गन्तव्य लग्न ©️ अनुजा बर्वे .

*गन्तव्य लग्न *

काय्ये हे शीर्षक ?🤔

‘लग्न नि कर्तव्य’-हे दोन्ही हातात हात घालून जातात, म्हणजे अगदी, यंदा कर्तव्य आहे पासून ते संसार सुरळीत निभावण्यापर्यंत. पण…….
हे ‘गन्तव्य’ चं काय ते नविनच एकेक!😮
प्रथम ऐकलं, तेव्हा मला असं वाटलं खरं .

झालं असं की, आमच्या एका पारंपारिक कौटुंबिक मित्राचा फोन आला होता, त्यांच्या लेकीच्या लग्नाचं आमंत्रण करण्यासाठी .
त्याना फार सवयै बाई शब्दशः भाषांतरांची !

“ २ दिवस राखून ठेवायचेच्चैत आहेत तुम्ही !

गन्तव्य लग्न * आहे.
म्हंजे ?🤔
अशा भुवया उंचावलेल्या दिसतायत मला फोनमधूनही पण ते आपलं माझ्या स्टाईलने केलेलं भाषांतर आहे * डेस्टिनेशन वेडिंग* चं ! ज्येष्ठांच्या सर्वसाधारण गरजा लक्षात घेऊन चोख व्यवस्था केली आहे ओव्हरनाईट स्टेची! ठीकै? आत्ताच्या ट्रेंडनुसार
लेक आणि होणारया जावयाने डिझाईन केलेली डिटेल्ड व्हॅाटसॅप पत्रिका पाठवतोचै!”

आम्हाला अधेमधे काही बोलायची संधी न देता, त्यांच्या कार्यातली आमची उपस्थिती गृहित धरून, उत्साहाने आमंत्रण करून त्यांनी फोन ठेवला देखिल.

अरे व्वा ! ‘आमंत्रण पत्रिका सिलेक्ट करून त्यांची छपाई’ वगैरेची आई वडिलांना करावी लागणारी धावपळ आता एकदम ‘फिंगर टीप’ वर ( ती देखिल साक्षात ज्यांचं लग्न आहे त्यांच्याच😀) आल्याचा ट्रेंड कळो आल्याने ‘नवल वर्तले ग्गं बाई’ असं झालं हो.

गन्तव्य* शब्द ऐकला तेव्हा रेल्वे प्लॅटफॅार्मवरच्या इंडिकेटरवर गन्तव्य स्थान असं लिहिलेलं असतं त्याचीच प्रथम आठवण झाली.
एक जमाना होता (अंदाजे ४०/४५ वर्षांपूर्वी) जेव्हा ,
‘व्यवस्थित शीक गं बाई म्हणजे तुझ्यासाठी छोटी-मोठी नोकरी शोधायचा आणि भरपूर शिकलेला नवरा शोधायचा पर्याय खुला होईल’, असा विचार घरातली वरिष्ठ मंडळी सहजपणे येता-जाता आम्हा मुलींच्या कानावर घालत.( अर्थात् अपवाद असतीलच)

साधारणपणे, ‘विशी-बाविशीच्या आत मुलीचं लग्न व्हायला हवं हो’ ( पंचविशीपर्यंत नाही झालं तर ?? 😮 तोबा तोबा ! ) अशी धारणा असलेला तो काळ ! त्या काळात त्यामुळे सामान्यतः पदवीधर नि पुढे द्विपदवीधर ( ठरे ठरेपर्यंत एख्खाद दोन वर्ष जातीलच अशा अंदाजाने😀) ह्या शैक्षणिक प्रवासाचं डेस्टिनेशन यानेकी * गन्तव्य स्थळ* म्हणजे ‘सुस्थळी पडणे’ हे असे.
(सध्याचा २६-२७ ॲानवर्डस् असा मुलींच्या लग्नाळू वयोगटाचा ट्रेंड बघता ह्या सुस्थळी पडणे वर नजरा 😳😳अशा उंचावणारेत.)
पण…आताशा,
‘ सुस्थळी पडण्याची’ कार्यवाही करायलाच * डेस्टिनेशन* बुक करायची फॅशन आलीये हे कळल्यावर मला अंमळ भारी वाटलं खरं !

‘ जायलाच हवं बर्र !’ असा इकडच्या स्वारींचा फतवा लगेचच आला . स्वारींनी ठरवलं म्हणजे ‘ मग काय अपीलच नाही’ असं
(मनातल्या मनात😛) म्हणत मी काही कारणास्तव कपाट उघडलं. आमचा ठराव कळल्यागत कपाटातल्या पारदर्शक

लग्नी* साडी फोल्डरमधल्या साड्याही ( घडीतल्या घडीत) खुसखुसत मोहरल्यागत वाटल्या मला.😄

का नाही मोहरणार हो ?

गेल्या अडीच पावणेतीन वर्षात लग्न-कार्याला जाणं झालंच नव्हतं.( ज्ये ना वयोगटामुळे हो 😔) नि जायचं ठरलं ते एकदम

डेस्टिनेशन वेडिंगला* ! 😀

‘ बोलावलं म्हणजे आपण लगेचच अगदी २ दिवसांसाठीचं ठरवायला नको’ अशा आवरतं घेण्याच्या ( कोकणस्थी😛) वळणामुळे आणि चारेक तासाचा तर प्रवासै ह्या विचारानेही, लग्नाच्या दिवशी सक्काळी निघायचं ठरलं.
(मार्च महिन्याची सुरूवातच असल्याने हवामानही सुसह्य असल्याचा ॲडिशनल बेनिफिट होताच.)

आताशा एक बरंय ! ग्रोसरी, दूध-दुभतं, भाजीपाला, औषधं, खाणं-पिणं(😛), प्रवासासाठी ड्रायव्हर सुविधा, असं सगळंच
एका बोटावर उपलब्ध ! सुविंधाचा सुकाळ नुस्ता !
नि मुख्य म्हणजे,
‘ तुम्ही ड्रायव्हिंग उत्तम करता त्याबद्दल दुमत नाही पण डेस्टिनेशन पर्यंतचा प्रवासही एन्जॅाय करा की जरा’
ही माझी मल्लीनाथी स्वारींकडून ॲप्रूव्ह ( फेसबुक पोस्ट टाकायला सुरूवात केल्यापासून ह्या दहशतवादी व्हर्ब * ची सवय लागलीये) झाल्यामुळे *चालक सुविधा ला फोन लावून त्याची त्या दिवशीची नेमणूक ठरवून झाली.

ठरल्याप्रमाणे ड्रायव्हर (कधी नव्हे तो😒) बरोब्बर सकाळी साडे सहाला हजर झाला.

“निघायचं नं ? ड्रायव्हर आला हं ! ती तुझी भांडी बिंडी आवरणं सोड आता” अशी वर्दी देऊन स्वारींनी पायात चपला घातल्या देखिल !

‘ अहो , एवढी ही पूजेची भांडी आवरून जागच्या जागी ठेवायला कितीसा वेळ लागणारे ? नि ड्रायव्हर म्हंजे का यमदूत आहे, की एक सेकंदही थांबणार नाही ?’ असा माझा (मनातल्या मनात 🤓) प्रतिवाद करून झाला.
खरं म्हणजे मुहूर्त दुपारी १२.४४ चा !
पाच-सात मिनिटांनी निघालो अस्तो तर काsssही बिघडलं नस्तं. पण…
नमनालाच तू तू-मै मै चं तेल नको म्हणून मी देखिल एकवार आरशात माझ्या ‘ जामानिम्या’ कडे कटाक्ष टाकून झर्रकन (?) निघाले.

डेस्टिनेशन* म्हणजे अगदी पेशव्यांच्या वाड्याचा * फील* देणारं असं ! चहूबाजूंनी, वरपक्ष-वधूपक्ष-निमंत्रितांसाठीचे अगदी दक्षतेने सजवलेले सुरेख कक्ष ,पाचेक पायरया वर चढून प्रवेश केल्यानंतर लगेच नजरेत भरले.
मध्यभागी, लग्नविधी नि लग्न लागण्यासाठीचं स्टेज तसं ‘ग्राऊंड लेव्हलला’ होतं.(वधू-वर, पाय जमिनीवर नसण्याच्या मानसिक स्थितीत असणार हे गृहित धरून बहुतेक 😛) नि वरती मात्र (सर्वेशाचे बलेसिंग्ज सहजी मिळावेत☺️म्हणून) मोकळं आकाश.

कोपरया कोपरयातल्या नेत्रसुखद सजावटी खरोखर लाजवाब.
पण…
एकीकडे मध्यभागी लग्नविधी सुरू होते नि दुसरीकडे (कमलपत्रावरच्या थेंबागत अगदी निर्लेपपणे😛)
कोपरया कोपरयातल्या सजावटींपुढे- किशोरवयीन, नवयौवना, नुकतंनुकतं प्रेम होऊ घातलेल्या जोड्या-ह्या सगळ्यांचं ‘सेल्फी‘ घेणं सुरू होते. तस्मात् ह्या ‘सेल्फी-विधीं’ ना मी ‘लग्न कुणाचे सेल्फी कुणा’ असं नाव मनोमन बहाल करून टाकलं.😀
( तुम्हालाही * कथा कुणाची व्यथा कुणा* हे एके काळच्या
नाटकाचं नाव आठवलं नं ? 😛त्यावरूनच मनात आलं.)

नवनविन फॅशन्स, उंची उंची साड्या, डिझायनर ज्वेलरया बघताना नि अवती भवतीच्या तरूणाईचा वावर अनुभवतांना बरयाच गॅपनंतर मन ताजं तवानं होऊन गेलं हो !
इतकं की, वैदिक पध्दतीचे विधी संपल्यानंतर अंतरपाटापुढे
वधू-वरांना आणायच्या आधीच्या मधल्या वेळात अस्मादिकानीही छोट्टंसं फोटो सेशन उरकून घेतलं. ( तिथल्याच एका नवतरूणीच्या हेल्पने😀) काय करणार ? अहो, DP बदलायची देखिल एक प्रकारे सामाजिक बांधिलकी झालेय अन् काय !!☺️)

सिनियर ज्ये.ना. वयोगटातल्या मंडळीना मात्र, ह्या सगळ्या
नव कल्पना पचवणं अंमळ जड जात होतं.
‘लग्न लागलं की लगेच डायनिंग हॅालकडे वळू ‘असा विचार झालाच होता सगळ्यांचा पण तोवर…
‘आमच्या वेळचं काही बोलायची सोयच नाही’ असं म्हणत म्हणत त्याच आठवणींमध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करीत होती मंडळी.

पण…… कसचं काय !

साडेबाराच्या सुमारास ( जेव्हा की मंगलाष्टकं सुरू होणं अपेक्षित होतं )लग्नवेदी पासून थोड्या दूरच्या सीमेवरून ( मुहूर्त-पालनाची सीमा साफ दुर्लक्षून) वराचा घोडा दृष्टीस पडला. वर-माय , वर-पिता,नि जवळच्या सगळ्याच मंडळींच्या उत्साह-उधाणाचं नृत्यात परिवर्तन झालं. पाठोपाठ वधू-पालखी ही सामिल झाली अन् काय!सगळं साग्रसंगीत तर होतंच परंतु हे समग्र नाचकाम पूर्ण होऊन अंतरपाटाशी पोचेपर्यंत सव्वा वाजून गेला होता.

‘मुहूर्त टळून गेल्याची ही परिसीमाच की !’
‘ अगबाई, कमालचै ! मग मुहूर्त काढला तरी कशाला म्हणते मी’
अशी वरिष्ठ कुजबुज एव्हाना वाढणं सहाजिकच होतं.

त्यानंतर सुमारे वीसेक मिनिटं वधूपक्षातल्या -वरपक्षातल्या हौशी मंगलाष्टकांनी राज्य केल्यानंतर गुरूजींना * तदेव लग्नं* म्हणायची संधी मिळाली ( एकदाची !😊)
सगळी सि.ज्ये.ना.मंडळी * हुश्श* करतायत तोवर तिथून पुढे एक वेगळीच स्पर्धा सुरू झाली. नवरा -नवरीला जास्तीत जास्त उंच करायची !😲
‘ हार घालण्यात कोणी आधी हार मानायची 🤔?’
हा सगळा डेस्टिनेशनचा घाट घातला ती सरताज क्रिया करायला
सर झुकवायला कोणताच पक्ष तयार होईना.

परत एकदा ,
‘ काय तरी एकेक फॅडं ही’,
‘ किती वेगवेगळ्या वेळा पाळायची वेळ येईल पुढे तेव्हा कसं करतील म्हणते मी ?’ अशी कुजबुज कानी येऊ लागली.🤓

फायनली , झालं बै ते * हाराहारी* प्रकरण नि मांडवशोभेकर
( डेस्टिनेशन वेडिंग मध्ये ह्यांना काय म्हणतात कोण जाणे) मंडळी

श्रीहरी* नाम घेण्यासाठी प्लेटांच्या लायनीकडे वळली.

कपड्यालत्त्यात कटाक्षाने आणलेली पारंपारिकता , जागोजागी सजावटीच्या रूपात ठळकपणे दिसून आलेली सुबत्ता ह्यांनी परिपूर्ण अशा त्या डेस्टिनेशन वेडिंग चा अनुभव म्हटलं तर सुखद नि म्हटलं तर अनेक बदल अधोरेखित करणारा असा होता.

बदल , बदलांचा वेग स्विकारून पुढे जावच लागतं हे तर खरंचै !
तरीही….
‘मुहूर्ताचं महत्व’ इतकं बदलावं ? 🤔🤔
‘ वेळ साजरी करणं’, ‘ वेळ निभावून नेणं’, अशा सहजीवनातल्या अन्य बाबीही बदलल्या तर कसं निभावं?
अशा अनेक विचारांनी परतीच्या वाटेवर मनात पिंगा घातला.
शिवाय,
निघे निघेपर्यंत उशीर तर झालाच होता.
‘ आता घरी केव्हा पोचणार ? सकाळची सगळी पूजेची वगैरे भांडी आवरायची बाकीचैत. इथे लग्न पाऊणेक तास उशीरा लागलं तरी चाललं पण सकाळी निघतांना थोडं सावकाश निघू म्हटलेलं नस्तं चाललं बरं’ असा स्वारींवर राग निघाला 😏
अर्थातच,
तोही मनातल्या मनातच हं !!!
( ह्यात मात्र काही ‘ बदल’ होईल असं वाटत नाहिये.😛)

©️ अनुजा बर्वे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu