आस्वाद मराठीचा (लेख क्र ३)©विद्या पेठे

मराठीचा आस्वाद (लेख  क्र ३)

 मराठीतील पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ या विषयी   माहिती  आणि त्या ग्रंथातील गुरुवर्णन आपण गेल्या वेळी पाहिले.  त्यावरून आपल्याला तत्कालीन उत्तम मराठी भाषेची कल्पना आली . 

या वेळी आपण महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या  राजसत्तांची थोडक्यात माहिती घेऊन  महानुभाव पंथाची  ओळख करून घेऊया.

महाराष्ट्रात एकूण आठ राजसत्ता झाल्या . पहिली राजसत्ता मौर्याची होती. 
यानंतर शालीवाहन घराणे आले .   शालीवाहनानंतर महाराष्ट्राच्या  पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे ख्रिस्तोत्तर तिसऱ्या शतकात राज्य   करीत होते.  त्रैकूटकानंतर महाराष्ट्रावर वाखाटकांचे राज्य होते.  वाखाटकानंतर कलचूरी घराणे महाराष्ट्रात नांदत होते. कलचूरीचा पराभव मंगलीश नावाच्या चालुक्याने केला. चालुक्य राजांच्या सत्ता काळात महाराष्ट्राची भरभराट झाली . यानंतर राष्ट्रकूट घराणे महाराष्ट्रात नांदू  लागले. त्यांचा पराभव परत चालुक्य राजाने केला म्हणून चालुक्य सत्ता आली.  चालुक्य राजांनंतर यादवांची राजवट सुरु झाली.  त्यांचा मुख्य राजा भिल्लम हा होता. यादव कुळात एकंदर सात राजे झाले.  त्यांच्या राज्यात संत, संन्यासी, कवी  यांना स्वस्थता लाभली. त्यांनी अनेक कवींना आश्रय दिला .   त्यामुळे उत्तम दर्जाचे काव्य यादवकाळात  निर्माण झाले .  कृष्णदेवराय, महादेवराय, रामदेवराय –  यादव या राजांचा काळ मराठीच्या दृष्टीने भरभराटीचा ठरला . पण  पुढे अल्लाउद्दीन  खिलजीच्या  फौजेने सर्व लुटून नेले. 

यादवांचे – विशेषतः, देवगिरीच्या राजाचे मराठीवर खूप उपकार आहेत. त्यांच्या काळात उत्तम दर्जेदार  साहित्य निर्माण झाले  कारण हे राजे गुणग्राही  होते. 

यादवांच्या  राज्यात अनेक संतकवि होऊन गेले. निवृत्ती, ज्ञानेश्वर, विसोबा खेचर , नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा ,कान्होपात्रा या  सर्व यादव कालीन संतांनी मराठीत लेखन केले. 
यादव काळात कवि नरसिंह, शल्य, नरेंद्र हे  रामदेवराव  यादवांच्या पदरी होते. त्यांनी नलाख्यान, रामायण व  रुक्मिणी स्वयंवर ही काव्ये लिहिली.  याचवेळी महानुभाव पंथीयांनी विपुल गद्य – पद्य  रचना केली. 

या सर्व लेखनामुळे रामदेवराव यादव राजाची  कारकीर्द मराठी वाङ्‌मयाच्या दृष्टीने सुवर्णाक्षरांनी  लिहावी  इतकी समृद्ध झाली . ज्ञानेश्वरी व इतर संतांची रसाळ आणि इतर पंथीयांच्या  मराठी रचना यात  मराठीचे अस्सल निष्कलंक स्वरूप या काळात पहायला मिळते. वैदिक, प्राकृत, अपभ्रंश या अवस्थेतून परिणत होत ती स्वतंत्र  भाषा या दर्जाला  पोचलेली दिसते. यावेळी तिच्यावर  संस्कृतचे वर्चस्व  नाही, फारशीचा वरचष्मा नाही आणि इंग्रजीचा तिला स्पर्शही  झालेला नाही. 

अशा सुंदर मराठीचे दर्शन यादवकाळात घडते.   पण पुढे मराठी भाषेत बदल घडत गेले. म्हणून मराठी भाषेचे  ५ कालखंड मानतात. १)  यादवकालीन २)बहामनीकालीन ३) शिवकालीन ४)पेशवेकालीन ५) आंग्ल कालीन. 

आज आपण यादवकाळातीलच महानुभाव पंथियांच्या थोड्या  वेगळ्या मराठी भाषेचा आस्वाद घेणार आहोत. महानुभाव पंथाचे  आद्य  संस्थापक श्री चक्रधर स्वामी होते. हे मूळचे सामवेदी गुर्जर जातीचे.   संसारतापास कंटाळून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली आणि महानुभाव पंथाची स्थापना केली.  त्यांची स्वतःची मराठी ग्रंथरचना  उपलब्ध नाही.   त्यांना मराठी भाषेचा अभिमान होता  हे पुढील वाक्यावरून दिसते, “कानडदेशा , तेलंगदेशा  न वचावे,   महाराष्ट्री असावे” .[ चक्रधर स्वामी दिसायला अतिशय सुंदर होते  असे ठिकठिकाणी वर्णन आहे. त्याचप्रमाणे ते मृदुभाषी  होते.] नागदेवाचार्य हे त्यांचे पट्टशिष्य होते.  महीन्द्र व्यास  हा त्यांचा  विद्वान शिष्य होता . भास्करव्यास उर्फ  भानुभट्ट  यांनी शिशुपाल वध, उद्धवगीता  हे दोन ग्रंथ लिहिले. त्यातील वर्णन कौशल्य,   कल्पना वैभव, भाषाप्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे .  

चक्रधर स्वामींची शिष्या ‘रुपाई उर्फ महदंबा’  हिने रचलेली बायकांची गाणी ‘ धवळे ‘ या नावाने  प्रसिद्ध आहेत . 

 महदंबा ही आद्य  मराठी कवयित्री  आहे.  तेराव्या शतकाच्या प्रारंभी रचलेल्या ‘ धवळ्यात ‘ रुक्मिणी हरणाची कथा आहे.  ती  मराठीत गायिलेली पहिली  कृष्णविवाह कथा. महदाइसा ही नागदेवाचार्याची चुलत बहीण. ज्ञानेश्वर‌ मंडळात जो मान मुक्ताबाईला होता   तोच मान चक्रधरांच्या मंडळात महदाइसेला होता. ती मोठी बुद्धिमान, विरक्त आणि जिज्ञासक होती. 
धवळा म्हणजे विवाहगीत.  तिच्या धवळ्यांचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग आहेत. श्री गोविंप्रभूना एकदा विवाह करण्याची इच्छा झाली. विवाहाची  सर्व तयारी झाली. तेव्हां महदाईसा किंवा महदंबा हिला स्फूर्ती  आली  व तिने धवले  गाईले. तो पूर्वार्ध . पुढे जवळ जवळ १५ वर्षांनी म्हाइंभट व लक्ष्मीधरभट यांच्या आग्रहामुळे तिने धवळे रचले  .तो उत्तरार्ध.
धवळा ही  चार चरणांची मुक्तछंद  रचना आहे.  ती साधी पण गोड आहे. त्यात स्त्री स्वभावाचे मार्दव आहे. उदा. हा  एक धवळा. 
 
शिशुपाळु वरु ऐसे आइकिलें बाळा: 
श्रमु पातली निऱ्हा जाली  व्याकुळा : 
स्मरिले कृष्णराओ, ” देवा संकष्टी पडिलेये थोरी : 
तूं एकु वांचौनिया आनु नाहीं अवधारी ॥७॥
 हृदा  धाक, तिये लागली चिंता, 
‘ भक्त बंधु छेदुनि’ म्हणे,” राखे अनंता : 
आरता  दानी कृपा करा देवा, मसि देयावे  उधरण : 
शिशुपाळ – बंदिवास चुकवा, दाखवा आपुले श्रीचरण ‘  ॥८॥
 
म्हाईमभट हा चक्रधर  स्वामीचा  निष्ठावान अनुयायी होता.  चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना  लोकांना अनेक वेळा  उपदेश करायचे .  एखाद्या  गोष्टीतून तत्वज्ञान  सांगायचे .  त्या आठवणींचे संकलन करून म्हाईमभटाने ‘लीळाचरित्र ‘ हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला .लीळा म्हणजे आठवण . त्यांचा संग्रह म्हणजे  लीळाचरित्र. यातील एका आठवणीचा नमुना पुढे देत  आहे .  त्यावरून तुम्हाला महानुभाव मराठी  भाषेचे स्वरूप समजेल .

इयत्ता ९ वी  च्या पुस्तकात धडा ३ रा ‘ कीर्ती कठियाचा दृष्टांत ‘ हा पाठ आहे. 

कीर्ती कठियाचा दृष्टांत

अर्थ – डोन नावाच्या गांवी गोसावियांच्या ठायी  म्हणजे चक्रधरांच्या घराजवळ  सकाळच्या वेळी मातीकाम चालले होते.  तेव्हां सर्वांना  थंडी (सी) वाजत होती. त्यामुळे भक्तांकडून काम होईना आणि भट (नागदेवाचार्य) मात्र  काम करत  होते तेव्हा नागोबा  ( दुसरे शिष्य) म्हणाले , “नागदेवा तुला कशी थंडी वाजत नाही ? तेव्हां भटो  (नागदेवाचार्य) म्हणाले, “आम्ही बैरागी, आम्हाला  कसली थंडी वाजणार ?  त्यावर सर्वज्ञ (चक्रधर स्वामी ) म्हणाले, ” वानरा (नागदेवाचार्य ) पोरा  – वैराग्य मिरवणे  हाही  एक विकारच  आहे. ”  त्यावर भटो  (नागदेवाचार्य) म्हणाले , ” हो, हो, निर्विकार कोण  असतो? ”  तेव्हा  सर्वज्ञ म्हणाले ,” वानरा, पोरा , कोणताही जीव  विकारातून मुक्त नाही. मग तू काय वेगळा आहेस  का?” ” हो का ?”  यावर  चक्रधरानी कठियाचा दृष्टांत सांगितला.  ” एक पुजारी (कठिया) होता .  “तो देवस्थानाची नीट  काळजी घेत असे.  झाडत असे.  सडासंमार्जन करी. ते पाहून गावकरी म्हणत, पुजारी हे चांगले  काम करतो. छान  काम करतो. ते ऐकून ( पुजारी) दिवसेंदिवस  अधिकच छान काम करू लागला.  पण  त्यामुळे त्याला  देवाने फळ दिले नाही.  त्याला लोकांकडून कीर्तीचे  फळ मात्र  मिळाले. 

तात्पर्य – लोकांनी  वाहवा  केली म्हणून देव प्रसन्न  झाला  नाही. लोकांची स्तुती ऐकायला मिळाली. 
 
महानुभाव मराठीची वैशिष्ठे : 

ही भाषा अल्पाक्षरी आहे.  उदा – ते सी वाजत  होते ,  झाडी, सडासंमार्जन करी . जी जी. त्यामुळे पाल्हाळ नाही .  विस्तार नाही.  पूर्णविरामाऐवजी  : असे चिन्ह वापरले आहे.  अवतरण चिन्हे,  प्रश्न चिन्ह  आहे. – शिष्याची   टोपण नावे  वापरली आहेत. नागदेवाचार्याना  ‘ वानरा ‘ म्हटले कारण ते अतिशय चपळ  होते. दृष्टांतामुळे शिष्यांना व लोकांना मार्गदर्शन मिळाले आहेच . पण तात्पर्यात – योग्य कोणते,  अयोग्य कोणते  हे नेमके सांगितले आहे. 

 

            लेखिका – ©विद्या पेठे 
                           मुंबई

 pc: google
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu