मराठी कविता चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या उल्लेखाशिवाय अधूरी आहे . आपल्या ठसठशीत वेगळेपणाने आरती प्रभूंची कविता उठून दिसते . आरती प्रभूंची कविता उमजायला तेवढेच संवेदनशील मन हवे ! खानोलकरांची कविता सर्वस्पर्शी आहे . शून्य शृंगारते यासारख्या त्यांच्या सुरुवातीच्या कवितांनी मराठी कवितेच्या राजप्रासादात आरती प्रभू नावाचे दालन उघडले . शून्य शृंगारते सारख्या कवितांमधून त्यांच्या अलौकिक काव्य प्रतिभेची झलक अनुभवायला मिळते . ललित दिवाळी इ.स.1970 मध्ये ‘ कुडाळातील ते दिवस ‘ या त्यांच्या लेखात शून्य शृंगारते या कवितेची प्रसवकथा खानोलकरांच्या शब्दात वाचणे , हा एक विलक्षण आनंददायी अनुभव आहे .
तत्कालीन सुप्रसिद्ध कवींसारख्या त्यांच्या कविता प्रेमाचे रोमँटिक वर्णन करणाऱ्या नव्हत्या . त्यांच्या भावकविता वेगळाच बाज घेऊन वाचकांसमोर येतात . त्यांच्या निसर्ग कविताही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आपले असे वेगळे स्थान टिकवून आहेत . नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्ग कवितेचे वैशिष्ट्य .
हिरव्याशा गवतात हळदिवी फुले ,
हलकेच केसरात दूध भरू आले ,
उभ्या उभ्या शेतांमध्ये सर कोसळली ,
केवड्याची सोनकडा गंधे
अशा सुंदर रंग – गंध भरलेल्या शब्दांनी , प्रतिमांनी त्यांची कविता नटलेली आहे .खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी साहित्याला मिळालेली एक अनमोल देणगी आहे . या सर्व गुणवैशिष्ट्यांनी समृद्ध आरती प्रभूंची एक भावकविता . नाही कशी म्हणू तुला .
नाही कशी म्हणू तुला …. म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने आड येते रीत
नाही कशी म्हणू तुला ….. येते जरा थांब .
परि हिरव्या वळणांनी जायचे ना लांब .
नाही कशी म्हणू तुला ….. माळ मला वेणी
परि नीट ओघळेल , हासतील कोणी
नाही कशी म्हणू तुला ….. घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव
नाही कशी म्हणू तुला ….. जरा लपू छपू
परि पाया खडे काटे लागतात खुपू
नाही कशी म्हणू तुला ….. विडा रे दुपारी
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी
टिपिकल आरती प्रभू टच असलेली भावकविता आहे ही .
परि हिरव्या वळणांनी जायचे ना लांब
परि नको अधरांचा मोडू सुमडाव
या खास खानोलकरी परिसस्पर्श लाभलेल्या ओळी !
जोगवा आणि दिवेलागण हे त्यांचे सुरवातीचे कवितासंग्रह . नैराश्याकडे झुकणाऱ्या कविता असलेले हे कवितासंग्रह होते .
जराच फिरली बिनखाबीची सुई ,
जुईचा उसवित शेला ,
आणि ठणकला गतस्मृतीचा ,
काळोखात कापूर पेला .
अशी त्यांची वेदना अधिक तीव्र होत जाते .
त्या मानाने त्यांच्या ‘ नक्षत्रांचे देणे ‘ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात . आपल्या वेदनाकोषातून बाहेर आल्या सारखे वाटतात . या कविता संग्रहातील नितांतसुंदर कविता आहे ‘ आड येते रीत ‘
या कवितेमध्ये पतीपत्नी मधील सूचक शृंगार अचूक व्यक्त झाला आहे . यातील शृंगारभाव उत्कट असला तरी , त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो . एका शालीन स्त्रीची लाडिक तक्रार आहे ही !
आरती प्रभूंच्या या कवितेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुरेख चालीत बांधले आहे . लता मंगेशकर यांनी आपल्या स्वर्गीय सूरांनी हे गीत वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे .
तू तेंव्हा तशी , तू तेंव्हा अशी
ये रे घना ये रे घना
समईच्या शुभ्र कळ्या
गेले द्यायचे राहून
ती येते आणिक जाते
विश्रब्द्ध मनाच्या कातरवेळी
अशा एकापेक्षा एक सुंदर भावकविता अवतरल्या आहेत खानोलकरांच्या लेखणीतून .
” या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या नागमोडी स्वभावातून
स्फुरलेल्या
मोडून पडाल …..
खानोलकर म्हणतात , माझी कविता अशी सहजपणे समजणे अवघड आहे . तिच्याकडे पहायचे डोळे , आणि ते समजून घेऊ शकणारं मन आधी तुमच्याकडे हवं . अन्यथा ते तुम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल . तरच ती तुमच्या आवाक्यात येईल . पुढे ते असा ही इशारा देतात की , ” तुमच्या मनाची अशी सिद्धता नसेल तर जा आपल्या वाटा धुंडाळत आल्या वाटेने . ” आरती प्रभूंच्या कविता जाणून घेताना या धाकाचे स्मरण ठेऊनच पुढे जायला हवे .
गेले द्यायचे राहून , तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या , आणि थोडी ओली पाने .
मराठी कवितेला नक्षत्रांचे देणे देऊन गेलेल्या या महान कवीला आदरांजली !
अखेरच्या प्रवासाला निघताना खानोलकरांची प्रतिभा अशी व्यक्त होते .
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा …..
मुकुंद कुलकर्णी©
9421454888