नोट एक हजाराची – शरणप्पा नागठाणे
माझ्या रूमचा इंटरकाॅम वाजला, हाँटेलची रिसेप्शनिस्ट बोलत होती ,-” your vehicle has arrived please ..”
मी म्हणालो , – ” Okay…. Thanks…I will be there in few minutes..”
माझा इंजिनिअरिंगचा मित्र विठ्ठल किसनराव दिंडे – आम्हा मित्र परिवारात तो VD नावाने फेमस…
व्हिडीने मला घेण्यासाठी स्वत:ची कार पाठविली होती.
कामानिमित्त अमेरिकेला कधी मधी जाणे होत असले तरी ही San Francisco येथे मी पहिल्यांदाच येत होतो.
व्हिडी अमेरिकेत बरीच वर्षे स्थाईक आहे…गेली ६-७ वर्षे सिलिकॉन व्हॅली मध्ये त्याने आपलं स्टार्ट अप सुरू केले होते आणि मी San Francisco ला येत आहे म्हटल्यावर त्याने मला बोलावणं किंवा मी त्याला भेटायला जाणं हे अनौपचारिक, सामाजिक होतं..
Tesla च्या Model X ह्या पाॅश आणि महागड्या कार मधून मी सिलिकॉन व्हॅली मध्ये व्हिडीच्या आॅफीसला पोहचलो…
गेल्या गेल्या मिठी मारत व्हिडीने माझं स्वागत केलं आणि सरळ आपल्या Conference hall मध्ये घेऊन गेला..
“आजचा पुर्ण दिवस मी तुझ्या साठी ठेवलेला आहे बरं का , त्यामुळे Be at ease ..आधी मी तुला थोडक्यात माझ्या start up ची माहिती देतो, मग आपण कंपनीचा एक राऊंड घेऊ…. त्यानंतर माझ्या ऑफिसात मस्त गप्पा मारत बसू… दुपारी घरी लंच, तुझ्या वहिनीनं बजावून सांगितले आहे की लंचला तुला घरी घेऊन यायचं- No Hotel at all … okay ?…”
मी म्हणालो, -” नो प्रोब्लेम बाॅस, as you wish …”
Keysun Soft Solutions अशा आगळ्यावेगळ्या नावाचा अर्थबोध मला होईना, तेंव्हा विठ्ठल म्हणाला, -” बाबाच्या नावाने म्हणजे Kisan चे Keysun असं start up चे नामकरण केलंय …”
खुप जवळचा मित्र असल्याने त्याचे family background मला माहित होते..त्याच्या वडिलांना मी कधी भेटलो नाही पण व्हिडीच्या बोलण्यातून नेहमी त्यांच्या बद्दल प्रेम, आदर व्यक्त होत असे, त्यामुळे start up चे नामकरण वडिलांच्या नावे करणं सहाजिकच होतं…
Keysun चे प्रेझेन्टेशन पाहीले, वर्कप्लेसचा राऊंड झाला आणि आम्ही दोघे व्हिडीच्या ऑफिसात आलो..
भलं मोठं ऐसपैस ऑफिस, त्याचं टेबल पाहून मला व्हिडीचा अभिमान ही वाटला आणि मानव स्वभावानुसार थोडा हेवा ही वाटला…
व्हिडीने आपल्या सेक्रेटरीला बोलावून पुन्हा एकदा काॅफी सांगितली आणि तिला सुचना ही दिली ,-” रेवती, please don’t disturb me until utmost urgency … काय आहे की बऱ्याच वर्षांनी मित्र भेटायला आला आहे… तेंव्हा you know what I mean….”
सेक्रेटरी म्हणाली – “okay sir, will do..”
व्हिडी त्याच्या सेक्रेटरीला बोलत असताना माझे लक्ष त्याच्या उजव्या हाताला टेबलावर ठेवलेल्या दोन अतिशय सुरेख फ्रेमकडे गेले…
एका फ्रेम मध्ये व्हिडीच्या वडिलांचा Black and white फोटो होता…
दुसरी फ्रेम पाहून मला अतिशय आश्र्चर्य वाटले कारण त्या फ्रेम मध्ये खूपच जुनी हजाराची नोट लावलेली होती आणि फ्रेमवर मोठ्या bold अक्षरांत लिहिले होते – ” INSPIRATION “
Inspiration ?
मला काही समजेना…
आपल्याकडे आयुष्यातील पहीला पगार मिळाला की तो आपण आई वडीलांच्या पायावर ठेवतो किंवा देवापुढे ठेवीत असतो , हे तसंच काही तरी असेल…
पण तसं असेल तर व्हिडीने धंद्यात मिळालेला पहीला डाॅलर देखील फ्रेम करून ठेवला असता, पण तसं काही दिसत नाही…
दुसरा विचार मनात आला की एक हजाराची नोट असो की डाॅलर शेवटी तो पैसाच ?…
याचा अर्थ VD चे Inspiration is money ?
पण मी ज्या व्हिडीला ओळखतो तो असा निश्र्चितच नाही… आणि नव्हता ही …मग ?
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव , confusion बघून व्हिडी हसला – विचारले ,-” Surprised ?”
मी मान डोलावली…
व्हिडी सांगू लागला – – – – – – – –
हिंदी चित्रपटात जसं सांगितले जातं ना तशी यह एक लंबी कहानी है …
साल १९८१-८२…
आपण इंजिनिअरिंगच्या Final year ला होतो..परिक्षा तीन महिन्यांवर आली होती..
परिक्षा फी, ईतर काही देणी ह्या सगळ्यांसाठी पैसे लागणार होते.. ८००-९०० रुपये तरी कमीत कमी पाहिजे होते..
मी वडिलांना पत्र पाठविले…
तुला तर माहीतच आहे की माझं गाव म्हणजे मराठवाडा – कर्नाटक बाॅर्डर वरच्या दुष्काळी भागातील एक…जीथे अवर्षण , दुष्काळ ही सामान्य बाब..
माझे बाबा एक सर्वसाधारण शेतकरी…५-६ एकर कोरडवाहू शेती, पण त्यांच्या मनात मला शिकवून मोठा इंजिनिअर करायची जीद्द…
मला ही शिष्यवृत्ती मिळत असे पण कुणबी कॅटेगरीत मिळणारी शिष्यवृत्ती असून असून किती असणार ?…पैशाची चणचण असेच..
त्या काळात १००० ही खुप मोठी रक्कम होती…आणि…खेड्यात तर एक हजार रुपये म्हणजे अबब अशी बाब…
इतके रुपये उसने पासने घेणं शक्य नव्हतं, तेंव्हा बाबांनी पैसे व्याजी घ्यायचं ठरवलं..
गावात व्याजी व्यवहारी करणारे २-४ सावकार होते..
उद्धव सावरकरांनी शेकडा ५ रुपये व्याजाने १००० ची नोट बाबांना दिली..
बाबा म्हणाले, -” सावकार, शंभर शंभराच्या नोटा द्या… मला हजार रुपयांची मोड कोण देणार ?”
सावकार म्हणाले, -” किस्ना, अरे शंभर शंभर असतील तर दिले असते पण नाहीत, तुला लेकाला मनीऑर्डरच करायची आहे ना ? मग पोस्टात मिळतील की …”
आमच्या गावात पोस्ट ऑफिस नव्हते…मग मला मनीऑर्डर करण्यासाठी बाबा तालुक्याला निघाले..
बस साठी आमच्या गावाहून ३-४ किलोमीटर चालत जावे लागत असे..
बस आली..
तिकीटाचे पैसे म्हणून बाबांनी एक हजाराची नोट काढून कंडक्टरला दिली…
कंडक्टर म्हणाला, -” अहो बाबा, ५ रुपयांच्या तिकीटासाठी एक हजार रुपयांची नोट ?”
बाबांनी चिल्लर नाहीत अशी विनंती केली…बाबांचा माळकरी अवतार बघून कंडक्टरने ” ठिक आहे – ठिक आहे … उतरताना बाकीचे पैसे घ्या ” असं म्हणत नोट आपल्या कातडी बॅग मध्ये ठेवून दिली…
तिकीट बुकिंग करून, बस मधिल प्रवाशांची संख्या मोजून कंडक्टर जागेवर येऊन बसला..
कातडी बॅग मधून हजाराची नोट काढली…बारकाईने नोटेचे निरीक्षण केले… दोन तीन वेळा माझ्या वडिलांकडे पाहिले आणि नोट पुन्हा कातडी बॅग मध्ये ठेवून दिली..
बाबांना आपल्या सीटवर बसवून घेतले आणि बराच वेळ इकडचा तिकडच्या गप्पा मारल्या… चौकशी केली…
तालुक्याचे ठिकाण आले..
बाबा उतरून जाण्यासाठी तयार झाले…
कंडक्टर म्हणाला, -” अहो बाबा, थांबा … हजाराची मोड आलेली नाही..चला एस टी च्या कॅन्टीन मध्ये जाऊन चिल्लर करू..”
बाबांना घेऊन कंडक्टर कॅन्टीन मध्ये आला..
बाबांना चहा पाजला आणि ती हजार रुपयांची नोट बाबांना परत करत म्हणाला, -” बाबा , ही नोट खोटी आहे-नकली आहे..ज्यांनी कोणी तुम्हाला दिली आहे त्यानं तुम्हाला फसवलं आहे… तेंव्हा गुपचूप हिला परत करा… नाही तर नष्ट करा…कोणाला समजले तर बाराच्या भावात जाल..”
बाबांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले..
सावकारांने हजाराची नोट देऊन चक्क फसवलं होतं..
कंडक्टरने फक्त चहाच पाजला नाही तर वर गावी परतीच्या तिकीटासाठी ५ रूपये ही दिले आणि म्हणाला, -“माझी रोज ह्याच रुट वर ड्युटी असते.. तुम्हाला जमेल तेंव्हा पैसे परत करा.. ”
कंडक्टर निघून गेला…
आता पुढे काय ?
मुलाला मनिआॅर्डर तर आजच्या आजच करणं गरजेचं होतं…
बाबा बराच वेळ सुन्न होऊन बसले, काही सुचत नव्हतं..
बाबांना आठवलं की आपल्या गावचा बालपणीचा सवंगडी हिरामण कांबळे इथं लाकडाचा वखारीत कामाला आहे..त्याला भेटून काही मार्ग निघतो का ते पहावं असा एक विचार मनात आला..
पुन्हा विचार केला की हिरामणचा पगार किती असणार ? दुसरं आपण कुणबी पाटील अन् हिरामण बारा बलुतेदारांपैकी एक…
पैसे कसं मागावं ?
मनाचा हिय्या करून बाबांनी हिरामणला सांगितले की आपली एक हजार रुपयांची नोट हरवली आणि कुठल्या ही परिस्थितीत आजच्या आज मनिआॅर्डर करणं गरजेचं आहे… नाही तर मुलांच्या शिक्षणाचं एक वर्ष वाया जाऊ शकतं….
” जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे” … असं म्हणतात आणि माझा विश्वास आहे की ते खरं आहे…
हिरामण म्हणाला, -” पाटील, मी मालकाला विचारून काही उचल मिळते का ते बघतो …”
आणि हिरामण कांबळे यांनी बाबांना आपल्या मालका कडून हजार रुपये आणून दिले..
८०० रूपयांची बाबांनी मला मनिआॅर्डर केली …
बाबांनी माझ्या आईला सांगितले की हजाराची नोट त्यांच्या कडून हरवली आणि हिरामण कडून पैसे घ्यावे लागले..
बाबांनी ती नकली हजाराची नोट जपून ठेवली..ही गोष्ट आयुष्यात कोणाला ही सांगितली नाही…
मी जेव्हा आयुष्यात settle झालो आणि बाबांना वाटलं की आता आपलं अवतार कार्य संपले आहे, तेंव्हा त्यांनी ही नोट मला दिली – म्हणाले , -” ही नोट मी आता पर्यंत सांभाळून ठेवली.. ह्या नोटेने मला माणसाची ओळख करून दिली…आयुष्यात खचून न जाता लढण्याची जिद्द दिली… कंडक्टर, हिरामण कांबळेच्या रूपात पांडुरंगाने दर्शन दिले… तू ही माणसं ओळखायला शिक…माणसं वाचायला शिक… माणसं निवडायला आणि जोडायला शिक…माणसं खरी असतात तीच कमवायची असतात…”
आणि त्या दिवसापासून ही हजाराची नोट सदैव माझ्या डोळ्यासमोर असते..
ही नोट मला सदैव बाबांच्या शब्दाची आठवण करून देत असते…
म्हणूनच बाबांच्या फोटो फ्रेम शेजारी ही खोटी नोट फ्रेम करून ठेवली आहे , माझं Inspiration म्हणून …
मी माणसं जोडत गेलो… आजही जोडत आहे..
माझ्या कंपनीचा Attrition rate (लोकांचे नौकरी सोडण्याचं प्रमाण) फक्त ०.२ टक्के आहे …
* * * * * *
विठ्ठल किसनराव दिंडे उर्फ VD सांगायचं थांबला…
मला काय बोलावे हे सुचेना…
श्री व.पु. काळे यांच्या कथेतील ती बाई – ती गृहीणी मला आठवली जी आपला तापटपणा, राग, हेकेखोरपणा कंट्रोल व्हावा म्हणून आपल्या गुरु महाराजांनी दिलेला नर्मदेतील गोटा आयुष्यभर सांभाळत होती..
- शरणप्पा नागठाणे
औरंगाबाद –५
व्दितीय पारितोषिक (कथा)- Thinkmarathi – स्पर्धा विशेषांक २०२१
प्रथमच ई-मासिक वाचलं, पुस्तकाची पानं न उलट्या, बोटाने पान खालीवर सरकत असणारे मासिक वाचलं, खूपच वेगळा अनुभव