गुढी पाडवा

गुढी पडावा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ . रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले तो हा दिवस.चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणचा वध करून अयोध्येला परतणार्‍या रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली जाते. असुरी शक्तीवर दैवी शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करून दरवाजासमोर रांगोळी काढावी . अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालून देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला लाल वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी उभी करावी. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते . म्हणून सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांतच गुढीची पूजा करावी . कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी एकत्र वाटावे आणि हे मिश्रण जेवणात वाढावे . पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी एखादा चांगला संकल्प करून चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

भूक न लागणे, उलट्या होणे, आम्लपित्त, कावीळ, मूळव्याध, पोटदुखी, पोटात जंत होणे, डोक्यात उवा होणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग, व्रण, जखमा, दाहरोग, विंचूदंश, सर्पदंश, अकाली केस पांढरे होणे, वेगवेगळ्या प्रकारचे ताप, मुखरोग, दातांचे आजार, नेत्रदोष, स्त्रियांचे आजार, सांधेदुखी इत्यादी आजारांवर कडूनिंब उपयुक्त आहे. वसंत ऋतूत हि पाने ग्रहण केल्याने आरोग्याबरोबरच बाल , बुद्धी व तेज वाढते . जंतुनाशक म्हणूनही कडूनिंबचा वापर करतात .

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी . ज्या भावनेने गुढीची पूजा केली त्याच भावनेने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी आणि गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवून गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे.

ज्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असतो तेथे काही जण या दिवशी पाणपोई सुरु करतात . पाऊस सुरु होईतो तेथे तहानलेल्यांना जलदान केले जाते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu