किल्ले रायगड ©मुकुंद कुलकर्णी

स्वराज्याची राजधानी

छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली .

रायगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे . समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला आहे . मराठा साम्राज्याच्या इतिहासात रायगडाची एक खास ओळख आहे . शिवरायांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून याला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवली . महाराजांचा राज्याभिषेक ‘ शिवराज्याभिषेक ‘ याच ठिकाणी संपन्न झाला .

युरोपियन लोक त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत . जिब्राल्टरचे ठाणे रॉक ऑफ जिब्राल्टर जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम . पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते . तो नुसता एक डोंगर होता . तेंव्हा त्यास रासविटा व तणस अशी दोन नावे होती . त्याचा आकार , उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही म्हणत .

मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला , तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला . महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात गड ताब्यात आला . तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली . त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला . रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे . शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे . सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे . म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली . रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबुदीप असे होते.

सभासद बखर म्हणते :

राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा . चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव उंच . पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे . दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा , परंतु तो उंचीने थोडका . दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले , तक्तास जागा हाच गड करावा रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले . गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट आहे . गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत . गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज , उत्तरेकडे टकमक टोक श्री शिरकाई मंदिर आहे . शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते . याची आठवण देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे .

शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे . महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे . 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले . तीन मण सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले . गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शु.13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला .

रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन . शके 1602 रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा , हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले . सभासद बखर म्हणते

” ते दिवशी पृथ्वीकंप जाहला . अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या . श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले ”

रायगडावर राजधानी स्थापन करण्याचे राजांनी निश्चित केले . रायगडाच्या निर्मितीचे काम महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांचेवर सोपवले . हिरोजीच रायगडाचे आर्किटेक्ट! महाराजांकडून आदेश प्राप्त होताच आपले कसब पणास लावून हिरोजी कामास लागले . महाराजांच्या संकल्पना , शिवरायांची दूरदृष्टी आणि हिरोजींची अंमलबजावणी यातून उभा राहिला स्वराज्याचा मानबिंदू ‘ किल्ले रायगड ‘. राजांच्या निवासाची व्यवस्था , प्रासाद ,विवेकसभा , कल्यणसभा , न्यायसभा , दारुगोळ्याची व्यवस्था करण्यासाठी दारु कोठारे , घोड्यांच्या पागा , अंबरखाने , स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी कचेऱ्या , मंत्र्यांसाठी निवासस्थाने , सल्ला मसलतीसाठी खलबतखाना , विविध मंदिरे , कीर्तिस्तंभ , करमणुकीची स्थाने इत्यादींनी सुसज्ज झाला रायगड . कडे तासणे , तटबंदी बांधणे , अभेद्य असे महाद्वार , बुरुज , चोरवाटा , संरक्षण व्यवस्थेसाठी आवश्यक अशा गोष्टींकडे हिरोजींनी विशेष लक्ष पुरवले . साकार झाला महाराजांच्या संकल्पनेतला योग्य असा गड ‘ रायगड ‘ हिंदवी स्वराज्याची , महाराष्ट्राची अस्मिता रायगडास मानाचा मुजरा !

मुकुंद कुलकर्णी ©
94214 54888
 

pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu