राज कपूर © मुकुंद कुलकर्णी
तीन राष्ट्रीय पुरस्कार , अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स , पद्मभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार . आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बॉलीवूडचा ‘ शो मन ‘ राज कपूर !
दि.१४ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला . त्यांचं खरं नाव होतं रणबीर कपूर . बॉलिवुडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या राज कपूर यांनी जे कमावलं ते केवळ स्वतःची मेहनत आणि अंगातल्या कलागुणाच्या जोरावर . राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले . त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले . पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच . दहाव्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली . पुढे राज कपूर , पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासह मायानगरी मुंबईला येऊन रहायला लागले आणि येथून सुरू झाली त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सफर . ” राजू छोट्या कामापासून सुरुवात करशील , तरच मोठा होशील ! ” हा कारकीर्दीच्या सुरुवातीला वडिलांनी दिलेला कानमंत्र ते कधीच विसरले नाहीत .
वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ.स. १९४८साली त्यांनी ‘ आर के स्टुडिओ ‘ ची स्थापना केली . सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात . खरं तर त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं होतं . पण ते निर्माता , दिग्दर्शक , अभिनेते असे सगळेच बनले . ‘ बरसात ‘ हा आर के स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा . या चित्रपटात राज सोबत नर्गीस प्रमुख भूमिकेत होती . यातील एक सीन लोकांना इतका आवडला की , पुढे तोच आर के स्टुडिओचा लोगो बनला . एका हातात सौंदर्य , एका हातात संगीत हे चित्र राज कपूर यांना खूप आवडले . राज या दोन्हीचे भोक्ते होते . राज नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती . तशी लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल . ऑन स्क्रीन , ऑफ स्क्रीन राज नर्गिस जोडी मशहूर होती .
राज कपूर आपल्या पहिल्या सिनेमासाठी एका स्टुडिओच्या शोधात होते . नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये रोमिओ ज्युलिएटचे शूटिंग करत होती . फेमस स्टुडिओमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या चौकशीसाठी ते जद्दनबाईंच्या घरी पोहोचले . जेंव्हा ते तिथे पोहोचले , तेंव्हा नर्गिसने दरवाजा उघडला होता . किचनमधून धावत येऊन तिने दरवाजा उघडला तेंव्हा ती पकोडे तळत होती . केस सावरताना हाताला लागलेले बेसनाचे पीठ तिच्या केसांवर पसरले . नर्गिसच्या या अवतारावर राज कपूर लट्टू झाला होता . हा प्रसंग जसाचा तसा नंतर ऋषी कपूर व डिंपल कापडिया यांच्यावर बॉबी चित्रपटात चित्रित केला गेला . पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले होते .
राज यांच्या चित्रपटातील नायक सामान्य माणूस आहे . फूटपाथवर राहणारे , फेरीवाले , चहा विकणारे राज कपूरच्या चित्रपटात सर्रास आढळतात . गरीबीचे उदात्तीकरण स्वतः ऐषोआरामात राहून आलेले नव्हते . राज स्वतः अत्यंत साधा होता .
राज चोरीचोरीचे शुटिंग मद्रासमध्ये करत होते . सत्यजित राय दिग्दर्शित पथेर पांचाली हा चित्रपट त्यावेळी मद्रासमध्ये दाखवला जात होता . राज यांनी तो चित्रपट पाहिला आणि दोन दिवस ते त्या प्रभावातून बाहेर येऊ शकले नाहीत . आर के बॕनरखाली चित्रपट बनवण्यासाठी ते सत्यजित राय यांना भेटलेसुद्धा पण राय यांना हिंदी येत नव्हती त्यामुळे हे शक्य झाले नाही .
राज सुरुवातीला अभिनयापेक्षा चित्रपटाच्या इतर अंगात रुची दाखवत होता . म्हणून पृथ्वीराजनी राजला मार्गदर्शनासाठी केदार शर्मा यांच्याकडे पाठवले . पृथ्वीराज , राजसाठी स्वतः चित्रपट निर्माण करू शकत होते . पण मुलाने या व्यवसायाची सुरूवात एबीसीडी पासून करावी अशी त्यांची इच्छा होती . केदार शर्मा यांच्या चित्रपटात राजला क्लॕपर बॉयचे काम मिळाले . शॉट सुरू होण्यापूर्वी राज केसात कंगवा फिरवून क्लॕप देत असे .केदार यांनी त्याला अनेकदा समजावले की , तू चित्रपटात दिसणार नाहीयेस त्यामुळे केस विंचरण्याची गरज नाही . पण , राज त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असे . एकदा त्यांनी क्लॕपर पट्टी एवढ्या जोरात आदळली की , जवळ उभ्या असलेल्या एका अभिनेत्याची नकली दाढी त्यात अडकून खाली पडली . हे पाहून केदार शर्मा भडकले . त्यांनी एक सणसणीत थप्पड राजच्या गालावर ठेवून दिली , त्यादिवशी राजच्या डोळ्यांत जे दुःख दिसले त्यामुळे केदार शर्मा आतून हलले . या थप्पडीने राजच्या चित्रकारकीर्दीचा प्रवास सुरू झाला .केदार शर्मांनी राजला नीलकमल या चित्रपटात नायकाची भूमिका दिली . राज कपूर यांचे जगभरात चाहते होते . मध्य पूर्व आशिया , रशिया , आफ्रिका , चीन दक्षिण पूर्व आशिया या देशांमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती . ‘ मेरा जूता है जपानी ‘ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले . राज चार्ली चॕप्लीनचे प्रशंसक होते . त्यांच्या अभिनयावर चार्ली चॕप्लीन यांचा पूर्ण प्रभाव होता .
राज कपूरला संगीताची चांगलीच जाण होती . लोकांना कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं याची त्याला चांगलीच समज होती . आजही त्याच्या चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत . लोकप्रिय संगीतकार शंकर जयकिसन हे सतत अठरा वर्षांपेक्षा जास्त काळ नं 1 चे संगीतकार होते . त्यांना पहिली संधी राजनी बरसात या आपल्या चित्रपटातून दिली होती . आपल्या चित्रपटातील संगीतासाठी त्यांची एक टीमच होती . गीतकार शैलेंद्र व हसरत जयपुरी , गायक मुकेश , संगीतकार शंकर जयकिशन हे त्या टीमचे बिनीचे शिलेदार होते . एकमेकांचे गाढ मित्र होते . जवळजवळ दोन दशकांचा दीर्घकाळ एकत्र काम करत होते . मुकेश यांच्या मृत्यूनंतर ” आज माझा आवाज हरपला ” ही राजची प्रतिक्रिया होती . राज , दिलीप , देव यांची घनिष्ट मैत्री होती . आर के स्टुडिओतील राजची मेकअप रूम वापरण्याची परवानगी फक्त देव आनंदला होती . विजय आनंद यांनी या तिघांना एकत्र घेऊन एक चित्रपट बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता . पण , या तिघांच्या तारखांचा घोळ आणि तिघांचाही अहंकार यामुळे तो प्रयत्न बारगळला .
इ.स.१९७१ साली भारत सरकारने राज कपूरला पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते .
राज कपूर यांची तब्येत ठीक नसतानाच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण मिळाले , ते तयारही झाले . दिल्लीच्या सिरीफोर्ट ऑडिटोरियममध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार होता . राज कपूर यांना तीव्र दम्याचा त्रास होता . त्यासाठी त्यांना ऑक्सिजन पुरवठा गरजेचा होता . सुरक्षा कारणास्तव राज कपूर यांना आॉक्सिजन सिलिंडर सोबत नेण्याची परवानगी नाकारण्यात आली . पुरस्कारासाठी त्यांचे नाव पुकारले गेले , तेंव्हाच त्यांच्या छातीत तीव्र कळ आली . हे पाहून तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण प्रोटोकॉल तोडून स्टेजवरून खाली उतरत राज कपूर यांच्या जवळ आले होते . राज कपूर यांना ताबडतोब एम्स रुग्णालयात हलवण्यात आले . एक महिना रुग्णालयात राहिल्यावर त्यांनी तेथेच अंतीम श्वास घेतला .
हिंदी चित्रपटसृष्टीतील ह्या ग्रेट शो मन ला सलाम !
मुकुंद कुलकर्णी©