शौकीन

बासुदांच्या सदाबहार चित्रपटांच्या गुलदस्त्यातलं आणखी एक टवटवीत फुल ‘ शौकीन ‘. खरं तर ही अशोककुमार , उत्पल दत्त , ए.के.हंगल या तीन मित्रांची कथा . त्याला जोड दिली आहे मिथुन चक्रवर्ती आणि रती अग्निहोत्री या प्रेमकहाणीची . तिघेही साठीपल्याडचे सिनियर सिटिझन्स . साठीपार असले तरी ते स्वतःला अजून चाळिशीतलेच समजत असतात . पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा ! तिघेही टिपिकल बासुदा मध्यमवर्गीय , नाही , उच्च मध्ममवर्गीय , नाही श्रीमंतच म्हणा ना , सुशिक्षित , सुसंस्कृत . पण खुषमिजाज , थोडेसे रंगेल . असं म्हणतात की संधी मिळत नाही तोपर्यंत सर्व पुरुष सभ्यच असतात ! तर असे हे तिघे सभ्य सद्गृहस्थ ! स्मोकिंग , माफक मदिरापान , बायकांवरून गॉसिप आणि काल्पनिक कथा रचून फुशारक्या मारणे हे यांचे आवडते छंद . रम , रमा आणि रमी यामध्ये बुडून गेलेले नाहीत पण , आकर्षण आहे . ड्रिंक्स , स्मोकिंग या सहजसाध्य गोष्टींमध्ये तिघेही तरबेज असतात . रम , रमी ठिक आहे , पण , रमेचं काय ? आजपर्यंत जे जमलं नाही ते क्षितिज गोव्यात धुंडाळायला तिघेही मुशाफिरीवर निघतात . आणि सुरू होते विनोदाची मेजवानी . मिथुन आणि रती ही जोडी या मसाल्यात आपला तरुणाईचा तडका टाकते आणि तयार होते एक खमंग , चमचमीत , मसालेदार डिश ‘ शौकीन ‘ .
‘ संध्याछाया भिवविती हृदया ‘ आयुष्यातील या कालखंडातील पुरुषांच्या मनोव्यापाराचे विनोदाच्या अंगाने केलेले मनोज्ञ चित्रण पहायला मिळते या सिनेमात .
‘ जब भी कोई कंगना बोले ‘ या गाण्याने चित्रपटाची सुरूवात होते . वारंवार येत राहतं हे गीत नंतर . पार्श्वभूमीवर स्कायस्क्पर्स . श्रीमंत मुंबईकरांची वस्ती . निवेदक परिचय करून देतो . इथे आपल्याला भेटतात आपले पहिले चरित्रनायक चौधरी ओमप्रकाश ( अशोककुमार ) . एकसष्ट वर्षांचे चौधरी मस्त मूडमधे परफ्यूम वगैरे मारून आपल्या अलिशान फ्लॅट मधे बागडत असतात . संगीताच्या , मग ते पाश्चात्य असो शास्त्रीय असो वा बॉलिवूड , त्या ठेक्यावर थिरकणे हा चौधरींचा आवडता छंद . सिक्स्टी प्लस असले तरी ते आपलं वय अठ्ठेचाळीसच्या पुढे जाऊ द्यायला तयार नसतात . अठ्ठेचाळीस एवढंच सांगत असतात . या दृश्यातून पुढे दिसणारा खुषमिजाज रंगेल चौधरी बासुदा प्रेक्षकांसमोर उभा करतात . दोन मुलं , तीन मुली , बायको असा सुखी परिवार . छोटा मुलगा अनिल सोडून सगळे विवाहित . आपापल्या घरी सुखरूप .
आता आपल्या समोर येतोय दुसरा चरित्र नायक इंद्रसेन ( ए.के.हंगल ) चौधरींचा मित्र इंद्रसेन चौधरींसारखाच . खुषमिजाज , रंगेल . चौधरींसारखाच फिजिकली फिट . सिक्स्टी प्लस असले तरी टेनिस कोर्टवर चैतन्याने सळसळत असतात . लॉन टेनिस उत्तम खेळत असतात . मित्र जगदीशच्या भाषेत ‘अंग्रेज की औलाद ! ‘. तुम्ही अजून चाळिशीतलेच दिसता असे म्हणल्यावर यांची कळी खुलत असते . चांगली कमाई , चांगली रहाणी , चांगले शौक . चौधरींसारखेच रंगेल . उँचे लोग उँची पसंद कटेगरी ! अँडरसन ट्रव्हल्स चे मालक . इंग्रज जाताजाता आपली औलाद सोडून गेले , त्यापैकी एक आपले इंद्रसेन उर्फ अँडरसन . तुमच्या लक्षात आलं असेलच अँडरसन हे इंद्रसेनचं इंग्रजी रूप . एकटेच असतात . दोन्ही मुली विवाहानंतर आपापल्या घरी मजेत . वर्षापूर्वीच पत्नीचे निधन झालेले . आता स्वतः इंद्रसेन , त्यांचा पाईप , व्हट 69 सारखी उंची व्हिस्की , सोबत इंग्रजी कादंबऱ्या हेच एकमेकांचे सोबती .
आता आपल्या तिसऱ्या चरित्र नायकाची ओळख करून घेऊया . जगदीशभाई . मट्रिकच्या उंबरठ्यावर अडखळले , पुढे शिकले नाहीत . दहा वर्ष पूर्ण झाली पत्नीवियोगाला , पुनर्विवाहाचा योग आला नाही .


‘ चमडी जाए पर दमडी न जाए ‘ याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जगदीशभाई . इतर दोघांसारखे हेही खुशमिजाज , रंगेल , शौकीन . मुंबई सारख्या महानगरीत सात सात बिल्डिंग्जचे मालक . व्याजाने दिलेल्या पैशांवरील व्याज आणि वेगवेगळ्या बिल्डिंगमधील भाडेकरूंकडून मिळणारे घरभाडे , पागडी अशी मजबूत कमाई . कायम लक्ष्मीचा वरदहस्त . एकदम श्रद्धाळू . महादेव , विष्णू , श्रीकृष्ण , माता लक्ष्मी , साईबाबा यांचे निस्सीम भक्त . यांच्यापुढे कायम नतमस्तक . एक तारीख ही जगदीशभाईंची अत्यंत आवडती तारिख . भाडेवसूलीचा दिवस . मस्तपैकी काळी टोपी , परिटघडीचा कोट घालून , विडी शिलगावून ते सकाळसकाळी भाडेवसूली मोहिमेवर रवाना होत असतात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला . तर असे हे समानशीले व्यसनेषुसख्यम् जिगरी दोस्त .
भाडेकरूंपैकी अनुराधावर जगदीशभाई यांची विशेष मर्जी . पण प्रश्न असा आहे की , दिल की बात अनुराधाला सांगायची कशी ? दुपारपर्यंत जगदीशभाई घरातून हललेच नाहीत असं व्हायला नको म्हणून अनुराधाला त्यांना कटवायची घाई . भाड्याची रक्कम स्विकारताना होणाऱ्या , मुद्दाम घडवून आणलेल्या ओझरत्या हस्तस्पर्शाने जगदीशभाई खूष ! अनुराधा एकटीच , विधवा असते . इथे नशीब आजमावून बघत असतात जगदीशभाई पण , अनुराधा काही दाद देत नाहीये . हे असंच चालू आहे दोन तीन वर्षांपासून .
सेक्रेटरी लीला इंद्रसेनच्या खास मर्जीतली . तिची खास आस्थेवाईकपणे चौकशी , कुठे गुंतलेली तर नाही ना . संध्याकाळी काय करतेस वगैरे पावलं टाकत ध्येयापर्यंत पोचायचा प्रयत्न चालू आहे . लीला हिंदी चित्रपटांची शौकीन आहे . लीलाला हिंदी सिनेमाला घेऊन जाणे ही मनीषा . चौधरींची तऱ्हा वेगळी . विवाहित आहेत . पण इकडच्या तिकडच्या सौंदर्यस्थळांकडे नजर लावून असतात . दहा बारा दिवसांच्या तीर्थयात्रेला जाणार असतात सौभाग्यवती चौधरी मग काय , आता मोकळं रानंच !
मेरा मुंबईहून गोव्याच्या समुद्रकिनारी , बीचवर . हॉटेल डोना पावला , इथली प्रसिद्ध नर्तिका , गायिका अनिता ( रती अग्निहोत्री ) अनितामुळे हॉटेल डोना पावलात कायम गर्दी असते . तिचे आयटेम साँग्ज , खरं तर आजच्या परिभाषेत यातलं कुठलंही गाणं आयटेम साँग या सदरात मोडत नाही , लोकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात . आणि हा रवी ( मिथुन चक्रवर्ती ) , अनिताचा बॉयफ्रेंड . सुशिक्षित एम् ए पास , सुसंस्कृत , होतकरू तरुण सध्या बेकार पण नोकरीच्या शोधात . ही या चित्रपटातील तरुण जोडी . रवी अनिता दोघेही बाळपणापासूनचे मित्र , सध्या रवी बंगळूरस्थित . अनिताला भेटण्यासाठी खास गोव्यात आणि नोकरीच्या शोधात इंटरव्ह्यूसाठी मुंबईत कायम येणेजाणे . छानशी नोकरी बघून मुंबईत सेटल होण्याचा दोघांचा मानस आहे .


मेरा पुन्हा मुंबईत , चौधरींच्या अलिशान फ्लॅटवर . चौधरी घरात एकटेच सौ.चौधरी तीर्थयात्रेला बाहेर . आता असा मोका मिळाल्यावर तिघा मित्रांची पार्टी होणारच . सिगरेट , दारू यावरील निर्बंध तूर्तास उठलेले . व्हिस्की , सोडा बर्फ , चकणा सगळी तयारी जय्यत आहे . आता फक्त मित्रांचीच वाट . चौधरी बाल्कनीतून समोरच्या तरुण मुलीला नेहमी न्याहळत असतो . तसंही त्याच्या नजरेच्या तावडीतून समोरील रस्त्यावरून जाणारी एकही तरुणी , पुरंध्री सुटत नसते . तर अशा त्याच्या आवडत्या मॉडेल्सपैकी एक समोरच्या बिल्डिंगमधील तरुणी डोअरबेल वाजवते . अनिलच्या रुममधून वाजणाऱ्या पॉपच्या तालावर तिचे पाय पडत असतात . तिचा हात हातात घेऊन तिला बसायचा आग्रह करत असतानाच जगदीशभाई टपकतात . जाताना ती अंकल म्हणून जाते आणि तेवढ्यापुरता विषय संपतो . अजून इंद्रसेन आलेला नाही . अनुराधा ताकास तूर लागू देत नाही , ही जगदीशभाईची तक्रार . त्यावर दोन पेग जास्त घे गम भाग जाएगा हा चौधरीचा सल्ला . अँडरसेन जॉईन होतो . रुटीनला कंटाळलेले तिघेही कुठेतरी ट्रिपसाठी जायचे ठरवतात . लीलाबरोबर चाललेल्या प्रयत्नांवरून दोस्तलोक इंद्रसेनची मस्करी करतात . दिल तो जवान है , पण वय वाढलंय . काहीतरी एक्सायटिंग केल्याशिवाय बेचैनी कमी होणार नाही , यावर सर्वांचं एकमत होतं . दिल शौकीन आहे . अनिर्बंध मोकळेपणाने काहीतरी शौक करूया या निष्कर्षापर्यंत सगळे येतात . इस पार या उस पार . पण , जे करायचं ते मुंबईपासून दूर लांब कुठेतरी करुया म्हणजे इथे मुंबईत कुणाला काही कळणार नाही . कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या अनुभवांची शिदोरी असते चौधरीजवळ . तीन चार वर्षांपूर्वी अशाच एका कामानिमित्त ते छत्तिसगडला गेलेले असतात . छत्तिसगडच्या डाक बंगल्याची आठवण ते सांगतात . आजूबाजूला बरीचशी आदिवासी लोकसंख्या . उफाड्याच्या तंदुरुस्त आदिवासी स्त्रिया तिथे कामाला असतात . तिथे काही संधी मिळाल्या होत्या . पण , ऐनवेळेस हिंमत होत नाही हाच आपला विक पॉईंट आहे ही खंत ते व्यक्त करतात . अशीच एका नाशिकच्या डाक बंगल्याची हकिकत ते सांगतात . मालिश करुन घ्यायची त्यांना सवय असते . मसाजची सोय होईल का असे ते चौकीदाराला विचारतात . चौकीदार वेगळाच अर्थ काढतो . त्यांच्याकडे चक्क तशा बाईला पाठवून देतो . ते निस्तरता नाकी नऊ येतात ! असंच काहीतरी धाडस करूया , हिंमत गोळा करू पण , आजवरच्या अळणी आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं , असं झणझणीत की जे कायम लक्षात राहिल . असं काहीतरी करण्यासाठी बाहेर जाण्याचं ठरतं .
गाडीचा प्रश्न नाही पण , ड्रायव्हरचं काय , तो तर हवाच . नाशिकला जाऊन तेथिल डाक बंगल्यावरील चौकीदाराच्या सहाय्याने उफाड्याच्या तरुण धष्टपुष्ट मुलींबरोबर काहीतरी ॲडव्हेंचर करायचं असा प्लॅन ठरतो . चौधरी मुलगा अनिलकडे ड्रायव्हरची चौकशी करतात . रवी रिकामाच असतो . सध्या तो मुंबईत इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो . मित्रांसोबत बियर पितापिता अनिल ड्रायव्हरचा विषय काढतो . रवी सुचवतो , मी सध्या रिकामाच आहे . तुझे वडील आणि त्यांच्या मित्रांना मी फिरवून आणू शकतो , एक ड्रायव्हर या भूमिकेतून . अनिल तयार होत नाही . हा तर सुशिक्षित मुलगा , वडिलांना हवा वेळप्रसंगी सामान उणलणारा गाडीतच झोपणारा व्यावसायिक ड्रायव्हर . हे काम रवीकडून करून घ्यायला अनिल तयार होत नाही . आणि तसेही चौधरी आणि कंपनीला मुलाच्या मित्राकडून ड्रायव्हरचे काम करून घेणे चालणार नाही . त्यांना काही कळू न देता एक ड्रायव्हर म्हणून मी जाईन , माझाही आठ दिवसांचा टाईमपास होईल , असा पर्याय रवी ठेवतो . सखाराम , गोव्याचा सखाराम असं रवीचं नामकरण होतं . सखाराम पांडुरंग काकोडकर . रोजचा तीस रुपये पगारही ठरतो .
नाशिकला जाण्यासाठी सखाराम ड्रायव्हर बरोबर तिघे शौकीन बाहेर पडतात . रवीला फोटोग्राफीचा शौक असतो त्याचा सॉफिस्टिकेटेड कमेरा त्याच्या सोबतच असतो . पॉश कपडे घालणारा , महागड्या सिगरेट ओढणारा , फोटोग्राफी सारखे शौक करणारा हा ड्रायव्हर तिघांना आवडतो . नाशिकला जाऊ , डाक बंगल्यावर चौधरीच्या ओळखीचा चौकीदार आहेच , तो आपलं काम करेल . मजा करू आणि ड्रायव्हर कडून फोटोही काढून घेऊ . तिघेही म्हातारे ॲडव्हेंचर मूडमधे चेकाळायला लागतात . इंद्रसेनच्या डोक्यात माऊंट अबू वगैरे हिल स्टेशन्स असतात . रवी ओळखतो म्हाताऱ्यांचं डेस्टिनेशन फिक्स नाहीये . त्यांच्या मनात काय चाललय याचाही अंदाज त्याला येतो . रवी त्यांना गोव्याला जाण्याचे सुचवतो . मी गोव्याचाच आहे , गोव्यात मी सर्व व्यवस्था करू शकतो असे अमिष दाखवतो . आपल्यालाही अनिताबरोबर गुटुरगुँ करायला मिळेल हा त्याचा स्वार्थ असतो . चलो गोवा ! डेस्टिनेशन गोवा !! पाहिजे ते करायला मिळणार म्हणून बुढ्ढे खूष , अनिताला भेटायला मिळणार म्हणून रवीही खूष .
‘ वहीं चल मेरे दिल ‘ या धूनसह सुरू होते आनंदयात्रा . गोव्यात गेल्यावर काय करायचं याचे मनातले मांडे तिघेही खायला लागतात . तिघे का , चौघेही ! गोव्यात प्रवेश झाला . आता आपली नैया तिघेही रवीच्या हातात सोपवतात . तुला हवं तिकडे घेऊन जा असा आदेश रवीला मिळतो . पहिला हॉल्ट अर्थातच हॉटेल डोना पावला . चहापाणी करून म्हातारे फ्रेश होतात .
संध्याकाळी त्या हॉटेलात डान्सर सिंगर अनिताचा प्रोग्रॅम एंजॉय करायचं ठरतं . तीन म्हाताऱ्यांना पटवून तुला भेटायला आलो , हे रवी अनिताला सांगतो . आता त्यांना असे पटव की निदान पंधरा दिवस तरी रहायला मिळेल ! त्यांच्यासमोर मी फक्त ड्रायव्हर आहे . ओळख दाखवायची नाही , अशी सूचना रवी अनिताला देतो . अनिताच्या घराशेजारीच असलेल्या रिकाम्या बंगल्यात तिघांची रहाण्याची व्यवस्था करण्याचे निश्चित करतात . परमार्था बरोबर आपलीही वारंवार गाठ पडेल , हा स्वार्थ साधला जाईल . ‘ सुहानी शाम आई है किसीके आनेसे ‘ या अनिताच्या परफॉर्मन्सवर चौधरीसह इंद्रसेन , जगदीशही थिरकायला लागतात .
सखाराम चांगला निघाला मुलगा . त्याच्या मनेजमेंटवर तिघे शौकीन खूष . पहिल्याच भेटीत अनिता चौधरीचा मामा बनवते . बंगल्यावर परतताना अनिताला ते घरापर्यंत लिफ्ट देतात .चौधरींना पाहिल्यावर मला माझे मामा आठवले असं अनिता म्हणते . चौधरी खट्टू इंद्रसेन , जगदीश खूष ! बंगल्यात रहाण्याची उत्तम सोय असते . तिघे शौकीन रिलक्स होतात . सिगरेट एक अनिता , ओढणारे तिघे , कसं जमणार .
तिघांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी अनिता स्विकारते . तिघांनाही ते हवंच असतं . रोजचे नव्वद रुपये असा व्यवहारही ठरतो . पण किचनमध्ये तुमचा ड्रायव्हर मदतीला लागेल अशी अट अनिता घालते . तिघांसाठी चौधरीजी , जगदीशजी , इंद्रसेनजी असे संबोधन अनिता ठरवते . घरी जाताजाता अनिता रवीला फ्लाईंग किस देते . तिघा म्हाताऱ्यांचा आपापल्या खिडकीत गोड गैरसमज होतो हे आपल्यासाठीच आहे . ‘ हम आँख किये बंद , तसव्वुरमें पडे हो , ऐसेमे कोई छम्मसे आ जाए तो क्या हो ‘ असा सगळा रोमँटिक माहौल .
हॉटेल डोना पावलावर संध्याकाळी अनिताचा स्पेशल परफॉर्मन्स असतो . डान्सची जय्यत तयारी करून तिघे शौकीन बाहेर पडतात . ‘ ये रंगे मेहफिल , बेहके हुवे दिल ‘ साकी भी और जाम भी . एक अनिता आणि स्पर्धक तीन . तिघेही अनिताला पटवायच्या प्रयत्नात असतात . ज्येष्ठतेनुसार पहिली संधी चौधरीला . एक लार्ज पेग मारून लाल सूटवर परफ्यूम मारून चौधरी परिक्षेला तयार . इकडे कारमध्ये ड्रायव्हर सखाराम आणि अनिताचं गुटुरगुँ चालू असतं . चौधरी बिचारा अनिताची वाट पाहून कंटाळलेला . अनिता गोवन स्पेशल डिशचा बेत ठरवते . तोपर्यंत तिघे पाय मोकळे करून या , सखाराम माझ्या मदतीला थांबेल असे अनिता सुचवते . जगदीश आणि इंद्रसेन , चौधरीला एकांत मिळावा म्हणून सखारामला घेऊन बाहेर जायची शक्कल लढवतात . संगीतप्रेमी चौधरी पियानोवर बसतो . अनिताला ते आवडतं ती ही साथ देते . चौधरी अनिताला व्हिस्की ऑफर करतो अनिता वाईनचा पर्याय सुचवते . वाईन , पियानो , अनिता सगळं आलं की जुळून . चौधरीची दिवास्वप्नं सुरू होतात . ड्रायव्हर मुलाच्या ओळखीचा आहे , मुंबईत सगळं कळल्यावर नाक कापलं जाईल ही धास्तीही असते . तिघेही शौकीन शुद्ध मराठीत सांगायचं तर अनितावर लाईन मारायला लागलेले असतात . रवीला हे कसं बघवेल . तो अनिताला सांगतो तिघेही हिरवट म्हातारे आंबटशौकीन आहेत . त्यांच्यापासून सांभाळून रहा . अनिता चलाख असते तिच्या डान्सर , सिंगरच्या अनुभवाने तिला खूप काही शिकवले असते . त्यामुळे हे सांभाळून घेणं तिला फारसं अवघड नसतं . काय होणार चौधरी अनिता एपिसोड पुढे ? ‘ चिअर्स ‘ वाईनचे चषक भिडतात . बॉटम्स अप , छोट्या राउंड स्टूलवर दोघे . ‘ चलो हसीन गीत एक बनाए , वो गीत बनाए फिर गुनगुनाए ‘ हे मस्त गाणं आहे या सिच्युएशनवर . बासुदांनी अप्रतिम चित्रण केलं आहे या गाण्याचं . कुठेही व्हल्गर वाटत नाही हे गाणं . चौधरीला मिळालेला एकांत अगदीच काही वाया गेला नाही !
आता पाळी जगदीशभाईची . सखारामला घेऊन चौधरी , इंद्रसेन कलंगुट बीचवर . उत्पल दत्तने या सीनमध्ये मजा आणली आहे . त्याचा कॉमेडीचा सेन्स अप्रतिम आहे . आता संध्याकाळ पर्यंतचा वेळ या घूंसट म्हाताऱ्याबरोबर काढावा लागणार याचा अंदाज अनिताला येतो . अधीर जगदीश अनिताला वाईन ऑफर करतो . अनिता नकार देते . अनुराधा जगदीश हे संदर्भ तिच्या कानावर आलेले असतात . अनुराधा वरून जगदीशला छेडायचं ती ठरवते . थोड्यावेळाने आराम करायला निघून जाते . जगदीशची कहाणी ऐकायला चौधरी , इंद्रसेन उत्सुक . पण घडलं तर काहीच नाही . आता चोरून मारून अनिताची गाठ घेणे या प्रकाराला रवीही वैतागलेला असतो .
आता पाळी इंद्रसेनची . रवीचा पेशन्स हळूहळू चाललेला . अनिताला कळत नाही ,एक दिवस जगदीश , इंद्रसेन गायब .एक दिवस चौधरी , इंद्रसेन गायब .आज चौधरी , जगदीश गायब . काय प्रकार आहे ? इंद्रसेन अनिता पत्त्यांचा डाव मांडायचा ठरवतात . इंद्रसेन संधीच्या शोधात . अनिता जवळ येते पण , आवाक्यात येत नाही . इंद्रसेन अस्वस्थ व्हायला लागतो . त्याला बरं वाटावं म्हणून अनिता व्हिस्कीचा एक लार्ज पेग देते . एकाचे चार होतात आणि इंद्रसेन ‘ टुन्न ‘ होतो . काहीतरी चुकतंय , कॉन्स्पिरसी चालू आहे रवीला संशय येतो . मधूनच तो दोन्ही म्हाताऱ्यांना घेऊन परत फिरतो .
रवी अनिता दोघे मिळून मिरामार बीचवर जातात . गंमत करायला आलेल्या तिघांनीही काहीही गंमत न करता गंमत अनुभवली असते . तसे तिघे बिचारे पापभिरू असतात . आपला पाय कुठेही घसरला नाही याचे तिघांनाही समाधान असते . तिघेही एकमेकांपाशी कबूली देतात , बरंच काही करायचं ठरवून आपण काहीही करू शकलो नाही . आपला प्लन कसा टांय टांय फिस्स झाला हे एकमेकांना सांगून एंजॉय करतात . करायचं ठरवलं असतं बरंच काही पण , करायची वेळ आल्यावर तिघांनाही घाम फुटलेला असतो .
सखारामकडे कमेरा असतो . अनिताबरोबर आपले फोटो सखारामने काढलेले असणार आणि मुंबईला गेल्यावर सखाराम अनिता आपल्याला ब्लॅकमेल करणार . या शंकेने तिघे शौकीन त्रस्त होतात . हाच त्या दोघांचा प्लॅन असणार , म्हणूनच सखाराम आपल्याला गोव्यात घेऊन आला . आणि त्या दोघांच्या जाळ्यात आपण मूर्खासारखे अलगदपणे अडकलो याची तिघांना खात्री वाटायला लागते . इथून ताबडतोब निघायला हवं या निर्णयावर तिघेही येतात .
किचमध्ये रवी अनिता एकमेकांच्या बाहुपाशात भविष्याची स्वप्नं बघत असतात . चौधरी त्या दोघांना या अवस्थेत बघतो . आता तर त्याची खात्रीच पटते .
दोघा मित्रांना तो बोलावून आणतो तिघे मिळून सखारामवर तोंडसुख घ्यायला लागतात . आपल्या पायरीने रहा असे सुनावतात . रवी अनिता एकमेकात गुंतले आहेत . लग्न करून त्यांना मुंबईत सेटल व्हायचं आहे . मुळात रवी व्यावसायिक ड्रायव्हर नाही , तो सुशिक्षित , सुसंस्कृत पण नोकरीच्या शोधात असलेला होतकरु तरुण आहे , या बाबतीत तिघेही अनभिज्ञ असतात . मुंबईत गेल्यावर आपलं काही खरं नाही , ही क्रिमिनल जोडी आपल्याला ब्लॅकमेल करणार . हा ड्रायव्हर आणि ही मुलगी आपल्या तालावर नाचवणार . तिघेही धास्तावलेले असतात . पुढे काय होणार ? पुढे क्लायमॅक्स !
रवी आणि अनिता दोघेही खरं काय ते सांगायला येतात . नक्की काय प्रकार आहे याचा उलगडा सगळ्यांना होतो . सगळं मळभ दूर होतं . अगदी फिटे अंधाराचे जाळे , झाले मोकळे आकाश ! शोकांतिका सुखांतिका होते . आता या दोघांसमोर गेलेली उरली सुरली इज्जत तरी कशी वाचवायची , हा या तिघा रंगेल म्हाताऱ्यांना पडलेला प्रश्न . चौधरी शक्कल लढवतो . कहां गये थे , कहीं नहीं , क्या लाये , कुछभी नहीं . अशी थोडक्यात ही सफर ! कुठल्याही क्षणी अश्लिलतेकडे झुकू शकेल असा या चित्रपटाचा प्लॉट . पण , कुठल्याही क्षणी तो अश्लील होत नाही ही बासुदांची खासियत . एका निखळ विनोदी , निरुपद्रवी , मनोरंजक सिनेमाचा पुरेपूर आनंद देऊन जातो हा चित्रपट , ही ॲडल्ट कॉमेडी ! मुंबईत पोहचताच रवीला चौधरी कन्स्ट्रक्शन मधे नोकरी ऑफर करतात चौधरी . इंद्रसेन भावाच्या पंचतारांकित हॉटेलात अनिताला जॉब ऑफर करतात . खारमध्ये रिकामा असलेला फ्लॅट जगदीशभाई दोघांना पागडी न मागता रहायला देतात . रवी अनितासाठी आंधळा मागतो एक ही अवस्था . उपरवाला देता है तो छप्पर फाडके !
आणि अशा रितीने आपले तिनही शौकीन मित्र आपली इज्जत शराफत पांघरून , तिला कोठेही धक्का लागू न देता मुंबईत परत जातात !

मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu