रंगपंचमी – शास्त्र काय सांगते ?

फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव म्हणजेच रंगपंचमी . या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर रंग उधळून हा सण साजरा करतात म्हणूनच या पंचमीला रंग पंचमी असे नाव पडले असावे. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जातो आणि उत्तर भारतात हाच उत्सव होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या उत्सवाच्या निर्मितीचे कारण अस्पष्ट असले तरी हा उत्सव वसंत ऋतू, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी निगडीत आहे. ‘धर्मसिंधु’ या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. ‘हा उत्सव सध्या प्राकृत लोक वद्य पंचमीपर्यंत साजरा करतात’, अशी माहितीही या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते. पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर त्याने अनंगरूपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे, हा देखील या उत्सवामागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पौर्णिमान्त मास मानण्याच्या पद्धतीमध्ये, होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाला प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सवही असण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे, असेही या आनंदोत्सवातून सूचित केले जात असावे.
रंगपंचमी हा रंगांचा उत्सव. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. म्हणूनच शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक रंगांचा वापर करून उत्सव साजरा केल्यास त्याचा आनंद द्विगुणीत व्हायला वेळ लागणार नाही !!

Main Menu