राहीबाई ते बीजमाता पद्मश्री राहीबाई !!
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कोंभाळणे (पोपेरेवाड़ी) हे छोटेसे गांव (खरं तर छोटीसी आदिवासी वस्ती), अचानक जगभर गाजलं ते राहीबाई सोमा पोपेरे या असामान्य महिलेमुळे ! २०२० चा पद्मश्री पुरस्कार घेतांना पाहून मन अभिमानाने भरून आले. राहीबाई ते बीजमाता या अनोख्या प्रवासाचा मागोवा घेतांना थक्क व्हायला झाले.
छोट्याशा आदिवासी पाड्यात जन्माला आलेल्या राहीबाईंकडे लौकिकदृष्ट्या शिक्षण नाही पण निसर्गाच्या शाळेत त्या खूप काही शिकल्या.लहानपणापासून शेतावर काम करणाऱ्या राहीबाईंच्या मनावर त्यांच्या वडिलांनी “जुनं ते सोनं” असं बिंबवलं आणि तेच त्यांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य बनलं.आपल्या कृषिप्रधान देशात अनेक प्रकारचे पिकांचे वाण उपलब्ध आहेत. परंतु हरितक्रांती नंतर देशात संकरित (हायब्रीड) बियाणांचा पुरवठा मोठया प्रमाणात होऊ लागला, भरमसाठ उत्पादनामुळे शेतकरी हायब्रीड बियाणांकडे वळले.एक गोष्ट मान्य करावी लागते ती म्हणजे आपल्या अन्नाची, म्हणजे अगदी फळे, भाज्या, अन्नधान्य यांची जी पूर्वी चव होती ती कुठेतरी गमावली आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या सारीकडेच वाढल्या. हे राहीबाईंच्याही लक्षांत आले व त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा, त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला.
सुरुवातीच्या काळांत राहीबाईंना हे काम करतांना अनेकांनी वेड्यात काढलं. अगदी घरच्यांनाही कांहीतरी फॅड, वेळेचा अपव्यय वाटत होते. पण त्यांनी आपला विचार बदलला नाही. पारंपारिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या, शेतात त्याचा वापर करायच्या. राहीबाई यांनी भात, वाल, नागली, वरई, उडीद वाटाणा , तूर, वेगवेगळी फळे, भाज्या अशा गावरान ५३ पिकांच्या ११४ वाणांच्या बियांचा संग्रह केला आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाहीत. प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. ते बियाणे औषधी आहेत कां, त्याचा उपयोग काय, त्याची वैशिष्टय़े कोणती हे सगळे त्या सांगतात. त्यामुळे बियाणांचा चालताबोलता ज्ञानकोश त्यांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते त्या मूळ स्वरूपात आहेत . त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. आपल्या कामाबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या, “गांडूळ खत कसे करायचे ते कळल्यावर मी दुसरे कोणतेच खत वापरले नाही. फवाराही गांडूळ खत पाण्याचाच मारतो. देशी वाणाचं धान्य हे केवळ पावसाच्या पाण्यावर येते. या बियाण्याला हायब्रीड पिकासारखे कोणतेही रासायनिक खत व पाणी देण्याची आवश्यकता नाही.निखळ पाण्यावर ही पिके वाढतात.जुने भात तर आता नाहीसेच होऊ लागले आहेत. रायभोग, जीरवेल वरंगळ, काळभात, ढवळभात, आंबेमोहोर ,टामकूड हे जुने भात होते.भाज्यांमध्ये गोड वाल,कडू वाल, बुटका वाल ,घेवडा, पताडा घेवडा,काळ्या शिरेचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा,बदुका घेवडा इ. पाऊस पडला की आम्ही रानभाज्याच खातो.मग त्याच्यात सातवेची, बडदेची भाजी,आंबट वेलाची, भोकरीची, तांदुळक्याची,चाईची भाजी अशा विविध प्रकारच्या आहेत.सांडपाण्यावर परसबागेतील झाडे वाढविली. त्याच झाडांना आता फळे आली आहेत”.
बायफ या संस्थेच्या मार्गदर्शन व सहकार्याने, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या गावरान बियाणांच्या प्रसार व प्रचाराचे कार्य केले. पुढे त्यांच्या या कार्याला एक दिशा मिळाली. त्यांनी गावरान बियाणांची बँक सुरु केली. कळसूबाई परिसरातील पारंपारिक बियाणे गोळा केले आणि गावरान बियाणांचा मोठा संग्रह करून सीडबँक सुरु केली. त्यांच्या बँकेत सफेद वांगी, हिरवी वांगी,सफेद तूर, टोमॅटो, घेवडा, वाल, उडीद, हरभरा, हुलगा, बाजरी, गहू, नागली, तीळ, भुईमुग, सूर्यफूल, जवस, भात, राळा, नाचणी, रायभात, वरंगल, अनेक प्रकारच्या रानभाज्या, अनेक प्रकारच्या पिकांची वाणं आहेत.त्यांच्या घराभोवती असणाऱ्या अडीच तीन एकर परिसरात विविध प्रकारची चारशे-पाचशे झाडे आज उभी आहेत आणि घरातील सारी मंडळी त्यांची काळजी घेतात.
त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जातात. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला. राहीबाईंच्या अजोड कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. २०१८ मध्ये बीबीसीने विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या जगातल्या शंभर प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे.आपल्या नेहमीच्या साध्यासुध्या वेषांत पद्मश्री पुरस्कार घेणाऱ्या अद्वितीय राहीबाईंचे कौतुक करावे तेवढे
थोडेच.
…नीला बर्वे