कथा – हिरकणी
“अभिनंदन, सुजाता मँडम.अप्रतिम. सगळ्यांना
मागे टाकलत.इतकं उत्कृष्ट प्रोजेक्ट अजून पर्यंत पाहिलं नव्हतं.तयारी उत्तम केली होती.”
मँडम, आता तुमचं प्रमोशन नक्कीच. पार्टी द्यायला लागेल.”
असे कितीतरी अभिप्राय दिले जात होते. कौतुकाचा वर्षाव होत होता. सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट बद्दलच्या गळ्यात असलेल्या पदकाचा भार वाटत होता. मन आक्रंदत होते”काय फलित ह्या मानमरातबांच?स्त्रीचा मूलभूत हक्क मात्रुत्व. तोसुद्धा मनासारखा उपभोगता येत नाही.’
तिच्यातील हिरकणी मुकाश्रू ढाळीत होती. सुन्न मनाने तिने सर्व सोपस्कार उरकले व काढता पाय घेतला. टँक्सीत बसून तिने
दाबोलिम विमानतळ गाठले. विमान सुटण्याची घोषणा होत होती. वार्याच्या गतीने धावून ती
विमानात चढली. स्थानापन्न झाल्यावर तिच्या मनात चहुबाजूंनी विचार घुसले.’कसा झाला असेल कार्यक्रम?पिंकी नीट बोलली असेल ना? सकाळचा माझ्यावरचा राग मनात धरून असेल का? निकाल काय लागेल?’
हा सिलसिला तीन आठवड्यापूर्वी चालू झाला होता. पिंकीची वत्क्रुत्वस्पर्धा व सुजाताचे प्रोजेक्ट दोन्हीची तयारी युद्ध पातळीवर. पहिल्या फेरीत पिंकीची निवड झाली व अंतिम फेरीसाठी सुजाताने तिचे भाषण लिहून पाठ करून घेतले. त्याचबरोबर प्रोजेक्टची तयारी सुध्दा केली. दोन्ही समांतर रेषात चालले होते. पिंकीला अंतिम कार्यक्रमासाठी तिच्या आवडीचा ड्रेस सुद्धा आणला. किती खुषीत होती पिंकी!परंतु तिचा कार्यक्रम व सुजाताचे प्रेझेंटेशन एकाच दिवशी आले. पिंकी व पर्यायाने सुजाता सुध्दा हिरमुसली.
“ममा, नको ना जाऊ तू.प्लिज.”
“साँरी बेटा, मला गेलच पाहिजे. खूप महत्वाचं काम आहे.”
“म्हणजे माझं भाषण महत्वाचं नाही ना ? तीसुद्धा तू गोव्याला जाणार. यू आर अ बँड ममा.”
पिंकीचे डोळे भरुन आले.
“तुझं भाषण तर सगळ्यापेक्षा महत्वाचं.पहाटेच्या विमानाने जाणार आणि रात्रीपर्यंत नक्की परत येणार. प्राँमिस. डँडू आणि आजी येणार आहेत. डँडू व्हिडीओ काढेल ना तुझ्या भाषणाचा।”
हिरमुसलेली पिंकी गप्प बसली.सुजाताला गलबलून आले. तिच्यातील हिरकणी व्याकूळ झाली होती. सुदीप तिची व पिंकीची आपल्यापरीने समजूत काढीत होता. सुजाताचे प्रोजेक्ट सर्वोत्तम ठरले होते. पण त्याचा तिला आनंद होतच नव्हता.
‘पिंकीचे भाषण सर्वोत्कृष्ट ठरेल का ? मध्येच अडखळणार नाही ना? तयारी तर उत्तम झाली होती. तिला यश मिळाले नाही तर ते माझेच अपयश.’अशा विचारानी ती हैराण झाली होती. सभोवतालचा माहोल तिला असह्य होत होता. तिच्यातील हिरकणी गडउतार होऊ पाहत होती. विमानाचा वेगही मंदावल्यासारखा भासत होता.
मुंबई विमानतळावर पायउतार होऊन तिने बाहेर धाव घेतली. टँक्सीत स्वतःला ढकलून दिले. त्या घाईतसुध्दा पिंकीच्या आवडीचे कँडबरी फ्रुट अँड नट् घ्यायला ती विसरली नाही. टँक्सी घराजवळ आली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. घरातील दिवे चालू होते. तिच्या उरातील धडधड वाढली. दार उघडताच पिंकी धावत आली.
“ममा, माझं स्पीच बेस्ट झालं.अध्यक्षांनी माझ्या गालाला हात लावून कौतुक केलं आणि मला हे गोल्डमेडल दिलं.”
सुजाताने भरलेल्या डोळ्यांनी सुदीपकडे पाहिले. तिची नजर विचारत होती”मला फोनवर कळवलं का नाही?”
सुदीपने स्पष्टीकरण दिले”सुजू, मी फोन करत होतो.पण पिंकीला सरप्राईज द्यायचं होतं.”
सुजाताने पिंकीला कवटाळले .तिच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली.
“वेडी ग माझी ममा.रडतेस काय ? हे गोल्डमेडल खरं तर तुझंच आहे. किती छान तयारी करुन घेतलीस तू माझी. म्हणूनच मी जिंकले.यू आर द बेस्टेस्ट ममा.”
पिंकीने ते मेडल सुजाताच्या गळ्यात घातले व कँडबरी हातात घेऊन ती उड्या मारु लागली. सुजाता अंतर्यामी सुखावली . ‘बँड टू बेस्टेस्ट’
हे प्रमोशन आँफीसातील प्रमोशन पेक्षा भारी होते. तिला मिळालेल्या मेडलपेक्षा पिंकीने घातलेले मेडल मौल्यवान होते.
तिच्यातील हिरकणी जिंकली होती.
प्रा.रेखा विनायक नाबर