विंदा करंदीकर ©मुकुंद कुलकर्णी

दि.२३ ऑगस्ट १९१८ रोजी गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा करंदीकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील धालवली येथे झाला . विंदांनी आपले शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले . हैद्राबाद मुक्ती संग्रामात विंदांचा सक्रिय सहभाग होता . त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला . विंदांचे वडील कोकणात पोंभुर्ला येथे असत . कोकणाविषयी त्यांना आत्मीयता वाटत असे . कोकणाच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते . ते कुठल्याही राजकीय संघटनेचे सभासद नव्हते . पण त्यांचा वैचारिक प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा राहिला . मराठी इतकेच त्यांचे इंग्रजीवरही प्रभुत्व होते . बसवेश्वर कॉलेज रत्नागिरी , रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई येथें ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते . केवळ लेखनासाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली . स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारे वेतन त्यांनी कधीही स्वीकारले नाही .

काव्यवाचनाचा प्रकार फारसा प्रचलित नसताना वसंत बापट , मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले आणि रसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला . इ.स.१९४९ साली प्रकाशित झालेल्या ‘ स्वेदगंगा ‘ पासून त्यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला . मृद्गंध , धृपद , जातक , विरुपिका आदि काव्यसंग्रह . स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ हे लघुनिबंधसंग्रह . ज्ञानेश्वरांच्या ‘ अमृतानुभवाचा ‘ अभिनव प्रयोग . परंपरा आणि नवता हा समीक्षालेख संग्रह फाऊस्ट , राजा लिअर आणि ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हे अनुवादीत ग्रंथ . राणीचा बाग , एकदा काय झाले , सशाचे कान , एटू लोकांचा देश , पिशीमावशी आणि तिची भुतावळ हे बालकविता संग्रह आठ तत्वज्ञांचे विचार मांडणारा इ.स.२००३सालचा ‘ अष्टदर्शने ‘ हा संग्रह . असे विपुल साहित्य निर्माण करून त्यांनी मराठी वाङमयाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे . इ.स.२००३ साली त्यांना ‘ अष्टदर्शने ‘ या संग्रहासाठी देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘ ज्ञानपीठ ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला . वि.स.खांडेकर , कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले . त्यानंतर हा पुरस्कार इ.स.२०१४ साली भालचंद्र नेमाडे यांना मिळाला .त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम विंदांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती .

विंदांच्या ‘ मृद्गंध ‘ या पॉप्युलर प्रकाशनाने दि.१५  डिसेंबर १९५४ ला प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीवरून ” विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता , विमुक्तपणा आणि संयम , अवखळपणा आणि मार्दव , गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो . कधीकधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते . अशावेळी तिचा जोष , तिचा नाद , तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता – ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते . तर कधीकधी लपत छपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते . प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल , दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ , गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे . निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरुप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते , तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते . ती कधी चित्रमयी बनते , कधी कोड्याच्या भाषेत बोलते , तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो . तिचे रूप न्यारे आहे . व्यक्तीत्व आगळे आहे . तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे . ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते .

“देणाऱ्याने देत जावे या कवितेत विंदांनी जीवनाचे मर्म सांगितले आहे . दातृत्व वृत्तीचा झरा अखंडित वाहता रहायला हवा . आयुष्यात समस्या नाहीत असे होऊ शकत नाही . अशा समस्यांनी माणसे मरगळून जातात . कठोर प्रसंगात माणूस स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो . व्यथांनी गांजलेला माणूस म्हणतो , ” रडण्याचेही बळ नाही | मज्जा मेली , इथे आता जीवनाची कळ नाही | माणसाच्या आत्मशोधनाचा प्रयत्न विंदांनी ” असा मी तसा मी , कसा मी कळेना ” या कवितेतून व्यक्त केला आहे . ” माझ्या मना बन दगड ” या कवितेतून श्रमिकांच्या व्यथा व्यक्त झाल्या आहेत . विंदांच्या कविता अस्सल आहेत . मानवी भावभावनांचे सर्व पदर त्यातून ठसठशीतपणे आविष्कारित होतात . त्यांच्या कवितांमधील सहजसुंदर अभिव्यक्तीमुळे त्यांच्या कविता कायमच सदाबहार आणि टवटवीत आहेत .

गंधाली प्रकाशनाकरिता विजया राजाध्यक्ष यांनी विंदांशी केलेल्या संवादात विंदा समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात ,

” वाचकांचे अनेक थर आहेत , यातला कोणताही एक थर वंचित ठेवणे हे पाप आहे . अशी कल्पना करा की , वाङ्मय हे एक जंगल आहे . चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते . त्या बागेच्या रचानेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात . पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलंही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत . जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहिजेत . ” मराठी साहित्यात पुरेसे महावृक्ष नसल्याची खंतही विंदा व्यक्त करतात .

कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात . ” करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे . त्यांचे सामाजिक , राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते . त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक , राजकीय कविता लिहिणे कठीण होते . पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले . त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे . पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही . करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही . तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो . नव्या अनुभवांना भिडत असतो . काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छंदिष्टपणा प्रकट करीत असतो . करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्वचिंतकही आहे . कविता , ललित निबंध , समीक्षा , इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे . तेंव्हा त्यांना मिळालेले ‘ ज्ञानपीठ ‘ हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे . ”

वयाच्या ९१ व्या वर्षी दि.१४ मार्च २०१० रोजी वृद्धापकाळाने विंदांचे निधन झाले .

स्वावलंबन , स्पष्टवक्तेपणा , साधी राहणी , चोखंदळपणा आणि शिस्त ही विंदांच्या जीवनाची पंचसूत्री होती . ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे अशा व्यक्तींपैकी एक विंदा होते . मार्क्सिस्ट आणि गांधीवादी विचारसरणी विंदांनी आपल्या कृतीतून आचरणात आणली होती . नियतीशरण न होता नियतीशी दोन हात करण्याची प्रेरणा देणारे महान कवी विंदांना आदरपूर्वक अभिवादन !

या सर्वश्रेष्ठ कवीला आदरांजली त्यांच्या ‘ देणाऱ्याने देत जावे ‘ या कवितेने !!

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरूनी
सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे

विंदा करंदीकर

मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu