व्दितीय पारितोषिक | घर-चारुलता काळे
घर
घर मातीच्या भिंतींचे, घर कौलारू छताचे,
वर डौलदार माडी, घर दगडी जोताचे.
स्वैंपाकघर, माझघर, देवघर देवाजीला,
ओटी पै-पाहुण्यांची, झुला झुले पडवीला.
घरा मागे एक गोठा, झाडे माडे परसात,
गोड पाण्याची विहिर, चाले रहाट मजेत.
माझ्या घराच्या या भिंती, अशा रुंदावत जाती,
आजुबाजुच्या घराना, देती किती नाती गोती.
काळ कसा किती गेला, बालपण ही सरले,
माझे धकलेले घर, माती मोलाचे उरले.
झाली जमीन सोन्याची, भाव गगनाला गेला,
मन कावरे बावरे, सौदा घराचा मी केला.
घर पाडले मोडले, मागे राहिले ना काही,
बंद पापणीला माझ्या, आसवांचा भार होइ.
- चारुलता काळे
मुंबई.
व्दितीय पारितोषिक (कविता)