जपून ठेवलेली सुगंधी आठवण

आठवणी हे माणसाला लाभलेलं एक वरदान ! ह्या गत स्मृतींच्या आधारानेच तर जीवन चालू राहते. आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून उंच उंच झोके घेते. सर्व कर्तव्ये निभावल्यावर उराशी जपायच्या त्या मधुर सुंदर आठवणी.पुढची वाटचाल सुगंधी करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या ह्या आठवणी.

स्मृतींच्या उद्यानात मी एकटीच बसले होते.स्वतःच्याच मनाशी संवाद साधत उत्तरायणात आलेला निवांतपणा जबाबदाऱ्यांची हलकी झालेली बंधने …भरपूर मोकळा वेळ . आताशा ह्या उद्यानात वारंवार माझं येणं होतं…कधी बालपणीचे दिवस आठवतात. आई -बाबा आणि धाकटा भाऊ ह्याच मर्यादेत असलेलं उबदार घर, सौख्यदायी ! , नवथर यौवन.. शाळा-कॉलेजमधले रम्य दिवस ,कधी सोनेरी यश तर कधी अपयशाचे कडू घोट गिळत करीअरची सुरवात होऊन जम बसेपर्यंतच जमलेला विवाह.. मुलगी सुयोग्य स्थळी पडली हो म्हणत नातेवाईकांनी उधळलेली स्तुती-सुमने !एकमेकांच्या साथीने केलेला प्रवास …मुलांची किलबिल.. चिवचिवाट जात्याच अतिशय हुशार ,मेरिट मध्ये आलेल्या दोघी मुली,त्यांचेही उत्तम शिक्षण आणि आता विवाहानंतर आपल्या संसारात मग्न !आता शांत झालेलं घरटं…किती आठवणींचे पदर गुंफलेत हे घरटे विणताना …कधी ऊन पाऊस ,कधी सुख-दुःख , मान – अपमान …सगळे आघात सहन करत मनात जपून ठेवलेल्या आठवणींचा गोफ …मन ह्या आठवणींचा धांडोळा घ्यायला आतुर असतं… अगदी मनाच्या डोहात खोल तळाशी डोकावून हाताशी काय लागतंय त्याचा अंदाज बांधत..मनाच्या अल्बम मधील एकेका फोटोवर स्थिरावतं….

ह्या उद्यानात काळ – वेळेचं बंधन नसतंच. बागेत प्रवेश केल्यावर मला आकाशाचा निळा रंग मोहवून टाकतो. हवेची झुळूक मनाला सुखावते, शरीरावर गोड शिरशिरी उमटते,झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडतात आणि मनालाही तजेलदार करतात. हिरवळीची हिरवाई डोळ्यांना थंडावते ,रंगीबेरंगी फुलांचे रंग मनाला मोहवून टाकतात. पारिजातक , रातराणी ह्या फुलांचा गंध वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मनालाही उल्हसित करतो फुलावर बसलेली मनमोहक फुलपाखरे माझं लक्ष वेधून घेतात हि चंचल फुलपाखरे मग एकदम आसमंत व्यापून मुक्तपणे संचार करतात.मी ह्या फुलपाखरांमध्ये माझ्या मनाचे रंग गुंफते.अलवारपणे त्यांना पकडायला धावते.चिमटीत पकडता येतील ती फुलपाखरे कसली ? ह्या उधळलेल्या रंग -गंधात मग आठवणींचा एकेक कप्पा उलगडत जातो. पारिजातकाची इवली इवली कोमल नाजूक फुले आपोआपच झाडापासून वेगळी होऊन अलगद जमिनीवर पडतात. मला माहेरची आठवण करून देतात.डोळ्यातल्या आसवानी मग बागेतलं सर्व वातावरणच धूसर होतं.

१९९० साल …माझे वडील सेवानिवृत्त झाले त्यांच्या सद्गुरूची भेट घ्यायला ते थेट हिमालयात पोहोचले.तिथून परत येताना माझ्यासाठी एक भेट घेऊनच आले.मोठ्या अक्षरांचे गीतेचे पुस्तक त्यांनी मला भेट  दिले. हृषीकेश इथे असणाऱ्या गोरखपूर प्रेस मधूनच हे पुस्तक त्यांनी आणले होते.त्यावर त्यांच्या सद्गुरूची स्वाक्षरी आणि सद्गुरूचे आशीर्वाद सोबत होते .केव्हढी मोठी भेट !!! त्याचे महत्व कळण्याचे ते वय अर्थातच नव्हते. आता निवृत्तीनंतर मी तुला एवढेच देऊ शकतो .त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.” बाबा ,तुमच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही ,आजपर्यंत मला भरपूर काही दिलेत, वाईट कशाला वाटून घेता ? “मी बाबांची माझ्यापरीने समजूत घातली. हा संवाद खरं तर एवढ्यावरच थांबला.ती एक आठवणच राहिली.बाबांचा तो चेहेरा मनावर कायम कोरला गेला.

ह्या पुस्तकाच्या रूपाने पुढचा प्रवास सुरु झाला जो खरं तर मलाही अनपेक्षित होता.गीतेची संथा देणाऱ्या फळणीकर बाईंची भेट झाली. त्यांच्याकडून पूर्ण गीता शिकल्यावर ती नित्य पठणात आली. गीतेचे पाठांतर सुरु झाले ,पारायणे झाली पुढे त्याचा अर्थबोध..त्यानिमित्ताने विचार, चिंतन मनन…ह्या गीतेने अगदी पार तिच्या बंधनात अडकवूनच टाकलं. मनाचा गाभारा केवळ सुगंधितच नाही तर पवित्रही केला.

हळू हळू गीतेच्या आधारे काही लेखन झाले. अनपेक्षित प्रसिद्धी लाभली.ज्यांना शिकायची आवड आहे त्यांना गीता शिकवायला सुरुवात .पुस्तकाच्या अवती-भवती माझा मन -मोगरा बहरू लागला.दारी लावलेले इवलेसे रोप आता छान बाळसे धरलेय त्याने…ह्या रोपाच्या मुळाशी असते बाबांचे माझ्यावरील निरपेक्ष प्रेम, जिव्हाळा,सुगंधी आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात सांभाळून ठेवलेल्या….त्या पुस्तकाला मी मनोमन प्रणिपात करते ..

गीतेच्या तत्वज्ञानाचा आधार जीवनाला लाभला की मन स्वाभाविकपणे स्थिरावते. शांत होते. शरीर निवृत्तिपथावरून चालू लागले कि हे तत्वज्ञान आपली चांगली सोबत करते.मन स्थितप्रज्ञ व्हायला सुरवात होते.आणि मग वानप्रस्थ सुखकर होतो. आठवणीच्या सुगंधाबरोबरच अवचिता परिमळू वाढू लागतो.

वर जाणारा झोका पुन्हा खाली येतोच.तसेच आपले आयुष्य. सगळ्याच आठवणी काही सुगंधी असतात असे  नाही कटू आठवणींनी मनाचा तोल ढासळतो.उद्यानात रुतणारे काटे पायाला जखम करण्यापूर्वीच मी घाईघाईने हे “स्मृती उद्यान ” बंद करते. आणि गीतेच्या वाचनाला प्रारंभ करते.ती चिरंतन सुगंधी आठवण मनोमन जपण्याचा प्रयत्न करते.सुगंधी आठवणींची बरसात व्हावी म्हणून मी त्या सर्वसमर्थ ईश्वराकडे प्रार्थना करते..

सौ स्नेहा हेमंत भाटवडेकर
विलेपार्ले ( पूर्व ), मुंबई, ४०००५७
मोबा.९८३३०१७०७४ | 9833017074
Email : sneha8562@gmail.com
 शब्दस्नेह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu