प्रथम पारितोषिक | तो – सौ. अंजली आशुतोष मराठे
तो
कुणी रेखिले आभाळावर
रंगबिरंगी चित्र मनोहर
कुणी ओतले मुग्ध कळ्यांवर
फुल-वेलींवर सुगंध अत्तर
खोल तळाशी निळ्या सागरी
कुणी लपविले मोती सुंदर
कुणी पसरले धरणीवरती
रुक्ष कोरडे कितीक कंकर
हिरवाईने नटली सजली
वनराई ही नितांत सुंदर
कडेकपारीतुनी वाहती
शुभ्रधवल खळखळते निर्झर
कुणी निर्मिले अजस्त्र प्राणी
कुणी निर्मिले सूक्ष्म जीव हे
कोण देतसे रंग रूप त्यां
अन प्राणांची घाली फुंकर
दिवस रात्र महिने वर्षाचे
कोण ठरवितो वेळापत्रक
चंद्र सूर्य अन तारे येती
निश्चित केलेल्या वेळेवर
कुणी लपविली स्वप्न लोचनी
कोण जागवी मनात आशा
कोण करवितो सुख-दु:खांचे
जीवनात ते भास समांतर
कोण ठरवितो किती असावे
एक एक श्वासाचे अंतर
कोण चालवी जन्म मृत्युचे
सृष्टीचे हे चक्र निरंतर
कुणा न दिसले कुणा न कळले
अवती भवती तरी भासले
चरा-चरातिल चैतन्यच ते
म्हणती त्याला सारे ईश्वर
सौ. अंजली आशुतोष मराठे
बडोदे, गुजरात
प्रथम पारितोषिक (कविता)