लॉकडाऊन मधलं घर

आज घरातल्या भिंती बोलू लागल्या होत्या. त्याही बोलत असतीलच नेहमी फक्त मी पहिल्यांदाच एवढे दिवस घरी राहिल्यामुळे आज मला ते समजलं असेल. कदाचित मी ऐकत असल्याचं त्यांना समजत नसावं त्यामुळेच त्या मनमोकळ्या बोलल्यासारखं जाणवत होतं. मीही खुर्चीत बसून शांत ऐकू लागलो.
असा विचार मी कधीच नव्हता केला गं ! आज जवळजवळ दीड महिना होत आला पण सगळे अजूनही जिथल्या तिथे. दीड महिन्यापूर्वी नवरा-बायकोने कामावर जाणं बंद केलं, मला सुरवातीला वाटलं होतं की नोकरी गेली की काय यांची ? पण मग पोरंही शाळेत जात नव्हती आणि आजी-आजोबांचीही बाहेर फेरफटका मारण्याची सोय बंद झाली. मग नीट लक्ष देऊन ऐकलं तेव्हा हे कोरोना आणि टाळेबंदीचं गौडबंगाल समजलं. बाहेरची परिस्थिती लवकर पूर्वपदावर येवो हीच विश्वकर्म्याच्या चरणी प्रार्थना बाई !
पण खरं सांगू का… ह्या परिस्थितीने का होईना घरांना आणि घरपणाला चांगले दिवस आले. नाहीतर खाण्यापुरता, ते ही आठवड्यातून तीन-चार दिवसच आणि झोपण्यापुरता नवरा-बायको एकमेकांचे चेहरे बघायची. पोरांना आई-बापाचा सहवास दिवसातला तास-दोन तास काय तो मिळायचा. आणि आजी-आजोबांचं तर विचारूच नका. ज्यांनी त्यांची उभी हयात माणसांच्या घोळक्यात घालवली त्यांना उतारवयात हा असा… एकाकीच म्हणा ना वेळ घालवावा लागायचा. ह्या टाळेबंदीने मात्र सगळी जीवनशैली मोडकळीस आणली. बरंच झालं ना ! नाहीतर हरवलंच होतं सगळं घरपण आणि मग माणसात म्हण रूढ झाली होती, “काय शेवटी चार भिंतीच तर उरल्या”. आपलं पण खऱ्या अर्थाने घरातल्या माणसांशिवाय अस्तित्व ते काय असतं ? फक्त मातीच्या, सिमेंटच्या चार भिंतीच. ह्या माणसांच्या एकत्रित असण्यानेच आपलं घरपण अस्तित्वात येतं. त्यांच्या हसण्या-रडण्याने, सुख-दुःखाने आपल्याला पैलू पडतात आणि मग चकाकी चढते. आपण खऱ्या अर्थाने मौल्यवान होतो, घरपण बाळसे धरतं.
त्यांनाही तशी सवय नाही म्हणा एवढी एकत्र राहण्याची आणि एकमेकांचे चेहरेच बघत राहण्याची. भिंती लाडाने हसल्याचं मला जाणवून गेलं. पण मी हाताशी पेन खेळत कान भिंतींवरच ठेवले.
त्यामुळे वाजतात भांड्याला भांडी. ती कधी तरी वाजणारच होती पण सगळे, म्हणजे पुढची आणि मागची पिढी दोन्हीही, घरातच असल्यावर वाजली म्हणजे थोडी तरी सभ्यता राहते. पण त्यामुळे थोडं जास्तीचं प्रेमही खुलतं बरका ! पोरांचं जग बदललं आणि आजी-आजोबांना स्वप्नात आल्यासारखं वाटू लागलं. त्या दोघांना अर्थातच नवरा बायकोला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं सुरवातीला. कंटाळाच काय येतो, अशाने आजारी पडू वगैरे वगैरे कुरबुरी होत्या पण एकदाचं सवयीचं झालं की अंगवळणी पडतंच. तुला सांगते घरात सगळ्यांच्याच मनमोकळ्या गप्पा रंगतात अगदी बिनदिक्कत. जेवण एकत्र, टाईमपास काय असतो तो तो एकत्र. खरंच हे असं घरपण शाश्वत असायला हवं, कायमस्वरूपी असायला हवं, यांच्या दैनंदिन जीवनात सुद्धा.
पण परिस्थिती बदलत असते. जागतिकीकरणाने लोकांना यशाच्या मोहापायी कदाचित कुटुंबापासून, माणसांपासून दूर नेलं. फक्त शारीरिक अस्तित्व पुरेसं नसतं म्हणून संवाद असायला हवा, एकत्रीतपणा असायला हवा ना गं ! जेव्हाही यांची दैनंदिनी पुन्हा सुरु होईल तेव्हा जुनीच वेळ येईल. काही बदलेल की नाही यात शंकाच आहे. पण इच्छा आहे की यांनी कुटुंबाशी हाच संवाद, मनमोकळ्या गप्पा अशाच जपायला हव्या मग वेळ काय आपसूकच मिळतो आणि मग घरपण सुद्धा.
घराच्या भिंतींचा रडवलेपणाही मला स्पर्श करून गेल्याचं जाणवलं.

-नाव : अमित बाविस्कर, पुणे.
मो. : ९५२७३०९९०५ 
pc:google

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu