कथा – द्वारका ©स्वानंद गोगटे

लेखक – स्वानंद गोगटे
कथा प्रकार – काल्पनिक

कॅप्टन राजवीर त्यांच्या कॅप्टन च्या केबिन मध्ये बसून रोजनिशी लिहीत होता. रोज रात्री डायरी लिहायचा त्याचा शिरस्ता होता. नौदलात जेव्हा तो ज्युनिअर ऑफिसर म्हणून जॉईन झाला तेव्हा त्याच्या पहिल्या कॅप्टन ने त्याला हा सल्ला दिला होता. जो राजवीर आज स्वतः कॅप्टन झाल्यावर देखील पाळत होता.

आज बरोबर एक महिना झाला विशाखापट्टणम म्हणजेच वायझॅक वरून निघून. नौदलाच्या एका मोहिमेसाठी तो आणि त्याचा सगळे सहकारी निघाले होते. राजवीर च्या आयुष्यात पहिल्यांदाच तो दोन नागरी संशोधकांना जहाजावर घेऊन जात होता. ती दोन्ही माणसे देखील तेवढीच महत्वाची होती. भारतीय पुरातत्व खात्याचे प्रमुख श्री सुंदरन आणि IIT चेन्नई चे समुद्रशास्त्राचे प्रोफेसर श्री राघव,

प्रधानमंत्री कार्यालयातून या दोघांची नियुक्ती होऊन खास राष्ट्रपती भवनातून नौदलाला या मोहिमेचा आदेश मिळाला होता. या मोहिमेबाबतचा सगळा तपशील राजवीर ला देखील माहीत नव्हता. त्याला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की या दोन संशोधकांना ते सांगतील त्या ठिकाणी न्यायचं आणि ते जी मदत मागतील ती पुरवायची. राजवीर ने त्याच्या सर्व हाताखालच्या अधिकाऱ्यांशी सुंदरन आणि राघव यांची ओळख करून दिली. एक वर्षभरपूर्वीच नौदलात ज्युनिअर ऑफिसर म्हणून जॉईन झालेल्या पराग ची त्याने या दोघांच्या मदतीसाठी नियुक्ती केली.

17 ऑक्टोबर रोजी त्यांनी भारतीय भूभाग सोडला होता. सुरवातीला थोडंस आग्नेय दिशेला जाऊन पहिला स्टॉप त्यांनी अंदमान बेटांवर घेतला. तिथे त्यांनी त्यांच्या INS सातपुडा वर इंधन भरून घेतलं, त्याच प्रमाणे आवश्यक रेशन सुद्धा घेतले. याच ठिकाणी राजवीर ला कॅप्टन बेदी येऊन मिळाले. कॅप्टन बेदी हे एका मालवाहू जहाजाचे कॅप्टन होते आणि त्यांना देखील पंतप्रधान कार्यालयातून खास या प्रोजेक्ट साठी पाचारण केले होते. कॅप्टन बेदी INS सातपुडा बरोबर फक्त जास्तीचा धान्यसाठा, पाणीसाठा, दारुगोळा, आणि इंधन घेऊन येत होते. बाकी त्यांना या प्रोजेक्ट बद्दल काहीच माहिती देण्यात आली नव्हती.

आज 17 नोव्हेंबर, आणि आज अंदमान हुन निघून सुद्धा 10 दिवस होऊन गेले होते. राघव आणि सुंदरन यांनी सांगितल्याप्रमाणे INS सातपुडा अंदमान पासून नैऋत्य दिशेला मार्गक्रमण करत होती. भर समुद्रात एका ठिकाणी आल्यावर आज अचानक राघव आणि सुंदरन यांनी राजवीर ला जहाज थांबवण्यासाठी सांगितले होते. त्या नुसार INS सातपुडा हिंदी महासागरात उभी होती. ती आता एवढ्या खोल पाण्यात होती की त्या ठिकाणी नांगर टाकणे देखील शक्य नव्हते.

जहाजावरील मिटिंग रूम मध्ये राजवीर, त्याचा सेकंड इन कमांड शेखर, सुंदरन, राघव आणि जहाजाचा cartographar हरीश बसले होते. राजवीर ने राघव आणि सुंदरन ला असे अचानक थांबण्याचे कारण विचारले. ते काही बोलायच्या आतच, राजवीर ला एक इमेल प्राप्त झाला. नौदलाच्या मुख्यालयातून तो आलेला होता. अति गोपनीय चा टॅग त्यावर होता. राजवीर ने आपल्या लॅपटॉप वर तो वाचायला सुरुवात केली.

” कॅप्टन राजवीर, आशा आहे की तूम्ही तुमच्या पहिल्या नियोजित स्थळी पोहचला असाल, राघव आणि सुंदरन हे आता या मोहिमेचा मुख्य उद्देश आणि आगामी वाटचालीबद्दल तुम्हाला सांगतील.

सूचना : राघव आणि सुंदरन हे दोघंही सामान्य नागरिक आहेत तरी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय नौदलाच्या आणि पर्यायाने तुमच्या खांद्यावर आहे. तरी नौदलाच्या शिस्तीचा कुठेही भंग न होता, त्या दोघांना सुरक्षित ठेवणे.

धन्यवाद”

राजवीर ने मेल वाचून संपवल्यावर राघव आणि सुंदरन कडे पाहिले. ते दोघे त्यांचा लॅपटॉप घेऊन तयारच होते. सुंदरन सुरू झाले, ” आपण सर्वांनी महाभारत वाचले असेलच, आणि त्यातील द्वारकेचा उल्लेख आणि इतिहास ठाऊक असेलच अशी आशा आहे. पण आपल्याला हे ठाऊक नसेल की द्वारका ही एक मनुष्यनिर्मित आजवरची सर्वात मोठी सबमरीन होती, कोणतीही नगरी नव्हती. कृष्णाच्या मृत्यू नंतर महाभारतानुसार द्वारका समुद्राने गिळली, पण समुद्रात जी बुडाली ती खुद्द द्वारका नव्हती, ती होती या सबमरीन च्या आजूबाजूला भराव टाकून बांधलेली घर.”

सुंदरन यांनी एकवार सर्वांवर नजर टाकली. सर्वजण पूर्णपणे लक्ष देऊन त्यांचे बोलणे ऐकत होते.
सुंदरन पुढे म्हणाले ” श्रीकृष्णाचा महाल हा त्या सबमरीन मध्ये होता, आणि कृष्ण या जगातून गेल्यावर त्याच्या अनुयायांनी ती सबमरीन त्यांना कृष्णानेच दिलेल्या आदेशानुसार ऑटो पायलट मोड वर टाकून चालू केली. आणि जशी सबमरीन चालू झाली तशी तिने किनारा सोडला आणि खोल समुद्रात निघून गेली आणि इकडे द्वारका बुडाली.”

आता राघव ने बोलायला सुरुवात केली, ” साधारण 2 वर्षांपूर्वी हिंदी महासागरात एका मालवाहतून करणाऱ्या जहाजाला त्यांच्या सोनार वर एक अतिप्रचंड वस्तू अथवा तत्सम काहीतरी असल्याचे जाणवले पण ते देखील काही क्षणच, नंतर ते गायब झाले आणि ना रडारवर दिसले ना सोनारवर. त्या नंतर आम्ही आहोधले असता जगभरातील समुद्रात अश्या घटना वेगवेगळ्या काळात घडल्याचे लक्षात आले, काहींनी त्याला वेगवेगळ्या रुपात वर्णून ठेवले आहे , काही त्याला समुद्री राक्षस म्हणत होते काही जण क्रॅकन, आणि अजूनही बरंच काही.”

साधारण 1 वर्षांपूर्वी मी माझ्या टीम सोबत गुजरातच्या किनाऱ्यावर द्वारकेचा इथे dive करून शोध घेत असताना, आम्हाला एक सीलबंद पेटारा मिळाला, त्या पेटार्यात बऱ्याच वस्तू होत्या पण एक मुख्य वस्तू होती ती म्हणजे एक नकाशा आणि त्यावर एक मार्ग. त्याच बरोबर काही चित्र मिळाली आणि लिखित पुरावे देखील जे हे सिद्ध करत होते की द्वारका ही एक सबमरीन आहे आणि ती समुद्रात निघून गेल्यावर आजूबाजूची घरे समुद्रात बुडाली”

एवढ्या वेळाने पहिल्यांदाच राजवीर ने विचारले, ” त्या नकाशात काय होते ?”

सुंदरन म्हणाले , ” तो नकाशा द्वारका सबमरीन चा होता आणि तो मार्ग होता ज्यावर आमच्या अपेक्षेनुसार द्वारका अजूनही समुद्रात फिरत आहे. “

अस बोलुन त्यांनी तो नकाशा स्क्रीन वर दाखवला. जहाजाचा cartographar हरीश उत्सुकतेने तो नकाशा पाहायला लागला. आणि 10 मिनिटे बारकाई ने पाहिल्यावर तो जवळ जवळ ओरडला की “अरे आता आपण ज्या जागी आहोत ती जागा देखील आहे या नकाशावर.”

राघव बोलू लागला,” होय आता आपण त्याच जागी आहोत ज्या ठिकाणी आजपासून 350 वर्षांपूर्वी द्वारका  किंवा त्यासारखे काही दिसले होते. आम्ही या नकाशावरील मार्गाचा अभ्यास केला आणि लक्षात आले ज्या ज्या ठिकाणी या नकाशावर शंख काढलेला आहे त्या त्या ठिकाणी द्वारका समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली आहे, आणि मगाशी सांगितलेल्या ऐतिहासिक घटना म्हणजेच समुद्री राक्षस किंवा क्रॅकन देखील या शंख असलेल्या जागांवरच घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच आम्ही लगेच पुरातत्व खात्याच्या नजरेस ही गोष्ट आणली. जर का आपण 19 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी असलो तरी कदाचित आपल्याला द्वारका दिसू शकेल आणि शक्य झाले तर आपण ती सबमरीन पुन्हा हस्तगत करू. आणि म्हणूनच आम्ही या प्रकरणी नौदलाची देखील मदत घेतली आहे.”

आता राजवीर ला तो लीड करत असलेल्या मोहिमेची माहिती मिळाली होती आणि त्यातील संभाव्य धोक्यांचा तो विचार करू लागला.

त्या रूम मधील सर्वच आता द्वारका या जादुई शब्दाबद्दल विचार करू लागले. राजवीर ने आजची मिटिंग संपल्याचे सांगितले आणि उद्या सकाळी परत एकदा भेटण्याचे ठरवून तो केबिन मध्ये आला होता. हा सगळा वृत्तांत रोजनिशीत लिहून त्याने रोजनिशी बंद केली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला.
पहाटे पहाटे त्याला डोळा लागला.

18 नोव्हेंबर चा दिवस उजाडला तोच मुली वेगळा उत्साह घेऊन, कालच्या मिटिंग मध्ये जे लोक होते ते एका वेगळ्याच उत्साहात कामाला लागले होते. सुंदरन आणि राघव त्यांच्या खोलीतच बसून विविध पुस्तक वाचून टिपण काढत होते. हरीश ने आपल्या जवळचा समुद्राचा नकाशा घेऊन सोनार यंत्रणा कार्यान्वित केली होती. आणि सोनार चा उपयोग करून आपल्याजवळील समुद्राच्या तळाचा नकाशा बरोबर आहे ना हे तपासायला लागला होता.

शेखर ने कॅप्टन बेदींना बोलावून हत्यार आणि दारुगोळा यांचा आढावा घेतला होता, आणि राजवीर च्या सल्ल्यानुसार त्याच्या टीम मधील सबमरीन चालवण्याचे प्रशिक्षण मिळालेल्या 10 जणांची वेगळी टीम करून आणि अन्य 10 मरिन कमांडो ची टीम त्याने तयार ठेवली होती. आता प्रतीक्षा होती ती फक्त उद्याच्या दिवसाची. या सर्व धांदलीत बाकीच्या लोकांना हेच सांगण्यात आले होते की हा एक युद्ध सराव आहे आणि रुटीन तयारी चालू आहे. त्यामुळे जास्त कोणी चौकशी देखील केली नव्हती.

18 नोव्हेंबर ची रात्र उजाडली. घड्याळाचा काटा हळूहळू पुढे सरकत होता. 19 नोव्हेंबर च्या पहाटेचे 5 वाजले होते, विषुववृत्त पार करून दक्षिण गोलार्धात असल्याने सकाळी 5 लाच थोडे थोडे उजडायला लागले होते. हवेत गारवा होताच. अचानक INS सातपुडा ला जोराचा हादरा बसला. सर्वजण खडबडून जागे झाले आणि आपल्या आपल्या खोल्यांतून बाहेर येऊन डेक वर धावले. त्यांच्या जहाजपासून अंदाजे 200 मीटर अंतरावर पाण्यामध्ये खळबळ माजलेली दिसत होती. जोरजोरात लाटा उसळत होत्या, अचानक त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर एक फुगवटा दिसला आणि क्षणात त्या फुगवट्या मधून एक चमकदार वस्तू बाहेर येऊ लागली. क्षणभरात त्या वस्तूचा खरा आकार सर्वांच्या लक्षात आला. एखाद्या शंखाप्रमाणे त्या वस्तूची रचना होती, पण ती वस्तू प्रचंड प्रमाणात चमकत होती, एवढी की डोळे दिपत होते. राघव आणि सुंदरन दोघेही अधाश्यासारखे त्या वस्तूकडे पाहत होते. दोघांनीही पूर्ण तयारी केली असल्याने डोळ्यावर प्रोटेक्टिव्ह गॉगल घातले होते आणि म्हणूनच ते त्या वस्तूकडे नीट पाहू शकत होते.

राजवीर ने शेखर ला ऑर्डर दिली की आपल्या छोट्या स्पीडबोट पाण्यात उतरवा आणि त्या वस्तूच्या दिशेने जा.

त्याप्रमाणे दोन छोट्या स्पीडबोटी निघाल्या, त्या शंखाकृती वस्तूपासून अंदाजे 10 मीटर अंतरावर असतानाच त्या वस्तूचा भाग एखाद्या दरवाज्याप्रमाणे बाजूला झाला आणि त्यातून एक चक्र मोठा आवाज करत बाहेर आले आणि त्या शंखाभोवती फिरू लागले. जणू ते त्या शंखाचे रक्षण करण्यासाठीच होते.

सुंदरन च्या लक्षात आले की महाभारतात वर्णन केलेले द्वारकेचे रक्षण करणारे सुदर्शन चक्र ते हेच. सुंदरन ने लाहेच त्या छोट्या बोटीवर असलेल्या शेखर ला वॉकीटॉकी वर मेसेज केला की “कोणतेही शस्त्र बाहेर काढू नका, सर्वांनी हात जोडून श्रीकृष्णाचे नाव घ्या”

त्यांचा मेसेज आल्या बरोबर शेखर ने त्याच्या बरोबरच्या सर्वांना सांगितले की “शस्त्र खाली ठेवा आणि हात जोडून श्रीकृष्णाचे नाव घ्या”

त्याप्रमाणे सर्वांनी कृती केली आणि त्या बरोबर त्या चक्राने आपला वेग कमी केला.

त्या शंखामधून या दोन बोटींवर एक प्रखर प्रकाशझोत पडला. जणूकाही ते या बोटींचे scanning करत होते. जसा तो झोत पडला तसा एक नौसैनिक खूप घाबरला आणि त्याने शंखाचे दिशेने हातातील गन ने गोळ्या चालवल्या. त्या होळीने शंखला स्पर्श केल्याबरोबर सुदर्शन चक्राने आपला वेग परत वाढवून या दोन बोटींवर हल्ला केला, आणि कुणालाही काहीही कळायच्या आत त्या दोन स्पीडबोटी त्यावरील नौसैनिकांसोबत नष्ट केल्या.

त्या नंतर ते सुदर्शन चक्र परत त्याच्या मूळ जागी म्हणजे शंखाच्या वरच्या भागात जाऊन बसले आणि तो दरवाजा बंद झाला. आणि तो शंख परत पाण्यात जाऊ लागला. आणि बघता बघता तो शंख दिसेनासा झाला.

INS सातपुडा च्या डेक वरील सर्व जण हा काही क्षणात घडलेला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते पण त्यांच्या हातात काहीही करण्यासारखे नव्हते. राजवीर, सुंदरन आणि राघव तिघेही शेखरच्या जाण्याने हादरले होते. पण त्यांच्या हे लक्षात आले होते की ते चक्र म्हणजे त्या शंखाचे डिफेन्स mechanisms होते आणि जेव्हा त्या स्पीडबोटींपासून शंखाला धोका वाटला तेव्हाच चक्राने हल्ला केला होता.

आता या सर्व प्रकारची नोंद official लॉग बुक मध्ये कशी करायची हा एक मोठा प्रश्न होता, कारण हे मिशन अत्यंत गुप्त होते. राजवीर फक्त एका गोष्टीने निश्चित होता की त्याने राघव आणि सुंदरन यांना त्यांचा हट्ट असून देखील स्पीडबोटीवर जाऊन दिले नव्हते आणि त्याच मुळे ते दोघेही आज जिवंत होते.

कृष्णाची द्वारका ती हाच शंख होता का या प्रश्नाचे उत्तर कोणीच दवू शकत नव्हते कारण त्या शंखाच्या जवळ सुद्धा कोणी जाऊ शकले नव्हते, पण जे काही होते ते दिव्य होते, अनाकलनीय होते या बाबत कोणालाच शंका नव्हती.

राजवीर ने सुंदरन आणि राघव कडे पाहिले. ते दोघेही प्रश्नार्थक नजरेने राजवीर कडे पाहत होते, दोघेही एकदम च बोलले, ” आता पुढे काय करायचं, परत फिरायचं का..?”

राजवीर ने शांतपणे समुद्राकडे पाहत उत्तर दिले, “तो शंख खरच द्वारका होता की नाही हे माहीत नाही पण त्या शंखामुळे मी माझ्या हाताखालील 21 जणांचे जीव गमावले, आता ती वस्तू अथवा तो शंख नक्की काय आहे ते कळल्या शिवाय मला शांतता मिळणार नाही. आता काय करायचे हे तुम्ही काय विचारता.. कामाला लागा, तो मॅप काढून बघा, पुढची जागा कोणती आहे जिथे हा शंख आपल्याला दिसेल, आपण आजच त्या ठिकाणी जाऊया”

आता चकित व्हायची पाळी सुंदरन आणि राघव यांची होती. ते दोघेही भारावल्यासारखे आपापल्या लॅपटॉप वर कामाला लागले, आणि राजवीर तो मात्र एकटक समुद्राकडे पाहत होता, जणू त्याला ती द्वारका ताब्यात घेण्याचीच ओढ लागली होती.

हिंदी महासागरातील घटना घडून आता बरोबर 2 दिवस झाले होते. गेले दोन दिवस राजवीर आणि त्याचे सहकारी, जहाजाच्या आजूबाजूच्या पाण्यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध घेत होते जे त्या 2 स्पीडबोटींवर होते. शेखर आणि त्याचे 20 सहकारी त्या दोन स्पीडबोटींवरून शंखाचे आकाराच्या त्या अनाकलनीय वस्तूच्या जवळ गेले होते पण एका छोट्या चुकीमुळे ते सर्व 21 च्या 21 जण आणि त्या स्पीडबोटी नष्ट झाल्या होत्या.

दोन दिवस शोध घेऊन राजवीर च्या हाती फक्त त्याच्या सहकाऱ्यांची शव लागली. आता मुख्य प्रश्न होता तो म्हणजे नौदलाच्या मुख्यालयाला या घटनेबाबत कळवण्याचा. राजवीर ने स्वतः जहाजाच्या संपर्क विभागात जाऊन नौदल मुख्यालयाला झालेल्या घटनेबाबत सांगितले. त्याला तिकडून आदेश मिळाला की मोहीम गुंडाळून परत विशाखापट्टणम ला यावे. त्या नुसार राजवीर ने हाताखालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आज शेखरच्या कमी त्याला खूप जाणवत होती. महिनोंमहिने जहाजावर राहिल्यावर नौसैनिकांसाठी त्यांचे सहकारीच त्यांचे कुटुंब बनलेले असतात. परंतु शेखर च्या अश्या अचानक जाण्याने राजवीर आतून थोडासा हलला होता आणि शेखर बरोबर केलेल्या विविध मोहिमा त्याच्या डोळ्यासमोरून गेल्या.

पण शेवटी नौदलाच्या शिस्तीला अनुसरून त्याने स्वतःला सावरले आणि विशाखापट्टणम च्या दिशेने जहाज वळवले.

10 डिसेंबर ला जहाज विशाखापट्टणम ला पोहचले. या मोहिमेचा संपूर्ण अहवाल नौदलाच्या वरिष्ठांना सादर करून राजवीर ने सुट्टीचा अर्ज केला. त्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी आरामाची गरज होती, त्याने सुट्टी मंजूर झाल्यावर आधीच ठरल्याप्रमाणे तडक IIT चेन्नई गाठले. सुंदरन आणि राघव त्याची तिथे वाटच पाहत होते. कॅम्पस मधील कॉफी शॉप मध्ये बसून त्यांनी त्यांची चर्चा सुरू केली.

या मधल्या काळात सुंदरन आणि राघव या दोघांनीही अभ्यास करून द्वारकेच्या मार्गातील पुढील जागा निश्चित केली होती. अंदमान निकोबार द्वीप समूहाच्या दक्षिणेला असलेल्या इंदिरा पॉईंट या भारतीय सीमेवरील शेवटच्या पॉईंट अपसून जवळ जवळ 100 किलोमीटर दक्षिणेला ती जागा होती. आणि तारीख होती 12 जानेवारी..!!!

भारतीय नौदलाने आणि पंतप्रधान कार्यालयाने ही मोहीम बंद केली होती. 21 प्रशिक्षित अधिकारी आणि नौसैनिकांच्या बलिदानानंतर अजून धोका पत्करायला सरकार आणि नौदल दोघेही तयार नव्हते. त्यामुळे आता जर द्वारकेचा शोध घ्यायला जायचे असेल तर कोणतीही सरकारी मदत मिळणार नव्हती. खर्च सुद्धा स्वतःलाच करावा लागणार होता. या सर्व गोष्टींची कल्पना राजवीर ने सुंदरन आणि राघव यांनी दिली.

हे ऐकल्यावर दोघांचेही चेहरे प्रश्नार्थक झाले. आता कसे करायचे हाच प्रश्न दोघांच्याही डोक्यात सुरू झाला. तेवढ्यात भारदस्त आवाजात एका व्यक्तीने त्यांना गुड मॉर्निंग केले. राघव आणि सुंदरन दोघांनीही त्याला लगेच ओळखले. भारतातील बिझनेस वर्तुळात सर्वात जास्त चर्चेत असलेला आणि भारतातील प्रमुख व्यावसायिक असलेल्या डॉ नरसिंह रेड्डीचा तो आवाज होता. डॉ रेड्डी हे त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी जसे ओळखले जात तसेच त्यांच्या इतिहाच्या वेडापायी देखील ओळखले जात. उत्तर भारतातील सिनौली येथे झालेल्या उत्खननासाठी डॉ रेड्डी यांनीच भारतीय पुरातत्व विभागाला आर्थिक मदत केली होती.

सुंदरन आणी राघव या दोघांनाही हे माहीत नव्हते की राजवीर आणि डॉ रेड्डी हे लहानपणापासूनच मित्र होते. दोघांचेही वडील नौदलात अधिकारी होते आणि त्याच मुळे या दोन मुलांची देखील मैत्री झाली होती. राजवीर ने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून नौदलात प्रवेश घेतला होता पण रेड्डी मात्र व्यवसायात उतरून आज मोठे व्यावसायिक झाले होते पण दोघांचीही मैत्री अबाधित होती.

राजवीरनेच डॉ रेड्डीना आज तिथे बोलावले होते. सुंदरन सिनौली उत्खननापासूनच डॉ रेड्डीना ओळखत होते. डॉ रेड्डी नी आल्या आल्या बोलायला सुरुवात केली, “राजवीर ने मला सर्व सांगितले आहे आणि माझ्या आर्थिक पाठिंबा या मोहिमेला आहे, तुम्ही माणसे गोळा करा, ज्या ज्या वस्तू लागतील त्या गोळा करा, आणि मोहिमेवर निघा”

डॉ रेड्डीच्या पाठिंब्यामुळे या तिघांनाही चांगलेच उत्साहित झाले आणि तयारीला लागले. पुढचे 2 आठवडे त्यांनी माणसे गोळा करणे, जहाज तयार करणे वगैरे मध्ये घालवले. राजवीर ने आपल्या तटरक्षक दलातील दोस्तांच्या मदतीने एका तस्कराची भेट घेतली, हा माणूस चेन्नई हुन तामिळ लोकांना चोरून श्रीलंकेला नेणे आणि तिकडच्या लोकांना भारतात आणणे हे काम करायचा, तटरक्षक दलाने त्याला अनेकवेळा अटक केली होती. आता सुद्धा तो चेन्नईच्या तटरक्षक दलाच्या जेल मध्येच होता. त्याच्याशी बोलून राजवीर ने एक मालवाहू पण स्पीड चांगला असलेली बोट arrange केली. आणि सर्व तयारी झाल्यावर राजवीर, सुंदरन आणि राघव आणि त्यांच्या बरोबर चे 30 सहकारी मोहिमेवर निघाले. त्यांनी बरोबर 5 जानेवारी ला चेन्नई सोडले. त्यांना आता लवकरात लवकर आपले इच्छित ठिकाण गाठायचे होते कारण हातात दिवस खूपच कमी होते.

पण निसर्गाची साथ त्यांना मिळाल्याने ते 11 जानेवारी ला आपल्या इच्छित स्थळी दाखल झाले. आता प्रतीक्षा होती ती द्वारकेच दर्शन होण्याची.

गेल्यावेळ प्रमाणेच राजवीर ने 2 स्पीडबोटी तयार ठेवल्या होत्या पण या वेळी खबरदारी म्हणून कोणतेही शस्त्र त्याने बरोबर घेतले नव्हते. राजवीर , सुंदरन आणि राघव तिघंही या बोटींवर होते आणि त्यांचे निवडक 15 सहकारी देखील. गेल्या वेळ प्रमाणेच ठीक सूर्योदयाच्या वेळेस पाण्यात खळबळ माजून एक फुगवटा आला आणि हळूहळू तो शंख पाण्याच्या पृष्ठभागावर आला.

राजवीर ने आपल्या दोन्ही बोटी शंखाच्या दिशेने नेल्या. साधारण 100 मीटर अंतरावर जाऊन ते थांबले कारण गेल्यावेळसारखेच शंखाच्या वरील भागातून सुदर्शन चक्र आले आणि शंखाभोवती फिरू लागले. पण या वेळी गेल्या वेळ सारखी चूक राजवीर आणि त्याच्या टीम ने केली नाही, त्यांनी हात जोडून श्री कृष्णाचे नाव घेतले, शंखामधून तीव्र प्रकाश या दोन्ही बोटींवर पडला आणि धोका नाही याची खात्री पटल्यावर, शतकाच्या मध्यातून एक दरवाजा उघडला गेला.

राजवीर, सुंदरन आणि राघव तिघंही आश्चर्याने पाहत होते. त्या दरवाज्यातून एक लांब फळी सदृश्य वस्तू बाहेर आली आणि यांच्या स्पीडबोटींपर्यंत ती आली. बाकी कुठलीच हालचाल झाली नाही. राजवीर, सुंदरन आणि राघव यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोटीवरच थांबायला सांगितलं आणि स्वतः त्या फळीवर पाय ठेवून उभे राहिले. अचानक पाने ती फळी परत शंखाच्या आत ओढली गेली. आणि हे तिघेही शंखाच्या आत ओढले जाऊन दिसेनासे झाले.

आतमध्ये मिट्ट काळोख होता. तिघंही भेदरलेल्या अवस्थेत एकमेकांचे हात पकडून उभे होते. आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना ते करत होते.

अचानक पणे ते जिथे उभे होते तिथे लख्ख प्रकाश पडला. आणि त्यांच्या लक्षात आले मी ते त्या शंखकृतीच्या आतमध्ये उभे होते. ती एक पार्किंग सदृश्य जागा होती, आत मध्ये त्यांच्या बाजूला अनेक आकाराचे शंख उभे करून ठेवले होते आणि त्या शंखाना मोटारसायकल प्रमाणे बसायची जागा आणि हँडल देखील होते पण बाकी कोणतेही इंजिन वगैरे दिसत नव्हते.

त्यांना अचानक आवाज आला म्हणून त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले, त्यांच्या पासून साधारण 10 फुटांवर एक आकृती उभी होती. हळूहळू ती आकृती प्रकाशात आली. तो एक माणूसच होता पण त्याला नाकाच्या ऐवजी माशांप्रमाणे कल्ले होते आणि त्यातून तो श्वास घेत होता. त्याला बघून राजवीर ने सुंदरन आणि राघव दोघांनाही स्वतःच्या मागे केले कारण उद्या काहीही अघटित घडले तर राजवीर एकटाच असा होता जो युद्धप्रकारात प्रशिक्षित होता. आणि जरी सुट्टीवर असला तरी तो एक नौसैनिक होता आणि भारतीय नागरिकांच्या रक्षणाचे काम त्याच्यावर होतेच.

राजवीर ने त्या मनुष्याच्या किंवा आकृतीच्या दिशेने खुणा करून तू कोण हे विचारले.

आणि हे विचारल्यावर ती आकृती जोरात हसायला लागली. ती शुद्ध हिंदीत बोलायला लागली, म्हणाली, ” घाबरू नका, मी अक्रूर, भगवान श्रीकृष्णांचा साथीदार आणि आता या द्वारकेचा पालक.”

त्याचे बोलणे ऐकून हे तिघंही आश्चर्याने स्तब्ध उभे राहिले. अक्रूर पुढे आला आणि त्याने या तिघांनाही आपल्या बरोबर आतमध्ये नेले. बाहेरून जेवढा हा शंख भव्य दिसत होता त्याच्यापेक्षा कितीतरी भव्य आतून वाटत होता. ते चौघही एका छोट्या खोलीत गेले आणि त्यांच्या मागे दरवाजा लागला. अक्रूराने समोरच्या भिंतीवरील एक कळ दाबली आणि त्या भिंतीत असलेला दरवाजा उघडला गेला. आत मध्ये भव्य दालन होत. अणे तिथे वेगवेगळे स्क्रीनसदृश्य पडदे होते. त्या पडद्यांसमोर अजून काही माणसे बसून काम करत होती. राजवीर ला त्याची बोट आणि स्पीड बोटी सुद्धा त्या पडद्यावर दिसल्या.

अक्रूर पुढे म्हणाला, “द्वारकेमध्ये आपले स्वागत आहे. आता आपण द्वारकेचा मुख्य नियंत्रण कक्षात आहोत. या ठिकाणहुन आम्ही संपूर्ण द्वारकेचे नियंत्रण करतो.”

सुंदरन ने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली, “पण श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर सर्व यादव हे आपापसात युद्ध करून मेले असे महाभारत सांगते, मग तुम्ही कोण नक्की..?”

अक्रूर बोलला, “बरोबर आहे तुमचं, आमच्या पैकी बरेच जण आपापसात युद्ध करून मेले पण सगळे नाही, आम्ही जे भगवान श्रीकृष्णाच्या सल्लागार मंडळात होतो त्यांनी असे पाऊल उचलले नाही, उलट श्री कृष्णानेच आम्हाला द्वारका घेऊन निघून जाण्यास सांगितले. आता तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहेत ते आम्ही आमच्या ग्रहावर बनवलेले एक amphibian जहाज आहे, ते पाण्यात, आकाशात, जमिनीवर, अवकाशात कुठेही संचार करू शकते. “

राजवीर ने मध्येच टोकले,” आमच्या ग्रहावर ..??”

अक्रूर म्हणाला, ” हो, आम्ही पृथ्वीवरचे नाही, आम्ही पृथ्वी पासून करोडो प्रकाशवर्षे दूर असलेल्या Sigma W या Andromeda R Galaxy या आमच्या ग्रहावरून आहोत. आमच्या ग्रहावरून वेळोवेळी पृथ्वीवर आमचे लोक आले आणि त्यांनाच तुम्ही मनुष्य देव किंवा गॉड किंवा परमेश्वर म्हणून ओळखता. आम्ही फक्त भारतातच नाही तर या पृथ्वीवरील विविध अन्य संस्कृती मध्ये देख आमचे लोक पाठवले, त्याच मुळे इजिप्त असो, किंवा इंका असो, किंवा चिनी असो किंवा इराणी असो, सर्वच संस्कृती मध्ये त्यांचे देव हे आकाशातुन आलेले दाखवले आहेत. आमच्या या ग्रहाचा पत्ता आम्ही एवढा विस्ताराने सांगायचो नाही तर त्याचा लघुरूपात सांगायचो. त्याला आम्ही S.W.A.R.G. म्हणायचो आणि तुम्ही मनुष्यांनी याला स्वर्ग म्हणायला सुरवात केली.

आमच आयुष्यमान हे पृथ्वीच्या तुलनेत 500 पटीने जास्त आहे त्यामुळेच आम्ही कायम च तुम्हाला तरुण दिसलो आहोत.”

सुंदरन ने प्रश्न केला, “मग एवढे वर्ष आम्हाला तुम्ही दिसत का नव्हता,?”

अक्रूर म्हणाला,” आम्ही दिसत नव्हते ते म्हणजे आमचे हे यान, हे यां कोणत्याच यंत्रावर दिसू शकत नाही, एवढंच काय आम्ही हे अदृश्य देखील करू शकतो. पण काही काळाने याचा दुरुस्ती साठी आम्ही ही यंत्रणा बंद करतो तेव्हा जर का कोणी मनुष्य त्या भागात असेल तर आम्ही त्यांना दिसतो, अन्यथा नाही”

राजवीर म्हणाला, ” मग आज आम्हाला कसे दिसलात, 2 महिन्यात तुमच्या यानात परत दुरुस्ती निघाली का.?”

अक्रूर हसला, व म्हणाला,” नाही आज कोणतीही दुरुस्ती नव्हती, पण तुम्हा लोकांना बघूनच आम्ही आज ठरवून आमची गुप्त राहण्याची प्रथा मोडली. गेल्या वेळी तुम्ही दिसला होतात त्या वेळी जे झाले त्या बद्दल माफी मागण्यासाठीच मी आज मुद्दाम तुम्हाला आमच्या द्वारकेत घेऊन आलोय,”

“गेल्यावेळी तुम्ही कोण आहात याची आम्हाला कल्पना नव्हती आणि त्याच मुळे द्वारकेचा सुरक्षा यंत्रणेच्या हातून तुमच्या माणसांचा मृत्यू झाला. पण मधल्या काळात तुमच्या बद्दल आमही बरीच माहिती गोळा केली आणि तुम्हाला भेटायची उत्सुकता वाढली”

राघव : “आमच्या बद्दल माहिती तुम्हाला कुठून मिळाली..?”

अक्रूर परत एकदा हसला, आणि म्हणाला,” तुला काय वाटत की इंटरनेट चा शोध मानवाला लागला..??, इंटरनेट हे आम्ही तुम्हाला दिलेले तंत्रज्ञान आहे, त्या मुळे तुमची माहिती काढणं आम्हाला खूपच सोपं होतं.”

“असो, तुम्हाला आज भेटून माझ्या मनावरचे ओझे कमी झाले, मी मनापासून क्षमा मागतो तुमच्या सहकाऱ्यांच्या मृत्यू बद्दल, आणि तुम्ही आम्हाला माफ कराल अशी अपेक्षा करतो.”

“आता तुम्हाला परत पाठवायची वेळ झाली, चला आपण निघुया.”

सुंदरन म्हणाले, ” कृपया आम्हाला या द्वारकेबद्दल अजून माहिती द्या, तुम्ही कसे राहता पाण्याखाली , काय खाता वगैरे”

अक्रूर म्हणाला, “तुम्ही माझे हे कल्ले बघितले असतीलच, त्यामुळेच आम्हाला पाण्याखाली देखील श्वास घेता येतो तसेच पाण्याखाली असताना पाणवनस्पती आणि मासे हेच आमचे खाणे.”

“या द्वारकेला ऊर्जा ही समुद्रात असताना भूगर्भातील उष्णतेमुळे मिळते आणि जमिनीवर आणि आकाशात असताना सूर्यापासून ऊर्जा घेतो.”

एवढे बोलणे होत असतानाच ते चौघे परत त्या छोट्या खोलीत आले, विरुद्ध बाजूच्या भिंतीवरील कळ दाबून अक्रूर या तिघांना परत त्या पार्किंग सदृश्य भागात घेऊन आला. तिघांचा निरोप घेताना, त्याने तिघांच्याही हातात एक एक शंख ठेवला. व म्हणाला,” हा शंख श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाची प्रतिकृती आहे, सांभाळून ठेवा”

आणि मग अक्रूर परत एकदा आतमध्ये निघून गेला. या तिघांनाही काहीही समजायच्या आत त्यांच्यावर एक प्रखर प्रकाशझोत पडला आणि ते तिघेही दुसऱ्या सेकंदाला, त्यांच्या स्पीडबोटींवर होते.

त्यांच्या डोळ्यादेखतच ते सुदर्शन चक्र परत त्याच्या मूळ जागी गेले आणि शंखरूपी द्वारका पाण्यात बुडवून दिसेनाशी झाली.

राजवीर , सुंदरन आणि राघव तिघेही स्तिमित होऊन त्यांच्या मुख्य बोटीवर परतले.

साधारण 20 जानेवारीच्या आसपास ते चेन्नई ला परतले. आल्यावर डॉ रेड्डीना त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. राघव त्याच्या कॉलेज मध्ये निघून गेला, सुंदरन दिल्लीला रवाना झाले. राजवीर ने आपल्याजवळील शंख डॉ रेड्डीना दिला, आणि म्हणाला “जर नशिबात असेल तर मला परत मिळेल चान्स द्वारकेत जाण्याचा आणि त्यावेळी मात्र मी नुसता शंख घेऊन येणार नाही, बघू कधी साथ देतंय माझं नशीब ते”

अस बोलून राजवीर परत विशाखापट्टणम ला रवाना झाला, त्याची सुट्टी संपली होती आणि परत नौदलाची ड्युटी त्याला खुणावत होती. त्याला खात्री होती की आज ना उद्या परत एकदा त्याला संधी मिळेल द्वारकेत जायची आणि त्याची तो वाट पाहणार होता.

समाप्त 

©स्वानंद गोगटे

09819632076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu