बेल ते बेल आयकॅान ©️ अनुजा बर्वे .

आताशा डोअर बेल वाजवून पाहुण्यांच्या सरप्राईझ व्हिजिटचा आनंद * गेटेड कॅालनी* मध्ये ( वयोपरत्वे आऊटडेटेड* होऊ लागलेल्यांसाठी * गेटेड* टर्म तशी नविनच .) राहणाऱ्यांसाठी अंमळ दुरापास्त झालाय. तिथे रखवालदार, सॅारी सिक्युरिटीच्या मार्फतच अतिथीची वर्दी यजमानाना मिळत असते.
तरीही…. *बेल ती बेलच * !
म्हणूनच , घराघरातल्या * बेलां* बद्दलची ( * बेल* चं अनेकवचन म्हणतेय मी.) आज ही किणकिण !!

*बेल ते बेल आयकॅान *

“आज्जीss, मी, मी वाजवणारे बेल तू आरती म्हण”.

पूजा झाल्यावर निरांजन लावायला काड्यापेटीतून काडी काढून ओढली त्याचा आवाज नि वास (तुम्ही नक्की सहमत असाल ह्या दोन्ही गोष्टींशी ☺️ ) ह्यावरून , टेबलावरच्या पाण्याच्या तांब्याशी खुडबुड करणा-या पाठमो-या नातवाला बरोब्बर सुगावा लागला .

“अरे होs ह्हो ! तुझ्याच हातात देतेय. पण मी किती वेळा सांगितलंय….”

“होय गं आज्जी ! बेल नाही, आरती करतांना वाजवतो ती घंटा, आय नो ! चुकून म्हटलं गं “

माझं वाक्य मध्येच तोडून घाईघाईने चूक कबूल करून टाकलीन पठ्ठ्यानं ! आज संकष्टी असल्याने घरातल्या ह्या लहान बाप्पाला * मावा मोदक * खाण्याची नि वाटण्याची घाई होती ,हे का मला माहित नव्हतं ?

घंटा वाजवून आरती झाली नि नमस्कार करून मोदक खाऊन पठ्ठ्या गेला देखिल कार्टून बघायला आणि मीही पोळ्या करायला म्हणून ओट्यापाशी गेले.

इतक्यात बेल वाजली .
*डोअर बेल * हो !

फोन बेल, वॅाशिंगमशीनची संपूर्ण cycle झाल्यानंतरची मंजुss ळ बेल , झालंच तर मायक्रोवेव्हची फाईव्ह टाईम्स वाजणारी कर्णकठोर बेल, तंत्रज्ञानाचं बाळकडू प्यायलेली तरूणाई घरात असेल तर -गल्या-दल्या लावलेल्या रिमांईडर्सच्या बेल्स…ह्या सगळ्या इंग्रजी बेला !
बेला आताशा मराठाळलेल्या आहेत म्हणून हे असं अनेकवचन !

“ कचरेवाली असणार ! बरं झालं आधीच आली ते ! नाहीतर हमखास पोळ्या करायच्या मध्ये येते नि मग तो गॅस मंद करणं, मग तव्याचं टेम्परेचर बिनसल्यामुळे पुढची पोळी नीट न होणं ….. चिडचिड होते नुस्ती ! अगदी मोबा. वर व्हिडिओ बघत असतांना वायफाय मंद झाल्यावर डिस्टर्बन्स येतो नि होते तश्शी !”

हा एवढाss स्वसंवाद होता होता कचरा देण्याचं नित्यकर्म झालं सुध्दा !!
नि तवा तापत टाकून मी पीचवर, आय मीन पोळपाटावर लाटिंग करायला सुरुवात केली. पोळ्यांचा एकमार्गी स्कोअर होत असतानाच मनात मात्र लहानपणापासूनच्या घंटांच्या आठवणी किणकिणू लागल्या.

आजी-आईबरोबर घरगुती देवपूजेतल्या आरतीसाठी मी लहान असतांना वाजवलेल्या घंटेची आठवण माझ्याही संग्रही आहेच की !
सगळ्या दिवशी आरती नि घंटा कॅामन असली तरी ,
सातही वारी देवांना वहायच्या फुलापानांचे नियम वेगवेगळे नि ठरलेले.
सोमवारी पूजेत शंकराच्या पिंडीवर वहायला बेल पत्र हवंच !
होय !!!
( हल्लीचं येस्स्स)
लहानपणी मला परिचित असलेला मराठी बेल शब्द स्त्रिलिंगी नव्हता.

घंटानाद तसा जरी कर्ण -सुखद असला तरी शाळा भरतांना वाजणारी पहिली घंटा आणि परिक्षेचा पेपर संपण्यापूर्वी १० मिनिटं आधी वाजणारी घंटा नाही म्हटलं तरी बालमनावरचा तणाव वाढवणारी अशी !!
नि शाळा सुटल्यानंतर वाजणारी घंटा म्हणजे त्या वयातला आनंदीआनंद !

उन्हाळ्याच्या सुट्टीत एक आईस्क्रिमच्या नव्हे आईसफ्रुटच्या गाडीची घंटा कानावर येई !
ते तसलं स्वस्तातलं काही घ्यायचं नाही अशी मोठ्यांची तंबी मिळत असल्याने फक्त मनातल्या मनातच गार वाटून घेत असू आम्ही मुलं !
मग…
‘नक्कोच ते आईसफ्रूट ! त्यावर मीठ टाकून बघितलं तर अळ्या वळवळतांना दिसतात’ अशा सध्याच्या व्हॅाटसॅपलाही लाजवतील अशा पोष्टी नव्हे कानगोष्टी सैरावैरा फिरत असत.

लांबच्या लांब प्रशस्त गॅलरीत ( आताच्या गॅलरीलेस पण २-३ बाथ -टॅायलेट असलेल्या प्रशस्त फ्लॅट वाल्यांचं असं होईल कदाचित हे वाचून !)
तीनचाकी सायकलच्या घंटी ची मजा येतच असे परंतु …..
जास्त मजा येई ती दुचाकी सायकलच्या घंटे ची !! सुट्टीमध्ये पटांगणात (आजकालचे मोबा.गेम पटू मोबा.स्क्रीनच्या अंगणात बागडत असल्याने, पटांगण म्हटल्यावर त्यांच्या भुवया उंचावणं स्वाभाविक आहे.☺️) चालवत असलेल्या भाड्याच्या दुचाकी सायकलच्या बॅलन्सिंगमध्ये कोण नवशिकं आहे नि कोण तरबेज हे घंटेच्या आवाजावरून सहज ओळखता येई.
एकदा का सायकल चालवण्यावर जम * बसला की *घंटी वाजवण्यातला रूबाब म्हणजे वेग वाढवणारी जमे ची बाजू !!

उन्हाळी , दिवाळी किंवा हिवाळी सुट्टीत बाल-नाटकं बघायला जाण्याचा एक आनंददायी सोहळा असे. त्यात पहिल्या, दुस-या नि तिस-या अशा तिन्ही * घंटा* ऐकण्यापासून ( एक्कही चुकता कामा नये) नाटक बघायची नि ‘आता नाटक सुरू होणार अशी सूचना देणारी’ तिसरी घंटा झाली की टाळ्या वाजवण्याची कोण हौस !!

अंदाजे साठच्या दशकाच्या मध्यावर घरगुती गॅस सिलिंडरची ओळख झाली गृहिणींना नि स्टोव्हला पिना मारण्याच्या त्रासापासून त्यांची हळुहळु सुटका झाली.
सिलिंडर घेऊन येणा-या गाडीची घंटा नि पाठोपाठ गॅसच्या पाठीवर पडलेली चालकाच्या हातातल्या पान्याची थाप कानी पडली की तमाम सुगृहिण्यांना अगदी देवळातला शांती लाभ झाल्यागत वाटे.

देवळातल्या घंटे ची मजा काही औरच !
अगदी लहानपणी आई किंवा बाबांनी आपल्याला उंच धरून वाजवलेली घंटा, थोड्या नंतरच्या वयात स्वत:च उंच उडी मारून कसाबसा हात पोचून आपण वाजवलेली घंटा नि त्यानंतर यथावकाश पूर्ण उंची वाढल्यानंतर सहज हात पोचल्यामुळे आपला घंटा वाजवण्यापाठचा अभिमान-
हे सगळं अगदी जसंच्या तसं माझ्या डोळ्यांसमोर तरळलं.

लग्नाळु वयात,आमचं आपलं, सीधे रास्ते, *कांदे-पोहे वास्ते टाईप्स असल्याने तेवढा तो दिल मे बजी घंटी वाला अनुभव मात्र नाही हं गाठीशी !!
त्यामुळे आताच्या भाषेत सांगायचं तर डेटिंग-कोर्टिंग इ.चा काय घंटा अनुभव असणारे ?

ह्या विचारांनी मात्र हलकंसं हसू उमटलं माझ्या चेह-यावर नि नेमकं तेच कीचनमध्ये आलेल्या नातवाने टिपलं.

“आज्जी, कसं आलंय माझं हे ड्रॅाईंग ? तू परवा श्रीरामांची आणि खारू ताईची गोष्ट सांगितली होतीस नं ती आठवून काढलंय हे !
पण तू एकटी एकटी हसत का होतीस ?”

“ॲाs!तू चित्र काढत होतास होय !! मला वाटलं तुझं कार्टून बघणं सुरू आहे. अरे व्वा ! हे खारूताईचं चित्र मस्तच आलंय हं ! पण ही कोप-यात घंटा कशासाठी काढलीयेस ?”

“ अग्गं , ते बेल आयकॅान आहे. माझं चित्र आवडलं असेल तर लाईक कर, फोटो काढून तुझ्या फ्रेंडस् मध्ये शेअर कर नि नेक्स्ट ड्रॅाईंगची आठवण ठेव हे सांगणारं आयकॅान !
ते यु-ट्युब मध्ये स्टोरी झाल्यावर सांगतात ना तस्सं!!”

मी त्याला भरभरून दिले नि ‘जेवण तयार आहे’ असं सांगून हात धुवायला पिटाळलं .

काय बोलणार हो !
आजच्या लेकरांना बालवयातच घंटेची एकदम आयकॅान म्हणून ओळख झालीये.
पण….

लहानपणापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर आनंददायी ठरलेल्या, मोठेपणी कधी कधी धोक्याच्या इशा-याचाही अनुभव देणा-या ह्या घंटेचा हा आयकॅान पर्यंतचा प्रवास मला मात्र थक्क करून गेला विचारांच्या किणकिणाटात !!☺️☺️

©️ अनुजा बर्वे .

फोटो: नेट-सौजन्य !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu