मुलांतील वाढणारी व्‍यसनाधीनता……

मुलांतील वाढणारी व्‍यसनाधीनता…… 

लहान मुले व्‍यसन का करतात ताणतणावाचे नियोजनाचे माध्यम म्‍हणून:

तणावातून मुक्‍तता मिळवण्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी, एकटेपणा दूर करण्यासाठी. समस्या सोडवण्यासाठी आणि नकारात्‍मक गोष्टी विसरण्यासाठी: आर्थिक, लैंगिक, सामाजिक.

मजाथरार आणि आनंद अनुभवण्यासाठी : चांगले वाटण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, कंटाळवाणेपणा कमी करण्यासाठी, आपल्‍या रागाची पातळी वाढवण्यासाठी.

संगतीच्‍या आग्रहामुळे : स्‍विकार करण्यासाठी, लोकप्रिय होण्यासाठी, त्‍या संगतीच्‍या साच्‍यात रुळण्यासाठी, मित्रांचे लक्ष वेधण्यासाठी.

स्‍वत:ला कल्‍पनाविश्वात रमवण्यसाठी: व्‍यसन करणे म्‍हणजे फक्‍त आपली प्रतिमा झाकण्याचा प्रयत्‍न करणे असे नाही तर तो एक स्‍वत:ची वेगळी प्रतिमा बनवण्याचाही प्रयत्‍न असतो.

जोखिम अनुभवण्यासाठी किंवा विद्रोह करण्यासाठी : काहीवेळा व्‍यसन केल्‍यानंतर नेमके काय परिणाम होतात हे जाणून घेण्याची इच्‍छा असते किंवा जे काम नशा न करता करता येत नाही ते करण्याचा प्रयत्‍न म्‍हणून.

कुतूहल म्‍हणून : वेगवेगळा प्रयोग म्‍हणून, शारीरिक गरजांचे समज: वजन कमी करण्यासाठी, शरीर कसण्यासाठी.

मुबलक उपलब्‍धता: भारतात समाजात अगदी शाळेमधेही अपायकारक औषध मुबलक प्रमाणात उपलब्‍धतेच्‍या सहजतेमुळे.

व्‍यसन : व्‍यसनावर अवलंबत्‍व आले असल्‍यास, व्‍यसन न केल्‍यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी. औषधींचा दुष्परिणाम वापराचा बराच काळ झाल्‍यानंतरही हळूहळू जाणवतो. काही कमी कालावधीत उद्भवणारे दुष्परिणाम असतात पण ते झाकले जातात. झोप न येणे व चिडचिडेपणा या लक्षणांमुळे गोंधळात टाकणारी परिस्‍थिती निर्माण होते. बराच वेळ पालकांना आपल्‍या मुलांच्या व्‍यसनासंदर्भात फार उशिराने कळते.

आर्थिक परिस्‍थीतीमुळे लहान वयातच काम करण्याची वेळ अनेक मुलांवर येते. दिवसभर कचरा, भंगार गोळा करणे, तसेच गॅरेज, किराणा दुकानात काम करुन मिळणाऱ्या पैशांतून अनेक मुले नशा करतात. अशा मुलांच्‍या कुटुंबियांच्‍या उत्‍पन्नातून अन्न, वस्‍त्र, निवारा, शिक्षण, आरोग्‍य आदी मूलभूत गरजा भागत नाहीत. त्‍यामुळे नाईलाजाने मुलांना काम करावे लागते. काही मुले शिक्षणापासून दूर जातात अन् काही व्‍यसनाच्‍या आहारी जातात.

पालकांनी लक्ष द्यावे.

अनेक पालकांचे मुले काय करीत आहेत. मुलांकडील पैशांचे ते काय करतात, याकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष, अशी त्‍याची कारणे आहेत.

वेळीच उपचाराची गरज

लहान मुले आनुवंशिकतेतून आणि परिसराच्‍या वातावरणातून नशेखोर होत असतात मद्यपी अथवा कोणत्‍याही प्रकारची नशा करणाऱ्या वडिलांची मुलांमध्ये अटेन्‍शन डिफेक्‍टेड हायपर (एडीउचडी)  हा आजार आढळतो. या आजाराची मुले अतिचंचल असतात, अशी मुले व्‍यवनाधीनताकडे पटकन वळतात. ती मुले बालपणापासूनच आयोडेक्स, व्‍हाईटनर, सुलोचन आणि अल्कोहोलची मात्रा असलेले खोकल्‍याच्‍या औषधाची नशा करतात.शिवाय त्‍यांना तंबाखु, गुटख्यांसारखे व्‍यसनही लवकरच लागते. सामाजिक वातावरणाचाही अशा मुलांवर लवकर परिणाम होतो. ते मद्यपी वडिलांचे अनुकरण करतात.

व्‍हाईटनरबाम अन् सिगारेट

आर्थिक परिस्‍थिती बेताची ७ ते १५ वयाच्‍या मुलांमध्ये व्‍हाईटनर, पंक्चर जोडण्यासाठी वापरण्यात येणारे सोल्‍युशन, मेडिकलमधून सहज उपलब्‍ध होणारा बाम, नेलपँटचे व्‍यसन दिसते. शिवाय सहज आणि अगदी कमी पैशांत व्‍यसनाची साधने मिळत असल्‍याने त्‍याकडे मुले वळतात. घरची परिस्‍थिती चांगली असलेली लहान वयातच सिगारेटच्‍या नादी लागतात.

आरोग्‍य धोक्‍यात

या पदार्थांच्‍या सेवनाने मुलांना गुंगी येते, आधिक आहारी गेलेल्‍यांना त्‍यातून बाहेर काढणे अवघड होते. सतत या पदार्थांचा वास मुलांना हवाहवासा वाटतो. त्‍यामुळे काही कालावधीनंतर या पदार्थांचे व्‍यसन केल्‍याशिवाय त्‍यांना चैन पडत नाही. अभ्यासाचा ताण घालवण्यासाठी ग्रुपने सिगारेट ओढण्याकडे मुले वळतात. मात्र, सहज उपलब्‍ध होणाऱ्या व्‍यसनाच्‍या या साहित्‍याच्‍या अतिसेवनाने मलांचे आरोग्‍य धोक्‍यात येत आहे.

वाढत्‍या व्‍यसनाधिनमागे अनेक कारणे आहेत. आज जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. आधुनिकतेचे वारे वाहत आहे. परंतु त्‍याच वेळी आई-वडिल आणि मुले यांच्‍यातील संवाद दुर्मिळ होत चालला आहे. आपली मुले काय करतात, ती कोणाच्‍या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्‍पना नसते. ते  फक्‍त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. अशी मुले एकलकोंडी बनवण्याची आणि व्‍यसनाकडे वळण्याची सगळे शक्यता वाढते. काही उच्चभ्रू कुटुंबांमध्ये सगळे बरोबर असतानाही ड्रिंक्‍स घेण्याचा प्रयत्‍न होताना दिसतो तर काही ठिकाणी मुले आणि पालक एकत्र ड्रिंक्‍स घेताना दिसतात. हे एक प्रकारे मुलांना व्‍यसनासाठी प्रवृत्त करणेच असते असे म्‍हणता येईल. असे झाल्‍यास पुढे मुले मोठ्या प्रमाणावर व्‍यसनाच्‍या आहारी गेल्‍यास आश्चर्य वाटायला नको.   

प्रबोधन हवे  आपल्याकडील  हिंदी चित्रपटांमधून ताण वाढलेल्या किंवा समस्यांनी वेढलेल्या व्यक्‍ती स्वत:ला व्यसनात डुंबवून घेत असल्याचे दाखवले जाते. ‘‘शराब ही सारे सवालोंका जबाब है’’ अशी वाक्ये नायकांच्या तोंडी असतात. ती युवा पिढीला प्रभावित करणे साहजिक आहे. शिवाय चित्रपटांचा समाजावर एवढा पगडा असतो की त्याचे परिणाम होतातच. त्या दृष्टीने विचार करायचा तर दु:खापासून करण्यासाठी नशा करा, असे चित्रपटात सांगितले जात असेल तर त्याचे काही ना काही प्रमाणात अनुकरण केले जाणे साहजिक आहे. असे असले तरी व्यसनांचे दुष्परिणाम तसेच सध्याची स्थिती नेमकेपणाने समोर आणण्यात प्रसिद्धीमाध्यमांचा वाटा आहे हे मान्य करावे लागेल.

      यात सामाजिक जागृतीचा आणि संस्काराचा भागही आहे. मुलांवर लहानपणापासून योग्य संस्कार झाले, आई-वडिलांनी काही आदर्श ठेवले तर त्याचाही निश्चित फायदा होतो. म्हणूनच व्यसनाधिनतेसंदर्भात शालेय जीवनापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यात पालक, शिक्षक यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे ते व्यसनांकडे वळणार नाहीत याची काळजी घेणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यावर सतत भर देत राहिल्यास समाजाला वेढत चाललेला व्यसनांचा विळखा वेळीच सोडवता येईल.

मद्यपान आणि वय – बहुतांश तरुणपिढी मद्यपानाच्या जाळ्यात अडकली आहे.  गतिशील जीवनशैलीमुळे पालकांचे मुलांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा मद्यपान व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.   जी व्यक्‍ती १५ वर्षापेक्षा कमी वयापासूनच दारु पिण्यास सुरुवात करते त्यांना मद्यपानाचे व्यसन जडण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

मद्यपानामुळे होणारे रोग – मद्यपान व्यसनाचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मद्यपानामुळे यकृताचे विविध विकार उत्पन्न होतात. यामध्ये हिपाटायटिस, यकृत संक्रमित होणे, यकृताचा सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कैन्सर इ. यकृताचे विकार उत्पन्न होतात.  याशिवाय मद्यपान करणाऱ्यांमध्ये हृदयरोग, हार्ट अॅटक, किडन्या निकामी होणे, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा कैन्सर तसेच विविध मानसिक होण्याचा धोका आधिक असतो. 

धूम्रपान आणि आरोग्य – सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धूम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिराघातक रसायने असतात. एकट्या सिगारेट मध्ये जवळजवळ ३२ वेगवेगळी अपायकारक रसायने असतात. सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकीट हे सेवन करणाऱ्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जात असते. एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील ८ मिनिटे कमी करतो. सध्या जगातील १ अब्ज लोक हे धूम्रपानाच्या विळख्यात आले असून प्रतिवर्षी किमान ६ लाख लोक मृत्यूमुखी पडतात. धूम्रपानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्‍तींना फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. धूम्रपान हे फुप्फुस कॅन्सरचे ९०% कारण असते.

      देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशाची संस्कृती, देशात आढळणारी विविधतेतील एकता याबाबतीत भारताची बरोबरी कोणीच करु शकत नाही. परंतु, देशाची प्रगती ज्याप्रमाणे होत आहे, त्याचप्रमाणे विविध समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. तरुणाई व्यसनात अडकत चालली असून, त्यांना यातून वेळीच बाहेर काढणे काळाची गरज बनली आहे. याकामी समाजातील विविध सेवा संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे आदींनी एकत्रित येऊन पुढाकार घेण्याची निर्माण झाली आहे.

प्रयत्न पडताहेत तोकडे – मुळात तंबाखू, गुटखा व धूम्रपानाच्या या पिढीला जाणीव नाही. अनेक भ्रामक कल्पनांमध्ये ही पिढी वावरत आहे. आशावेळी त्यांच्या आणि समाजाच्या निकोप वाढीसाठी या पिढीला व्यसनांचे दुष्परिणाम शालेय वयातच सांगायला हवेत. परंतु, आपल्या देशात धूम्रपान किंवा व्यसनांना आळा घालण्यासाठी होत असलेले प्रयत्न तोकडे पडत असून व्यसनाधीनतेचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत.
दरम्यान, १९९७ मध्ये युरोपीय संसदेने तंबाखूची कोणत्याही स्वरुपात जाहिरात करण्यावर बंदी घातली आहे. बहुसंख्य विकसीत देशात १८ वर्षाखालील मुलांना सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तंबाखू कंपन्यांनी आपला मोर्चा विकसनशील देशांकडे वळविला. त्यामुळे तंबाखू सेवानाच्या जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १ ऑक्टोंबर १९९८ पासून आचारसंहिता अंमलात आली. त्यांचे उत्तरदायित्व अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएसीआय) देण्यात आले. मात्र, या संस्थेकडे मर्यादा आल्या. तंबाखू सेवन हे आरोग्यास हानिकारक आहे, हा वैधानिक इशारा ठळक अक्षरात छापावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु, ही मागणी प्रत्यक्षात उतरण्यासाठी २०१२ सालवी वाट पहावी लागली.

धूम्रपान बंदीची ऐशीतैशी – केरळ उच्च न्यायलयाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी करुन त्याची कार्यवाही सुरु झाली. तसेच दिल्लीतही बंदी सुरु झाली. भारत सरकारने १९९० साली सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा कायदा केला. तसेच शाळांच्या परिसरापासून १०० मीटर अंतरापर्यंत धूम्रपान बंदी केली. मात्र, आजही कायद्याचे कठोर पालन केले जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक ठिकाणी उभे राहून धूम्रपान करुन हवेत धूर जोडर्ण्यांची संख्या वाढत चालली आहे.

जाहिरातींचाही  प्रभाव – विविध प्रकारच्या जाहिरातींचाही पगडा मुलांवर पटकन होतो. त्यामुळे नामवंत व लोकप्रिय अभिनेते, खेळाडू जेव्हा पानमसाला सेवनाच्या जाहिराती करतात, तेव्हा पानमसाला सेवनाने काहीच होत नाही, तर आपणही सेवन करावे, अशी मुलांची धारण होते. त्याचवेळी पालक व समुदेशकाची भूमिका महत्त्वाची ठरते. साधारण १६ ते १९ वयोगटाची आपली मुले काय करतात, कोणाच्या संगतीत राहतात, याकडे पालक लक्ष हवे. 

      धूम्रपान, तंबाखू सेवन व त्यांचे दुष्परिणाम रोखायचे असतील तर मुलांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यलयांमध्ये अनेक तर्हेचे तक्‍ते लावले जातात. त्या तक्‍त्यांमध्ये तंबाखू, धूम्रपान यांचे दुष्परिणाम याबद्दल स्लाईड शो झाले पाहिजेत. मात्र, केवळ उपदेश, व्याख्यान यापेक्षा चित्रांचा जो परिणाम होतो, तो तंबाखू सेवन व धूम्रपानाची भयावहता पटकन टिपणारा असतो. त्यामुळे मुले तरुण व्यसनाकडे वळणार नाहीत.

 व्यसन सोडण्यासाठी मानसिक तयारी आवश्यक धूम्रपानामुळे हृदयविकार, रक्‍तदाब, लकवा, रक्‍तप्रवाह व्यवस्थित न होणे, प्रतिकारशक्‍ती कमी होणे, नपुसंकत्व येणे, कातडीला सुरकुत्या पडणे, पित्ताचे प्रमाण वाढून पोटाचे विकार होणे आदी विकार होतात. व्यक्‍तीला कोणतेही व्यसन असले तरी ते प्रत्येकाला सोडविता येते.
 मात्र, त्यासाठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. तंबाखू किंवा कोणतेही व्यसन सहजसहजी सुटत नाही. प्रयत्नपूर्वक सोडण्याचा प्रयत्न करावा.

नेमके काय घडते आहे, हे पालकांना कळावे म्हणून –

      पौगंडावस्थेतील मुलांच्या मेंदूच्या काही भागाची विशेषत: frontal cortex ची (जिथे निर्णयक्षमता, भावनांवर नियंत्रण, विवेक शक्‍ती वापरणे, इम्पल्सवर ताबा अशा अनेक गोष्टी घडत असतात) पुनर्रचना होत असते. नवीन नवीन synapse प्रचंड असतात, त्यांच्यात बदल घडत असतात. अशा अवस्थेमध्ये जर मन:स्वास्थ्य ठीक नसेल, मूल्ये ढासळली असतील, कल्पनाविश्वात (फँटसी) वावरायची सवय लागली असेल, तर मुलांकडून अयोग्य निर्णय घेतले जाऊ शकतात. चुकीचे वागले जाऊ शकते. ज्याचे दुष्परिणाम त्यांना, इतराना आणि पर्यायाने पालकांना भोगावे लागतात. या वयातील हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पिरिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. तसेच समोरच्याच्या भावना, कृती, चेहऱ्यावरील भावना (एक्सप्रेशन्स) समजून घेण्यात मुलांची चूक होऊ शकते. प्रौढ व्यक्‍तींमध्ये मेंदूतील prefrontal cortex चा वापर भावनांचे मूल्यामापन करताना केला जातो, तर मुलांमध्ये त्यापेक्षा अमिग्डलावर जास्त अवलंबित असते. मग पटकन भावनाधारित चुकीची प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ शकते. अर्थात, हे काही चुकीच्या वागण्याचे समर्थन विश्चितच नव्हे; पण आपला मुलगा अशी का वागत असेल हे समजून घेण्यासाठी ही माहिती उपयुक्‍त ठरु शकते.

पालक कशी मदत करु शकतात मुळात आपले वर्तन चांगले ठेवणे, आपण मुलांसाठी रोल मॉडेल (आदर्श) बनणे महत्त्वाचे आहे. लहानपणापासून मुलांना घरात प्रेम, विश्वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावी.

 घरातील व्यक्‍तींचे वर्तन व्यवस्थित असूनही बाहेरील प्रभावांमुळे मुलांचे वर्तन बदलू शकते. मुलांशी नाते इतके विश्वासाचे हवे, की त्याने पालकांशी मोकळेपणाने त्यांच्या समस्यांबद्दल बोलावे. या समस्या भावनिक असतील, तर वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यावी. मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणे टाळावीत. पालकांमधले मतभेद त्यांनी स्वतंत्रपणे व्यक्‍त करावेत.

 मुले बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी, त्यांच्या सवयी याची त्यांच्या नकळत चौकशी करावी.

 मुलांना दिले जाणारे पैसे अवाजवी नाहीत आणि त्यांचा योग्य विनियोग होतीया याकडे लक्ष द्यावे. याचा अर्थ पोलिसिंग करावे असा नाही, किंवा पैसे देऊच नयेत असाही नाही.
शक्यतो घरामध्ये हिंसा व सेकम् असणारे चित्रपट, दृश्ये पाहू नयेत. इंटरनेटच्या काही साइट्स ब्लॉक कराव्यात. लहानपणापासून मुलांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकवावे, त्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करावा.
 मुलांची नकारात्मक ऊर्जा, भरपूर व्यायाम आणि कला यांच्याद्वारे वापरली जाईल याकडे लक्ष ठेवावे.
 मुलांशी मैत्री करावी. आपल्या सहवासात त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रयत्न करावा.
मुलांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. आपले म्हणणे ऐकले जाते आहे याचा त्यांना विश्वास द्यावा.

      व्यसनाधीनता ही एक मानसिकता आहे. या मानसिकतेची वेळीच दखल घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना अशा व्यसनांपासून दूर ठेवले, तरच त्यास वेळीच अटकाव आणणे शक्य होईल, असे मत मानसोपचार तज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये टपऱ्यांवर पेन हुक्का राजरोसपणे विक्री होते, हे वृत्त लोकमतमध्ये वाचले. अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

      व्यसन कशाचेही असो; त्याचा मेंदूवर परिणाम होताच. काही काळ मनाची व्यवस्था वेगळी होते. त्यामुळे कोणतेच व्यसन नसावे. व्यसन जडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये  हुक्क्याचे फॅड आहे. बालवयात व्यसनाची सवय लागणे अत्यंत घातक आहे. व्यसनामुळे फफ्फुसावर, तसेच मेंदूवर परिणाम होतो. मेंदूशी निगडित समस्या उद्भवतात. कायमचा मेंदूविकास जडण्याची शक्यता असते. संबंधीत व्यक्‍तीच्या आयुष्यावर, परिणामी त्याच्या कुटुंबावर याचे दूरगामी परिणाम जाणवतात. त्यामुळे पालकांनी सतर्कता दाखवून मुलांना व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे. शाळांमध्ये, तसेच विविध ठिकाणी चर्चासत्र आयोजित करुन मुलांमध्ये जागृती केली पाहिजे.

 केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही, तर शाळेत शिकणारे अल्पवयीन विद्यार्थीसुद्धा पेन हुक्क्याच्या आहारी गेले आहेत, ही चिंतेची बाब आहे. पेन हुक्का, इलेक्ट्रिक सिगारेट बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याची क्रेझ असली, तरी पालकांनी जागरुकता दाखवली पाहिजे. नवीन काही बाजरपेठेत आल्यास त्याबद्दलची उत्सुकता वाढते, परंतु ते अहितकारक असेल, तर वेळीच विक्रीपासून रोखले पाहिजे. शासनाने पेन हुक्क्यासारख्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे. काहींना तात्पुरते आकर्षण वाटते, तर काहीजण आहारी जातात. शालेय वयात विद्यार्थी व्यसनाकडे झुकत असतील. तर शासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

विविध प्रकारच्या फळांच्या फळांचा सुगंध असणारे द्रव्य वापरात येत असेल, तरी त्यात निकोटिनसारखा घातक पदार्थ असण्याची शक्यता असते. जसे अन्य प्रकारच्या नशा केल्या जातात. तशाच प्रकारे पेन हुक्क्याचा वापर करुन नशा केली जाते. ही व्यसनधीनतेकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पालकांनी जागरुकता दाखवली पाहिजे. सिगारेट, व्हाइटनर या गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. मुले काय करतात, त्यांच्यावर कोणत्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आहे, याकडे पालकांचे लक्ष हवे. पालकांनी सतर्कता दाखवली, तरच या प्रकारावर नियंत्रण आणता येईल.

इंटरनेट एक व्यसन – आजच्या काळात सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत. मानवाने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती केली. इंटरनेटमुळे तर माहितीचा विस्फोट होऊन जगाचे द्वारच खुले झाले आहे. कोणत्याही व्यक्‍तीस कुटल्याही स्वरुपाची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली. इंटरनेट खऱ्या अर्थाने जग जवळ आले. भारतात आर्थिक उदारीकरणानंतर इंटरनेटचे जाळे वेगाने पसरले. या इंटरनेटच्या फायद्याप्रमाणे तोटेही आहेत. कोणत्याही गोष्टीचा वापर केला असता समतोल साधणे फार महत्त्वाचे आहे. त्याचा अतिरेक झाल्यास त्याचे दुष्परिणाम हे होणारच त्याप्रमाणे इंटरनेटचा जास्त वापर केल्यास त्याचे व्यसन लागू शकते.

      घरगुती इंटरनेटच्या वाढत्या प्रमाणामुळे ‘इंटरनेट अडिक्शन’ अर्थात ‘इंटरनेट’ चे व्यसन लागण्याचे शहरातील मुलांचे प्रमाणही वाढले आहे. या व्यसनाधीनतेचा प्रत्यक्ष संबंध मेंदूमधील रसायनांचे प्रमाण बिघडण्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ‘इंटरनेट’ चा वाढता वापर चिंतेत भर घालवणारी बाब असून, कम्पयुटर अथवा तंत्‍सम इंटरनेट पाहण्याच्‍या साधनांच्‍या प्रमाणाबाहेर वापराने चिडचिड, अतिताण आदी विकार जडत असल्‍याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटचा इतका वापर तरूण मुले करतात कि आई वडिलांशी असलेला मुलांचा संवाद कमी होत आहे. इंटरनेटमुळे मुले मैदानी खेळ विसरले आहेत.

      इंटरनेट व्‍यसनात गुरफटलेली ही मुले खऱ्या सामाजिक संवादापासून दुरावलेलीच राहतात. कौटुंबिक नातेसंबंधावर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्‍तवाशी/सत्‍याशी नातं तुटल्‍याने व कमी झाल्‍याने ही मुलं सायकोसिस/स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात. कुमारवयीन तरूणांमधील आत्‍महत्‍या व त्‍यांच्‍यातील वाढती हिंसक  वृत्ती या आजघडीच्‍या गंभीर समस्‍येला, गढुळलेले कौटुंबिक, सामाजिक स्‍तरावरले पदर जसे कारणीभूत आहेत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे कळत नकळत होणारे दुष्परिणामही जबाबदार आहेत. ‘इंटरनेट व्‍यसनाधीनता’ हे यातील एक महत्वाचं कारण•!

 प्रगत तंत्रज्ञान ज्‍या प्रमाणे आजच्‍या पिढीसाठी जगाच्‍या स्पर्धेत तारक आहे. तसच ते त्‍यांच्‍यासाठी मारक बनत चालंलं आहे. आजकाल टीव्‍ही, कम्‍प्युटर यांचा वाढत वापर. त्‍यात तासंन तास इंटरनेट, सोशल नेट वकिंग साईट्स, गेम्‍स, पॉर्न मुव्‍हीज, चॅटीगमुळे ते सतत त्‍यातच गढून राहातायेत…. त्‍यांच्‍या बोटांना आणि डोळ्याला तो एक चाळाच लागलाय.

 दिवसातला अर्ध्याहून अधिक वेळ ते सायबर कॅफेमध्ये जाऊन बसतात. कॉलेज शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करायेत असं ही समोर येतंय. म्‍हणजेच या महाजालात ते स्‍वत:ला अडकून घेतायेत. आजच्‍या प्रगत समाजातली ही एक गंभीर समस्‍याच बनत चाललीये. याचसाठी आता अशा व्‍यक्‍तींना व्‍यसन मुक्‍ती केंद्राची मदत घ्यावी लागतेय.

यामध्ये १५ ते २२ वयोगटातील मुलं-मुलींच प्रमाण जास्‍त आहे. याच अजून एक कारण आहे ते नोकरदार आई वडिल. ते घरात नसल्‍याने मुलांवर लक्ष ठेवल जात नाही, आणि मग परिणामी ते या व्‍यसनाच्‍या आहारी जातात, अशा विद्यार्थांवर उपचार कारण हेही एक चेलेंज आहे.

त्‍यामुळेच आता ही पालकांचीच खरी कसोटी आहे की, आपल्‍या मुलाला. आजच्‍या या जीवघेण्या स्‍पर्धेत प्रगत. तंत्रज्ञानापासून दूर ठेवायचं तर नाही. पण त्‍याला याच सगळ्याचं व्‍यसनी ही बनवायचं नाही. एक सशक्‍त व्‍यक्‍ती म्‍हणून त्‍याला समाजात उभ करायचं.

 आईवडिलांच्‍या व्‍यस्‍त दैनंदिन जीवनामुळे मुलांवर वचक व बंधने शिथील झाली आहेत. पालकांच्‍या आर्थिक सुसंपन्नतेमुळे विद्यार्थांचा ‘पॉकेट मनी,’ शैक्षणिक सुविधांमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. ज्‍या वयात विद्यार्जन करून भावी जीवनाचा पाया रचायला हवा, त्‍या वयात ते व्‍यसनाधीन होत आहेत. मद्याचा एक पेला आयुष्य उद्धवस्‍त करण्यास पुरेसा ठरतो. यावर वेळीच आळा न घातल्‍यास अवघे आयुष्य उध्दवस्‍त व्‍हायला वेळ लागत नाही.

 भारतीय जीवनप्रणाली, संस्‍कृती, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय संकल्‍पना जपण्यासाठी सर्वप्रथम पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर उत्तम संस्‍कार करून त्‍यांनाए या जीवघेण्या व्‍यसनापासून परावृत्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा.

 पालकांनी, समाजाने युवा पिढीच्‍या घराबाहेरील हालचालींवर कडक नजर ठेवून अनावश्यक वावराला अटकाव घालायला हवा. ही सामाजिक जबाबदारी आहे. त्‍यासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून राहायची गरज नाही. देशाचे भविष्य असलेल्‍या तरूणाईचे अवघे आयुष्य दु:खमय करणाऱ्या विषवल्लीपासून मुक्‍त करण्यासाठी सर्वकष प्रयत्‍न करायला हवेत. त्‍यासाठी जनजागृती करायला हवी. हे सामाजिक आव्‍हान पालक, शिक्षक, समाजघटकांनी सामाजिक समरसनेतून सक्ष्मणपणे पेलायलाच हवे.

 शाळा व सामाजिक संस्‍थांचा सहभाग –

 आजकाल फोफावत चाललेल्‍या या विषवल्लीचे परिणाम पुढील काळात संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. त्‍यासाठीच शाळा व्‍यवस्‍थापन आणि सामाजिक संस्‍था यांनी निकोप मानसिक विकास, रागाचे व एकूणच उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्‍यासाठी मुलांसाठी व पालकांसाठी तज्‍ज्ञांनी व्‍याख्याने, कार्यशाळा, स्‍व-मदत गट अशा प्रकारे उपाय योजण्याची आता गरज आहे. शांत, स्‍वस्‍थ, कणखर आणि चांगली मूल्‍ये असणारा समाज घडविण्याच्या दिशेने ते एक महत्‍त्‍वाचे पाऊल ठरेल.

 (क्रमश)

डॉ. सौ. सुजाता वढावकर

सी/६४ चिंतामणी रेसिडन्‍सी,

११ वा मजला चैत्रबन, बिबवेवाडी रोड,

बिबवेवाडी, पुणे ४११ ०३७

फोन नं. २४२०४१४६

मो. ९९२३७०४१६४

Email – sujata@yahoo.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu