देवाचा शोध…..

देवाचा शोध…..

एक छोटा मुलगा, आज त्याने काही ठरवले आहे. त्या देवाबरोबर जेवायचे आहे.तो देवाच्या शोधात निघाला. काही खाण्याच्या वस्तू आणि पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तो घराबाहेर पडला. खूप चालला. एका बागेत गेला.थोडी विश्रांती घेण्यासाठी एका बाकावर बसला.
जवळच एक आजी होती. तिच्याकडे त्याचे लक्ष गेले. तिला बहुधा तहान लागलेली होती.त्याने जवळचे पाणी तिला दिले. ती पाणी प्याली.
बाटली परत देताना ती हसली. इतके सुंदर हसणे तो प्रथमच बघत होता. त्याने तिला खाऊ दिला.ती परत तसेच हसली.ते हास्य बघुन तो मोहुन गेला…
तो उठला. दिवस सरत आला होता.आता त्याला घरी परतायचे होते. तो तिथून निघाला.थोडे पुढे गेला.वळून पाहिले.ती आजी गोड हसत होती. तो धावत तिच्याकडे आला. तिला मिठी मारली.तिनेही प्रेमाने त्याला कुशीत घेतले.घराच्या दिशेने तो निघाला.घरी पोचला. आज तो खूपच खुश दिसत होता.
आईने विचारले तसा तो म्हणाला,‘देव कितीतरी थकला होता आई! भुकेला, तहानेलाही होता. तरी खूप गोड हसत होता.’ इकडे ती आजी घरी पोचली.
केवढी आनंदी, केवढी तृप्त! रोजचा शीण नव्हता. एकटेपणाची बोच नव्हती. तिच्या मुलाला सारेच अनपेक्षित होते. ‘कुठे होतीस दिवसभर?’
त्याने आईला विचारले. ती दैवी तंद्रीतच होती. म्हणाली, ‘मला वाटत होते त्यापेक्षा खूप तरुण आहे देव! तरुण कसला? बालकच!!
न मागता मला सारे दिले. प्रेमाने मिठीही मारली!’ आजींच्या देहावर वसंत ऋतू अवतरला होता. केवढा आनंद, केवढी तृप्ती, केवढे समाधान!!

ही छोटीशी गोष्ट मी वाचली आणि दिवसभर त्या मुलाचा आणि म्हातार्‍या आजीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत राहिला.सारे अध्यात्म एक छोट्याशा गोष्टीत ठासून भरल्याचे मला जाणवले. हजार धर्मग्रंथांचे सार एका गोष्टीचे/ अज्ञात लेखकाचे मला खूप कौतुक वाटले. देवाला निवृत्त करायला निघालेल्या किंवा देवाला शोधायला निघालेल्या प्रत्येकानेच ही गोष्ट वाचली पाहिजे. या एका गोष्टीत सार्‍या शंकांचे समाधान सापडते…..!!!!!!!!!

देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला
देव सर्वांना दिसत असतो.

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu