श्रीनिवास विनायक खळे ©मुकुंद कुलकर्णी

” श्रीनिवास च गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पुरा झाला की हा आता आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही अंदाजच करता येत नाही . अंतऱ्याच्या दोन ओळी झाल्या की आपल्याला असा प्रश्न पडतो की हा मुखड्याला परत कसा येणार ? तसे सगळेच परत येतात , उड्या मारत . त्यातल्या काही माकडाच्या ही असतात . पण हा येतो तो असा की – एका डहाळीवरून फुलपाखरू जसं दुसऱ्या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखड्याला परत येतो आणि आपल्याला कळतच नाही की हा येथे आला कसा ! “
– पु.ल.देशपांडे

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समृद्ध करण्यात आग्रा , ग्वाल्हेर , जयपूर अशा अनेक घराण्यांचे अमूल्य योगदान आहे . रसिकांना भावणाऱ्या भावगीतांबद्दल म्हणाल तर त्या गीतांना अमरत्व बहाल केलं ते ‘ श्रीनिवास खळे ‘ या घराण्याने .

मराठी भावगीतांना अतिशय मोहक चाली लाऊन सहा दशकांहून अधिक काळ मराठी रसिकांवर मोहिनी घालणारे श्रीनिवास खळे ऊर्फ खळेकाका यांचा आज जन्मदिन . हिंदी , संस्कृत , गुजराती , बंगाली इत्यादी अनेक भाषांमधील गीतांना खळे यांनी स्वरबद्ध केले आहे . त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्येच आहे . बोलकी बाहुली , जिव्हाळा , पोरकी , पळसाला पाने तीन या सारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले . लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘ रामश्याम गुणगान ‘ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता .

श्रीनिवास खळे यांचा जन्म दि.30 एप्रिल 1926 रोजी बडोदा येथे झाला . मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले . पुढे अता हुसेन खाँ , निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ अशा दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली .

बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून काही वर्ष नोकरी केल्यावर खळेअण्णा मुंबईत आले , पण त्यांना फारसे काम मिळेना . इथेच त्यांची ओळख के दत्ता यांच्याशी झाली . दत्ता यांचे सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी काम करायला सुरूवात केली . काही चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या . मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेकाकांचे सगळे कष्ट पाण्यात गेले . त्या नैराश्यापोटी आपली पेटी विकून संगीताला रामराम ठोकावा आणि दुसरा काहीतरी नोकरीधंदा शोधावा अशा निर्णयाप्रत ते आले होते . अशा कठीण काळात त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढले . इ.स.1952 साली
‘ गोरी गोरी पान ‘ आणि ‘ एका तळ्यात होती ‘ ही त्यांची अत्यंत सुरेख दोन गाणी असलेली तबकडी प्रसिद्ध झाली . या दोन्ही रचना गदिमांच्या होत्या . मुळात या रचना ‘ लक्ष्मीपूजन ‘ या चित्रपटांसाठी होत्या , पण ऐनवेळी तो चित्रपट बारगळला . खळ्यांनी लावलेल्या या गीतांच्या चाली गदिमांना एवढ्या आवडल्या होत्या की त्यांनी एचएमव्ही कडून वेगळी तबकडी बनवून घेतली . या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना आणि आशाताईंनासुद्धा खऱ्या अर्थानी प्रसिद्धी मिळवून दिली आणि खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले .

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले संगीतकार नौशाद खळे काकांचे मोठे फॅन होते . ते म्हणत , ” मौका मिलता तो मैं खळे जी का शागीर्द बनता . इनके जितने अच्छे गीत हम जिंदगी भर बना नहीं सके . आप हमारी नॅशनल प्रॉपर्टी हो , आपके जैसा कलाकार अब हैं कहॉं ? “
– नौशाद

दि.1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस , ह्यासाठी खास , राजा बढेंनी दोन महाराष्ट्र गीते लिहिली त्यापैकी एक ‘ जयजय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत शाहीर साबळे यांनी गायले आणि खळेसाहेबांनी संगीतबद्ध केले . आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे .
‘ संगीत पाणीग्रहण ‘ या आचार्य अत्रे लिखित संगीत नाटकाला खळ्यांनी संगीत दिले होते .

इ.स. 1968 पासून खळ्यांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली . इ.स. 1973 साली लता मंगेशकरांकडून ‘ अभंग तुकयाचे ‘ हा संत तुकारामाच्या अभंगांचा संग्रह , तर पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून अभंगवाणी गाऊन घेतली . या दोन्हीलाही अफाट लोकप्रियता लाभली . श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर , कविता कृष्णमूर्ती , वीणा सहस्त्रबुद्धे अशा कितीतरी सुप्रसिद्ध कलाकारांनी गायलेल्या गीतांच्या तबकड्या खूपच लोकप्रिय झाल्या . श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिले नसले तरी भावगीत – भक्तीगीत हे प्रकार भरपूर हाताळले . जवळजवळ शंभरहून अधिक गायक गायिकांनी श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत . पंडित भीमसेन जोशी , सुधीर फडके , वसंतराव देशपांडे , लता मंगेशकर , आशा भोसले . सुमन कल्याणपूर , माणिक वर्मा , सुलोचना चव्हाण पासून ते हृदयनाथ मंगेशकर , उषा मंगेशकर . अरूण दाते , सुधा मलहोत्रा , सुरेश वाडकर देवकी पंडित , कविता कृष्णमूर्ती शंकर महादेवन ते अगदी अलिकडे लिटल चॅम्पियन आर्या आंबेकर यांच्यापर्यंत अनेक नामवंतांनी खळेकाकांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत .

अलौकिक प्रतिभा लाभलेले बाबूजी , सुधीर फडके यांच्या मनात खळेकाकांनी विषयी अत्यंत आदर होता . ” एक अलौकिक संगीतकार वगैरे स्तुती केली तरी त्या स्तुतीला शब्दच नाहीत . खळे म्हणजे खळेच त्यांनी ज्या पद्धतीने संगीत निर्माण केले तसं करणार कोणी नाही व पुढे होईल की नाही हे नियती काय करेल माहित नाही . यांच्यासारख्या चाली मला नाही येणार ! यांचं मी म्हटलेलं ‘ लळा जिव्हाळा शब्दच खोटे ‘ शिकताना मी मनात खरोखर घाबरलो होतो की , यांच्या या गाण्यातल्या जागा माझ्या गळ्यातून निघतील असं मला नाही वाटत व आजही त्याच भावना आहेत . “

आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत खळे काकांना अनेक पुरस्कार लाभले . इतर अनेक पुरस्कारांबरोबर इ.स. 2010 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले .

प्रेम करणारे रसिक हीच आयुष्याची कमाई असे मानणाऱ्या श्रीनिवास खळे यांना मानाचा मुजरा !

मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu