यु-नळी ! एक सखी !!©️ अनुजा बर्वे.
“ काही पर्वाच नाही मी काय सांगतोय त्याची! काय विचारतोय मी ?ओह्ह ! बघावं तेव्हा हिचे कान भरलेले! “
आणखीही काहीतरी पुटपुटत , ड्रॅावरमधलं पाकीट काढून घेऊन खिशात टाकून चपला सरकवल्यानंतर जोरात लॅच ओढल्याचा आवाज आला नि इकडची स्वारी घराबाहेर पडलेय ह्यावर शिक्कामोर्तब झालं.
आहा ! खर्रच सांगते , ह्यांचं पहिलंच वाक्य मनाला अंमळ गुदगुल्या करून गेलं.
का नाही होणार हो ?
तुम्हाला म्हणून सांगते, * तू सिर्फ कर्म कर* ह्या कृष्ण शिकवणीसारखं, माझं आपलं खूपदा इकडच्या स्वारीला काहीबाही सांगणं ,( म्हणजे कधी एखादं छोट्टसं गॅासिप, कधी मनाच्या आतल्या कप्प्यातलं नि इतरही …) नि तिकडून अव्याहतपणे ह्या हितगूजांना (?) * बेपर्वा* ट्रीटमेंट मिळणं हे अन्नेक वर्ष चालत आलंय.
( नाही, म्हणजेsss तसं घरोघरी हे कॅामनै !
“ हं , बोल की! ऐकतोय मी !! “ न्यूज चॅनेल म्यूट करून * निमूट* पणे संवाद साधणारे ऐसे पति देवचि ललनांना ! हो नं ? )
‘बेपर्वाईमें कितना गम होता है जान गए जी?’ असं मनातल्या मनात विचारतांना ( म्हणून तर हिंदी भाषा) अगदी सुखद झुळुक आल्यागत झालं.
पण…..
.आताशा नाहीच्च वाईट वाटून घेत मी.
अर्थात् ह्याचं पूर्ण श्रेय * यु-ट्युबला* नि कानात लावलेल्या त्या पांढरया पिटुकल्या * लव्ह बर्डस्* ना ( Air pods असं नावै त्यांचं हे शिकलेय मी !)
‘ काहीही काssय ? म्हणे * कान भरले*
स्वारींचं हे म्हणणं जरा खटकलंच मला. कित्ती वेगळा अर्थय त्याचा !’
खरंतर ऐकू आलेली स्वारींची सगळीच वाक्यं मी एन्जॅाय केली . होय ! अजूनही( ? म्हणजे ज्ये. ना. असूनही ) कान भलतेच तिखट आहेत हं अस्मादिकांचे !
लेकीची गिफ्टै ही- *मोबाईल * नि जोडीने
* Air pods* ची जोडी !
‘आई, ऐक जरा माझं. बिनधास्तपणे लगेच वापरायला सुरवात कर’ अशी तिची सूचनाही आली वरून !
होय हो !
भेट आली ॲमेझॅान वरूऩ , सूचना आली फोन * वरून* नि ह्या भेटवस्तुमुळे जे ऐकत असते ते येतंय यु-ट्युब वरून !
( पूर्वी कसं की , पापड हवे तर फळी * वरून* डबा कढायची तसदी घ्यावी लागे, झाडा खालून सावधपणे जावं लागे वरून पक्ष्यांचा प्रसाद मिळेल ह्या चिंतेने, आणि…
अकस्मात् * वरून * बोलावणे आले म्हणजे तर दुःखाचा डोंगरच ! तर…
असा एकंदरीतच त्रासदायक असलेला
* वरून* आताशा खूप्पच बदललाय. ☺️)
तर..* यु-ट्युबवर * मस्स्सतपैकी द्रुत लयीतलं * जागू मै सारी रैsssना…* ऐकता ऐकता हात झरझर कीचन-पसारा आवरत होते नि तेवढ्यात हा खाटकन् * लॅच-ओढ प्रसंग * घडला.
‘तुम्ही वॅाक घेऊन या हवं तर पण आज बाहेरून काहीही आणायचं नाहिये’ अशी सूचना मी आधी दिली तेव्हा स्वारी आयपॅड वर पेशन्स खेळण्यात गर्क * असल्यामुळे माझी सूचना *व्यर्थ गेली.
हुं s ! पहा, स्वारींचे * कान रिकामे * असूनही काही उपयोग झाला ?
त्यापेक्षा * भरल्या कानांनी यु-ट्युब* ऐकावं की !
राजकारण , समाजकारण, मनोरंजन, रेसिपीज् , हेल्थ-टीप्स …अस्सं ‘उपयोगी’ , ‘धमाकेदार’ पॅकेज अस्तंय तिथे !
साधारणतः * ट्यूब* म्हटलं की पाण्याने भरलेली नळी ( पाणी-टंचाईमुळे माझ्या लहानपणीच्या आठवणींमधली नळी अनेकदा पाणी-प्रतिक्षेत असे.) किंवा गॅस वहन करणारी नळी नजरेसमोर येत असे. नंतर ऐकलं की * यु-ट्युब* असंही एक प्रकरण अस्तं पण ते कळण्यासाठी * स्मार्ट* असायला हवं, आपण स्वत: नि फोनही !
खरंतर कॅालेजमध्ये असतांना * यु-ट्युब* हाताळली होती . पण तेव्हा ती द्रव पदार्थाच्या पातळीचा समतोल दर्शवणारी परिक्षानळी असल्यामुळे जुळवून घेतलं तरी तिच्याशी काही मैत्रीबित्री झाली नाही.
पुढे जाऊन भविष्यात, आपणही असं थोडंथोडं * e- स्मार्ट* होऊ नि * कोणत्याही पातळीवरचं* ( म्हंजे खर्रच अगदी कोणत्याही बर्रका ) ज्ञान-माहिती भांडार घेऊन एक * यु-नळी * आपली सखी होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं हो !
तसं तर ७/८ वर्षांपूर्वीच * स्मार्ट फोन * आला हाती पण फोन-भ्रमंतीसाठी हातात वेळ अत्यंत कमी नि ह्या * e- world* मधली अस्मादिकांची इयत्ता अगदीच प्राथमिक पातळीवरची ! शिवाय प्रापंचिक जबाबदारया पार पाडता पाडता सुरू केलेला हा
* शिक्षण-प्रपंच* तसा हळुहळुच आकार घेत होता.
‘इतकी छान चर्चा आहे * यु-ट्युबवर* त्यांच्या अभिनय-अनुभवांची’ किंवा
‘त्या नाटकाचा व्हिडिओ आहे ॲव्हलेबल * यु-ट्युबवर* ‘
किंवा मग
‘ ही रेसिपी यु-ट्युब * वरून* शिकले मी’
अशा आशयाच्या हळुहळु कानावर पडणारया वाक्यांनी ह्या
* यु-नळी* बद्दलचं कुतुहल वाढतच गेलं.
आता * ट्यूब * म्हटलं तर ती * आत * काहीतरी सामावून घेणारी असते नि ह्या ट्यूबच्या बाबतीत सगळे * वर* हे प्रेपोझिशन का वापरतायत ? असा एक बाळबोध प्रश्नही मनात डोकावे सुरवातीला .
पण …….
हळुहळु ह्या * यु-ट्युब* च्या रंगांचा ( नि भडक ढंगांचाही ) बोध होत गेला नि बघता बघता आम्हा दोघींचे सूर जुळु लागले की हो ! शिवाय हे * मैत्र * फुलवायला गेल्या पॅण्डेमिकच्या २ वर्षांनी कॅटॅलिटिक एजंट सारखं काम केलं म्हणाना !
* यु-ट्युब* ॲान करावं, कान भरावे ( Air pod ने हं ) पदर बांधावा नि कीचनमध्ये शिरावं- राजकारणी व्हिडिओ लावावा नि खुशाल वाल पापडी-गवारी मोडाव्या *किंवा कोबी *तासावी-चिरावीकिंवा-
मस्त स्पीडी गाणी चालवावीत नि लय-तालात पोळ्या लाटाव्या किंवा मग –
विरोधी पक्षांना धो डालणारं संसदेतलं आत्मविश्वासभरं भाषण ऐकतांना खुशाल आवराआवरीचं पाणी लोटावं ओट्यावर
कीचनवर्क * सुसह्य* करते हो ही सखी !
मनमोकळेपणाने बोलतेचै तर तुम्हाला सांगावंसं वाटतंय आज . मी एकत्र कुटुंब पध्दतीतली नव- सासुरवाशीण असतांना TV हे
‘दृक् -श्राव्य’ माध्यम माझ्या सदैव कीचन कामामुळे श्राव्य च ठरत असे.
काश् ! ही यु-नळी तेव्हा असती !!☺️
( चिडचिड अंमळ कमी झाली असती हो!)
आता सातत्याने राजकीय विश्लेषण ऐकतांना वाटतं की ,
* कीचन पॅालिटिक्स* म्हणजेही असंच स्मॅालेस्ट व्हर्जन म्हणता येईल की !
अर्रे ! तेव्हा ही * सखी* असती तर तसं
* खास राजकीय टचवालं चातुर्य* वाढलं असतं कदाचित् !
ह्या सखीची गंमत अशी की खर्रच ‘ सेक्युलर ‘ आहे ही !
हेवी कॅलरी वाल्या रेसिपीशी ‘गळाभेट’ करते नि लगेच डाएट कंट्रोलच्या व्हिडिओशी हातमिळवणीही !
डाव्या हाती ‘भक्तियोग’ प्रवचन लावेल तर उजव्या हाती ‘…क्स ताकद वृध्दी ची जानकारी’
बालगोपाळांसाठी गोष्टीवेल्हाळ व्हिडिओपाठोपाठ वृद्धाश्रमाची ओळखपर सैर घडवण्यातही ही माहिर आहे.
* यु- नळी * ही ट्युब नसून एक जग आहे असंही म्हणावंसं वाटतं कैकदा आणि जग म्हटलं की भलं-बुरं असायचंच !
SO चांगलं ते ग्रहण करायला उपलब्ध करून देणारया ह्या माझ्या सखीच्या वैविध्याचं वर्णन करायची माझी तर क्षमताच नाही खरं म्हणजे !
आयुष्याच्या ह्या तिसरया टप्प्यावर बसल्या जागी जग फिरवून आणणारया, e- वर्ल्ड शी जुळवून घेणं सोप्पं व्हावं म्हणून अपडेट करणारया नि भवतालाचं भान देणारया ह्या * यु- ट्युब* वर
लिहावं असं अनेक दिवस मनात होतं.
आता लिहिता लिहिता * भान * अंमळ सुटलं असेल तर तुम्ही समजून घ्यालच की ! * सखी साठी कायपण !* हो नं ?
अर्रे हो ! भान म्हटल्यावर लॅच ओढल्याचा आवाज आठवला.
आता एखादी चटपटीत ( पण पटकन होणारी हं ) रेसिपी शोधते स्वारींची मर्जी राखायला.
* यु-सखी * आहेच मदतीला ! ☺️☺️
काय म्हणता ?
हो हो ! त्या Air pod च्या जोडीला बंद करून टाकलंय त्यांच्या कुपीत ! ( टेम्पररी हं !)
©️ अनुजा बर्वे.
फोटोः नेट सौजन्य