दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि त्यामागच्या कथा…

दिवाळी म्हणजेच दीपावलीचा उत्सव अश्विन वद्य त्रयोदशीपासून, म्हणजेच धनत्रयोदशी पासून सुरू होतो व तो कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीया (किंवा भाऊबीज) ह्या दिवसापर्यंत चालतो, धनत्रयोदशीपासून यमद्वितीयेपर्यंत खरे म्हणजे पाच तिथी येतात, परंतु त्यातल्या काही तिथींचा लोप होतो, तर कधी एकाच दिवशी दोन तिथी लागतात, असे दरवर्षी होत असल्यामुळे दीपावलीचा हा उत्सव प्रत्यक्षात पाच दिवस कधीच साजरा करायला मिळत नाही, तो तीन किंवा चार दिवसच उपभोगायला मिळतो.

पावसाळा संपून नवीन पिके हाती आलेली असतात आणि आल्हाद दायक शरद ऋतूचे आगमन झालेले असते, अशा वेळी ह्या शरद ऋतूच्या  मध्यावर हा सण येतो. अश्विन महिन्याच्या सुरुवातीला नवरात्रोत्सवापासूनच  आनंद साजरा करायला सुरुवात झालेली असते. त्या आनंदाचा अत्युच्च  बिंदू म्हणजे हा दिवाळीचा उत्सव असे म्हणायला हरकत नाही. 

काहींच्या मते प्रभू रामचंद्र , सीता , लक्ष्मण हे तिघे जण वनवास संपवून याच सुमारास अयोध्येला परत आले . आणि त्यामुळे अयोध्येतील लोकांनी  जो दीपोत्सव साजरा केला तोच पुढे दीपावलीचा उत्सव म्हणून  रूढ झाला.

परंतु दीपावलीसंबंधातली अधिक प्रसिद्ध कथा ही बळी राजासंबंधी आहे, ती अशी :

प्राचीन काळी बळी नावाचा दैत्यांचा राजा फार बलाढ्य झाला होता. तो अत्यंत दानशूर व दिलेल्या वचनाला जागणारा म्हणून प्रसिद्ध होता.परंतु देव-दैत्यांच्या हाडवैरामुळे, आणि  बळीराजाच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळे  आणि दैत्यांचे गुरू शुक्राचार्य ह्यांच्या चिथावणीमुळे त्याने देवांवर स्वारी करून  कित्येक देवांना व लक्ष्मीलादेखील बंदिवासात टाकले. बळीला  युद्धात पराभूत करणे देवांना अशक्य होते, म्हणून युक्तीने त्याचा काटा  काढायचा असे देवांनी ठरविले. विष्णूने वामनाचा अवतार घेतला. वामन  हा ठेंगू ब्रह्मचारी. बळी राजा यज्ञ करीत असताना हा ब्रह्मचारी त्याच्या कडे दान मागण्यासाठी गेला. बळी राजाने “दान माग” म्हणून सांगितले. बळी राजाचे गुरू शुक्राचार्य यांनी देवांचे हे कपट ओळखले  होते. त्यांनी बळीला पुन्हा पुन्हा सांगितले की, “तू हे दान देऊ नकोस, त्याने तुझा नाश होणार आहे ” परंतु बळीला आपल्या दानशूरपणाची घमेंड  झाली होती; शिवाय तो शब्द देऊन बसला होता. बळी दानाचे  पाणी वामनाच्या हातावर सोडणार असे पाहून शेवटचा उपाय म्हणून शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेतले व ते झारीच्या तोंडाच्या भोकाशी जाऊन बसले. शुक्राचार्यांच्या ह्या कृतीवरूनच, एखादा मोठ्या स्थानावरचा व्यक्ती  आपल्या स्थानाचा दुरुपयोग करून छुपेपणाने एखाद्या चांगल्या कार्याच्या आड येऊ लागला की त्याला ‘झारीतला शुक्राचार्य’ असे म्हणण्याचा वाक्प्रचार रूढ झाला.) झारीतून पाणी पडेना असे पाहून  वामनाने  दर्भाचे टोक झारीच्या भोकातून आत खुपसले. त्यामुळे आत  राहिलेल्या शुक्राचार्यांचा डोळा फुटला व ते चटकन मागे झाले व झारीतून पाणी वामनाच्या हातावर पडले. वामनाने बळी राजाजवळ, तीन पावले जागा मागितली. बळीने तीन पावले जागा दिली. वामनाने एका पावलात पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकला आणि “ तिसरे पाऊल कोठे ठेवू ?” असे विचारताच बळीने खाली वाकून आपले मस्तक पुढे केले व तिसरे पाऊल मस्तकावर ठेवायला सांगितले. वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडले. मात्र त्याच्या दानशूरपणावर खूश होऊन वामनाने त्याला पाताळाचे राज्य दिले.  वरील सर्व घटना धनत्रयोदशी ते अमावास्या ह्या तीन दिवसांत  घडली.  नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले, तेव्हा बळी म्हणाला, “देवा, मी फक्त माझ्या प्रजेसाठी एक वर मागतो : ह्या तीन दिवसांत जो कोणी यमासाठी दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत  व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर रहावी.” वामनाने “ तथास्तु” असे म्हटले . तेव्हापासून दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली.अश्विन महिन्याच्या कोजागिरी पौर्णिमेपासून ते  कार्तिक महिन्याच्या त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत  पितरांना प्रकाश व आनंद देण्यासाठी आकाशकंदील टांगले जावेत, असा शास्त्रादेश आहे. 

दिवाळीच्या दिवसांपैकी प्रत्येक दिवसाबद्दल वेगवेगळ्या कथा देखील प्रसिद्ध आहेत. 
धनत्रयोदशी (धनतेरस)

धनत्रयोदशी (धनतेरस)
१. देवांचा वैद्य ‘धन्वंतरी’ ह्याच्या सन्मानार्थ ही तिथी साजरी  केली जाते. देवांनी आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा  त्यातून निघालेल्या अमृताचा कुंभ घेऊन प्रथम धन्वंतरी बाहेर आले. धन्वंतरी हे सुद्धा समुद्रमंथनातून बाहेर आलेले एक रत्नच होते.  धन्वंतरीने आयुर्वेद सांगितला. हजारो वर्षांपासून ह्या आयुर्वेदाचाच उपचार आपले भारतवासी करीत आलेले आहेत. अखिल भारतातले वैद लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व त्याच्या गौरवार्थ उत्सव साजरा करतात.
२. हेम राजाच्या मुलाचे लग्न होऊन चार दिवसही लोटले नव्हते.  तोच त्या राजपुत्राचा मृत्यू झाला. हेम राजाच्या घरात सर्व लोक दुःखाने  आकांत करू लागले. यमराजाचे दूत त्या राजपुत्राचे प्राण न्यायला आले  तेव्हा त्यांचेही अंतःकरण द्रवले व आपण याचे प्राण नेऊ नयेत असे त्यांना वाटले. यमराजाला हे कळले तेव्हा तो स्वतः तेथे आला. त्याला असे दृश्य दिसले की आपले दूतच रडत बसले आहेत. यमराजालाही ते सर्व दृश्य बघून फार वाईट वाटले. शेवटी थोडा वेळ विचार करून यमराजाने सांगून टाकले की, “जे लोक आजपासून पाच दिवस (यमद्वितीयेपर्यंत) आपल्या घरासमोर रोज दिवे लावतील, त्यांना अपमृत्यूचे भय राहणार नाही.” ह्या घटनेवरून धनत्रयोदशीच्या दिवसापासून घरोघरी दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली.
व्यापारी लोक ह्या दिवसाला ‘धनतेरस’ असे म्हणतात. दुकानांची, तसेच घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी, घराची किंवा दुकानाचा सजावट, ह्या गोष्टी ह्या दिवसापासून सुरू होतात.

नरकचतुर्दशी : 

नरकचतुर्दशी : 
सामान्य लोकांच्या दृष्टीने दिवाळीची खरी सुरुवात नरकचतुर्दशीच्या दिवसापासून होते. लोक भल्या पहाटे उठतात, दिव्यांचा झगमगाट करतात, सुगंधी उटणे अंगाला लावून स्नान करतात व स्नान करताना पायाखाली  कारिंटे  चिरडून, आपण नरकासुरालाच पायाखाली चिरडले आहे, असे मानतात . सकाळी सकाळी दिवाळीचे पदार्थ खाऊन , नवीन कपडे घालून, दारासमोर रांगोळ्या काढून ,फटाके वाजवून आनंदात दिवसाची सुरुवात करतात व आप्तेष्टांच्या भेटी घेऊन हा दिवस साजरा करतात. 

प्राग्ज्योतिषपूर नगराचा राजा नरकासुर हा बलाढ्य होता. त्याने कित्येक देवांचाच नव्हे, तर देवांचा राजा इंद्र याचादेखील पराभव  केला. त्याने इंद्राला त्याच्या सिंहासनावरून हाकलून दिले व त्याची  छत्रचामरे हिरावून घेतली. तो अतिशय अन्यायी व जुलमी होता. त्याची प्रजादेखील त्यांच्या अत्याचारांना विटलेली होती. श्रीकृष्णाकडे जेव्हा नरकासुराविषयी अनेकदा तक्रारी आल्या, तेंव्हा त्याने नरकासुराचा वध करण्याचा निश्चय केला. त्याने नरकासुराचा वध  करण्यासाठी आपल्याबरोबर आपली पत्नी सत्यभामा हिला घेतले तिच्या हातून अश्विन वद्य चतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचा वध केला. ( मरताना नरकासुराने वर मागून घेतला की,” या दिवशी सर्वांनी पहाटे मगलस्नाने करावी व हा दिवस दिवे लावून साजरा करावा.” कृष्णाने “तथास्तु” म्हटले व तेव्हापासून नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे मंगलस्नान करण्याची व दिवे लावून दिवस साजरा करण्याची प्रथा पडली. नरकासुरावर विजय मिळविताच श्रीकृष्ण आणि सत्यभामा ह्यांनी नरकासुराने पळवून आणून बंदिवासात ठेवलेल्या सोळा हजार कुमारिकांची सुटका केली. त्या सोळा सहस्र कुमारिकांनी श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली व त्याला आपला पती मानले, अशीही कथा आहे.

अश्विन अमावास्या : लक्ष्मीपूजन  
ह्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम असतो. व्यापारी लोक दुकानातील जमाखर्चाच्या व देण्याघेण्याच्या वह्यांची पूजा करतात , घरोघरी लक्ष्मीची पूजा व प्रार्थना केली जाते.
वामनाने बळीराजाला पाताळात गाडून लक्ष्मीची सुटका ह्याच अमावास्येच्या  दिवशी केली, म्हणून लक्ष्मीच्या सुटकेचा आनंदोत्सव हा दिवस साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजन कसे करावे – 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी  प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन घालावे आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता व कुबेर यांची पूजा करावी, असा त्या दिवसाचा विधी आहे. 
केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळवलेला आणि त्याच मार्गाने खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, नैतिकता, प्रामाणिक श्रम असतील तिथे लक्ष्मी आकर्षित होते आणि वास्तव्य करू लागते. लक्ष्मी सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असून तिची आठ रूपे आहेत. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी ती आठ रूपे होत.
लक्ष्मीपूजनात धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे, चवळीच्या शेंगा वाहिल्या जातात. तसेच मसाला दूध आणि लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. मग पुढील मंत्राने तिची पूजा करतात –

कमला चपलालक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया |
पद्मा पद्मालया सम्पदुच्चै: श्री: पद्मधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरे: प्रिया |
या गतिस्त्वत्पपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ||
अर्थ – (हे लक्ष्मी,) तू सर्व देवांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणा-यांना जी गती प्राप्त होते, ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.लक्ष्‍मीपूजनाला लक्ष्मीसोबत कुबेराचीही पूजा केली जाते. कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आणि यक्ष किन्नरांचा अधिपती मानला जातो. कुबेराचा उल्लेख वैश्रवण असा केला जातो. बह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्य, त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असे सांगितले जाते. कुबेर हा संपत्तीचा रक्षण करणारा अशी श्रद्धा आहे. कुबेर हा शिवभक्त होता, म्हणून मंत्रपुष्पांजलीत त्याचा उल्लेख आढळतो. पूजमध्‍ये लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून पुढील मंत्राने त्याचेही ध्यान करतात –

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च |
भवन्तु त्वत्पसादेन धनधान्यादिसम्पद: ||

अर्थ – निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेने (मला) धनधान्यादी संपत्ती प्राप्त होवो.त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे.पुराणात असे सांगितले आहे, की आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व तिच्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तेथे ती आकर्षित होतेच; शिवाय, ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मी व कुबेर यांची पुढील मंत्राने प्रार्थना करायची असते.
कमला चपलालक्ष्मीश्चला भूतिर्हरिप्रिया |
पद्मा पद्मालया सम्पदुच्चै: श्री: पद्मधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरे: प्रिया |
या गतिस्त्वत्पपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ||
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च |
भवन्तु त्वत्पसादेन धनधान्यादिसम्पद: ||

लक्ष्मीपूजन केल्याने पूजकाच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते आणि त्याला दु:ख-दारिद्रयाची बाधा कधीही होत नाही, असे त्याचे फल सांगितले आहे.

बलिप्रतिपदा (पाडवा):
ह्या दिवशी विक्रम संवत् सुरू होतो. म्हणून ह्या दिवसाला नववर्षाची सुरुवात मानण्याची प्रथा आहे. व्यापारी लोक ह्या दिवसापासून  आपल्या नवीन व्यापारी वर्षाची सुरुवात करतात व नवीन जमा खर्चाच्या वह्या नववर्षासाठी उघडतात.
अत्यंत  पवित्र मानलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी  हा एक आहे. मुलीच्या लग्नानंतर तिची पहिलीच दिवाळी असेल तर तिचे आईवडील जावयाला व त्याच्या घरच्यांना बोलावून त्यांना पक्वान्नांचे जेवण करून आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन मुलीचा दिवाळसण साजरा करतात. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याचीदेखील प्रथा आहे आणि ओवाळणी म्हणून पतीने तिला एखादी तिची प्रिय वस्तू द्यावी अशी प्रथा आहे . 

बळी राजाला वामनाने पाताळात गाडले, परंतु त्याच्या दानशूरपणावर  वामन (म्हणजेच विष्णू ) इतका प्रसन्न झाला की तो बळीला म्हणला तुझा अलौकिक दानशूरपणा पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे.मी तुला पाताळाचे  राज्य देतो व तुझी सेवा करण्यासाठी मी स्वतः तुझ्या महालाचा द्वारपाल  होतो. एवढेच नव्हे, तर लोक आजच्या ह्या दिवसाचे तुझ्या  नावाने स्मरण करतील व त्याला बलिप्रतिपदा असे म्हणतील.” तेव्हापासून हा दिवस ‘बलिप्रतिपदा’ ह्या नावाने साजरा होऊ लागला.  

यमद्वितीया (भाऊबीज) : 


यमद्वितीया (भाऊबीज) : 
ह्या दिवशी बहीण भावाला ओवाळते व भाऊ तिच्या ओवाळणीत  भाऊबीज म्हणून काही पैसे किंवा तिला आवडणारी भेटवस्तू ठेवतो. ह्या दिवशी भावाने आपल्या घरी पत्नीच्या हातचे न जेवता बहिणीच्या घरी जेवले पाहिजे, असा शास्त्रादेश आहे !
ह्या बाबतीत अशा कथा आहेत :
१) यम हा नेहमीच कामात असतो. त्याला आपल्या बहिणीकडे  जायला वेळ मिळणे कठीण. परंतु एकदा तो कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या  दिवशी आपल्या बहिणीकडे गेला. भावाच्या अचानक येण्यामुळे बहीण यमी अत्यंत आनंदित झाली. तिने त्याला पंचारतीने ओवाळले व स्वतः अन्न तयार करून त्याला जेवू घातले. यमाने देखील आपल्या लाडक्या बहिणीला  वस्त्रालंकारांची भेट दिली. यम-यमीचे जे बंधुप्रेम त्यांच्या भेटीच्या वेळी प्रकट झाले त्याचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न म्हणून भाऊबीजेचा सण आपण साजरा करीत असतो.
२ ) यम मृत्यू पावला तेव्हा यमीला इतके दुःख झाले की तिचे अश्रू अवरेनात. दिवस संपला ह्या गोष्टीचेसुद्धा भान तिला राहिले नाही. दिवस संपल्याचे तिला कळावे म्हणून देवांनी मुद्दाम रात्र निर्माण केली . मग यमीचा दु:खावेग हळूहळू शांत झाला. तेव्हापासून यमीचे बंधुप्रेम सूचित करण्यासाठी भाऊबीज साजरी करण्याची प्रथा पडली. भाऊ यमपाशातून वाचावा ही ह्या दिवशी प्रत्येक  बहिणीची मन प्रार्थना असते.

यमुना नदीत ह्या दिवशी स्नान करणे अत्यंत पवित्र समजतात. भाऊ नसल्यास चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळण्याची प्रथा आहे .  हिंदु ,धर्मीयांच्या सर्व सणांमध्ये दिवाळी हाच जास्तीत जास्त आनंदाचा सण आहे. आपली सर्व दुःखे विसरून प्रत्येक हिंदू ह्या सणात आनंद लुटत असतो. धनत्रयोदशीच्या आणि बळीराजाच्या कथेमुळे  निदान ह्या दिवाळीच्या दिवसांत तरी आपल्यावर काही विघ्न येणार नाही, असा विश्वास त्याला मनोमन वाटत असतो.  दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरात नवीन वस्तू येतात, घरातील माणसांच्या अंगावर नवीन कपडे वा अलंकार चढतात, गोडधोड खायला मिळते, नातेवाइकांच्या भेटीगाठी होतात आणि जीवनात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होते.

 

– थिन्कमराठी.कॉम Team 

 आधार – भारतीय संस्कृतीकोश 
             पुस्तक – सण आणि सुट्ट्या  

Pc:google

Main Menu