होळी रे होळी पुरणाची पोळी
साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, १ वाटी गुळ, १ वाटी साखर, ६-७ वेलदोड्यांची पूड ,चिमुटभर जायफळ पूड, चिमुटभर हळद, २ चमचे तेल , अर्धा चमचा मीठ .
कृती : डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी, तेल हळद व मीठ घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर ती चाळणीत टाकावी आणि पाणी निथळू द्यावे. गुळ किसून घ्यावा किंवा बारीक चिरावा.पातेल्यात डाळ गुळ व साखर एकत्र करावे पातेले गेस वर ठेवावे. गुळ वितळायला लागला की गेस बारीक करावा.मंदाग्नीवर पुरण शिजवावे. हे मिश्रण हलवत राहावे. उलथने पुराणात उभे केले असता सरळ उभे राहिले की पुरण शिजले असे समजावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की पातेले उतरवून ठेवावे. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. व पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे किंवा पाट्यावर वाटावे म्हणजे ते लवकर व बारीक वाटले जाते.
पुरण पोळीसाठी कणिक भिजवणे :
साहित्य : १ वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, ४ चमचे तेल.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून घडीच्या पोळ्यानप्रमाणे पीठ भिजवणे.मात्र थोडे सैलसर ठेवावे. भिजवलेले पीठ तासभर मुरु द्यावे. व नंतर पोळ्या लाटाव्यात.
पुरण पोळी लाटणे :
मोठ्या सुपारी एवढा कणकेचा गोळा घ्यावा. पिठाच्या गोळ्याच्या तिप्पट पुरणाचा गोळा घ्यावा. कणकेची वाटी करावी व त्यात पुरण घालून मोदकाच्या आकारासारखा उंद करावा. तो चपात करून तांदळाच्या पिठीत घोळून पोळी अलगद लाटावी. पोळी लाटताना तांदळाच्या पिठीवरच लाटावी. शक्यतो बिडाच्या किंवा निर्लेपच्या तव्यावर पोळी भाजली तर पोळी तव्याला अजिबात चिकटत नाही. आणि करपतही नाही.तवा तापल्यावर मंडगीवर पोळी भाजावी .
होळी स्पेशल थंडाई
साहित्य :
पंचवीस ते तीस बदाम-बी, दोन चमचे खसखस, आठ दहा पिस्ते, चार चमचे चारोळी, दोन चमचे बडीशोप, सात-आठ वेलदोडे, दोन-तीन चमचे काकडीचे बी, दहा-बारा दाणे पांढरी मिरी, थोडे बेदाणे, दोन ग्लास दूध, दोन ग्लास पाणी, पाच-सहा गुलाबकळ्या किंवा गुलाबाचे पाणी, साखर.
कृती :
बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास काळ्या मिर्यांना पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी, वेलदोडे, खसखस, पिस्ते, काकडीचे बी, चारोळी, बडीशोप, बेदाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वाटून झाल्यावर तो गोळा व दूध व पाणी एकत्र करावे व गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात साखर घालून चांगले ढवळावे साखर विरघळल्यावर त्यात गुलाबाचे पाणी घालावे. जास्त दाट वाटल्यास दूध किंवा पाणी जरूर असेल, ते घालावे. हवा असल्यास थोडा बर्फ घालून थंडाई पिण्यास द्यावी.