करोनाच्या या कठीण काळातही माणुसकीचे नव्याने दर्शन.

करोनाच्या या कठीण काळातही माणुसकीचे नव्याने दर्शन होते आहे करोनाच संकट गेल्यावर्षी आलं आणि आपल्या मागे हात धुवून लागल. अनलॉक १, अनलॉक २ म्हणता म्हणता परत कडक निर्बंध लावण्याची वेळ आली. पण या वर्ष- दिड वर्षाच्या काळात या करोनने आपल्याला अनेक वेळा माणुसकीचे नव्याने दर्शन घडवले.   या कोरोनाच्या काळात अनेक चांगले – वाईट अनुभव आपल्याला आले . काही काही माणसं कशी वागतात असं म्हणावं लागतानाच , काही ठिकाणी माणुसकीचे वेगळेच दर्शनही झाले. असे काही प्रसंग वाचनात, ऐकण्यात आले की अजूनही माणुसकी भरपूर शिल्लक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.   हे दाखवणारा प्रसंग आत्ताच पेपरमध्ये वाचला, पेपरमध्ये बातमी आली होती – 
मृत प्रवाशाला वाऱ्यावर न सोडणारा रिक्षाचालक  
बातमी अशी होती  की रिक्षात राहिलेले मौल्यवान दागिने , महत्त्वाची कागदपत्रे प्रवाशांना परत करणाऱ्या प्रामाणिक  रिक्षावाल्यांचे कौतुक तर होतच असते परंतू  प्रवासी अचानक निधन पावल्यावर  त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाणारा रिक्षाचालक विरळच.  ठाण्यातील रिक्षाचालक अजय कुमार याला  सोमवारी रेल्वे स्थानकातून गिरीश बेंद्रे या प्रवाशाचे ब्रह्मांडाचे भाडे मिळाले.  श्री बेंद्रे यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरी येत आहेत असे पत्नीला सांगितले .ते अजय कुमार यांच्याशी बोलत होते आणि घरी यायला साधारण दहा पंधरा मिनिटांत पोहोचेन असेही ते फोनवर म्हणाले पण  रिक्षाचालकाने बेंद्रे यांनी सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा थांबवली. त्यांनी बेंद्रे यांना कोणत्या विंग  समोर थांबवू असे विचारले परंतू  अजयकुमार यांना काही उत्तर मिळाले नाही.  अजय कुमार यांनी उतरून काकांना हलवले पण ते जागेवरच लवंडले.  काहीतरी गडबड आहे असे समजून त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या  लोकांना प्रकार सांगितला.  कुणी सल्ला दिला की पोलिसांचे झेंगट मागे लागेल.  पण अजयकुमार यांनी घरच्यांचा फोन येताच हकीकत सांगितली.  बेंद्रे यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  कासारवडवली पोलीस स्थानक आणि शासकीय रुग्णालयातील सर्व औपचारिकता पूर्ण होईपर्यंत अजयकुमार तिथे  थांबून होते. त्यांचे नातेवाईक विद्याधर सुळे म्हणालेही की आम्ही या रिक्षाचालकाचे  आभारी आहोत की त्यांनी नातेवाईकांना तर कळवलेच पण बेंद्रे यांना रुग्णालयातही पोहोचवले अशी माणुसकी दुर्मीळ आहे.  

हे आणि अशी अजूनही बरीच उदाहरणे करोनाच्या संकटात ऐकायला , पाहायला मिळाली आणि माणुसकी अजूनही भरपूर प्रमाणात जिवंत आहे  याची खात्री पटली. असं म्हणतात की माणूस बदलायला वेळ लागत नाही पण वेळ बदलायला मात्र माणूसच लागतो.  करोनाच्या  या संकटावर मात करताना अनेकांनी हे सिद्ध केले आहे .या काळात हॉस्टेलमधील मुलांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून घरापासून व आपल्या माणसांपासून लांब असलेल्या या मुलांची जेवणाची सोय पुण्यातील एका महिलेने केली .पंजाबमधील एका हॉटेल मालकाने तर रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसाठी अनेक महिने अन्नछत्र सुरू ठेवले होते. या काळात अनेकांनी आपल्याकडे आहे नाही त्यातले थोडे गरजवंतांना दिले. अनेकांनी आपल्या आजुबाजूला राहणाऱ्या वयस्कर व आजारी माणसांना लागेल ती मदत केली. आपल्या माणसांसोबत वेळ कळत नाही पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात. म्हणूनच करोनाच्या  संकटाची  ही जीवघेणी वेळ बदलण्यासाठी आपला ,परका ,श्रीमंत, गरीब असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना लागेल ती मदत आपण या आजाराला न घाबरता केली पाहिजे. कोण म्हणतं रक्ताची नाती फक्त देवच जोडतो एखाद्या गरजूला मदत करून पाहा रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी नाती तयार होतील .आज खऱ्या अर्थाने RICH  बनण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.  R म्हणजे Relationship , I म्हणजे  Income, C म्हणजे Character  H म्हणजे Health, तब्येत.   

स्वतःची तब्येत उत्तम रीतीने जपत माणुसकीच्या नात्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांची तब्येत जपायला ,आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यांची मदत करायला आपण पुढे येऊ या, खऱ्या अर्थाने RICH होऊया .

  • सौ. रश्मी मावळंकर 
  • श्री. विद्याधर सुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu