कल्पवृक्षाच्या छायेत

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी । प्रेमस्वरूप आई , वात्सल्य सिंधू आई …
आई म्हणजे वात्सल्य , प्रेम , त्याग , समर्पण , सहनशीलता यांची मूर्ती आणि म्हणूनच फक्त देवाचीच नव्हे तर दानव , मानव या सर्वांचीच आराध्य देवता आहे. वडील हे घर नावाच्या इमारतीचा मजबूत पाया व अस्तित्व असते. परंतु असे असूनही या अस्तित्वाची फारशी दाखल घेतलेली आढळत नाही. वडिलांबद्दल फारसे काही बोलले, लिहिले जात नाही , त्यांच्या थोर असण्याचे गोडवे गायले जात नाहीत. त्यांच्यावर गाणी बनवून ती सिनेमामध्ये दाखवलेली आपल्याला फारशी आढळणार नाही. बघावे तेथे फक्त आईच्या महानतेचे दृश्य पाहायला मिळते. आणि जर का सिनेमात बाप रेखाटला असेल तर तो ही बेवडा, व्यसनी, जुगारी , आपल्या बायकोच्या कमाईवर जगणारा, मुलीला विकणारा, बायको मुलींना मारहाण करणारा. नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे समाजात अशा वाईट वडिलांप्रमाणे चांगले ,सुस्वभावी ,प्रेमळ वडीलही असतातच. पण मग अशा चांगल्या वडिलांच्या चांगुलपणाचे महत्व कधी समजून घेतले जाते का ?

आईकडे अश्रुंचे पाट असतात तर वडिलांकडे संयमाचे घाट असतात. आई आपली प्रत्येक भावना सर्वांसमोर रडून व्यक्त करू शकते. पण वडिलांना सर्वांसमोर रडताही येत नाही. आपली प्रत्येक भावना आतल्या आत दाबून मूक राहूनच करावे लागते. सांत्वनालाही त्यांनाच जावे लागते. आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यालाच जास्त मानसिक त्रास सोसावा लागतो. परीक्षेसाठी अभ्यास घेणारी, परीक्षेची तयारी लवकर उठून करून देणारी आई असते पण वाटेल त्यावेळी वाटेल त्या ठिकाणी धावपळ करून मुलाला परीक्षा केंद्रावर पेपर सुरु होण्यापूर्वी पोहोचवणारे वडीलच असतात. असे असूनही चांगले मार्क मिळाल्याचे श्रेय मिळते आईलाच.

रोज सगळ्यांच्या आवडीचे जेवण करून सगळ्यांची मने तृप्त करणारी आई सर्वांच्या आयुष्यभर लक्षात राहते. पण अंगात उठायचीही ताकद नसताना कामाचे खाडे न करता नोकरीवर जाऊन आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारे वडील मात्र सहजपणे विसरले जातात. आजारपणही अंगावर काढतात ते डॉक्टरांचा , औषधाचा खर्च वाचावा व डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली तर होणाऱ्या खाड्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता यावे म्हणून. व अशा तऱ्हेने वडील मुलांच्या भविष्यासाठी उदा. मुलांची लग्ने, करियर यासाठी स्वात:ला कष्टांच्या भट्टीत मुक्तपणे स्वखुषीने आनंदाने झोकून देतात व आयुष्यभर स्वात:चा क्षणभरही विचार न करता घरात सतत आनंदी उत्साही वातावरण ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतात.

देवकी यशोदेचे कौतुक सगळेच करतात पण नदीच्या पुरातून गळ्याभर पाण्यातून कृष्णाला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेवही तितकाच महत्वाचा आहे. राम कौसल्येचा पुत्र होता पण तरीही पुत्र वियोगाने मेला तो राजा दशरथच होता.स्वात:चे आई लहानपणीच वारल्यावरही पुरुषाला मोकळेपणाने रडता येत नाही लहान भावंडांचा आधार व्हायचे असते. पत्नी अर्ध्यावर सोडून गेली तरी मुलांसाठी स्वात:चे अश्रू लपवावे लागतात. लहानपणीच पितृछत्र गमावल्यामुळे अनेक जबाबदाऱ्या लवकर पेलाव्या लागणाऱ्या मुलांनाच वडिलांचे खरे महत्व कळते.

पालक , गुरु , मार्गदर्शक , प्रशिक्षक अशा अनेक भूमिका साकारत असताना प्रेम , विश्वास , आदर , मित्रत्व अशा अनेक कंगोऱ्यांनी वडील व मुलाचे नाते समृद्ध करण्याचा वडील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आटोकाट प्रयत्न करत असतात.
ज्या घरात वडिलांचे अस्तित्व आहे त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करत नाही. मग ते वडील व्यसनी असोत वा काहीही काम न करणारे असोत. इतकी जबरदस्त ताकद वडिलांच्या अस्तित्वात असते. कोणाचा मुलगा होणे टाळता येत नाही पण बाप होणे सहज टाळता येते, असे असूनही वडील कधीही वडील होण्याचे टाळत नाहीत. आईच्या असण्याला व आई होण्यालाही वडिलांमुळे अर्थ असतो.
गरोदरपणी शारीरिक त्रास जरी स्त्री सोसत असली तरी आपल्या होणाऱ्या त्रासाच्या काळजीने व आपल्या होणाऱ्या मुलाच्या आरोग्याच्या काळजीने होणारा मानसिक त्रास पुरुषही सोसत असतोच. डिलिव्हरीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये बायको व होणाऱ्या बाळाच्या काळजीने अस्वस्थपणे फेऱ्या मारणाऱ्या त्या बाळाच्या वडिलांची साधी दखलही घेतली जात नाही. बाळंतपण आईच्या व बाळाची दिवसरात्र काळजी घेऊन पार पडणाऱ्या आईचे कौतुक सर्वच मुली आयुष्यभर करतात पण ते बाळंतपण सुखरूप पार पाडण्यासाठी लागणाऱ्या पैशाची सोया करण्यासाठी वणवण भटकलेल्या, प्रसंगी लोकांपुढे हात पसरलेल्या , भरमसाठ व्याजाने कर्ज घेतलेल्या वडिलांचे कौतुक केलेले फारसे आठवत नाही. ठेच लागली कि आई ग असे उद्गार आपल्या तोंडून निघाल्याशिवाय राहत नाही. छोट्या संकटात आई आठवते पण मोठी मोठी वादळे पेलताना मात्र बापाचं आठवतो. मंगलसमयी घरातली सर्वजण जातात पण मयताच्या प्रसंगी मात्र वडीलच जातात. घरी उशिरा येणाऱ्या मुलाची वाट पाहणारे , मुलाच्या नोकरीसाठी साहेबापुढे लाचार होणारे जसे वडील असतात तसेच मुलींच्या स्थळासाठी चपला झिजवणारे घरच्यांसाठी स्वत:ची दुःखे लपवणारे वडीलच असतात. आणि अशा वडिलांचे महत्व खऱ्या अर्थाने जाणवते ती सासरी गेलेली मुलगी. फोनवर बोलताना वडिलांच्या कातर झालेल्या स्वरावरून त्यांच्या मनातले सगळे विचार एका क्षणात ओळखते. तेच मुलगा वडिलांच्या जवळ असूनही ओळखू शकत नाही. कोणतीही मुलगी आपल्या स्वत:च्या इच्छा , आकांक्षा , ध्येय बाजूला ठेऊन वडील म्हणतील तेंव्हा आणि वडील सांगतील त्या मुलाशी लग्न करायला लगेच तयार होते. म्हणूनच तर वडील म्हणतात

A son is son till he gets his wife…
& a daughter is daughter till the end of life ..

आणि अशा वेळी मुलींच्याही तोंडावर नकळत गीत येते
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरूनी आला . याला काहो बघायला ?

-सौ. रश्मी मावळंकर
PC:Unknown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu