आस्वाद मराठीचा -भाग २ ©विद्या पेठे

नमस्कार या आधीच्या लेखात आपण संत ज्ञानेश्वरांनी केलेले मराठी भाषेचे कौतुक ‘माझा मराठाचि बोलू कवतुके ,अमृतातेही पैजा जिंके’ या ओव्यांच्या अर्थातून समजावून घेतले होते .
या वेळी थोडे मागे जाऊन आपण आपल्या मराठी भाषेची पूर्वपाठीका समजावून घेऊ .
कोणतीही भाषा हे आत्मप्रकटीकरणाचे, आत्म – निवेदनाचे प्रभावी माध्यम असते. पण प्राचीन काळी म्हणजे भाषा अस्तित्वात येण्याआधी मानव हावभाव, डोळे, अंगविक्षेप, मुद्राभिनय इ. चा वापर करून भावना व्यक्त करत असे. नंतर मानव टाळू, दात, जीभ, ओठ, स्वरयंत्र यांच्या मदतीने ध्वनिउच्चार करू लागला. ध्वनींच्या सहाय्याने शब्द, शब्दांची वाक्ये झाली. त्यांना अर्थ आले, आणि भाषेचा जन्म झाला.
हे मी अगदी साध्या शब्दात सांगितले. पण, भाषेची उत्पत्ती हा खूप गहन विषय आहे. त्यात खूप मतमतांतरे आहेत. आपण ते बाजूला ठेवून मराठी भाषेच्या उत्पत्तीकडे वळू या.
विद्वानाच्या मते मूळ ‘आर्य ‘ भाषा किंवा ‘ आर्योदभव ‘ भाषा हा एक प्राचीन भाषासंघ  मानला जातो. पुढे एक भाषाउत्पत्तीचे कोष्टक दिले आहे. त्यात मराठी भाषेची उत्पत्ती आर्य भाषेपासून कशी झाली हे दाखवले आहे, किंबहुना भारतात बोलल्या जाणाऱ्या बऱ्याच भाषांचे उगमस्थान दाखवले आहे.

 

ख्रिस्तपूर्व १००० पासून ख्रिस्तपूर्व २०० पर्यंत हा पाणिनीय संस्कृतचा काळ आहे. त्यानंतर प्राकृत, अपभ्रंश , मिश्र प्राकृत भाषांचा काळ सुरु होतो. त्यानंतर मराठी – असा मराठी भाषेच्या उत्पत्तीचा प्रवास आढळतो. या प्रवासात संस्कृत भाषेप्रमाणेच इतर भाषेतील शब्दांचे मिश्रणही मराठीत झालेले आढळते .
अशी मराठी अस्तित्वात होती, वापरात होती याचे पुरावे उपलब्ध आहेत, एकूण सोळा शिलालेखांचे हे पुरावे आढळतात. पूर्वी महाराष्ट्राचे  नाव ‘ दक्षिणापथ ‘ असे होते. आर्य उत्तरेकडून आले.  विंध्य पर्वत ओलांडल्यावर दक्षिणेकडे जाण्याचा मार्ग म्हणून त्याला ‘दक्षिणापथ’ म्हटले गेले.  पण सत्याश्रय  पुलकेशी याच्या इ.स. ६११  तील बदामी येथील  शिलालेखात  महाराष्ट्राचा  प्रथम उल्लेख सापडतो.  या महाराष्ट्राचे तेव्हा कोकण आणि विदर्भ असे दोन भाग मानले जात.

 

Image Source

महाराष्ट्रावर पहिली राजसत्ता मौर्यांची होती. अशी नोंद असलेला शिलालेख आहे.  शेवटची सत्ता यादव घराण्याची होती .मराठी भाषेच्या अस्तित्वाचा पुरावा देणारा पहिला शिलालेख श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्तीच्या पायाशी लिहिलेला आढळतो . या शिलालेखात ‘श्री चामुंडराजे करवियले गंगराज सुत्ताले करवियले’ असे लिहिले आहे.   गंग घराण्यातील राजांचा चामुण्डाराय हा प्रधान होता . राय ही  पदवी मिळाली होती. त्याने आणि गंग राजाच्या सुतांनी (मुलांनी) हा शिलालेख खोदून घेतला असा त्याचा अर्थ आहे. या प्रचंड पुतळ्याची उंची ७० फूट आहे. आता हा पुतळा दिगंबर जैन पंथियांच्या ताब्यात आहे.

शिलेखानंतर मराठीच्या अस्तित्वाचे पुरावे ताम्रपटांवर आढळतात. खाली शिलाहार घराण्याचा आणि वारखेड येथील  ताम्रपट दाखवला आहे. 

Image Source

वरील पुराव्यावरून मराठी भाषा असित्वात होती, बोलली जात होती हे समजले पण मराठी भाषेची भरभराट महाराष्ट्रात यादवकाळात झालेली दिसते. यादवराजे गुणग्राही होते. म्हणूनच त्यांच्या काळात महानुभाव पंथाला आश्रय मिळाला, यांचं सुमारास भिल्लम यादवाच्या अधिराज्यात सारंगधर नावाच्या मांडलिकाच्या  सत्तेखाली मराठीचा आद्य कवि मुकुंदराज याने ‘विवेकसिंधु‘ हा ग्रंथ रचला. हा मराठीतला पहिला ग्रंथ मानतात. मराठी भाषेचे अस्सल, निष्कलंक मराठी स्वरूप यादवकाळात पाहायला मिळते. ” शके अकरा दाहोत्तरु ! साधारण सवंत्सरु ! राजा शारंगधरू ! राज्य ऐसा समायो सर्वोत्तमु ! तेथ मुकुंद दितोतमु ! विवेकसुंधु मनोरम निर्मिला ! असे या ग्रंथाचे वर्णन केले आहे. 
आता यादवकालीन विवेकसिंधु ( इ.स. ११८८ ) या ग्रंथातील काव्याचा अनुभव घेऊ या.


विवेकसिंधु हा मराठीतला पहिला ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिला. आपले गुरु रघुनाथ आणि हरिनाथ यांच्या समाधीसमोर त्यांची मनोमन मान्यता घेऊन हा ग्रंध लिहिला. सरल भक्तीमार्गाचा प्रसार करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथात प्रथम शिव शंकराची स्तुती आहे. नंतर मराठी भाषेचे श्रेष्ठत्व वर्णन केले आहे . सद्गुरूची लक्षणे, त्याची थोरवी अनेक उदाहरणे देऊन व्यक्त केली आहे. गुरूपदेशामुळे लाभ, मायेचे स्वरूप, प्रकृती – पुरुष यांचा संबंध, माया व तिचे कार्य, ओंकाराचा महिमा अशा अनेक विषयांबद्दल यात चर्चा केली आहे.


अर्थ – श्री शंकराचार्याच्या भाष्याला अनुसरून मी ही हे निरूपण केले. त्यामुळे माझे हे निरूपण शास्त्रीय ज्ञानाला अनुसरून आहे, म्हणूनच शहाण्या लोकांनी ते स्वीकारावे, कधी कधी काही जण शास्त्राला देखील गप्प बस म्हणतात तरीही प्रत्यक्ष शंकराचार्यांनी सांगितलेले हे बोल व्यर्थ ठरवतील का ? जसे तुळशीने आपल्या पवित्रपणाने प्रत्यक्ष लक्ष्मीलाही कमीपणा आणला म्हणून श्रीविष्णूने तिला आपल्या मस्तकी धारण केले. म्हणून ती वंदनीय ठरली. त्याचप्रमाणे, मोक्षाची इच्छा करणारा विवेकसिंधुच्या ज्ञानात अवगाहन करेल तर प्रत्यक्ष विष्णू भगवान त्याला भेटतील. जो या विवेकरूपी समुद्रातील शब्दरूपी रत्ने आपल्या कंठात धारण करेल त्याला जनकाची थोरवी लाभेल. समुद्राचे पाणी खारट असते. पण त्यातील मोती मात्र सर्वांना अलंकृत करतात. परंतु त्यांना मुक्ती प्राप्त करून देणारे मोती या विवेकसिंधु ग्रंथात मिळतील. विवेकसिंधूचा पूर्वार्ध क्षीरसमुद्रासारखा अगाध  असला तरी तिथे असणाऱ्या श्रीविष्णूच्या रूपाने आपल्याला निर्गुण आत्मबोधाची  प्राप्ती होईल.

हा ग्रंध करताना जरी श्रम झाले तरी माझी मनोकामना पूर्ण झाली. नृसिन्हांचा मुलगा बल्लाळ, त्याचा मुलगा जैतपाळ यांनी ही ग्रंथरचना माझ्याकडून करून घेतली. भागीरथाच्या प्रत्नामुळे गंगेने जगाला सुखी केले , त्याचप्रमाणे जैतपाळाच्या या आग्रहावरून केलेल्या या ग्रंथामुळे जग सुखी होईल. पिनाक नावाचे धनुष्य हातात धारण करणारा शिवशंकर माझ्यावर प्रसन्न होवो असे मुकुंदराज म्हणतात .

वरील ओव्यातील भाषा, त्यातील उपमा, अपेक्षा , अलंकार, श्रोत्यांशी केलेला मुसंवाद ही सारी तत्कालीन उत्कृष्ट मराठीची लक्षणे या ओव्यात दिसतात, म्हणूनच मराठीतील हा पवित्र ग्रंथ असला तरी उत्कृष्ट आहे यात शंका नाही .

            लेखिका – ©विद्या पेठे 
                           मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu