ते सात दिवस ! प्रवासवर्णन©अनीश दाते

ते सात दिवस !   प्रवासवर्णन – अनीश दाते 

भारतीय आध्यात्मात भगवान श्रीकृष्ण या दैवताबद्दल फार मोठे असे जागृत कुतुहूल जगात सर्वत्र आहे.

श्रीकृष्णाचे अतिशय जागृत असे धर्मसंस्थापनार्थ कार्य आणि भगवदगीता हे हिदूंचे परमप्रिय असे विषय आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीबद्दल आणि संपन्न अशा काठियावाडी सौराष्ट्र भूमीबद्दल बरीच वर्षे वाचून ,ऐकून होतो. यंदाच्या दिवाळीनंतर भारतात कुठेतरी महाराष्ट्राबाहेर दौरा करण्याचे माझ्या आणि पत्नी अनुजाच्या मनात होते. त्यासाठी आतापर्यंत राजस्थान , मध्य प्रदेश, गुजरात आणि अशाच  काही अद्याप बाकी फिरण्यासाठी बाकी राहिलेल्या पर्यटनस्थळांची चर्चा झाली. अनुजाच्या श्रीकृष्णभक्तीमुळे देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारकानगरीबरोबर सोमनाथ , जुनागढ , गीर या सौराष्ट्रभूमीतील इतर स्थळांचा प्रस्ताव एकदम संमत झाला आणि एक अतिशय संस्मरणीय असा काठेवाडीचा दौरा पार पडला.

सौराष्ट्र मेलने आम्ही दिवाळीनंतरच्या पहिल्याच सोमवारी ठीक दुपारी साडेतीनच्या सुमारास भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीत पोचलो.
भगवान श्रीकृष्णांनी आपली द्वारकानगरी जिथे वसवली तो गुजरातचा सौराष्ट्र अगदी सुजलाम सुफलाम असा समृद्ध असल्याचे जाणवत होते. विशेषतः सुरेंद्रनगर पुढे राजकोट , जामनगरमार्गे प्रवास करताना पाण्याची अपार अशी मुबलकता आणि अत्यंत सुपीक जमीन हे या काठेवाडी भूमीचे वैशिष्टय असल्याचे जाणवत होते.
ऊस , भुईमुग, कापूस ही या भागातली बहरून आलेली मुख्य पिके प्रवासादरम्यान सगळीकडे दिसत होती आणि बऱ्याच ठिकाणी पाणथळ जागा असल्याने विविध पक्ष्यांचे , त्यातल्या त्यात स्थलांतरित फ्लेमिंगो , काळी पाणबदके आणि पेलिकन पक्ष्यांचे दर्शन घडत होते.
सौराष्ट्र म्हणजे आपण ज्याला मराठीत काठेवाड असे म्हणतो , त्याला गुजराती भाषेत या भागाला ‘ काठियावाड ‘ असे म्हणतात. पाणी आणि गवतचारा याने हा भाग अत्यंत समृध्द असल्याने फार पूर्वीपासून या भागात गाय , बैल, घोडा आणि उंट असे पशुपालन मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यातून दुभती काठेवाडी गाय आणि दमदार असा काठेवाडी घोडा ह्या जाती भारतात तर अगदी सुप्रसिद्ध आहेत हे आख्ख्या भारतातील शाळांमधील भूगोलामध्ये शिकवले गेले असल्याने परत तसे सांगायला मी अगदीच गाढव नव्हतो.

यंदाच्या पावसाने भारतीय हवामान खात्याची सगळी गणिते आणि भाकिते काही प्रमाणात खरी तर काही प्रमाणात खोटी ठरवली होती. त्यातून पाऊस नको इतका दिवाळीनंतरही कंटाळा यावा इतका लांबला होता. दिवाळीनंतरही काही दिवस सासुरवाडीला दिवाळसणासाठी आलेल्या जावयबापूसारखा पावसाने मुक्काम ठोकला होता आणि त्यातून पश्चिम भारतातील गुजरात , महाराष्ट्र या राज्यातील किनारपट्टी भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे वादळ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती.
ठरल्याप्रमाणे दौरा व्यवस्थित पार पडणार की नाही याची प्रवासाला जाताना एक प्रकारची वादळी धाकधूक विशेषतः अनुजाच्या मनात होती आणि मी मात्र पाऊस आल्यावर केवळ छत्री उघडून ती डोक्यावर धरायची असते एवढे मनात ठेवून अगदी निश्चिन्त होतो.

आमच्या सुदैवाने प्रवासात वाटेत कुठेही पाऊस नव्हता आणि कमाल म्हणजे ढगाळ हवामान वगैरे काहीही आढळले नाही. द्वारकानगरीत एका प्रसन्न दुपारी पोचल्यानंतर लगेच हॉटेलवर जाऊन ताजेतवाने झालो आणि त्याच संध्याकाळी द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
अवघ्या पाच दहा मिनिटांत द्वारकाधीश महाराजांचे फार प्रसन्न आणि सुंदर असे श्रींचे दर्शन झाले. अनुजा तर हरखून गेली होती आणि ज्याचे दर्शन घ्यायचे होते ते झाल्यानंतर बाहेर येत स्तिमित होऊन भव्य अशा द्वारकाधीश मंदिराकडे पुन्हा पाहत श्रद्धेनं हात जोडत होती. महाराष्ट्रात जो मान विठोबा  रखुमाईचा आहे, जो मान आंध्र – तेलंगणात तिरुपती बालाजीचा आहे , तोच मान आख्ख्या गुजरातमध्ये या द्वारकाधीश महाराजांचा आहे आणि साऱ्या गुर्जर भूमीतून तसेच गुजरातबाहेरील अवघ्या जगभरातून लाखो वैष्णव श्रीकृष्णभक्त द्वारकानगरीला भेट देण्यासाठी मोठ्या आतुरतेने येतात.

ज्या सौराष्ट्र मेलने आलो त्या मेलचा एक आख्खा डबा हरेकृष्ण संप्रदायाच्या भक्तांनी व्यापला होता आणि वाटेत कोणत्याही जंक्शनवर मेल थांबली की त्यांचा जथा हरे कृष्णाचे मुक्त कंठाने टाळ आणि मृदंग वादनात आनंदाने संबंध फ़लाटभर भजन वारी करून भक्तीचा मळा फुलवत गात नाचत येत होता. मोठ्या प्रसन्न मनाने आम्ही त्या अपूर्व संध्याकाळी द्वारकाधीश मंदिर परिसरात फिरलो आणि दुसऱ्या दिवशी बेट द्वारकेला भेट द्यायची होती म्हणून रात्री द्वारकानगरीत भगवान श्रीकृष्णाच्या छायेत निवांतपणे मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी ठरल्याप्रमाणे बेट द्वारकेला जाऊन आलो. बेट द्वारका आवडले नाही कारण ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यामानाने मोठी निराशा पदरी आली. बेट द्वारकेला जाण्यासाठी ज्या ओखा बंदरावर जावे लागते ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे ओखा बंदर मात्र पूर्ण मुस्लिम मच्छिमारांच्या ताब्यात असल्याचे जाणवत होते. बेट द्वारकेला जाताना वाटेत भारतातील बारा प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक दारुकावन नागेश्वर शिवमंदिर दर्शन घेतले आणि हे अत्यंत शांत असे ठिकाण खूप आवडले.दारुकावन मंदिरानंतर गोपी तलाव म्हणून एक ठिकाण आहे ते पाहिले.
गोपिकांना भगवान श्रीकृष्णाने छचोरपणे त्यांची वस्त्रे पळवून आळवत पाण्यात भिजत भिजवत ठेवले ते गोपी तलाव ठिकाण बिलकुल आवडले नाही.
एकतर खरोखर हाच का तो गोपी तलाव आहे की काय अशी त्या तलावातील खराब शेवाळी पाण्यामुळे एक शंका चाटून गेली. बेट द्वारकेला दर्शन झाल्यानंतर तिथेच एका टोकाला हनुमानपुत्र मकरध्वज मंदिर म्हणून द्वारका बेटाच्या शेवटच्या टोकाचा भाग आहे तिथे जाऊ शकलो नाही. कारण एकतर दुपारी दोन वाजेपर्यंत ओखा बंदरावरून येताना श्री रुक्मिणीदेवी मंदिर दर्शन करून अर्धा दिवस म्हणून भाड्याने घेतलेल्या टॅक्सीला मोकळे करायचे होते.

मात्र ओखा बंदरावरची ती नुसती भक्तांची दाटीवाटीने झालेली भाऊगर्दी , कडक उकाडा असणारे उन्ह आणि बेट द्वारका मंदिरातील तो नुसता खिसेकापू , गल्लाभरू पुरोहित वर्ग यामुळे आम्ही पुरते वैतागलो होतो .यामुळे इच्छा असूनही अजिबात पुढे जावेसे वाटले नाही. ओखावरून द्वारकानगरीला परत येताना वाटेत मीठापूर हे गाव लागले आणि भारत देश का असली नमक असणाऱ्या टाटा नमकचा भलामोठ्ठा विस्तीर्ण प्लांट ओझरता पाहायला मिळाला.


गुजरात राज्याला वापी, सुरत , वलसाड , दमणपासून व्हाया खंबात ते पार कांडला , मांडवी, लखपत या कच्छच्या आखातापर्यंत मोठ्ठा सागर किनारा लाभला आहे.स्वतःच्याच देशात तयार होणाऱ्या मिठावर लादलेला कर मोडून काढणारी ती महात्मा गांधींची भारतीय स्वातंत्र्ययुद्धात महत्वाचा टप्पा ठरणारी दांडी यात्रा याच गुजरातच्या किनाऱ्यावरून गेली होती. या गुजरातच्या किनारपट्टीचे पाणी भयंकर असे खारट मचूळ आहे आणि म्हणून मीठापूरला अत्यंत योग्य जागी टाटा कंपनीने आपला मोठ्ठा केमिकल प्लांट उभा केला असून तिथे इंडस्ट्रीला आवश्यक त्या सर्व केमिकलच्या विविध घटकांचे उत्पादन होते.यात मीठ तसेच रासायनिक खतांचा मुख्य समावेश आहे.

साऱ्या भारत देशाला असली नमक मीठ पुरवणाऱ्या टाटा साल्ट कारखाना मीठापूर गावी असावा या योगायोगाची मोठी गंमत वाटत होती. टाटा केमिकलच्या मीठापूर प्लांट शेजारून जात असताना टाटांनी भारताला दिलेल्या योगदानाबद्दल देशाभिमान जागृत झाला.

ओखा बंदरावरून द्वारकानगरीला परत येताना शहराबाहेर २ किमी अंतरावर एका शांत जागी वसलेल्या आणि सुंदर कोरीव दगडी खांब ,शिल्पांमध्ये कोरलेल्या श्री रुक्मिणीदेवी मंदिराचे दर्शन घेतले.द्वारकाधीश श्रीकृष्णाशेजारी श्री रुक्मिणीदेवीचे मंदिर का नाही याचे विवेचन तेथील पुरोहिताने थोडक्यात दिले ते असे की, एकदा महाकोपिष्ट दुर्वास मुनींना द्वारकानगरीच्या दर्शनाचे आमंत्रण देण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणीदेवीसह गेले.त्यासमयी दुर्वास मुनींनी त्यांना स्वतः रथ ओढून द्वारकानगरीला घेऊन जाण्याची अट घातली आणि दोघांनी ती आनंदाने मान्य केली. दुर्वास मुनींना रथावर बसवून स्वतः रथ ओढून जात असताना वाटेत रुक्मिणीदेवीला भयंकर तहान लागली. तेव्हा तिची तहान शमवण्यासाठी श्रीकृष्णाने लत्ताप्रहार करून भूमीमधून गंगा नदीच्या पाण्याची धार उत्पन्न करून ते पाणी तिला पिण्यासाठी दिले. खुद्द दुर्वास मुनींना हे पवित्र गंगाजलाचे पाणी आधी न देता रुक्मिणीदेवीला आधी दिल्याचे पाहून खूप क्रोध आला आणि त्यांनी क्रोधाविष्ट होऊन रुक्मिणीदेवीला असा शाप दिला की यापुढे त्यांची द्वारकेतील त्यांची वास्तव्यस्थाने एकमेकांपासून काही अंतरावर राहातील. तेव्हापासून भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि श्री रुक्मिणीदेवी यांची मंदिरे शेजारी शेजारी न नांदता ठराविक अंतरावर आजतागायत तशीच आहेत.

जुने अरुंद गल्लीबोळवजा रस्ते , अंगावर येणारी ती मी मी म्हणणारी सर्व प्रकारची वाहने , मोकाट सुटलेली , रस्ते – चौक अडवून निवांतपणे रवंथ करत उभी असलेली , आडवी तिडवी कशीही बसलेली मोकाट गुरे आणि गुरांनी जागोजागी टेकलेले ते शेणाचे पो हे सगळे काही हुकवीत पोपटाच्या डोळ्याने या द्वारकानगरीत जपून हुशारीने चालावे लागते. द्वारकानगरीतील काठीयावाडी जेवणावर फार म्हणजे फारच प्रसन्न होतो. भद्रकाली चौकात श्रीनाथ डायनिंग हॉलवर आकंठ जेवून आणि काठेवाडी मालकाला आपल्या सुटलेल्या पोटाने अगदी पोटभर दुवा देऊन आलो. स्वयंपाककला निपूणा अनुजा तर इथल्या तबियतदार भोजनावर अत्यंत खुश होती. तिसऱ्या दिवशी बृहस्पतीच्या बुधवारी देवभूमी द्वारकानगरीचा निरोप घेण्याआधी भल्या सकाळी एक फेरफटका मारावयास बाहेर पडलो. द्वारकाधीश मंदिराला लागून गोमती नदीच्या घाटावर तमाम वैष्णव भक्तमंडळी लाडक्या रणछोडदासाच्या दर्शनाआधी पवित्र स्नान उरकून घेण्यात दंग होती. पलीकडील विस्तीर्ण समुद्र किनारी जाण्यासाठी बांधलेल्या सुदामा सेतूवरून भारतातील बद्रिनाथ ,जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि द्वारका या पवित्र चारधामांपैकी एक अशा समस्त द्वारकानगरीचे काठाकाठाने सुरेख दर्शन घडले. गोमती नदी समुद्राला जाऊन मिळते तो संगम आणि तिथून जवळच दिसणारे द्वारकेचे दीपगृह हे सकाळच्या अपूर्व अशा सूर्योदयात दिसणारे दृश्य खास कॅमेऱ्यात बंदिस्त करून परतलो.

द्वारकानगरीत सर्व थरातील लहानथोर भक्त मंडळींची सर्वतोपरी चोख व्यवस्था आहे. तेथील जनता आणि द्वारकाधीश मंदिरातील सेवकवर्ग तर सदैव सेवेला तत्पर असतो. सर्वत्र आता चांगली स्टारसेवा देणारी हॉटेल्स तसेच सुसज्ज भक्त निवासगृहे निघाली आहेत आणि सर्वात मुख्य म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या नकाशावर राजस्थान , केरळ , मध्य प्रदेश या भारतातील प्रमुख राज्यांप्रमाणे गुजरात प्रवाशांच्या वाढत्या पसंतीला उतरत आहे. द्वारकानगरी रेल्वेने आणि ४५ किमी अंतरावरील जामनगर शहराद्वारे विमानसेवेने सुलभरीत्या जोडली गेली आहे. शेवटी भरल्या अंतःकरणाने जय हो द्वारकाधीश श्रीकृष्ण की असा जयघोष करत दोन दिवसांच्या मुक्कामानंतर द्वारकेचा निरोप घेतला आणि पोरबंदरद्वारे प्रभासपट्टण क्षेत्री श्री सोमनाथला जाण्यास मार्गस्थ झालो. द्वारकानगरीचा निरोप घेऊन बुधवारी सकाळी निघालो आणि दोन तासांनी महात्मा गांधीच्या जन्मस्थळी पोरबंदरला आलो.

महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जमस्थानांना भेट दिली. कस्तुरबांचे जन्मस्थान आणि माहेरचे घर गांधींच्या घरामागेच दोन घरे सोडून आहे. दोन्ही घरांची आता भारत सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय स्मारके झाली असून ही घरे अतिशय जपून जतन , संवर्धन करून ठेवली आहेत. पैकी महात्मा गांधींच्या जन्मस्थळाचे ‘ कीर्ती मंदिर ‘ असे नामकरण केले असून मुळ जन्मस्थानाला लागून सुंदर अशी वास्तू उभारली आहे. महात्मा गांधींच्या कीर्ती मंदिरानंतर जवळच कृष्णभक्त सुदामा मंदिराला भेट दिली. हे सुदामा मंदिर इसवी सन १९०० साली त्यावेळचा पोरबंदर संस्थानचा स्थानिक राजा भावसिंह  यांनी उभारले आहे. अपूर्व मैत्रीला समर्पित अशी भारतात दोन मंदिर आहेत.पैकी हे एक असे निस्सीम , घनिष्ट मैत्रीचे मंदिर पोरबंदरला आहे, त्यामुळे पोरबंदरला कीर्ती मंदिराच्या बरोबरीने एक वेगळी ओळख लाभली आहे. दुसरे एक असे मंदिर जे मध्य प्रदेशमध्ये उज्जैनजवळ नारायणधाम येथे आहे. अलीकडे पोरबंदरच्या या भक्त सुदामा मंदिराच्या प्रांगणात एकमेकांना मैत्रीपूर्ण आलिंगन देणारे भगवान श्रीकृष्ण आणि भक्त सुदामा या दोन जिवाभावाच्या मित्रांचे सुंदर पूर्णाकृती शिल्प उभारण्यात आले असून त्याभोवती कारंजी असणारी बाग तयार करण्यात आली आहे.

पोरबंदरमध्ये वावरताना का कोण जाणे निदान आम्हांला तरी स्वच्छता , सुंदरता आणि शिस्तता या गांधींच्या मूल्यांची पार वाट लागलेली दिसत होती. साऱ्या पोरबंदरची स्वच्छता ठेवण्यात नगरपालिकेची ढिलाई होते की काय अशी मोठ्ठी शंका यावी इतपत सगळीकडे धूळ आणि घाण दिसत होती. कीर्ती मंदिर , सुदामा मंदिर दर्शनानंतर पोरबंदर सोडले आणि सोरटी सोमनाथला जायला लागलो.

दक्षिण गुजरातच्या किनारी भागातून ओखा ते भावनगर व्हाया पोरबंदर , सोमनाथ असा सुंदर राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. काही ठिकाणी अद्याप बरेचसे काम बाकी असले तरी लवकरच सर्व महत्त्वाच्या मोठ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांचे जाळे गुजरात राज्यात सगळीकडे निर्माण होत असल्याचे आणि नजीकच्या भविष्यात त्याचा फार मोठा वाटा गुजरातच्या इन्फ्रा स्ट्रक्चरकरता होणार असल्याचे समजत होते. याची सर्वात मोठी चुणूक तेजपुर ते सोमनाथ या भागातून जाताना दिसली. द्वारका ते सोमनाथ या किनारी भागात बऱ्याच ठिकाणी नारळाच्या बागांनी बहरून आलेली आणि भुईमुगाच्या शेतांमधून फुलून आलेली सुफलाम समृध्दी दिसत होती.आणखी एक ठळक वैशिष्टय दिसले ते म्हणजे ओखा ते सोमनाथ या किनारी भागात सगळीकडे समुद्राकडून येणारे जोरदार वारे अडवत त्यापासून मजबूत विद्युत निर्मिती करणारी फिरत्या पंख्यांची उभारली गेलेली उंचच उंच अशी टर्बाइन केंद्रे. आज साऱ्या गुजरातभर टर्बाइन केंद्रांचे मोठे जाळे उभारले गेले आहे आणि नवनवीन ठिकाणीही उभारले जात आहे. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत सायंकाळी सहाच्या सुमारास सोमनाथला पोचलो आणि लगेच तासाभरात सोमनाथ ट्रस्टच्या यात्री निवासात ताजेतवाने होऊन तडक श्री सोमनाथ दर्शनाला निघालो. अवघ्या पाच एक मिनिटांत फार प्रसन्न असे सोरटी सोमनाथ शिवलिंग दर्शन झाले. द्वादश ज्योतिर्लिंगाच्या संस्कृत स्तोत्रात सर्वप्रथमत्वाचा मान मिळालेल्या श्री सोमनाथ शिवलिंगाचे दर्शन घडल्यावर फार बरं वाटलं.


अत्यंत शिस्तबद्ध , नियोजनबध्द असा हा श्री सोमनाथ मंदिराचा परिसर तिन्ही बाजूला मोकळ्या असलेल्या विशाल सागरतीरी , प्रभासपट्टण गावी त्यावेळचे स्वतंत्र भारताचे गृहमंत्री आणि पोलादी लोहपुरुष सरदार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली उभारला गेला आहे. शिवदर्शनानंतर सोमनाथचा प्राचीन शिवमंदिराचा इतिहास थोडक्यात उलगडून दाखवणारा साऊंड अँड लाईट हा अप्रतिम शो पहावयास मिळाला.

प्राचीन काळात सोमनाथच्या मंदिराच्या संपन्न वैभवशाली श्रीमंतीची ख्याती सर्वत्र विशेषतः अरबस्थानात पसरली होती आणि तीच नेमकी तिच्यावर वारंवार होणाऱ्या परकीय अरबी आक्रमणांना कारण ठरली. सर्वप्रथम गझनीच्या महमूदाने सोमनाथवर हल्ला करून पहिला विनाश केला. पुढे कालौघात अल्लाउद्दीन खिलजी याने आणि त्यानंतर १७०५ साली मोगल शहेनशाह औरंगजेबाच्या आज्ञेने दक्षिण गुजरातच्या सुभेदाराने हे सोमनाथ मंदिर साफ उध्वस्त करून टाकले आणि संपूर्ण विनाश केला. शेवटी एवढे सगळे परकीय हल्ले पचवून देखील सोमनाथ मंदिर हिदू धर्माच्या जाज्वल्य उदयाचे, विनाशाचे आणि विनाशाच्या राखेतून पुन्हा उत्तुंग झेप घेण्याचे प्रतीक बनले आहे हेच विशेष आहे.

सोमनाथ शिवमंदिर कळसाखाली दक्षिणेला एक दिशा अशी विलक्षण आहे की तिथून थेट अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवापर्यंत थेट समुद्र आहे. सोमनाथपासून बाणासारख्या सरळ जाणाऱ्या वाटेत जराही कोठेही एक इंचभरही जमीन नाही आणि आता याची खात्री आता उपग्रहाद्वारे अगदी १०० टक्के अचूक झाली आहे. म्हणजे आपली प्राचीन भारतभूमी सर्वच शास्त्रांमध्ये अत्यंत प्रगत होती हे सिद्ध होते.या दिशादर्शक बाणाखाली ‘ आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग ‘ असे संस्कृतमध्ये वर्णिलेली ओळ आहे. रात्रीच्या साउंड अँड लाईट शो नंतर रात्रीच्या काळोखी आसमंतात रंगीबेरंगी तेजोमय दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला आणि साथीला सागरगाजेच्या आवाजात श्री सोमनाथ मंदिराचा सारा परिसर हिडून पाहिला. तृप्त होऊन अतिशय समाधानाने रात्री आराम केला. रात्री हवेत अचानक बदल होऊन जोरदार असा गडगडाटी पाऊस झाला.

दुसऱ्या दिवशी प्रसन्न गुरुवारी सकाळी लवकर उठून , सर्व काही आटोपून नऊच्या सुमारास श्री सोमनाथ दर्शनाला जाऊन आलो. आदल्या बुधवारच्या रात्री जोरदार पाऊस झाला होता , त्यामुळे हवा अगदी बेताची अशी आल्हाददायक गार झाली होती. वातावरण एकदम ढगाळ आणि प्रसन्न होते. सकाळी भक्तमंडळींची विशेष गर्दी नसल्याने अवघ्या पाच दहा मिनिटांत श्री सोरटी सोमनाथचे सुरेख दर्शन झाले. सोमनाथ मंदिर परिसरात फिरून मंदिराला तिन्ही बाजूंनी वेढलेल्या विशाल सागराचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात टेलिस्कोप दुर्बिणीने सोमनाथजवळ ७ किमी अंतरावरील वेरावळ क्षेत्र येथील श्री बाणकोट मंदिराचे दर्शन घेण्याची सुरेख व्यवस्था आहे. त्याप्रमाणे दर्शन आणि गाईडचे मार्गदर्शन घेतले. श्री सोमनाथ मंदिर परिसरातील सर्व व्यवस्था अत्यंत कडेकोट आणि शिस्तबद्ध आहे. मंदिराच्या चारी दिशांना आणि मुख्यत्वे समुद्राच्या दिशेला एके ४७ रायफल शस्त्रसज्ज बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान तैनात केले आहेत.


श्री सोमनाथ मंदिर परिसर फिरून झाल्यावर मंदिराच्या बाहेर पुण्यश्लोक श्री अहल्या देवी होळकर यांनी १७८३ साली उभारलेल्या श्री शिवमंदिराचे खास आवर्जून दर्शन घेतले.

१७०५ साली मोगल बादशाह औरंगजेबाच्या हिंदू धर्मविरोधी आज्ञेने दक्षिण गुजरातच्या सुभेदाराने हे सोमनाथ मंदिर साफ उध्वस्त करून टाकले होते. त्यानंतर पुण्यश्लोक श्री अहल्या देवींनी आपले खासगी कारभारी कृष्णाजी यांना प्रभासपट्टण क्षेत्री पाठवून श्री सोमनाथाचे छोटे शिवमंदिर उभारले होते. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर गृहमंत्री सरदार पटेलांच्या आज्ञेनुसार भारताच्या पुरातत्व खात्याने सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे उत्खनन केले. उत्खननात मिळालेल्या ब्रह्मशिळेवर आजचे हे नवनिर्वाचित भव्य श्री सोमनाथ मंदिर उभारले असले तरी आजही भाविक अत्यंत श्रध्देने या जुन्या मंदिराचे खास दर्शन घेतात. याचे कारण असे की आजही खरा श्री सोमनाथ या अहल्या देवींनी उभारलेल्या मंदिरात वस्ती करून आहे अशी लाखो भाविकांची भाबडी समजूत आहे. श्री सोमनाथ मंदिरात सायंकाळी दाखवल्या जाणाऱ्या साऊंड अँड लाईट शो मध्ये सरदार पटेल , कन्हैयालाल मुंशी यांच्या आधी पुण्यश्लोक श्री अहल्यादेवी होळकर आणि वीर हमीरजी गोहिल यांची नावे खास श्रेय म्हणून आदराने घेतली जातात.सोमनाथ मंदिरावर जेव्हा मुझफ्फरशाह यांच्या सेनेने हल्ला केला तेव्हा अवघ्या १६ वर्षांच्या वीर हमीरजी गोहिल या कर्तबगार राजपूत योद्ध्याने मोजक्या साथीदारांसह कडवा लढा दिला आणि श्री सोमनाथ मंदिरासाठी धर्मरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली.या अलौकिक त्यागाचे पवित्र प्रतीक म्हणून सरदार पटेलांच्या बरोबरीने वीर हमीरजी गोहिल यांचा घोड्यावर बसलेला भालाधारी देखणा पूर्णाकृती पुतळा श्री सोमनाथ मंदिरासमोरील चौकात मोठ्या चबुतऱ्यावर उभारलेला आहे.

श्री सोमनाथ मंदिराशेजारी प्राचीन काळात श्री पार्वती मंदिर होते आणि आज या मंदिराचा चबुतरा शिल्लक असून तो जतन करण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी भोजन आणि थोडासा आराम केल्यानंतर श्री सोमनाथ मंदिर परिसरानजीक दुपारी तीन वाजता स्थानिक स्थलदर्शन घडवणारी मिनी बस मिळाली. सुरेख माहिती देणाऱ्या मार्गदर्शकाने पुढील ठिकाणांची माहिती दिली.

श्री शशिभूषण महादेव मंदिर –

सोमनाथ जवळ समुद्रकिनाऱ्यानजीक हे मंदिर आहे.येथे तीन वेगवेगळी दगडी शिवलिंगे सागरकिनारी पाण्यात खडकावर असून भाविक त्याचे दर्शन घेतात. शिकारीसाठी आलेल्या जरा नावाच्या व्याधाने येथून लांबवर हरण चरत असल्याचे समजून सोडलेला बाण काही अंतरावर भालका तीर्थक्षेत्री विशाल पिंपळवृक्षाखाली समाधी स्थितीत पहुडलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या अंगठ्यावर लागला. तिथून तो पुढे श्रीकृष्णांच्या ध्यानधारणा करणाऱ्या उजव्या हाताच्या पंजावर मधोमध लागून शिरोभागी मधोमध कपाळी स्थिरावला.

श्री भालका तीर्थ –

प्रभासपट्टण क्षेत्री जमलेल्या सर्व यादवांचा बेधुंद मद्यपानामुळे आपापसात अचानक वाद निर्माण होऊन त्याचे पर्यवसान यादव वंश विनाशामध्ये झाले आणि हा यादव विनाश गांधारीच्या शापाने अटळ असल्याचे मनोमन जाणून असलेले भगवान श्रीकृष्ण खिन्न अवस्थेत येथे समाधी स्थितीत ध्यानस्थ होऊन येथे पिंपळवृक्षाखाली पहुडले होते. हरणावर बाण सोडला असे समजून सोडलेल्या बाणाच्या शोधात या ठिकाणी आल्यावर जरा व्याधाने जेव्हा भगवान श्रीकृष्णांची क्षमायाचना केली. तेव्हा भगवान त्याला म्हणाले की ‘ हे जरा तू तुझे कर्तव्य केले असून यात तुझा कोणताही अपराध नाही.माझ्या गेल्या जन्मीच्या श्रीरामावतारात वालीला त्याचा भाऊ सुग्रीव याच्याबरोबर झालेल्या युद्धात मी लपून बाण मारला होता आणि केवळ एकच अशी चूक माझ्याकडून आयुष्यात तेव्हा घडली होती.आज तो वाली जरा व्याधाच्या रूपाने आला आणि तू सोडलेला तोच बाण आता श्रीकृष्ण बनून आलेल्या श्रीरामांवर म्हणजे मला लागला आहे , थोडक्यात या चुकीची परतफेड झाली आहे असे समजून हे माझे अवतारकार्य समाप्त करतो.” त्यानंतर आपल्या धाकट्या भावाचा श्रीकृष्णाचा मृत्यू जवळ आला असल्याचे अंतर्मनी जाणून भालकातीर्थाजवळ हिरण्य नदीकाठी एका गुंफेत सदेह समाधी घेणारे बलराम प्रकट झाले आणि ते श्रीकृष्णाला घेऊन जवळील हिरण्य नदीच्या तीरावर आले. दोघांनी एकमेकांना अखेरच्या संवादानंतर साश्रूपूर्ण  आलिंगन दिले.श्रीकृष्णांनी हिरण्य नदीत सदेह प्रवेश करून जलसमाधी घेऊन अवतारसमाप्ती केली आणि बलराम परत आपल्या गुंफेमध्ये समाधीस्थळी परतले.अशा या विलक्षण भगवान श्रीकृष्ण अवतार समाप्तीचे ठिकाण हिरण्य नदीकिनारी फार शांत परिसरात आहे.तिथे सुंदर घाट बांधला असून श्री गीता मंदिर , श्री लक्ष्मीनारायण मंदिर , श्री बलराम गुंफा आणि दगडात कोरलेली श्रीकृष्ण चरण पावले आहेत. संथ वाहणाऱ्या हिरण्य नदीचे पात्र सुंदर असून अनेक पक्ष्यांचे विविध प्रकार येथे बघावयास मिळाले. भल्ल म्हणजे बाण.या तीर्थ स्थानी भगवान श्रीकृष्णाला बाण लागला म्हणून या तीर्थाला भल्लका तीर्थ किवा भालका तीर्थ असे म्हणतात.

भालका तीर्थानंतर हिरण्य , कपिल , सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम पाहिला. संगमाजवळील एक भव्य सुंदर असे श्रीराम मंदिर आणि श्री परशुराम तपोभूमी तीर्थमंदिर यांचे दर्शन घेऊन सोमनाथला भारावलेल्या अवस्थेत मावळत्या दिनकराला साक्ष ठेवून परतलो. फार दिवसांपासून मनात असलेले अपूर्व श्री सोरटी सोमनाथ क्षेत्रदर्शन झाले होते आणि भोजनोत्तर रात्री त्या दर्शनाची उजळणी करत आराम केला. शुक्रवारी सकाळी सोमनाथवरून जुनागढला जाण्यासाठी निघालो. सोमनाथ ते जुनागढ या सुंदर खड्डेमुक्त राज्य महामार्गावरून जाताना सगळीकडे सौराष्ट्राच्या निसर्गसमृद्धतेचे दर्शन घडत होते. नारळाची विशाल बने , केसर आंबा आणि चिकू या फळझाडांच्या विस्तीर्ण सुफलाम बागा ,
भुईमूग , कापूस यांची बाहेरून आलेली शेती दिसत होती. दिवाळीनंतर सुरु झालेल्या थंडीचा मजेदार आस्वाद घेणारी प्रसन्न हवा होती आणि हिरव्यागार संपन्न निसर्गसमृद्धतेमध्ये काळ्याभोर जमिनींचे नवीन पेरणीसाठी नांगरून ठेवलेले पट्टे अधूनमधून आढळत होते. भुईमुगाच्या पिकाची कापणी चालू होती आणि नवीन भुईमुगाच्या पेरणीची लगबग शेतात राबणाऱ्या बायामाणसांमध्ये सुरु होती. एखाद दुसऱ्या लहान मोठ्या पाणथळ जागा बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळत होत्या आणि त्यात डुंबणाऱ्या गुरांचा कळप पाहून ‘ सब भूमी है गोपाल की ‘ याची खात्री पटत होती. जुनागढला जाताना वाटेत सासण गीर हे भारतातील आणि आशियातील एकमेव सिंह अभयारण्याला भेट देणे हे आकर्षण होते.

भारतात सर्वत्र फार प्राचीन काळापासून विशेषतः मध्य प्रदेश ते उत्तर भारतातील जंगलांमधून वनराज केसरीचे साम्राज्य वाघांच्या बरोबरीने होते. ब्रिटिश राज्यकर्ते , संस्थानिक राजांच्या अवैध आणि बेसुमार शिकारीच्या हव्यासामुळे कालांतराने १९ व्या शतकात अवघे थोडे सिंह गुजरातच्या गीर जंगलात उरले.
केवळ सिंग किवा सिंह  आडनावाला जागून जंगलातील सिंहांची शिकार करायची हे या संस्थानिक राजांच्या विलासाचे प्रतीक बनले होते.त्यामुळे हळूहळू सिहांची संख्या राहण्यालायक अयोग्य वातावरण , पाण्याचा अभाव या कारणांमुळे घसरत गेली आणि परिणामी हा जंगलचा राजा गुजरातचे जंगल सोडून इतरत्र अगदी नामशेष झाला.

भारतातील नव्हे तर संबंध आशियातील सिंह प्राणी कायमचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याचे वेळीच गांभीर्य ओळखून जुनागढच्या नबाबाने कडक कायदे केले आणि त्याच्या संस्थानात सिंहांच्या शिकारीवर बंदी घातली. एकप्रकारे कोणताही त्रास नको म्हणून संस्थानच्या नबाबाने सिंहांना राजाश्रयाच्या संरक्षणाचे अभय दिले.

आज जुनागढ , अमरेली ते भावनगर या सौराष्ट्र परिसरात सुमारे ५०० च्या संख्येने सिंहांची प्रजा वाढत आहे.काही सिंहांनी आता हळूहळू जुनागढ गीर अभयारण्याजवळ अमरेली जिल्ह्यात स्थलांतर केले असून त्यातील काही मोजके सिंह भावनगर जिल्ह्यातील अरण्यात स्थलांततरीत झाले असल्याची माहिती समजली. जुनागढवरून दोन तासाभरात गिरला पोचल्यावर एका तासाभराची जिप्सी सफारीसह राईड घेऊन लगेच जंगलच्या राजांना भेटायला निघालो.या अभयारण्याला ‘ देवालिया गीर अभयारण्य ‘ असे म्हणतात. साऱ्या अभयारण्यात साग ,शीशम , बाभूळ आदी वृक्षांची दाटी होती. हा जंगलाचा भाग सिंहांसाठी योग्य असा गवताळ कुरणांचा आहे आणि त्यात फिक्कट हिरव्या ते पिवळसर रंगांच्या खूप छटा उठून दिसतात.

आम्ही राईडला निघालो तेव्हा सकाळची साडेनवाच्या सुमाराची वेळ होती आणि इतक्या लवकर सकाळी सकाळी सिंह महाराज दर्शन देतील की नाही याची धाकधुक होती.कदाचित त्यांची ती सकाळची हलकी न्याहारी करण्याची वेळ असल्याने मनात ही भलतीच शंका आली होती आणि ती बोलून दाखवल्यावर घरची अनुजा नामक सिंहीण गुरगुरायची तेवढी बाकी होती.पण ती शांत राहिल्याने भर जंगलात असूनही जीव थोडक्यात वाचला.

गीर जंगलात थोडे आत गेल्यावर मात्र नीलगायी, हरणे आणि लांडगे हे प्राणी खूप प्रमाणात दिसले.त्यानंतर जरा एक वळणावर झाडांच्या गर्द सावलीत एक सिंह आणि सिंहीणीची प्रेमळ जोडी दिसली.बहुतेक कळपापासून लांबवर कोणाचा त्रास नको म्हणून निवांत प्रायव्हसीसाठी आली असावी.
सिंहिणीने आणलेली सकाळची पोटभर न्याहारी सिंह महाराजांनी केली असावी. तेवढ्यात एक अशी अय्याई जांभई ताणून देत सिंह महाराज साफ आडवे होताना दिसले. .  

सासण गीर अभयारण्यात आता बहुसंख्येने पर्यटक येतात. गुजरात सरकारने ट्रॅव्हल अँड टुरिझमचे महत्व ओळखून पर्यटकांसाठी खूप सोयी निर्माण केल्या असून सुसज्ज मिनी बसेस आणि जिप्सी सफारीसह कुशल ड्रायव्हर्स तसेच मार्गदर्शक दिमतीला दिले जातात. गीर अभयारण्याच्या गेटजवळच आठवणीदाखल विविध वस्तूंची विक्री करणारे केंद्र आहे आणि त्यात गीरच्या सिंहांची सुंदर डिझाइनर चित्रे , लोगो असणारी कॅप्स , जॅकेट्स , ट्राऊझर्स , टी शर्ट्स ,विंडशीटर्स अशा वस्तूंची रेलचेल आहे. पर्यटक या केंद्रातून आठवणीसाठी आणि भेट देण्यासाठी अशा वस्तू नेतात. आम्ही देखील थोडी बहुत खरेदी केली आणि सासण गीर सिंह अभयारण्याचा परत एकदा भेट देण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. सासण गीरवरून सौराष्ट्राचे जुने नबाबी संस्थान जुनागढला तासाभरात पोचलो. गिरनार प्रवेशव्दार रोडवर आरामदायी लिओ रेसॉर्ट्समध्ये मुक्काम केला.

थोडाफार आराम करून लगेच एका झक्कास गुजराथी थाळी देणाऱ्या हॉटेलमध्ये पार्वती पतये हरहर महादेव करायला बसलो. आतापर्यंत द्वारका ते सोमनाथ दौऱ्यात सर्वत्र नुसत्या विविध चविष्ट पदार्थांची मुबलक रेलचेल असणाऱ्या काठियावाडी भोजनाने आमच्या भुकेचा महाराष्ट्र सौराष्ट्राने हा हा म्हणता जिंकून घेतला होता. जुनागढचा मुक्काम आटोपून परत मुंबईला जाण्यासाठी विमानाने पोरबंदरला गेलो तोपर्यंत ही आनंदी खाद्ययात्रा सुखेनैव चालू होती.पत्नीच्या वटारणाऱ्या नजरेकडे दुर्लक्ष करत वाढत्या वजनाची चिंता करणे सोडून दिले होते आणि काठियावाडी भोजनाचे मनसोक्त भजन पूजन सेवन चालू होते. भोजनानंतर जुनागढचा अप्परकोट हा किल्ला पाहायला गेलो. ‘ अडी कडी नी वाव ‘ म्हणून या किल्ल्यात पाण्याची सोय करणारी एक प्रचंड अशी तीनशे फूट खोल विहीर आहे,तिचे बांधकाम पाहून थक्क व्हायला होते.मात्र विहिरीत प्लॅस्टिकच्या पिण्याच्या रिकाम्या टाकून दिलेल्या बाटल्यांचा तो खच पाहूनच हात जोडले.
प्लास्टिक विरोधी चळवळीने अजून किती प्रमाणात व्यापक जनजागृती करायला हा कधीच न संपणारा आपल्या देशाचा फार मोठा चिंताजनक विषय आहे. असा प्लास्टिक कचऱ्याचा वाढत प्रश्न आपल्या देशातील महत्वाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या पर्यटन स्थळी उभा राहतो तेव्हा मन उद्विग्न होते.ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या दृष्टीने आपला आसेतु हिमाचल भारत देश खूप सुंदर , विशाल आहे, इतका की मजबूत परकीय चलन मिळण्यासाठी सुद्धा या ट्रॅव्हल अँड टुरिझमचा उपयोग होतो हे जगात कितीतरी प्रगत देशांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. त्या दृष्टीने आपल्या देशात काही ठळक अपवाद सोडल्यास अजूनही बरीच अनास्था आहे. जुनागढचा अप्परकोट किल्ला पाहून झाल्यावर हॉटेलवर परतलो आणि दुसऱ्या दिवशीचे स्थानिक स्थलदर्शन निश्चित करून आराम केला. शनिवारी सकाळी जुनागढला स्थानिक स्थलदर्शन करावयास निघालो. यात महाबतखान मकबरा , शक्करबाग प्राणी संग्रहालय ,गुजरातचे सर्वश्रेष्ठ संत नरसी मेहता निवासस्थान , सम्राट अशोक शिलालेख आणि श्री स्वामीनारायण मंदिर ही ठिकाणे पाहिली. पैकी स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने जुनागढच्या चित्तखाना चौकात जिल्हा न्यायालयासमोर जुनागढ नवाब महाबतखान मकबरा विशेष उल्लेखनीय आहे. इंडो – मुस्लिम आणि युरोपिअन गॉथिक अशा मिश्रशैलीत १८९२ साली या मकबऱ्याचे सुरेख बांधकाम झाले.या मकबऱ्याभोवती चारी मनोऱ्यांवर जाण्यासाठी बाहेरून सुंदर कोरीव गोलाकार जिने आहेत. गुजरातचे परमश्रेष्ठ संत नरसी मेहता यांच्या निवासस्थानाचे दर्शन घेतले. ‘ वैष्णवजन तो तेणें कहिये जे पीड पराई ही जाणी रे ‘ हा संत नरसीनाथांचा अभंग खूप प्रसिद्ध आहे. गिरनार दरवाजा रोडवर मौर्य कालीन सम्राट अशोकाच्या संदेशांचे लेखन कोरलेली शिळा आहे, त्यावर ब्राह्मी लिपीमध्ये विविध उपदेशात्मक राजधर्माज्ञा आणि धार्मिक यात्रांचे महत्व कोरले आहे. सम्राट अशोकाचे साम्राज्य भारताच्या पश्चिमेकडे काबूल, कंदाहर आणि सौराष्ट गिरनारपर्यंत पसरले होते.
गिरनार पर्वताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायथ्यापासून काही अंतरावरच हा शिलालेख पाहावयास मिळतो. जुनागढमधील स्थानिक श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतल्यावर फार बरे वाटले. गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाचे जनक श्री स्वामीनारायण यांच्या आज्ञेने हे मंदिर उभारण्यात आले असून मंदिरासमोर श्रीस्वामीनारायण यांचा राहता राजवाडा त्यांच्या दैनंदिन वापरातील चीजवस्तूंसह मोठा काळजीपूर्वक जतन करून दर्शनाला खुला ठेवण्यात आला आहे.आज साऱ्या जगभरात सुंदर अशा श्री स्वामीनारायण मंदिरांची मालिका निर्माण झाली आहे आणि या मालिकेतील सर्वात पहिले मंदिर म्हणून जुनागढच्या या मंदिराचा मान आहे. १८२८ साली या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. यात श्री रणछोडराय, त्रिकमराय , राधारामन , हरिकृष्णमहाराज, सिद्धेश्वर महादेव आणि पार्वती यांच्या अत्यंत देखण्या मूर्ती स्थापन केल्या आहेत.मंदिराच्या मुख्य सभागृहावरील दर्शनी छतावर स्वामीनारायण यांच्या जीवनातील ठळक प्रसंग कोरले असून त्यातून त्यांच्या अवतारकार्याची थोडक्यात माहिती मिळते.भगवान विष्णू दशावतार , श्रीकृष्ण जीवनातील प्रसंग आणि श्री स्वामीनारायण मंदिरे असे विषय छतावर कोरण्यात आले आहेत.

आम्ही मंदिरात गेलो तेव्हा सकाळच्या राजभोग प्रसादारतीची वेळ झाली होती. सारा वैष्णव भक्तगण खड्या सुरात म्हटल्या जाणाऱ्या आरतीमध्ये तल्लीन झाला होता.आरती समाप्तीचा तो आवाज भक्तगणांच्या टिपेच्या स्वरात उंचावला गेला आणि सनई चौघडा , शंख या वाद्यांच्या ललकारीत सर्व देवतांच्या गर्भगृहाचे सुंदर कोरीव लाकडी दरवाजे उघडले गेले.साऱ्या भक्तगणांबरोबर आम्ही श्री रणछोडरायापुढे नतमस्तक झालो. जुनागढमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दरबार हॉल वस्तूसंग्रहालय. नेमके ते शनिवारचा सुट्टीचा दिवस असल्याने बंद होते आणि त्यात आणखी एक दुर्दैव म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने आमची खूप निराशा झाली. नंतर गुगलवर सहज दरबार हॉल वस्तूसंग्रहालयाची साईट पाहिल्यावर जागतिक दर्जाच्या राजेशाही कलात्मक संग्रहाची भेट हुकल्याचे खूप वाईट वाटले.

पाहता पाहता द्वारकानगरीपासून सुरु झालेल्या सौराष्ट्र दर्शनाला सुर्यरथाच्या सात अश्वांसारखे ते सात दिवस कसे दौडत उडून गेले ते कळले नाही. आम्ही श्री द्वारकाधीश ते श्री रणछोडराय अशा भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणात काठेवाड फिरत होतो. वेळेअभावी आम्ही गिरनारदर्शन इच्छा असुनही करू शकलो नाही.
बाकी सर्व काही आधुनिक सुखसोयी आता आल्या असल्या तरी जुनागढ हे जिल्हा मुख्य केंद्राचे शहर तसे खूपच जुनाट वळणाचे वाटले.रस्तोरस्ती असणाऱ्या खड्डयांमुळे त्या दिव्य सहाआसनी टमटम नामक रिक्षात बसून मक्याच्या लाह्यांसारखे शहरभर आम्ही नुसते टणाटण उडत होतो. स्पीडब्रेकर्स किती निश्चित अंतरावर असावेत याला काही घरबंदच नव्हता. त्यामुळे तर स्पीडब्रेकर आला रे आला तर खुद्द स्वतःच टमटमच्या मागच्या बाजूला बसलो असताना आपसूकच उभा राहत होतो. द्वारकानगरी ,सोमनाथप्रमाणे येथेही रस्त्यात पायी चालत असताना कुठली गरीब गाय दत्त म्हणत समोर उभी राहील याचा काही नेम नव्हता.जुनागढजवळ गिरनार दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भक्त मंडळींनी जुनागढचे रस्ते फुलून गेले होते. येणाऱ्या – जाणाऱ्या सर्व वाहनांमधून भक्त मंडळींची दाटी होती.विठूरायांच्या दर्शनाला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे साऱ्या गुजरातमधील लहान सहान गावांमधील भोळीभाबडी भाविक भक्त मंडळी गिरनारदर्शनासाठी येत जात होती. आमच्या हॉटेल रूममधून समोर गिरनारच्या डोंगराची गर्द हिरवीगार पर्वतराजी दिसत होती आणि लांबवर श्रीदत्त मंदिराचे लुकलुकणारे दिवे दिसत होते. त्या दिव्यांना नमस्कार करून पुन्हा कधीतरी गिरनार दर्शन करण्यासाठी जुनागढला नक्की येऊ असे श्रीदत्तमहाराजांना साकडे घालून रात्री निवांत झोपलो.

सौराष्ट्र दौऱ्याच्या आठव्या दिवशी रविवारी सकाळी जुनागढचा भावपूर्ण निरोप घेतला आणि मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी पोरबंदरला जाण्यासाठी निघालो.दोन तासांमध्ये पोरबंदरला आलो.या दोन तासांच्या सुंदर आणि आश्चर्य म्हणजे खड्डेमुक्त प्रवासात गुजरातची महत्तम साधारण विभाजक अशी प्रगती अनुभवली. भुईमुग, कापूस , गहू या नगदी पिकांची विपुल पसरलेली शेती आणि केसर आंबा, चिकू, नारळाच्या बहरलेल्या बागा नजर जाईल तिथे ठायीठायी दिसत होत्या.जोडीला शेळ्या, मेंढ्या , गाई गुरांचे कळप सगळीकडे हिरव्यागार गवती कुरणात चरताना दिसत होते.

महात्मा गांधींचे जन्मगाव म्हणून पोरबंदर शहरातील खादी ग्रामोद्योग केंद्राची माहिती मिळाली होती आणि म्हणून आल्यानंतर लगेच दुपारी तिथे मोर्चा वळवला. नेमकी रविवारची सुट्टी असल्याने खादी ग्रामोद्योग केंद्र बंद होते, त्यामुळे निराशा झाली. तसेच रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने पोरबंदरचे घाऊक आणि किरकोळ ड्रेस मटेरियल कपडा मार्केट पण बंद होते. त्यामुळे शॉपिगसाठी खूप उत्साही असलेल्या अनुजाचा काहीसा हिरमोड झाला. दुपारी निलेश डायनिंग  हॉल येथे गुजराथी थाळी भोजन घेण्यासाठी गेलो होतो. जेवण खूप तेलकट नव्हते. मालक जोशी आणि मंडळींनी बनवलेली घरगुती गुजराती काठीयावाडी जेवणाची भोजनथाळी होती. गुजरातमध्ये दूध दुभते मुबलक असल्याने जेवणात दही ताक भरपूर असते. तसेच भुईमुगाचे पीक खूप असल्याने रिफाईंड शेंगदाणा तेलाचे खासगी घरगुती घाणे व कारखाने भरपूर ,त्यामुळे तेलाचा वापर व्यवस्थित असतो.मसाल्याचे पदार्थ भरपूर होत असल्याने मसाल्यांची चैन असते.

काठीयावाड सौराष्ट्र हा पाण्याने अतिशय समृध्द असल्याने इथे सगळ्या भाज्या , डाळी, धान्ये , कडधान्ये यांचे उत्पन्न भरपूर होते. त्यामुळे त्यांचा भरपूर वापर गुजराती जेवणात होतो. सकस शाकाहारी पदार्थांची भरपूर रेलचेल असल्याने आणि सारे गरवी गुजरात मुख्यत्वे शाकाहारी वैष्णव हिंदू असल्याने येथे चुकूनही येथे नॉनव्हेजची हॉटेल्स विशेष करून पाहायला मिळत नाहीत. एवढेच काय तर अंडी, मटण, चिकनची दुकाने सुद्धा कुठेही दिसली नाहीत. निदान सौराष्ट्रात दौऱ्यावर असताना आम्हांला तरी दिसली नाहीत.

खैके पानांच्या गाद्या तर पावलोपावली आहेत , पण तिथे सुद्धा मुंबई स्टाईलप्रमाणे हमखास ठेवली जाणारी अंडी ठेवलेली बिलकुल दिसली नाहीत. सबंध गुजरात राज्यात कायद्याने १००% कडक दारूबंदी असल्याने इथे दारूची दुकाने नाहीत आणि त्यामुळे बिअर लिकर बार रेस्टॉरंट्स तर अजिबात नाहीत. पोरबंदर येथे शेवटचे दोन दिवस होतो आणि तेथे फेरफटका मारताना सहज जाणवलेले वैशिष्टय म्हणजे गावठी सोडामिश्रित विविध फ्लेवर्समध्ये मिळणारी थंड पेये विक्रीची दुकाने.पानाच्या दुकानांइतक्या बरोबरीने किबहुना जरा जास्तच संख्येने ही सोडामिश्रित विविध फ्लेवर्समध्ये मिळणाऱ्या थंड पेयांची दुकाने आढळली. पोरबंदर शहराचा जाणवलेला एक विशेष म्हणजे भलेमोठे रस्ते आणि रुंद पदपथ. या रुंद पदपथांवर कुठेही अतिक्रमण करणारी दुकाने , झोपडपट्टी असे काहीही आढळले नाही. हेच दृश्य द्वारकानगरी ते पोरबंदर व्हाया सोमनाथ , जुनागढ येथे शहरांवर अतिक्रमणे करणाऱ्या झोपडपट्टीबाबत आढळून आले नाही त्यामुळे फार आश्चर्याचे नवल करत आम्ही हिंडत होतो.

त्या रविवारी मावळत्या दिनकराला साक्ष ठेवत निवांत संध्याकाळी पोरबंदरचा समुद्रकिनारा पाहिला. खडकाळ , शुभ्र वाळूचा हा किंचित उतरता असा किनारा असून थोड्या जवळच पोरबंदरला बोटींसाठी गुजरात पोर्ट ट्रस्टने मोठ्ठा डॉक बांधलेला आहे. रात्री संदीपनी आश्रम ट्रस्टच्या श्री हरी मंदिराला भेट दिली. श्री. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००६ साली या अतिशय भव्य देखण्या मंदिराचे उद्घाटन झाले असून ते मुख्यत्वे श्री लक्ष्मीनारायणाचे आहे. श्री हरी मंदिरासाठी सुंदर कोरीवकाम असणारी शिल्पे ,खांब घडवले असून त्यासाठी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मिळणारा स्थानिक पिवळसर लाईम स्टोनचा वापर केला आहे.मुख्य देवदर्शनाचा सभामंडप खूप विशाल असून गर्भगृहात सर्वात मधोमध श्री लक्ष्मीनारायण ,डावीकडे श्री राधाकृष्ण आणि उजवीकडे श्री रामजानकी यांच्या शुभ्र मार्बल दगडात कोरलेल्या सहा इंची उंचीच्या सुबक संगमरवरी दगडातील मूर्ती आहेत. बदलत्या काळाप्रमाणे वरिष्ठ नागरिकांचा विचार करून मंदिराच्या वरील सभामंडपात जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी लिफ्टसच्या सोयी केल्या आहेत.

शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी पोरबंदर शहरातील पाणथळ जागी असणारे पक्षी अभयारण्य पाहायला गेलो होतो.त्यानंतर जवळील पोरबंदर मार्केटला आणि खादी ग्रामोद्योग केंद्राला धावती भेट देऊन थोडीबहुत खरेदी केली. महात्मा गांधींच्या जन्मस्थळाशेजारचे सुंदर आणि खूप जुने असे लोकप्रिय श्रीनाथजी मंदिर पाहिले. गुजरातच्या जनतेचा भावलेला एक मोठ्ठा गुण म्हणजे प्रचंड धार्मिक वृत्ती. सकाळची आपली नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून कामावर जाण्याआधी लक्षणीय संख्येने भक्तमंडळी श्रीनाथजींच्या सकाळच्या आरतीला हजर होती. त्यानंतर हॉटेलवर आलो. सारी आवराआवर अनुजाने करून ठेवली होती. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमभक्त अनुजाला या दौऱ्यामुळे खूप समाधान लाभले होते आणि देवभूमी सौराष्ट्रचा निरोप घेत असल्याने काहीसे वाईट पण वाटत होते. महाभारत युद्धानंतर भगवान श्रीकृष्णाच्या कायम झालेल्या वास्तव्याने आणि पावन स्पर्शाने पुलकित झालेल्या या सौराष्ट्र भूमीच्या कृतार्थ दर्शनाने ते सात दिवस श्रीरणछोडराय द्वारकाधीशाच्या कोडकौतुकात कसे उडून गेले ते कळलेच नाही.

हॉटेल व्यवस्थापनाला रूम सोडत असल्याची सूचना दिली आणि सामान घेऊन तडक पोरबंदर विमानतळावर आलो. उड्डाणाला खराब हवेमुळे २ तासांचा विलंब होणार असल्याची सूचना सकाळी मिळाली होती. ठीक सकाळी अकरा वाजता आम्हांला घेऊन जाणारे विमान शेवटी एकदाचे दुपारी पावणे दोन वाजता सुटले आणि संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईला द्वारकाधीश श्रीकृष्ण की जय असा जयघोष करत पोचलो.

– अनीश दाते , 
भ्रमणध्वनी – ९३२४६२३६३०
dateaneesh@gmail.com    

2 thoughts on “ते सात दिवस ! प्रवासवर्णन©अनीश दाते

 • April 11, 2021 at 1:23 pm
  Permalink

  खूप सुरेख वर्णन

  Reply
 • April 12, 2021 at 4:25 am
  Permalink

  अनिश जी, उत्तम लिहिले आहे. प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद झाला.
  धन्यवाद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu