सदैव धुक्याची शाल पांघरलेला सैनिकांचा गांव : चौकुळ

महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील घटप्रभेच्या किनारी वसलेले कायम धुक्यात असलेले गांव….चौकुळ!घटप्रभा नदीचा उगम आंबोलीत झाला असला तरी ती चौकुळमध्ये संथ होत,विस्तारित होत परिसर हिरवागार करते आणि मग सह्याद्रीच्या कुशीने कर्नाटककडे रवाना होते.सारे ४०० उंबरठा असलेले,सुमारे १४०० लोकसंख्या असलेले छोटेसे गांव पण घरटी एक/दोन सैनिक!

कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथून गावडे घराण्यातील तिघे भाऊ चौकुळमध्ये आले.त्यांनी हे गांव वसविले.शेतसारा जमा करण्यासाठी येथे खोती पद्धत रूढ झाली.गांव वसवणाऱ्या तिघांच्या घराण्यातून तिघे खोत नेमले गेले.त्यांना शेतसारा जमा करण्याची इतरांनी कबुली दिली म्हणून ते कबुलायतदार गांवकर झाले आणि त्यानुसार गांवचा कारभार करण्याची व्यवस्था ठरवली गेली.


पूर्वीच्या काळी चौकुळ ते आंबोली हे दहा किलोमीटरचे अंतर घनदाट जंगलातून पार करावे लागे.जंगलातून अहोरात्र धुक्याबरोबर जंगली श्वापदांमध्ये भरलेल्या या भागातून जाणे हे मोठे साहसच असे.यामुळे कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याचा बेडरपणा येथील भूमीपुत्रांच्या नसानसात असे आणि त्याचाच वसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. जेमतेम चौथी शिकल्यानंतर कामानिमित्त बेळगाव किंवा कोल्हापूर गाठायचे. तेथूनच मग सैन्यात भरती व्हायचे,अशी या गावातील बांधवांची परंपरा होती. संस्थानकाळातील इतिहासातही बापूसाहेब महाराजांच्या सैन्यात आंबोली-चौकुळ येथील सैनिकांच्या नोंदी आढळतात तसेच शासकीय दस्ताऐवजात १९३०मधील भरतीत चौकुळच्या सैनिकांची नोंद आढळते. १९१९ मध्ये आझाद हिंदसेनेत चौकुळ येथील लक्ष्मण गोविंद गावडे, भिकाजी गावडे, कृष्णा गावडे हे सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक होते. १९६२च्या चीन युद्धात ब्रिगेडीयर शंकर परब (आंबोली), उल्हास परब (चौकुळ), दशरथ परब (चौकुळ) यांना पराक्रम करतांना वीरगती प्राप्त झाली. मेजर बळीराम परब यांनी पाकशी लढतांना त्यांचे अनेक रणगाडे फोडले व वीरमरणास सामोरे गेले.१९८९ मध्ये श्रीलंकेत शांतीसेना म्हणून काम करीत असतांना चौकुळ येथील हवालदार एकनाथ धोंडू नाईक, रामचंद्र गावडे हे शहीद झाले. तर २००८मध्ये कारगील युद्धांत भारत-पाकिस्तान सीमेवर दीपक धोंडू गावडे यांस वीरगती मिळाली.

तळहातावर शीर घेऊन लढण्याची परंपरा जपणारे हे गांव.. आंबोली-चौकुळ, गेळे या तीनही गांवात ६०० ते ७०० माजी सैनिक आहेत तर ३०० हून अधिक सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी सध्या सीमेवर खडा पहारा देत आहेत. साधेसुधे असे त्यांचे आईवडील मला महान वाटतात कारण महिनोंमहिने घरापासून दूर असणाऱ्या सुपुत्रांबद्दल त्यांना अभिमान आहेच, किंबहुना त्यांनीच बालपणापासून त्यांना देशभक्तीचे धडे दिले आहेत आणि आपल्या दुसऱ्या सुपुत्रांना, भाचरांना ,पुतण्यांनाही सैन्यात जाण्यास प्रोत्साहन देतात. धन्य ते माता -पिता आणि धन्य ते सुपुत्र!

चौकुळ गावांतील अनेक वीर पुरस्कारांनी सन्मानित आहेत. चौकुळचे शिपाई बाबूराव गावडे यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सर्वश्री पांडुरंग गावडे (आंबोली), एकनाथ नाईक (चौकुळ), रामचंद्र गावडे (चौकुळ), रामचंद्र गावडे (आंबोली) यांना ताम्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शांतिसेनेच्या माध्यमातून श्रीलंका,आफ्रिका, रुगांडो अशा विविध देशांत जाऊन पराक्रम गाजविणाऱ्यांमध्ये चौकुळचे सैनिक अग्रगणी आहेत. उग्रवादींबरोबर सामना करणारे बापू सोमा गावडे यांना जम्मू-काश्मीरमध्ये ‘जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.बापू गावडे आता आपल्या गावांतील मुलांना सैन्यामध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.


सैनिक परंपरा असल्याने या गांवात मुळातच शिस्त ही पिढयान् पिढया चालत आलेली आहे. येथे कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत म्हणून सर्वजण सदैव दक्ष असतात.गांव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी रोटेशन पद्धतीने तिघांकडे सोपवली जाते. हे तिघे वर सांगितल्याप्रमाणे गावडे घराण्याच्या मूळ तीन कुटुंबातील वंशज असतात. दरवर्षी प्रमुख बदलत असल्याने एकाधिकारशाही रहात नाही.दर मंगळवारी भरणारी गांवसभा अर्थात गांवकी हा या व्यवस्थेचा आत्मा.संपूर्ण चौकुळ गांव दर मंगळवारी सुट्टी घेते. कोणत्याही परंपरागत कामांत ते व्यस्त रहात नाहीत तर या दिवशी सर्व जण गांवाची ग्रामदेवता सातेरीदेवीच्या मंदिरात जमतात. येथे ‘गांवकी’ भरते.मनोभावे देवीची पूजा करून गांवात कुणाच्या छोट्या -मोठया तक्रारी असतील,तंटे असतील तर येथेच सोडविले जातात.बारा वाड्या आणि एक गावठाण मिळून वसलेल्या दहा किलोमीटर विस्ताराच्या या गांवाविषयीचा प्रत्येक निर्णय देवीच्या साक्षीने घेतला जातो आणि तो सर्व विनातक्रार मानतात.पुन्हां एकमेकांशी सौदाहर्याने वागू लागतात.हाही गुण कौतुकास्पद. आपण किती सल मनांत ठेवतो बरं? ‘गावकी’ मध्ये तंटे सोडविण्याबरोबरच शेतमजुरीचे दर,औताचे दर,चराई क्षेत्र, शेतीचे क्षेत्र,विकास कामांचे निर्णय इतकेच काय तर कोणी कुठे घर बांधायचे याचे निर्णयही सर्व संमतीने घेतले जातात.या व्यवस्थेला कबुलायतदार गावकर म्हणून ओळखले जाते.

इतक्या वर्षांत येथे पोलीस दरबारी एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.फौजदारी अथवा दिवाणी केसेसची संख्या अपवादात्मकही दिसून येत नाही.कोणत्याही गावांत हेवेदावे असू नयेत म्हणून राज्य सरकारने २००७ मध्ये ‘तंटामुक्त गांव’ योजना राबविण्यास सुरुवात केली आणि प्रोत्साहन म्हणून बक्षिसेही जाहीर झाली.येथे तंटे गांवपातळीवरच मिटत असल्याने पहिले बक्षीस आपल्यालाच मिळणार,अशी खात्री गांवकरी आणि अधिकाऱ्यांनाही होती.मूल्यमापनही झाले; पण चौकुळला बक्षीस मिळाले नाही.याचे कारण म्हणजे गांवातून पोलिस ठाण्यात एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती !! हा हन्त,हन्त !!!
या गांवात अनेक वनऔषधीं आहेत.दुर्मिळ वनस्पतीही आहेत. पिढयान् पिढया गायी-वासरांसाठी खास शेतीक्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. शासनाने अलीकडे गाय-वासरांसाठी गायरान जाहीर केली परंतु चौकुळमध्ये मात्र अनेक पिढया ही परंपरा सुरू आहे.येथे अनेक वर्षांपासून कुऱ्हाडबंदी,चराईबंदी पाळली जाते. शेतीची ठिकाणे “गांवकी’मध्ये ठरवून कुऱ्हाडबंदी उठविली जाते.चारा यायला लागला की कबुलायतदार गावकर चराईबंदीचे क्षेत्र निश्चित करतात याला आखाड म्हणतात. डिसेंबरपर्यंत चारा कापून झाल्यावरच येथील चराईबंदी उठवली जाते. सारे कांही एकमताने, शिस्तीने!

आज बदलत्या संपर्क यंत्रणेतही लष्करी जवानांबाबतचे आकर्षण, श्रद्धा,पसंती चौकुळ गांवात कायम आहे.बरेचजण लष्करी सेवेतच असल्याने अथवा निवृत्त झाल्यानंतरही अन्य सेवा देत असल्याने गांवापासून दूर आहेत.परिणामी येथील बहुतांश घरे बंदच आहेत.म्हणून आता निवृत्त सैनिक आणि गांवातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत कृषिपर्यटनाच्या माध्यमातून या बंद घरांमध्ये पर्यटकांना निवासाची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.घनदाट झाडी, निर्मळ नदी, दुर्मिळ वनस्पती उदा. ग्रामदेवतेच्या मंदिराच्या प्रांगणात धुपाचे झाड, शिवाय खास कोकणी रुचकर जेवण आणि गांवावर कायम धुक्याची शाल …पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी.सावंतवाडी पासून ४० कि.मी. किंवा आंबोली पासून फक्त १० कि. मी. अंतरावर असणारे सैनिकांचे हे अनोखे गांव बघायलाच हवे आणि हिरव्या रानांत धुक्याची शाल एकदा तरी लपेटून घ्यायलाच हवी, नाही कां?

….. नीला बर्वे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu