चिरंजीव राहो ! – रामदास कामत ©नितीन सप्रे
चिरंजीव राहो !
रविवार ९ जानेवारी २०२२…दिल्लीत गेले दोन दिवस पाऊस पडत होता . एरवी प्रभातीच सारा गाव जागवित येणारा पूर्वेचा देव सूर्यदेव, त्याचाच वार असूनही आद्याप उगवला नव्हता. सकाळी सकाळी बातमी मिळाली ती नाट्यसंगीत, भावसंगीताच्या प्राचीवर प्रदीर्घ काळ तळपणाऱ्या गोमंतकीय अरुण कमलाच्या शनिवारच्या मावळतीची. शनिवारच्या ‘निशेचा तम’ आता कधीच सरणार नव्हता. मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ गायक नट रामदास कामत यांच्या निधनाची बातमी मनाला हुरहूर लावून गेली.
रामदास कामत आणि माझी ओळख तशी फार जुनी. सुमारे ५० वर्षां पूर्वीची. मी प्राथमिक शाळेच्या दुसऱ्या अथवा तीसरीला असेन. नागपूर आकाशवाणी आणि माझ्या आईच्या सौजन्याने ही ओळख झाली. पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शन मधील सेवेमुळे ती अधिकच दृढ होत गेली. त्याकाळी सकाळी सहा वाजता अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम नागपूर आकाशवाणी वर असायचा. अर्चना म्हणजे आमच्या सकाळच्या अन्हिकाचाच एक भाग होता. सकाळी शाळेची तयारी आणि चहा बिस्कीटांच्या साथीला अर्चनेचे सकस सुर म्हणजे दिवसनाट्याची दमदार नांदीच ठरायची. ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे’, ‘हरी ओम हरी ओम प्रणव ओमकार’… अशी कित्येक गाणी शाळेची तयारी करताना कानावर पडली आणि हृदयात कायमची रुजली. आपल्या खात्यावर किती अनमोल ठेवा जमा होतोय याची तेव्हा अजिबात नसलेली जाणीव, आता मात्र पदोपदी होत असते.
तळकोकणात साखळी गावच्या वाचनालयाच्या मदतीसाठी बेबंदशाही नाटक बसवण्यात आलं होतं, त्यात पदेही घालण्यात आली. सात वर्षांचा रामदास, तोंडाला रंग लावून बाळराजेंच्या भूमिकेत रंगभूमीवर नुसता अवतरलाच नाही तर दोन पदेही जोरकसपणे गायला आणि पुढची प्रदीर्घ कारकीर्द उत्तरोत्तर वर्धिष्णुच होत गेली.
आई, वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी अश्या घसघशीत कामत कुटुंबातलं रामदास हे शेंडेफळ. जन्म १८ फेब्रुवारी १९३१ चा गोव्याच्या म्हापशातला. सांपत्तिक दृष्ट्या सुदाम्याशी नातं सांगणारं हे कुटुंब तसं समाधानी होतं कारण घरात सुरांच ऐश्र्वर्य होतं. आई मथुरा, वडील शांताराम, भाऊ उपेंद्र आणि स्वतः रामदास यांच्या गळ्यात सुरांची मौक्तिक माला रुळत होती. गाण्याचं औपचारिक शिक्षण जरी नसलं तरी वडील दत्तपदे, नाट्यपदे गात असत तर आई स्वयंपाक करता करता ओव्या, स्तोत्र,भजने आदी गात असे. भाई मुंबईत होता आणि गाण्याची तलीमही घेत होता, तोच छोट्या रामदासचा गुरू झाला. पुढे अर्थशास्त्राची पदवी घेऊन १९५३ मध्ये अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात कामतांनी नोकरी पत्करली. खर्डेघाशी करून फर्डे गायन करणारे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या नंतरचे हे दुसरे उदाहरण म्हणता येईल.
दैवगती हा शब्द साधारणतः नकारात्मकतेने वापरला जातो मात्र अनेकदा ती उपयुक्त साथही देते. कामतांच्या बाबतीत याचा प्रत्यय येतो. त्यांचं कार्यालय असलेल्या सीजीओ (CGO)इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून आकाशवाणीचे कामकाज त्यावेळी होत असे.
बा. सी. मर्ढेकर, राजा बढे, मंगेश पाडगावकर, यशवंत देव असे शब्दर्षी तिथेच त्यांच्या संपर्कात आले. शब्द सुरांचा मेळ झाला आणि आकाशवाणीवर रामदास कामत यांचा चंचुप्रवेश झाला.
संगीत रंगभूमीवर ते अवतरले धी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशयकल्लोळ या नाटका द्वारे. गंमत म्हणजे कामत आश्विन शेठ ची स्वप्न बघत होते मात्र दिग्दर्शक गोपीनाथ सावकारांनी त्यांना साधू बनवलं आणि ‘हृदयी धरा हा बोध खरा’ हे एकमेव पद त्यांच्या वाट्याला आलं तेही तीन चार मिनिटांत सादर करण्याच्या अटी सह. भाई उपेंद्रनी संधी न सोडण्याचा दिलेला सल्ला मानत त्यांनी तिचे सोने केले.
हे पद त्यांनी असं काही सादर केलं की रसिकजनांच्या हृदयी जागा मिळाली. त्यानंतर संगीत शारदा नाटकात कोदंडाची भूमिका साकारली आणि त्याबरोबरच पूर्वी कधी ही नसलेला संगीतासाठीचा पहिला पुरस्कारही. रामदास कामत यांचा गायनाभिनय सातत्याने बहरत होता पण ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस या उक्ती प्रमाणे तो हिमशिखरांवर पोहोचवला संगीत मस्त्यगंधा नाटकानं.
साठच्या दशकात मराठी संगीत नाटकाला संजीवन गुटी मिळाली ती कट्यार काळजात घुसली आणि मस्त्यगंधा या नाटकांमुळे. पण गंमत अशी की मस्त्यगंधा नाटक सुरवातीचे सुमारे ३८ प्रयोग पाण्याखाली होते. निर्मात्यांनी ते बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र देवाघरचे ज्ञात कुणाला?… यत्न तो देव जाणावा म्हटतात त्याप्रमाणे या नाटकातील पदांची ध्वनिमुद्रिका यावी यासाठी कामतांनी अनेक ट्रायलस् दिल्या आणि अखेरीस त्यांना हेम लाभले. एका दिवसात ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ अशी चार पदं रेकॉर्ड झाली. एचएमव्ही च्या (HMV) पैंगणकरांनी कामतांना ती सुपूर्द केली. कामतांचा आकाशवाणीवर वावर असल्यानं तिथे मैत्र जुळलेलं होतं. शरद जांभेकर या पारखी मित्राने दोन तीन दिवस ही चारही गाणी कामगार सभा, वनिता मंडळ अश्या बिनी च्या कार्यक्रमा द्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आणि किमया घडली. ‘दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा’ हे शब्दशः खरं ठरवत बंद होणाऱ्या या नाटकानं ३९ व्या प्रयोगा पासून नव्यानं जोम धरला. नाट्यसंगीत आणि आकाशवाणी माध्यमाची ही ताकद होती.
रामदास कामत यांना व्रतस्थ कलाकार म्हटलं पाहिजे. नाटक, संगीत या कला त्यांनी साधकाच्या भूमिकेतून जवळ केल्या. प्रसंगी व्यक्तिगत जीवनातील सुखदुःखाचा अडसर येऊ दिला नाही तसच मेहनतीला ही ते कधी कमी पडले नाहीत. पंडित भीमसेन जोशी, ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकाचं संगीत दिग्दर्शन करत होते. दिवसा मुंबईत नोकरी, त्यानंतर रेल्वेने पुणे गाठून भीमसेनजीं कडे रात्री अकरा, साडे अकरा पर्यंत तालीम, रात्री बाराच्या सुमारास रेल्वे पकडुन माघारी परतून, जेमतेम तासभराची विश्रांती घेऊन पुन्हा नोकरीवर हजर अशी भीमसेनी मेहनत करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही, तेव्हाच तम निशेचा सरून करुणाकर ईश्वरा कडून कृपादान मिळण्यासाठी ते पात्र ठरले.
‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ अश्या अनेक संगीत नाटकांतून त्यांनी उत्तम अभिनय तसच तडफदार आणि तळमळीनं सुरेल पदं सादर केली. त्यांचे सुर निव्वळ गळ्यातूनच नाही तर हृदयातून पाझरत असावेत. त्यांच्या ओजस्वी सुरात, गोमंतकीय कोंकणीची, कानाला गोड लागणारी अनुनासिकता होती आणि म्हणूनच कामत यांनी गायलेली ‘बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला’, ‘श्रीरंगा कमला कांता’ ह्या सारखी कित्येक गाणी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. ती विस्मरणात जाणं निव्वळ अशक्य. अर्थात ‘मत्स्यगंधा’ आणि ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी ते गानरसिकांच्या गळ्यातले ताईत झाले. मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मर सदा’ ही त्यांची नाटय़पदे विशेष गाजली. नाट्यवेल्हाळ मराठी रसिकांवर त्यांचे गारूड न पडते तरच नवल. कट्यार काळजात घुसली या अजोड नाटकातील सदशिवाच्या भूमिकेचं मोरपिसही खरंतर कामत यांच्या शिरपेचात रोवलं गेलं असतं, मात्र त्या सुमारास ते एअर इंडियाच्या सेवेत होते आणि त्यांची दुबईला बदली झाल्यामुळे त्यांना सदाशिव साकारता आला नाही असं मला अलीकडेच कळलं.
त्यांनी फारशी चित्रपट गीतं गायली नाहीत कारण एकतर वेळेची अनुपलब्धता आणि कदाचित नाट्यसृष्टी वर त्यांचं असलेलं पहिलं प्रेम ही असावीत. अर्थात जे करायचं ते उत्तमच, या बाण्याने त्यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातील, खरोखरच जीव वेडावून टाकणारं सदाबहार गाणं म्हणजे ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’. आवाज खराब असतानाही, बार्शी मुंबई असा धकाधकीचा अनारक्षित रेल्वे प्रवास करून त्यांनी तो टेक दिला आणि ते गाणं अजरामर करून टाकलं. इतक्या लोकप्रिय गाण्याबद्दल एकदा ते म्हणाले की त्या गाण्यातल्या त्रुटी मला ऐकताना आज जाणवतात. साखळीतील एका कार्यक्रमात निवेदकाने त्यांचा पंडित रामदास कामत असा उल्लेख करता क्षणीच त्याच्या हातून माईक घेऊन “मला पंडित उपाधी लावू नका, मी पंडित नाही, मी जो काही आहे तो अभिषेकी बुआंची देण आहे. त्यांनी दिलेलं मी प्रामाणिकपणे ग्रहण केलं आणि तेच तुमच्या समोर सादर करतो.” असं नम्रतेने नमूद केलं. असा निरलस, निर्व्याज, सरल मनाचा कलाकार विरळाच.
नाटकात अभिनय कसा करावा आणि गद्यातून गायकीत कसं यावं याची शिकवण गोपीनाथराव सावकार यांच्या कडून मिळाल्याचं ते सांगत. तसच नाट्यपदांसाठीचे मार्गदर्शक म्हणून ते संगीत शारदेची पदं बसवून घेणाऱ्या गोविंदराव अग्नि यांचा उल्लेख करत. त्यांची कारकीर्द यशोशिखरावर नेणाऱ्या नाटकांचे संगीत दिग्दर्शक पंडित जितेंद्र अभिषेकी बुआ यांनी गद्य आणि गान याचा विचार दिला, दृष्टी दिली असं त्यांनी नम्रपणे अनेकदा बोलून दाखवललं होतं.
नाट्यसंगीताची, चार प्रमुख कालखंडात त्यांनी विभागणी केली. पहिला कालखंड १८८० ते १९१० हा शाकुंतल, सौभद्र, शारदा, मृच्छकटिक वगैरे नाटकांचा. ज्यावेळी नाट्यसंगीतात साकी, दिंडी, कामदा अश्या पारंपरिक चालींच वर्चस्व होतं. त्यानंतरच्या म्हणजेच १९११ ते १९३२ हा संगीत नाटकांचा सुवर्णकाळ ज्यावेळी बालगंधर्व गायकी, मास्टर दीनानाथ गायकी यांच्या शैलीची मोहिनी रसिकवर्गाला पडली. तिसऱ्या म्हणजेच १९३२ ते १९६० ह्या कालखंडात ज्योत्स्ना भोळे यांनी भावगीताच्या अंगाने नाट्यपदं प्रचलित केलीत. याच कालावधीत छोटा गंधर्व यांचा उदय झाला. आणि चौथा म्हणेच १९६० ते १९८५ हा चित्रपट गीतांचा वरचष्मा असलेला आणि त्यामुळे नाट्य संगीताला काहीशी मरगळ आली असलेला कालखंड. मात्र दारव्हेकर मास्तरांच्या अभिषेकी बुवांच्या संगीतानं नटलेलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या अद्वितीय गायन अभिनयानं संगीत रंगभूमीवर सुवर्णांकित झालेलं ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकानं प्रचंड लोकप्रियता अनुभवली. पुढे ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ या विद्याधर गोखले यांच्या नाटकातील पदांच आटोपशीर पण कसदार गायन सादर करून नाट्यसंगीताला पुन्हा सुगीचे दिवस दाखविल्याचं प्रतिपादन ते करतात. या सर्व कालखंडातील नाटकांमधील नाट्य आणि गायन वैशिष्ट्यं उलगडून सांगणाऱ्या पाच सहा दिवसीय शिबीराची कल्पना त्यांच्या मनात अखेर पर्यंत रुंजी घालत होती. अत्यंत कलासक्त जीवन जगलेला हा थोर गायक नट आयुष्याच्या तिसऱ्या अंकाच्या उत्तरार्धात मन कृतार्थ शुभ्रतेने भरून आल्याची भावना राखून होता हे विशेष. कलेला समर्पित अश्या थोर गायक नटाच्या कलेवराची आज अग्निफुलं होत असताना कृतज्ञ रसिक एवढीच प्रार्थना करू शकतो.
“चिरंजीव राहो…चिरंजीव राहो जगी नाम रामा।
जोवरि रविशशि पाव सुखधामा ॥
नाद-सिद्धी सकळ वरदान देवो ।
अचल राहो तुझा स्नेह अभिरामा ॥”
ऐकण्यासाठी क्लिक करा – चिरंजीव राहो
(टीप: या लेखातील छायाचित्र दूरदर्शनच्या सौजन्याने…माझा मित्र उदय कामत, निर्माता ह्याच्या परवानगीने. धन्यवाद उदय.)
नितीन सप्रे
©नितीन सप्रे
8851540881
pc:google
टीप: लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवरही उपलब्ध आहे.