“बाल—राम “©️ अनुजा बर्वे.
“बाल—राम “
‘बलराम’ लिहायच्याऐवजी चुकून ब ला काना लागलाय का ?🤔
की ,
‘लहानगा राम’ म्हणायचंय ?
नक्की कशाबद्दल लिहायचंय 😲
शीर्षकावरून असे प्रश्न उद्भवणं सहाजिकै !😊
पण….
माझ्या ‘बाल’पणातला ‘राम’ अचानक आठवतोय आज, म्हणून हे शीर्षक !😊
म्हटलं आज,
रामनवमी आहे नि आठवतंय काहीबाही 😛 ,
तर लिहितेच !!😀
लहानपणी खाऊ शेअर करतांना हातातून लिमलेटची गोळी , बिस्किट इ.काही खाली पडलं तर लगेच उचलून , लागलेली माती झटकून मैत्रिणीला प्रश्न जायचा ,
राम की भूत ?
( मनात ‘राम’ म्हण,’राम’ म्हण ग्गं बाई असं चालायचं 😉)
नि तिनं राम म्हटलं की बिनधास्त खाऊन टाकायचं !!
असा हा राम फाॅर्म्यूला हायजेनिक म्हणून सर्वमान्य होता.😃
लहानपणी ह्या अशा गोड गोड गोळ्या वगैरे खाऊन नंतर तोंड धुवायला ‘अळंटळं’ केल्याने
‘दात-दुखी ‘ उद्भवायचीच केव्हांना केव्हा ! लवंग वगैरे दाताखाली धरण्याच्या घरगुती उपायाबरोबरच,
“तरी मी सांगत असते, दात वेळच्यावेळी नीट घासावे , पण ऐकायचं म्हणून नाही.🤨 जाऊन्दे, झालं ते झालं !लवंग धरल्येयस नं , आत्ता थोड्या वेळात वाटेल हं बरं! अगं रामराम म्हणत रहा मनातल्या मनात! “ असं आईचा सल्ला ठरलेला .🤓
आमच्या लहानपणी आम्ही मुलं ‘लहानच’ होतो.😉
म्हंजेs I mean, लगेच गुगल करून ‘God Rama’ असं काही करतो का ?
हे बघणं ही उपलब्ध नव्हतं अन् अशा शंकाही मनात येत नसत.
आईनं सांगितलंय तसं करायचं.
मनातल्या मनात राम केव्हाच साथीदार झालेला असे.😊
असंच दुसरं दुखणं म्हंजे’परीक्षे’चं!
मारूनमुटकून आई ‘अभ्यासाला’ तर बसवत असे पण अभ्यास खरा झालाय की हा ‘भासै’🤔हे नक्की न ठरवता आल्यामुळे पेपरची भीती नेहमीचीच !🙁
“ घाबरू नको. पेपर हातात येईपर्यत रामा चं नाव घे, मन आपोआप शांत होईल नि सगळी उत्तरं छान आठवतील बघ !”
असं सांगत आई धीर देत असे.
वास्तविक वाचतांनाच धांदरटपणा झाला असेल तर राम तरी काय करणार ? पण…
असं मनात देखिल न येता मनातल्या मनात रामा चीही वरात निघे परीक्षेला!
परीक्षा संपली की सगळं पटांगण ‘आंदण’ दिल्यागत आम्ही मुलं तिथून निघायला राजी होत नसू.
भरपूर खेळायला परवानगी म्हंजे आमच्यासाठी ते राम राज्या चेच दिवस असायचे.
खेळात राज्य कोणावर हे ठरवणारी
“ राम राई साई सुट्यो” अशी खणखणीत आवाजातली चकण्याची पध्दत चुकत नसे कध्धीच !!
खरंतर राई म्हंजे वन, त्याची आठवण आनंददायी पटांगणावर का ?🧐
त्याआधी येणारा राम नि नंतर साई हे बाकी सगळ्यांना सोडवत कुणा एकावरच का राज्य देत असावेत ?🤔
नक्की काय अर्थ ह्या आरोळीचा ?
ह्यातला कोणताही प्रश्न मनाला स्पर्श करीत नसे.
अर्थ ठासून भरलेला असायचा तो राम साक्षी खेळातल्या ‘मज्जेत’! 😃😃
सुट्टी म्हटली की, रात्रीचा पत्त्याचा डाव नि नंतर गप्पागोष्टी ठरलेल्या.
गोष्टीत ‘भूत’ अंतर्भूत असणं मस्ट असायचं !
आमच्यापैकी कोणाचे ना कोणाचे दादा-ताई ह्या अशा गोष्टी सांगण्यात तरबेज असायचे.
(‘दादा-ताई’ दोघं 😳 असं आश्चर्य वाटू शकतं आता पण… .. घराघरात किमान ३ भावंडं असायची त्यावेळी😀)
पण मग भूताच्या भीतीवरचा रामबाण उपाय म्हंजे रामा चं नाव हेही ज्ञान त्या दादा-ताई लोकांकडूनच मिळे.
भीती वाटली तरी गोष्ट अर्धवट सोडवत नसे.
मग काय, जिन्यातून घरी जाईपर्यंत
भीती घालवायला तेवढ्या अंतरात राम नाम सोबत करत असे.🙏
“खाणं असो की दुखणं,
खेळ असो वा भीती
राम आमुचा सखा
सहज होतसे सोबती “
अशा त्या मंतरलेल्या दिवसात माझ्या बाल मनात शंकाही येत असत कधीकधी !
“जोश्यांना ‘पत्र्याचं कार्ड’ मिळालं दूधाचं ! परमनंट्ट !!आज राम प्रहरीच भेटले , तेव्हा म्हणले. जमतं ब्वाॅss एकेकाला”
शेजारचे काका बाबांना सांगत असतांना एकदा ऐकलं मी !
(‘दूधाची ददात’ मिटवणारया त्या पत्र्याच्या कार्डाला ‘सोन्या’इतकं महत्व असण्याचा काळ तो ! 😄
आताच्या ‘पिशवी’ दूधग्राहकांना कल्पनाही येणार नाही एवढं ‘स्टेटस’ असायचं त्या कार्डाला😛)
“आईगं , राम प्रहर म्हंजे कोणता ?”
“ सक्काळी ढाराढूर झोपेतून उठण्याचा ज्यावेळेस विचारही मनात येत नाही तुझ्या तो !! कसा दिसणार तुला 🤨?”
सूर जरी अंमळ चिडका होत असला आईचा तरी त्यात लटकेपणा अधिक असायचा.
नि तिच्या राज्यात जे राम पारी
झोपेचं सुख अनुभवलं त्याला तोड नाही, अगदी मनमुराद नि विनाचिंता 😌😌
“अगंबाई, ३ नंबर मधल्या मावशींनी झोपेतच राम म्हटलं म्हणे ! खरोख्खर भाग्यवान हो !!”
आई शेजारच्या वहिनींना सांगत असतांना ऐकलं जेव्हा मी तेव्हा गोंधळून गेले होते प्रथम !!
‘नाव तर रामा चं घेतेय मग आवाज गंभीर का ? ‘
पण हा प्रश्न विचारायचं काही धाडस झालं नव्हतं मला तेव्हा.
( मुलांचं शंकानिरसन सविस्तर नि शांतपणे करावं हे बालमानस शास्त्र
आचरणात येण्यापूर्वीचा काळ होता तो😶)
हळु हळु आपसुक काही गोष्टी कळत गेल्या.
वाढत्या वयानुसार ,
रामराम जोडून आला की होणारा ‘नमस्कार’ 🙏 नि
एकदाच म्हंजेss एकदाचं राम म्हटलं की होणारा अनर्थ
ह्याचीही उकल होत गेली.😊
आयुष्याचा तिसरा टप्पा नातवंडांमध्ये ‘बालपण’ शोधतो असं म्हणतात.
पण….
आताशा लेकरं मोठी होऊन प्रगतीसाठी देशाबाहेर झेप घेण्याचा ट्रेंड असल्याने, अवतीभवतीचं ‘बालपण’ हरवत चाललंय.
तेव्हा लक्षात येतं ,ह्या वयात सकारात्मक रहाण्यासाठी ज्या रामा चा शोध पोथीपुराणात जाणीवपूर्वक घ्यावा लागतो तो सखा लहानपणी कळत-नकळत आपल्या किती सहज जवळ असे.😊
अशाच किंचितशा निराश टप्प्यावर
आज रामनवमीच्या दिवशी बालपणीचा राम भेटला नि मनाला एक वेगळीच उभारी आली.
©️ अनुजा बर्वे.