होळी रे होळी…

हिवाळ्यातली हाडं गोठवणारी भटकंती करता करता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजावे आता दिवसाच्या भटकंतीला आराम देण्याची वेळ आली आहे.

आले आहेत, थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन लवकरच चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस. आंब्याला लगडलेल्या बाळकैर्या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस. सुगीची आणि खळ्याची कामं संपून घरात धान्याच्या राशी लावण्याचे दिवस. सगळे कसे नवेनवे.

मग उत्सवप्रिय असलेला माणूस तरी कसा मागे राहील? अशा याच ऋतुच्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावरचा रंगीत उत्सव वसंतोत्सव. आपला शिमगा आणि होळी. पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरुन प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वार्याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे ब्रम्हदेवाने रक्षण केले. नंतर ब्रम्हदेवानेच हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करुन वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते.

फाल्गुनी पौर्णिमेला प्रतीकात्मक दहन करुन सर्व दुर्गुणांचा विनाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. सामाजिक लाजेखातर आपला राग आपण अपशब्दांमध्ये उघडपणे व्यक्त करु शकत नाही. अशा रागाचे दहन होळीसमोर एकमेकांच्या नावाने बोंब ठोकून, शिव्या देऊन केले जाते हेतू हा की, आपले मन स्वच्छ व्हावे आणि स्नेहाचे एक नवे पर्व आपण दुसर्या दिवसापासून सुरु करावे. घरात भरभरुन आलेल्या धान्यातूनच नैवेद्य होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जाते. निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा आदर्श.

होळीच्या दुसर्या दिवशी रंगांचा उत्सव म्हणजे धूलिवंदन. तरुणाईचा आणि आबालवृद्धांचा जल्लोष. नटखट श्रीकृष्णाने गोपिकांवर उधळलेल्या रंगाचा उत्सव. वसंताच्या आगमनाचा आनंद अबीर-गुलालातून व्यक्त करण्याचा दिन. आपसांतील मतभेद विसरुन, सर्व हेवेदावे आणि सामाजिक/आर्थिक स्थिती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करणे हाच या धुळवडीचा उद्देश. आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेला रंग (हळद, कडुनिंब, कुमकुम, गुलाब, पळस) वातावरणातील सर्व विषारी द्रव्याचा निचरा करतात म्हणून नैसर्गिक रंगांनीच होळी खेळावी असे शास्त्र सांगते. रंगांची होळी भारतभर वेगवेगळ्या रुपांत खेळली जाते. बरसानाची लठमार होळी, मथुरा बनारसची अबीर-गुलाल होळी, पंजाबातील होला मोहल्ला, कोकण-गोव्याचा शिगमो, उत्तर भारतातील ठंडाई आणि भांगमध्ये मदहोश होळी असे विविध प्रकार रुढ आहेत.

होली है भाई होली है बुरा न मानो होली है !!!
pc:google

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu