थंडीत घ्या त्वचेची काळजी
आपली त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील व संपूर्ण शरीराला व्यापून टाकणारा अवयव. मात्र हवामानाचा , वातावरणाचा त्याच्यावर सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच पण हिवाळ्यात तर ती विशेषत्वाने घ्यावी लागते.
थंडीमध्ये घाम यायचे प्रमाण कमी झाल्याने सुद्धा त्वचा कोरडी होते. यामुळे त्वचा फुटणे, खरखरीत होणे, कोरडी पडणे, खाज सुटणे असे त्रास होऊ लागतात. हेमंत व शिशिर ऋतू असे थंडीचे दोन ऋतू होत. हेमंतामध्ये थंडीची सुरवात होते, तर शिशिरात थंडीची तीव्रता वाढते.
थंडीच्या दिवसात महागडी सौंदर्य उत्पादनं वापरण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी करूनही त्वचेची काळजी घेता येते.
1. हिवाळ्यामध्येसुद्धा जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग.रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्यक ते सर्व पोषण मिळते.
2.खोबरेल तेल ,अॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे.तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.
3. नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारूहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच,पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो.
4. रात्री बदाम भिजवून , सकाळी त्याची सालं काढून , पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.
5.ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे , त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसानं स्क्रब करावं.
6.घरच्या घरी मॉयश्चरायझर करायचे झाल्यास लिंबूरस, गुलाबपाणी, आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावा दिवसभर त्वचा मऊ राहते.
7.आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक भाग म्हणजे ओठ. चेहर्याचे सौंदर्य राखण्यासाठी ओठाचे सौंदर्य राखणे खुप गरजेचे आहे. चेहरा कसाही असला तरी नाजुक गुलाबी ओठांनी सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यासाठी हिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवा.(त्याला वारंवार जीभ लावु नका) ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यासाठी ओठांना व्हॅसलिन अजिबात लावू नये. अधिक प्रमाणात पाणी प्यायाल्याने व झोपतांना ब्रँडेड लिप बामचा वापर केल्याने फायदा होतो.तसेच ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांवरील चीरांवर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो.
8.हिवाळ्यामध्ये तळपायांना, विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरूक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे यासुद्धा तक्रारी आढळतात.अशावेळी तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, हिवाळा हा ऋतू वर्षभरासाठीची प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या काळात त्वचेच्या काळजी सोबत संतुलित आहार घ्यावा जेणेकरून गुलाबी थंडीचा गोडवा अधिक प्रमाणात अनुभवण्यास मिळेल.