाढदिवसाच दिलेलं गिफ्ट आता पाच वर्षाचं झालं…
किती शाश्वत ते एक दिवसाच पोरं तुम्ही माझ्या हातात दिलं होतं…माझ्यापरीने मी तिला सुसंस्कारित करण्याचा खूप प्रयत्न करते…गोडच आहे ग माझी नातं….तुम्हा उभयतांनी आम्हा दोघींचे सगळे वाढदिवस अनाथालयातच केले…तो तर आनंद आणिकच वेगळा …कारण तुमची म्हणून आलेली ही पुष्पाआई… आश्रमातील सर्वांची आई झाली…आणि आजचा हा अजूनच सुखद धक्का जिकडे तिकडे पोस्टर…वाढदिवसाच्या शुभेच्छा…
या उतरत्या वयात हे सगळं नवीनच ग…खरंच सुचिता खूप खूप धन्यवाद…आणि सुचिता चहाचा कप हातात घेऊन वळणार तोच तिला गरगरल्या सारखे वाटले…आणि उलटी झाली…पुष्पाताई जवळ गेल्या…पाठीवरून हात फिरवला…खुर्चीवर बसवून पाणी दिले प्यायला…आणि हळूच तिच्या कानात म्हणाल्या…
गुड न्युज का ग…? सुचिता म्हणाली आई बहुतेक…अठ्ठावीस तारीख होती माझी….अजून काही आली नाही…आणि माझ्या देखील लक्षात आले नाही…आई टेस्ट करून घेते…अजय उठला की त्याला पाठवते मेडिकल मध्ये…त्यामध्ये कळते प्रेग्नशी आहे की नाही ते…
अजय उठला त्याला चहा घेऊन आधी मेडिकल मधेच पाठवले…टेस्ट पॉझिटिव्ह निघाली…आज घरात ट्रिपल धमाका उडाला…अजयने तर फटाके वाजवायचे बाकी ठेवले…
भरभर सगळे यावरून अनाथ आश्रमात गेलो…तिथे केक कापून…मुलांना खाऊ देऊन..मग रात्री बिल्डिंग मधील मुलांना बोलावले…केक, चॉकलेट, पावभाजी आणि गिफ्ट आणले होते…सुजया खूप खुश होती…आज पहिल्यादा बिल्डिंग मधिल मित्र मैत्रिणी आल्या होत्या…वेगवेगळे गेम ठेवले होते…
खेळता खेळता सुजया ची मैत्रीण म्हणाली…सुजया खूप दिवसा पासून पाहतेय ग…ह्या आजी तुमच्याकडे…पण त्या नक्की कोणाच्या आई आहेत ग…तुझ्या आईच्या की बाबांच्या…सुजया म्हणाली मलाही माहित नाही ग …खरतर मी ऐकले माझे आईबाबा अनाथ होते….पण मग मला काका , आत्या कसे…आज विचारते मी आजीला…आजी तू नक्की आई कुणाची ….आणि तू दोघांपैकी कुणाची आई असेल तर हे दोघेही अनाथ कसे…
सुजयाचा वाढदिवस थाटात पार पडला …सगळे आपापल्या घरी गेले…सुजया खूप थकली होती…आजीला म्हणाली ऐ आजी मी कपडे बदलून झोपते…चलना ग मला झोपवून दे…आजी आज तू मला अंगाई गीत गाऊन झोपवं हं…पुष्पाताई म्हणाल्या, बाळा आईला थोडं आवरायला मदत करते … तोवर तू कपडे बदलून घे…ओके आजी म्हणत सुजया रूम मध्ये गेली…
अजय म्हणाला आई तू जा सुजयाला झोपवायला… खूप थकली ती…मी करतो मदत सुचिताला…शिवाय अनुसया बाई आहेच मदतीला…आणि पुष्पाताई बेडरूम मध्ये गेल्या…
सुजया च्या डोक्यात मैत्रिणीने विचारले पक्के होते…पुष्पताईंना आत आलेली बघून सुजया तिला बिलगली…पुष्पाताई ने पदराने तिची दृष्ट् काढली…म्हणाल्या किती गोड दिसत होती माझी परी राणी…कोणाची नजर न लागो…
चल तुला झोपायचे न…हो आजी…आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली…पण आता तिची झोप कोसो दूर गेली…कारण तिला मैत्रिणीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे होते…
हळूच पुष्पाताईला म्हणाली…आजी मला एक प्रश्न पडला…अर्थात तो माझ्या मैत्रिणीला पडला…त्याचे उत्तर मला हवे आहे…पुष्पाताई म्हणाल्या…असा कोणता कठीण प्रश्न पडला माझ्या छकुलीला… सुजया म्हणाली …आजी मला सांग तू नक्की आई कुणाची…आईची की बाबांची…पुष्पाताई थोड्या विचारात पडल्या…मग म्हणाल्या दोघांची पण…ये आजी खरं खरं सांग ग…कारण मी तर नेहमी ऐकत आली….आई बाबा दोघे अनाथ म्हणून…आणि म्हणूनच आपले सगळयांचे वाढदिवस तिथेच साजरे करतो…आणि काम करायला अनुसया बाई आहेत…मग तू आई कोणाची…आणि माझी आजी कशी…ते US चे सगळे माझे काका, आत्या भाऊ कसे…
आता पुष्पाताईंनी तिला जाहिराती पासूनची सगळी स्टोरी सांगितली…सुजया मांडीवरून उठूनच बसली…म्हणाली खरंच…! ग्रेटच आहे माझी आई…आणि आजी त्यामुळेच मला तुझ्या सारखी गोड आजी मिळाली…आणि पुष्पाताई ला मिठी मारली…पुष्पाताई बोलल्या…हो ग बाळा…खरंच खूप ग्रेट आहे..तुझी आई आणि बाबा सुद्धा…पोटच्या मुलांनी सुद्धा जपले नसते इतके जपतात मला…त्या दोन अनाथ लेकरांची आई होऊन धन्य झाले मी…आणि तुझ्या सारखी गोड नात…
आता पुन्हा तुला भाऊ किंवा बहीण येणार खेळायला बरका सुजया…भाबडी सुजया पुष्पाताईंना म्हणाली आजी खरंच…मला खेळायला सोबती येणार…आणि त्या आनंदातच ती झोपी गेली…
दिवस सरत होते…सुचिताच्या गरोदर पणामुळे… सगळेच खुश होतो…मुलगा मुलगी हा भेदभाव त्या दोघांनाही माहित नव्हते…पण पुष्पताईंना वाटायचे…आता मुलगा व्हावा…त्या सारखं म्हणायच्या एक मुलगा, एक मुलगी म्हणजे दोन्ही हौशी पूर्ण …आणि कुटूंब सुद्धा पूर्ण…
बघता बघता नववा सरला… सुचिताच्या पोटात दुखायला लागले…अजय सुजयाला घेऊन घरी होता…पुष्पाताई आणि सुचिता ड्रायव्हरला बोलवून दवाखान्यात गेल्या…सकाळचे सहा वाजले होते…दिवस उजाडला होता…पुष्पताईंनी अजय ला फोन केला…सुजया उठली असेल तर लवकर हॉस्पिटल ला ये…डॉक्टर म्हणाले इतक्यात होईल ती बाळंत…त्यांच्या मिस्टरानां पण बोलून घ्या…फॅमिली प्लांनिंग चे ओप्रेशन करायचे तर त्यांची सही लागेल…लगेच अजय आला…सर्व फॉर्म्यालिटीज पूर्ण करून झाल्या…थोड्याच वेळात सुचिताने एका गोडंस बाळाला जन्म दिला…
या वेळी मात्र मुलगा झाला…अजय आणि सुचिताची कुटुंब नामक संज्ञा पूर्ण झाली…त्या दोघांना मुलगा , मुलगी काहीही चालणार होत…पुष्पाताई मात्र नातवाची आस लावून बसल्या होत्या…नातूच झाला…सगळेच खूप आनंदात होते…US ला फोन करून हि गोड बातमी सांगितली…तेही खूप खुश झाले…त्या दोघांनाही एक एकच मुल होत…
यावेळी बारस्याला मात्र US वरून कोणीच येऊ शकले नाही…दोघांनाही महत्वाचे काम होते… नाव मात्र US च्या बहिणाबाई म्हणजे बाळाच्या आत्याने ठेवले सुजय…
दिवस सरत होते…सुजया आणि सुजय कलाकलाने वाढत होते…सुजयाला डॉक्टर व्हायचे होते…आणि सुजय ला IIT मधून इंजिनीअर व्हायचे होते…दोघेही हुशार होते…दहावी, बारावी चांगल्या मार्काने पास होऊन सुजया मेडिकल एट्रान्स दिली…तिचा गव्हरमेन्ट कॉलेज ला नंबर लागला…आणि स्त्रीरोग तज्ञ झाली…एक चांगली स्त्री रोग तज्ञ म्हणून खूप नावारूपाला आली..सुजय पण IIT पवई ला अडमिशन घेऊन इंजिनीअर झाला…
त्याचे तर कॅम्पस सिलेक्शन झाले….मल्टिनॅशनल कंपनी मध्ये एक कोटीच पैकेज मिळाले…जॉब मात्र अमेरिकेत होता…
त्याने त्या जॉबला नकार दिला…कारण त्याला जे काय करायचे ते भारतात करायचे होते…आई वडील दोघेही अनाथ होते…परदेशात जाऊन राहणं… त्यामुळे त्याला जमलं नाही…तो म्हणाला…सर मला कमी पैकेज ची नोकरी चालेल पण भारतातच…कारण माझे आईवडील दोघेही अनाथ होते…त्या अनाथ पणाला आणि एकटे पणाला कंटाळून माझ्या आईने पेपर ला एक जाहिरात दिली…”आई पाहिजे”…माझ्या आईबाबांना आई मिळाली ….कारण माझ्या आजीचे दोन्ही मुलं US ला राहतात…आजोबा या जगात नाही…आणि म्हणूनच मला माझ्या आईबाबांना सोडून …मी फक्त माझं भविष्य घडावं म्हणून परदेशात जावं…मला मान्य नाही…पगार थोडा कमी चालेल…पण मला माझी माणसं हवी आहेत…सोबतच माझा देश…आणि त्याच कंपनीने त्याला भारतात 70 लाखाचं पैकेज दिलं…
दोघांचेही लग्न झाले…जावई हृदय रोग तज्ञ होता…सून पण चांगल्या कंपनीत नोकरीला होती…
पुष्पाताई बद्दल मात्र सगळ्यांना विशेष कौतुक वाटले…कारण एक मुलगी जाहिरात देते काय..?,आणि एक चांगल्या घरची स्त्री…ती जाहिरात वाचून…त्यांची आई होण्यासाठी जाहिरातीच्या ठिकाणी जाते काय..? दोघीही ग्रेटच…
नातवंडात खेळणाऱ्या पुष्पाताई… आता पणतू मांडीवर घेऊन खेळवत होत्या…सुचिता आणि अजय खूप आनंदात होते…दोघांनीही आता रिटायर्डमेन्ट घेतली होती…आणि आश्रमाला बरीच देणगी दिली होती…सगळं खूप छान चाललं होतं…
पुष्पाताई भरले घर पाहून धन्य धन्य झाल्या…आता त्या रोज सकाळी उठून जास्तीतजास्त पूजापाठ करायच्या…खूप थकल्या होत्या…अशाच एका सकाळी पुष्पाताई उठल्या…आंघोळ केली…आणि पूजेला बसल्या…आणि बसल्या बसल्या त्या माउलीला हार्ट अट्याक आला….तो शेवटच करून गेला…सगळेच झोपले होते…पुष्पाताई च्या सकाळच्या मंत्राने घर जागे व्हायचे …आजीचा आज मंत्राचा आवाज येत नाही म्हणून सुजय ची बायको देवघरात गेली…आजी जागेवरच भिंतीला टेकून कलंडल्या होत्या…तिने आजीला हलवले…काहीच प्रतिसाद नाही…आणि जोरात आजी….आजी…आई…बाबा…
सुजय अशी आरोळी ठोकली…सगळेच धावत देवघरात आले…पुष्पाताई निपचित पडल्या होत्या…सुचिता आणि अजय तर पार खचून गेले होते….सुजय नेच US ला फोन करून हि बातमी सांगितली…
पण त्या दोघांनाही आपल्या आईचे शेवटचे दर्शन घेता आले नाही…रजाच दिल्या नाही…सुजया रडत रडत म्हणाली… आजी, अग तुझा नातजावई हृदयरोग तज्ञ …गावातल्या गावात…तुला काही त्रास होता तर सांगायचे होते न ग…आजी तू आम्हाला हवी होती ग…आणि माझ्या आईबाबांना आई हवी होती ग…
पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तू अनाथ करून निघून गेली…
सगळ्यांनी साश्रू नयनांनी पुष्पताईंना अखेरचा निरोप दिला…
US च्या मुलांच्या सांगण्यावरून पुष्पताईंनी त्यांच राहत घर …त्याचा नातू सुजय आणि नात सुजयाच्या नावावर केलं…इतका मोठा बंगला तो…तो रिकामा ठेऊन काय करणार…मग सुजय आणि सुजया या दोन भावंडांनी…तिथे एक वृद्धाश्रम काढला…खास त्या आई वडिलांसाठी…ज्याची मुले परदेशात आहेत…किंवा जी मुलं आईवडिलांना सांभाळत नाही…आणि त्याची सर्व धुरा …अजय आणि सुचितावर सोपवली…
पुष्पाताई च्या जाण्याने अनाथ झालेले सुचिता आणि अजयला…त्या वृद्धाश्रमात पुन्हा आईबाबा मिळाले…
परंतु पुष्पाताईची पोकळी मात्र त्यानां सतत जाणवत राहिली …शेवट पर्यंत…

समाप्त…..

©️ सौ प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.
pc:google

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu