गुंफिते संस्कार फुलांची माला …

अस म्हटलं जात की मुल ही आईच्या पोटात असल्यापासूनच शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात करतात, आणि ते खरच आहे की ! अभिमन्यूने नाही का आईच्या पोटात असतानाच चक्रव्यूह प्रवेशाची प्रक्रिया शिकून घेतली होती. आणि म्हणूनच आज सर्वत्र उपलब्ध असलेल्या गर्भसंस्कार केंद्रात प्रवेश मिळवून आपल्या मुलांना पोटात असल्यापासूनच चांगल्या संस्कारांचे धडे आई देत असल्याचे आपल्याला सर्रास पाहायला मिळते.खरच, मुलांना त्यांची जवाबदारी कळेल आणि ती जवाबदारीने वागतील अशी शिस्त लावणे हे आजच्या काळात खूपच महत्वाचे आहे.मुल स्वतःचे स्थान समाजात स्वतः निर्माण करू शकतील असे संस्कार अतिशय प्रेमाने त्यांच्यावर केले गेले पाहिजेत. असे करण्यात जर पालक यशस्वी झाले, तर मुलांना चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची गरज भासणार नाही. यशस्वी संगोपनाचे काही मूलमंत्र पालक त्यांच्यासाठी किती जास्तीत जास्त वेळ देऊ शकतात या गोष्टीवर जास्त अवलंबून असतो. 

आपण नेहमी एक काम झाल की लगेच दुसऱ्या कामाविषयी विचार करायला लागतो आणि याच आपल्या कामाच्या व्यापात मुलांकडे दुर्लक्ष्य झाले की मुलह%0 जाणून बुजून आपल्या मनाविरुद्ध वागायला लागतात. अशावेळी मुलांच्या चुकीच्या वागण्याकडे दुर्लक्ष्य केले तर मुले आपल्यापासून दुरावण्याची शक्यता असते.(आपले आईवडील आपल्याकडे लक्ष्य देत नाहीत या भावनेने) म्हणून मुलांकडे दुर्लक्ष्य करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल रागावणे किंवा प्रेमाने समजावून सांगणे केंव्हाही चांगले.
शब्दापेक्षा कृतीचा वापर करा. रोजच्या सूचनांची गणती करायची झाली तर आपण आपल्या मुलांना २०० च्या वर सूचना देत असतो व सारखे हे कर हे करू नको म्हणून सांगत असतो. उदा. ‘पायातून काढलेले गुंडाळलेले मोजे सरळ करून धुवायला टाक’ असे सांगूनही मुल ऐकत नसेल तर त्याला ओरडण्यापेक्षा मोजे तसेच धुवा म्हणजे पुढच्या वेळेस मुल मोजे घालताना गुंडाळलेले मोजे दिसले की धुवायच्या वेळेला ते सरळ करून टाकेल. जसे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ट तसेच लहान मुलांच्या बाबतीत शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ ठरते.

मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना महत्व द्या. त्यांना सल्ले विचारा. त्यांची आवड निवड विचारात घ्या.तुमच्या कामात खरेदी मध्ये त्यांची मदत घ्या. मुलांच्या कोणत्याही बाबतीत ढवळाढवळ किंवा मध्यस्ती करण्यापूर्वी जर त्या बाबतीत मध्यस्ती केली तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करा. मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः कितपत घेता येतात पहा व मगच मध्यस्ती करायची की नाही ते ठरावा. प्रत्येक गोष्टीत आपण मुलांना मदत करत राहिलो तर मुले स्वतः निर्णय घ्यायला असमर्थ ठरतील.म्हणून त्यांनी केलेल्या कृतीच्या परिणामांचा विचार करायला शिकू द्या. प्रत्येक गोष्टीत मध्यस्थी करू नये.
जर तुमचे मुल तुम्हाला जाणून बुजून चिडायला लावत असेल तर त्याच्यावर चिडण्यापेक्षा किंवा त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा सरळ त्या खोलीतून बाहेर निघून जा म्हणजे वाद विवाद टळेल व मुलावर वाद न घालण्याचे चांगले संस्कारही होतील. आपल्या मुलाची दुसऱ्याच्या मुलाशी कधीही तुलना करू नका. मुलाला तू खूप वाईट आहेस असे सांगितल्याने त्यांना वाईट वाटते. आपण आपल्या आई वडिलांना आवडत नाही या भावनेने ते खूप दुखावले जाऊन त्याच्यातील आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते.म्हणून आम्हाला तू खूप आवडतोस पण तुझे वागणे चुकीचे आहे ते आवडत नाही असे सांगून त्याला समजावा म्हणजे मुल आपले चुकीचे वागणे सुधारून मनाप्रमाणे वागेल.

एकाच वेळी कडकपणे व प्रेमळपणे दोन्ही पद्धतीने वागा. उदा.एखादी गोष्ट तुम्ही मुलाला करायला सांगितली व मुल ती गोष्ट करत नसेल तर कडकपणे वागून मुलाकडून ती गोष्ट करून घ्या व नंतर मुलाला जवळ घेऊन प्रेमाने समजावा म्हणजे आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुल ऐकेल व ताबडतोब करेलही.

मुलांना खरच ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी घेऊन द्या. मागितलेल्या प्रत्येक गोष्टीची मागणी पूर्ण करू नका.गरजेच्या वस्तू लगेच द्या. नाहीतर मुलांना बघेल ती वस्तू मागायची व हट्ट करायची सवय लागते.व मुले हट्टी होतात.मुलांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने तुमचे वागणे असेच पाहिजे. तुमची मुले शांत व समजूतदार व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही रागाला आवर घालून शांत व समजुतदारपणे वागायला हवे म्हणजे मुलेही शांत होतील.
सौ. रश्मी उदय मावळंकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu