कथा – अबे ​

आमचा मुलगा अहमदाबादला शिकायला आहे . आमची ही सारखी मुलाला भेटायला जाऊया म्हणून मागे लागली होती . शनि . रवि . च्या सुट्टीत मी सपत्नीक अहमदाबादला गेलो . 

फाफडा , जिलेबी , ढोकळा , डाळवडे आणि मसाला चहा अशा नाश्त्याच्या बुफेवर यथेचछ ताव मारला . हॉटेलच्या डेस्कवर फिरण्याच्या स्थळां विषयी माहिती विचारली . इंटरन्याशनल व्ही आय पी  दोन दिवस सिटीत येत असल्या कारणाने साबरमती आश्रम , रिव्हर फ्रंट अशा ठिकाणी भेटी देण्यास नागरिकांना मज्जाव आहे ,असे कळल्यावर मी नाराज झालो . पण आमची ही अजिबात हिरमुसली नाही . मला म्हणाली नेक्स्ट ट्रीपमध्ये ते सगळं बघू . ह्यावेळी आपण पोळ मध्ये फिरू . आणि ती उत्साहात हॉटेलातून निघाली . मी तिच्या पाठोपाठ चालत तिला विचारले , पोळ म्हणजे काय ? त्यावर ती म्हणाली आपली कशी गणेशगल्ली , चिवडागल्ली तशी इथे असते ती पोळ . 

नवरात्र जवळ आल्यामुळे सगळीकडे रंगीबेरंगी चनिया चोळी , धोती कुर्ता , ज्वेलरी चे स्टॊल लागले होते . बायको म्हणाली , सानिका आता तीन वर्षांची होत्येय . आपल्यामध्ये परकर पोलका घेतात . चला आपण तिच्यासाठी छान चनियाचोळी घेऊ . 

अबे मला तुझ्या खरेदीत पाडू नको . फार बोरिंग होते . मी आपला हॉटेलवर टीव्ही बघत लोळत पडतो , तू खरेदी करून ये . हॉटेल जवळच तर आहे . मी तिथून हॉटेलवर जाण्यासाठी निघालो . एक गल्ली चुकलो आणि मेनरोडला लागलो . तिथे लोकांची तोबा गर्दी होती . कळले की पंतप्रधान व जपानचे पंतप्रधान यांचा रोड शो आहे . म्हटलं बघावं तरी काय असतं ते . मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रुटीन शिवाय काही सामाजिक जीवन अनुभवता आले नाही . एवीतेवी टाईमपासच करायचा आहे . असा विचार करत मी गर्दीत पुढे पुढे चालू लागलो . अजून रोड शो तिथपर्यंत यायला बराच वेळ लागणार असे दिसत होते . मी आपला धक्क्याने पुढे पुढे सरकत होतो . चणा जोर गरम वाला उभा होता त्याच्याकडून थोडे चणे घेतले . पैसे देऊन चणे तोंडात टाकत असताना एकाचा जोरात धक्का लागला . चण्याची पुडी कशीबशी सांभाळत मी ओरडलो , अबे , डोळे फुटलेत का ? पुरुषाला काय धक्का मारतो . 

सॉरी , सॉरी म्हणत तो माणूस पळण्याच्या तयारीत होता . पण गर्दीत त्याला सटकता आले नाही . त्याने हसत हसत विचारले , तुम्ही मराठी का ?

मी चण्याच्या पुडीतून डोके वर करत रागाने त्याच्याकडे बघितले आणि केकाटलो , अबे , तू इथे कुठे ? त्यावर माझा उन्नत मुखडा त्याला दिसला आणि तोही उद्गारला , शिंद्या ना तू ? इथे कुणीकडे ? आमची गळाभेट झाली . नुकतीच पंतप्रधान व जपानच्या पंतप्रधानांची एअरपोर्ट वर भेट झाल्याची बातमी वायूवेगे पसरली होती . कॉलेज नंतर  इतक्या वर्षांनी पारसची आणि माझी गाठ पडली होती . एका दैनिक समाचार पत्राचा तो वार्ताहर होता . त्यामुळे गडबडीत होता . त्याने त्याचे कार्ड मला दिले व म्हणाला उद्या संध्याकाळ नन्तर मी कामातून मोकळा होईल . मला कोन्त्याक्ट कर . ओ .के . उद्या भेटू . असे बोलत बोलत तो पुढे निघून गेला . मी त्याचे कार्ड प्यांटच्या पाठीमागील खिशातील व्हॉलेट मध्ये ठेवावे म्हणून खिशात हात घालण्याचा प्रयत्न करू लागलो . तर एकाने माझे मनगट गच्च पकडले . मी क्या हुआ ? शु छे ? शु छे ? असे विचारत राहिलो . मला गर्दीतून खेचत त्याने व्हॅन मध्य टाकले . तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर दंडुका दाखवला . चुपचाप उतरलो . समोर पहिले तर त्याने मला पोलीस ठाण्यात आणले होते . कितीतरी चित्र विचित्र चेहरे तिथे पकडून आणले होते . कोणी बेरकी , कोणी निडर , तर कोणी दयेसाठी आसुसलेले . माझ्या मोबाईलची रींग वाजली . हीच कॉल होता . मी दुप्पट घाबरलो . आगीतून सुटून फुफाट्यात पडल्यागत माझी स्थिती झाली . पटकन क्लिक केले . आवाज बंद झाला . चुकून मी फोन कट केला वाटतं . पुन्हा रिंग वाजली तेव्हा हवालदार ओरडला , रिंग ऐकू येत नाही का ? आवाज बंद करा . मी फोन वर बोलत तिथून बाजूला जाऊ लागलो . त्याने दंडुक्याने तिथेच बसायची खूण केली . 

अहो मी केव्हाच पोहोचले रूमवर . तुम्ही कुठे आहात ?

मी …. पुढे काय बोलावे कळेना . 

अहो या ना लवकर , मला एकटीला इथे कसेतरीच होत्येय . 

अबे , तू फोन ठेव आता . तू फोन ठेवला तर मी येईन ना . मी घाबरत फोन कट केला . 

तिथे इन्चार्ज असलेल्या इंस्पेक्टरांनी माझे बोलणे ऐकले आणि विचारले , काय भाऊ मराठी का तुम्ही ? काय घोळ घातलात ?

इंस्पपेक्टर मराठी दिसतोय . बुडत्याला काडीचा आधार मिळाल्याप्रमाणे मी त्याच्या टेबलापाशी धावून गेलो . तितक्यात मघाशी मला घेऊन आलेला माणूस म्हणाला , हा गर्दीत पाकिटमारी करत होता . सारखे काहीतरी अबेसर व अकि म्याडम विषयी बोलत होता , चौकशा करत होता . मला तर ह्याच्यावर जासूसीचा संशय आहे . 

साहेब हा उगीचच काहीतरी बरळतोय . हा आहे कोण ? मी फुत्कारलो . 

इन्स्पेकटर शांतपणे म्हणाले , आधी आवाज खाली घ्यायचा . हे पोलिसस्टेशन आहे . हा इथला हवालदार आहे . आज इंटरन्याशनल व्ही आय पी सिटीत आले आहेत , त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात केलेला सध्या वेशातील हवालदार आहे . 

अबे , पण माझ्यावर चोरीचा आळ … 

साहेब हा असाच अबे , अबे करून काहीतरी बोलत होता . 

इन्स्पेक्टर मला म्हणाले , तुम्ही नेहमी असेच बोलता का ? मी मुंडीने होकार दिला . त्यांनी हवालदाराला हसत हसत सांगितले कि हि त्यांची मराठी भाषेतून बोलायची लकब आहे . 

पण हवालदार काही पीछेहाट घ्यायला तयार होईना . तो म्हणाला , ह्यांनी माझ्या खिशातील पाकीट मारायचा प्रयत्न केला . 

साफ खोटे आहे . मी मराठी माणूस आहे . मोडेन पण वाकणार नाही , 

ह्याचा काय सम्बन्ध इथे ? इन्स्पेक्टरने विचारले . 

म्हणजे … मी … मी चाचरत बोललो . मर्द मराठ्याची हिम्मत गोळा केली आणि ठामपणे म्हणालो , मी हाडाचा मराठी आहे . हालाखीचे दिवस जगीन पण कधी चोरी करणार नाही . 

पण ह्याने माझ्या खिशात … 

मी माझ्या मित्राचे कार्ड तुझ्या खिशात कशाला ठेविन . 

मी , इन्स्पेक्टर आणि हवालदार तिघेही बुचकळ्यात पडलो . इन्स्पेक्टरने विचारले नक्की काय झाले ?

त्यावर आठवून मी म्हणालो , माझा कॉलेज मधला मित्र मला भेटला . त्याचे कार्ड व्हॉलेट मध्ये ठेवण्यासाठी … 

तुम्ही माझ्या खिशात हात घातला … 

मी कशाला तुमच्या खिशात … गर्दीत चुकून तुमच्या खिशाला हात लागला असेल . 

नाटकं बास झाली . साब , आ चोर छे . 

चोर नथी छे . अहो हे कार्ड बघा मित्राचे , अजून हातातच आहे . 

पत्रकाराचे कार्ड वाचताच हवालदार म्हणाला , ओके , ओके . पण तुम्ही अकि म्याडम विषयी काय बोलत होतात ? 

कोण अकि म्याडम ? 

ते तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बोलत होतात … 

ते होय , ते जरा आमचं कॉलेज काळातलं म्याटर होतं . 

माझा खुललेला, हसरा चेहरा बघून इन्स्पेक्टर हि खुषीत आले व म्हणाले , बोला , बोला . 

ते आपलं काही नाही . कॉलेज मध्ये आमच्या ब्याच ला एक देखणी पोरगी होती अकि , तिच्याविषयी … 

तुम्ही लाईन मारत होतात तिच्यावर … 

नाही हो , तो माझा मित्र पारस  तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता . 

मासोळी अडकली का जाळ्यात ?

नाही ना . आणि तेच मी अकीविषयी विचारत होतो . 

अकि म्हणजे ? 

अंकिता . 

होय . होय . मग तुम्हीसुद्धा जाळी फेकली असतील … 

कसचं काय , ती इतकी चिकणी आणि भारी होती की आम्ही बाकीचे सगळे तिच्याभोवती मधमाशीसारखे रुंजी घालत होतो . 

फोनची रिंग वाजली . पोहोचतोच आहे असे म्हणत हिचा फोन ठेवला . तिथून निघालो . मी कोणत्या एरियात आहे ते माहित नव्हते . आता उशीर करायला नको . म्हणून रिक्षावाल्याला हॉटेलचे नाव सांगितले . एक छोटीशी गिरकी घेऊन रिक्षा हॉटेल समोर उभी राहिली . त्याला मिनिमम चार्ज देऊन हॉटेलातल्या लिफ्ट मध्ये उभा राहिलो . आज बायको पासून पळून जात होतो , पण बायकोच्या फोनवरील मराठी संभाषणाने इन्स्पेक्टर देव रूपात भेटला आणि माझी सुटका झाली . म्हणून म्हणतो कि सुज्ञ जनांनी नेहमी बायकोला शरण जावे . 

तुम्ही असं करता तुम्ही तसं करता 

प्रेम – क्रोधाने उच्चारण कर ता 

करते रोज तू माझा उद्धार 

मुक्ताफळे उधळण्या तू असते उदार 

तरीही तूच माझी सुखदाता 

शरण येतो तुझ्या आश्रया करता . 

लिफ्ट चे दार उघडले गेले आणि मी रूमकडे वळलो . 

सौ . शुभांगी निमकर 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu