शिवकालीन मराठी (लेखांक ८)

आत्तापर्यंत आपण मराठी भाषेची उत्पत्ती व विकास बघताना अनेक कवींच्या लेखनातून प्रगट झालेले मराठी भाषेचे स्वरूप पाहिले. गेल्या लेखांकांमध्ये बहामनी काळात मराठी भाषेवर झालेला फारशी भाषेचा परिणाम व त्याची उदाहरणे पाहिली. आजच्या लेखात शिवकालीन मराठीचे रूप कसे होते हे पाहूया. शिवकालीन मराठीचा कालखंड साधारणतः१६०० ते १७०० असा मानतात .हे मराठी भाषेचे तिसरे अवस्थांतर मानतात. यादवकालीन शुद्ध मराठी त्यानंतर बहामनीकालीन आणि नंतर शिवकालीन मराठी अशी या भाषेची स्थित्यंतरे आहेत.
शिवकालीन मराठीत स्वर व्यंजन विभक्ती प्रत्यय क्रियापदे यांच्या स्वरूपात बदल झालेला दिसतो. शिवकालीन काही प्रयोग विशेष पाहूया.

१)गनिमास घेरा केले २)जिवे मारिला गेला ३)गावगना हिंडोन संचणी करा. ४)कार्य प्रयोजन लिहीत जाणे ५)शिरजोरी करणे ६)परागंदा होऊ लागलेत.

शिवकालात जी राज्यक्रांती झाली त्यामुळे मराठीला तिचे स्वत्त्व मिळाले. मराठीचे मराठी पण राखण्यास साधुसंतांची कामगिरी कारणीभूत झाली. शिवकालात शहाजीराजे यांच्या आश्रयाखाली असलेल्या ३५ कवींची यादी जयराम पिण्डये यांनी दिली आहे. शिवाजी राजांनी कवी भूषण याला राजाश्रय दिला. संत तुकारामांच्या कीर्तनात राजे तन्मय झाले. रामदासांच्या चरणी तर त्यांनी आपले राज्यच अर्पण केले. शाहिरांना उत्तेजन दिले. जिजाऊ मातोश्रींनी अगिन दासांना बोलावले तेव्हा त्याने अफजलखानाच्या वधाचा पोवाडा गायला म्हणून त्याच्या हातावर दोन सोन्याचे लंगर (कडी) चढवली व एक गाव बक्षीस दिला. याशिवाय या काळात मुक्तेश्वर ,शिवकल्याण ,संत तुकाराम, मोरया गोसावी ,गणेशनाथ, सेना न्हावी ,वामन पंडित , विठ्ठलदास अशा कितीतरी जणांनी मराठी भाषेत मोलाची भर घातली. याशिवाय वेण्णाबाई ,बहिणाबाई या स्त्रिया सुद्धा मराठीत कवने करत होत्या.

तरीही दरबारात घरीदारी फारशी शब्द वापरले जात होतेच.  हे शब्द खड्यासारखे निवडून काढून टाकण्याकरता राजदरबारात नेहमी लागणाऱ्या शब्दांचा राज्यव्यवहार कोश करण्याची आज्ञा महाराजांनी रघुनाथ पंडित यांना दिली. अशा रीतीने मराठीच्या शुद्धीकरणाचा हा पहिला उपक्रम केला गेला.
मराठी भाषा टिकून राहिली याचे आणखी एक कारण म्हणजे सन १५२९ मध्ये बुऱ्हाड निजामशहाने महाराष्ट्र ब्राह्मण आपल्या दिवाणगिरीवर नेमला. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीत ब्राह्मणी कारकुनाच्या फर्डेशाहीला  चांगला भाव मिळाला. सन १५५५ मध्ये इब्राहिम आदिलशहा विजापूरच्या गादीवर बसला. तो मराठ्यांच्या शौर्याचा चाहता होता. त्याने मोठमोठ्या हुद्यांवर मराठ्यांची योजना केली. दरबारात मराठ्यांचा शिरकाव झाला. इतकेच नाही तर सर्व बादशाही दप्तर मराठीत ठेवण्याचे बादशहाचे फर्मान निघाले. अनेक मराठी मुत्सद्दी दरबारात आले. या परंपरेचा आद्य प्रवर्तक हेमाद्री पंत होता.
आता काही शिवकालीन मराठीचे नमुने पाहूया.

फादर थॉमस स्टीव्हन्स (१५४९ ते १६१९)
जन्माने इंग्रज. जन्म बोस्टन येथे.  गोव्यात त्यांनी मिशनरी कार्याला सुरुवात केली. मडगाव जवळ कुंकोळी गावात ख्रिस्ती आणि हिंदू या दोन भिन्नधर्मीय लोकांत मारामारी झाली.  त्यात ख्रिस्ती धर्माचे चार धर्म पंडित मारले गेले. त्यांना दफन करण्याची वेळ फादर स्टीफन्स यांच्यावर आली. धर्म जर परस्पर प्रेमाची शिकवण देतो तर मग अशा घटना का होतात ,या विचारातून त्यांच्या ‘क्रिस्तपुराण’ या काव्याचा जन्म झाला.
फादर स्टीफन्स सारख्या एका परदेशी व्यक्तीने इतके सुंदर मराठी काव्य लिहावे याचे सर्वांना आश्चर्य वाटते. त्यातील अर्थ ,उपमा ,अनुप्रास, अलंकारही वाखाणण्याजोगे आहेत. ‘दोस्तीन क्रिश्तां आणि ‘कोकणी भाषेचे व्याकरण’ ही त्यांची आणखी दोन पुस्तके आहेत.
फादर स्टीफन्स यांच्या मराठी भाषेचे सुंदर वर्णन करणाऱ्या काव्यपंक्ती बघूया.

जैसे हरळान माजी  रत्न किळा । की रत्नां माजी हिरा निळा ।
तैसी भाषा माझी चोखळा।  भाषा मराठी।।
जैसी पुस्पां माझी पुस्प मोगरी। किं परिमळा माजी कस्तुरि ।।
तैसी भाषां माजी साजिरी ।भाषा मराठी।।
पाखियांमध्ये मयोरु (मोर) ।  वृक्षांमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये सानु थोरू। मराठीयेसी।
तारांमध्ये बारा रासी। सप्तवारांमध्ये रवि- शशि
या दिपिंचेया भाषांमध्ये तैसी। बोली मराठी।।

संत मुक्तेश्वर – संत एकनाथ महाराजांचा नातू होता.
संत एकनाथांच्या मुलीचा मुलगा. त्यांचे आराध्य दैवत दत्त होते. कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई. कुलदैवत- सोनारीचा भाई भैरव.
मुक्तेश्वर यांनी भरपूर ग्रंथरचना केली.१७२२ ओव्यांचे सात कांडे असलेले रामायण लिहिले. ते विविध अक्षरगण  वृत्तात लिहिले असून यमक, अनुप्रास,  श्लेम इत्यादी शब्दालंकारांवर भर आहे. मुक्तेश्वराची कीर्ती त्याच्या भारतीय पर्वांमुळे आहे त्यापैकी आदि, सभा,वन ,विराट आणि सौप्तिक पर्व ही पाच पर्व उपलब्ध आहेत.

मुक्तेश्वरांनी केलेले अरुणोदयाचे वर्णन पाहूया.
पूर्व दिशेने क्षालिले (धुतले) मुखां।
कुंकुम रेखीले त्या तिलका।
भार्गवाचार्य उदया येत। तव अपार क्रमुकियांं पंथ।
पुढे जान्हवी जळाचा वात । शीतल मंद पातळा।।
कुक्कुट रवा करितां काका । भये पळ सुटला आलुका।
भोग द्यावया  चक्रवाका। ​चक्रवाकी चालल्या।।

संत तुकाराम (तुकाराम बोल्होबा आंबिले)
जन्म- २१ जानेवारी १६०८- निर्वाण  १९ मार्च १६५०
केशव चैतन्य महाराज हे त्यांचे गुरु होते.  संत तुकाराम वारकरी संप्रदायाचे होते.  तुकारामांच्या गाथेत ५००० च्या पेक्षा जास्त अभंग आहेत.  तीर्थक्षेत्र देहू.  व्यवसायाने ते वाणी होते . पत्नीचे नाव आवली.  महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई ही त्यांची अपत्ये.  तुकारामांचे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे.  त्यांच्या काव्यातील गोडवा आणि भाषेतील रसाळपणा अतुल आहे.  ते सदेह वैकुंठाला गेले असे म्हणतात.
अभंग
कन्या सासुरासी जाये।  मागे परतोनि पाहे ।। 
तैसे जाले माझ्या जीवा । केव्हा भेटसी केशवा ।।
चुकलिया माये  । बाळ हुरू हुरू पाहे ।।
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी ।।

संत रामदास स्वामी

नाव नारायण सूर्याजी ठोसर
जन्म २४ मार्च १६०८
गाव – जांब (जालना)
निर्वाण – १३  जानेवारी १६८१
गुरु- प्रभू रामचंद्र
भाषा – मराठी
रचना- दासबोध, मनाचे श्लोक
वडील – सूर्याजीपंत ठोसर
आई – राणूबाई ठोसर

समर्थ रामदासांचा जन्म रामनवमीच्या मुहूर्तावर मध्यांनी झाला.  समर्थ लहानपणापासून बुद्धिमान, निश्चयी व खोडकर होते.  वयाच्या दहाव्या वर्षी लग्न ठरवले.  शुभमंगल सावधान यातले  सावधान शब्द ऐकताच रामदास स्वामी भर मंडपातून पळाले.  मग त्यांनी पंचवटीला श्रीरामाचे दर्शन घेतले.  दीर्घ तपश्चर्या केली. त्यावेळी रोज १२०० सूर्यनमस्कार घालत. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा जप करीत.  रामनामाचा १३ कोटी वेळा जप केला. त्यानंतर वेद, उपनिषदे ,प्राचीन ग्रंथ यांचा अभ्यास केला.  रामायणाची रचना केली.  करुणाष्टके लिहिली .टाकळी येथे त्यांनी हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली.  मग १२ वर्षे भारत भ्रमण केले.  संपूर्ण हिंदुस्थानातील जनस्थितीचे निरीक्षण केले.  त्यांची  शिखांचे गुरु हरगोविंदसिंह यांच्याशी भेट झाली होती.  ते नेहमी दोन तलवारी बाळगत.  एक धर्मरक्षणासाठी आणि दुसरी स्त्रीरक्षणासाठी.  ते पाहून समर्थांनी पण शस्त्र बाळगण्याला सुरुवात केली.  त्यांच्या कुबडीमध्ये छोटी तलवार असे. आजही ती सज्जनगडावर पाहायला मिळते.
तरुणांनी संघटित व्हावे , बलोपासना करावी. म्हणून समर्थांनी अकरा मारुतींची स्थापना केली ठिकठिकाणी मठ स्थापन केले.

अंतिम ५ दिवस समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले होते. याच काळात तंजावर येथून श्रीरामपंचायतन मूर्ती आल्या. समर्थांनी त्यांची पूजा केली.  अंतिम दिवस ते पद्मासन घालून बसले. ३ वेळा जय जय रघुवीर समर्थ असा घोष केला आणि त्यांचा आत्मा पंचत्वात विलीन झाला.

संत रामदासांचा अभंग
राघवाची कथा पतितपावन
गाती भक्तजन आवडीने । 
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा
कैलासींचा राणा लांचावला ।

देवांचे मंडण  भक्तांचे भूषण

धर्मसंरक्षण राम एक ।

रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे 
कथा निरुपणे  जन्म गेला ।।

संत बहिणाबाई पाठक

जन्म इसवीसन १६२८ –  मृत्यू २ ऑक्टोबर १७००

संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील स्त्री संत कवियत्री.  त्या संत तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांच्या पित्याचे नाव आऊजी. आईचे नाव जानकी.  त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचा विवाह रत्नाकर पाठक यांच्याशी लावून दिला. घरी ,दारी , शेतात काम करताना त्या अखंड पांडुरंगाचे नामस्मरण करत. नंतर त्या तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या.  त्यांनी तुकोबांना गुरू मानले होते.  पण तुकोबांचे वैकुंठ गमन झाल्यामुळे त्यांना गुरुचे दर्शन झाले नाही.  त्यांची निष्ठा पाहून तुकोबांनी त्यांना कार्तिक वद्य ५ शके १५६९  रोजी स्वप्नात येऊन दर्शन दिले व गुरुपदेश केला.
असे म्हणतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्व १२ जन्मांचे स्मरण होते हा त्यांचा तेरावा जन्म होता आपल्या १२ जन्मांचे वर्णन केलेले ९५ अभंग त्यांनी आपल्या मुलाला सांगितले.  त्यांचे एकूण ७३२ अभंग उपलब्ध आहेत. त्यापैकी हा एक प्रसिद्ध अभंग.-

संत कृपा झाली  इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया , उभारिले देवालया ।
नामा त्याचा किंकर, तेणे विस्तरिले आवार ।
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत ।
तुका झालासे कळस भजन करा सावकाश ।
बहिण फडकती ध्वजात तेणे केले होजा ।।

श्री शिवाजी राजे
इसवी सन १६५५
गद्य उतारा

यशहुरल  इजरती राजश्री जिवाजी  विनायक सुभेदार व कारकून सुबे मामले प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत.
दौलत खान व दारियासारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुर्वे मजकुरावरी दिधल्या , त्यास तुम्ही काही पावले नाही म्हणून कळॊ आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील. तुम्हास  समजले असेल की याला ऐवज कोठेतरी खजाना रसद पाठविलीया मजरा होईल म्हणत असाल, तरी पद्यदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी पाणी,फाटा आदि करून सामान पावावे.  या कामास  सामान वेगाने पवावेते नाही. पद्मदुर्ग हबशी  फौजा चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. येवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद  पाठवून मजरा करू म्हणाल त्यावरील साहेब रिझतील का काय ?  न कळे हबीसियांनी  काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतिल तरी अशा चाकारास ठाकेठीक केले पाहिजेत. आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे.  याउपरी बोभाट  आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस यैसे जाणून बरा नातीजा  तुम्हास पावेल.  ताकीर असे. रवाना. 

या आधी फादर स्टीफन्स, संत तुकाराम, मुक्तेश्वर ,संत बहिणाबाई, संत रामदास आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे पत्र यांची कवने व उतारा दिला आहे.  यावरून तत्कालीन मराठी सहज कळते.  त्यामुळेच या शिवकालीन मराठीत काव्याचा अर्थ मी सांगितला नाही.  तो सहज समजणार आहे.  शिवाजी महाराजांनी आपल्या सेविकांना पद्मदुर्गाबद्दल ज्या सूचना केल्या आहेत त्या मात्र लक्षात घेण्याजोग्या  आहेत.  मोरोपंत पेशवे यांनी ऐवज पाठवला होता पण तो का मिळाला नाही याचा जाब महाराजांनी विचारला आहे.  पद्मदुर्गच्या मदतीला गेलंच पाहिजे असा हुकूम दिलाच पण त्याबद्दल काही गडबड गोंधळ झाला तर गय करणार नाही अशी ताकीदही महाराजांनी दिलेली आहे. हे विशेष.  शिवाजी महाराजांचे कर्तव्य कठोर, धीरोदात्त व्यक्तिमत्व वरील उताऱ्यावरून स्पष्ट होते. 

लेखिका – ©विद्या पेठे ,  मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu