आस्वाद मराठीचा,लेखांक 4-पंचतंत्र ©विद्या पेठे

नमस्कार, याआधी भाग एक मध्ये संत ज्ञानेश्वरांनी केलेले मराठी

भाषेचे कौतुक पाहिले.भाग दोन मध्ये मराठीतील पहिला ग्रंथ विवेकसिंधूमधील मराठीचा आस्वाद घेतला.भाग तीन मध्ये महानुभाव पंथातील लीळाचरित्र आणि धवळे यातील थोड्या वेगळ्या वाटणाऱ्या मराठीचा अनुभव घेतला.भाग चार मध्ये आपण आणखी एका वेगळ्या मराठी भाषेचा अनुभव घेणार आहोत. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘पंचतंत्र’.हे पुस्तकही यादवकालीन आहे आणि तेराव्या शतकातील आहे पंचतंत्र हे संस्कृत व पाली भाषेतील बोधकथांचे संकलन आहे.

 

मूळ संस्कृत भाषेत असलेल्या पंचतंत्राचे इ.स.पु.पाचव्या शतकातील पुस्तकाचे लेखक आहेत ‘विष्णू शर्मा’. त्यांनी राजकुमारांना सांगितलेल्या गोष्टी या पुस्तकात आहेत.असं म्हणतात की या ग्रंथाची रचना पूर्ण झाली तेव्हा विष्णू शर्मा यांचे वय ८० च्या जवळपास होते. विष्णू शर्मा दक्षिण भारतातील ‘महिला रोप्य’ नावाच्या नगरात राहत होते.या नगराचा राजा ‘अमरशक्ती’ याला तीन पुत्र होते त्यांची नावे ‘बहुशक्ती’,’उग्रशक्ती’ आणि ‘अनंतशक्ती’.तिघांनाही राजनीती, नेतृत्व गुण इत्यादीचे अजिबात ज्ञान नव्हते. त्यांना शिकवण्यासाठी राजाने पुष्कळ पंडितांची नेमणूक केली पण त्याचा उपयोग झाला नाही.मग राजाच्या मंत्र्यांनी विष्णू शर्मा यांना अध्यापक नेमण्याचा सल्ला दिला. ते राजनीती, नितीशास्त्र, राजकीय कौशल्य, नेतृत्व इत्यादी शास्त्रात निपुण होते.मग राजाने विष्णू शर्मा यांना दरबारात बोलावून अशी घोषणा केली की जर विष्णू शर्मा राजपुत्रांना कुशल प्रशासक बनवण्यात सफल झाले तर त्यांना १०० गावे व भरपूर सोने इनाम म्हणून देण्यात येईल.तेव्हा विष्णू शर्मा म्हणाले “मला या बक्षिसाची लालसा नाही कारण हे राजा मी माझी विद्या विकत नाही,पण मी आपल्या मुलांना सहा महिन्यात कुशल प्रशासक बनवेन अशी शपथ घेतो.जर मी माझा संकल्प पुरा करण्यात अयशस्वी झालो तर मी माझे नाव बदलेन” राजाने आनंदाने तिन्ही राजपुत्रांची जबाबदारी विष्णू शर्मा यांच्यावर सोपवली.
विष्णू शर्मा यांनी राजपुत्रांना शिकवण्यासाठी वेगळी पद्धत स्वीकारली.त्यांनी पशुपक्ष्यांच्या माध्यमातून राजपुत्रांना निरनिराळ्या कथा सांगितल्या आणि अल्पावधीत त्यांना राजनीतीत निपुण केले.त्या कथा म्हणजेच “पंचतंत्र”.या कथांचे पाच समूह आहेत.
१) मित्रभेद २) मित्रलाभ ३) संधीनिग्रह ४) लद्धप्रणाश ५) अपरिक्षिकारकम. यात एका मोठ्या गोष्टीत असंख्य कहाण्या आहेत या आकर्षक कथांमधून नीती,सदाचार यांचे उत्तम शिक्षण मिळते.नीती कथांमध्ये ‘पंचतंत्र’ पहिल्या स्थानावर आहे. ‘पंचतंत्र’ हे मराठी भाषेतील अभिमानाचे स्थान आहे.आता आपण ‘पंचतंत्र’मधील एक कथा बघू या.

पंचतंत्र (तेरावे शतक ?)

पिंगलकु पुसे । दमनकु सांद्ये । म्हणे होणे एके नगरी यज्ञदत्त ब्राह्मणु असे। तो दुर्बलु । तयाते ब्राह्मणीने म्हणीतिले । तुम्ही काही न करा. आम्ही अवघे भुके मरत असो. तंव तो चहुकडे हिंडू निघाला। वाटेस जाता येके अरण्यी पातला । तयासी तृषा लागली। म्हणोनि कारणे हिंडता तव एक अड देखिला। तणे झाकीला असे । तया पाहे तव देखिले । व्याघ्रु ।सर्पु । वान्नरू । सोनारू। ऐसे चौघे तया मध्ये पडले असति । ते तया यज्ञदत्त ब्राह्मणे देखिले । तेही तो देखिला मग चौघेही तयाते म्हणति । आमुते या अडांतूनु बाहेरि काढा. तव तो विचारी । म्हणे यांसि बहिर काढिता पूर्ण होईल।

महाराष्ट्रकवी (भावे)

वरील कथेतील मराठी भाषा सहज समजते.फक्त आजचे मराठी आणि तेराव्या शतकातील मराठी यात थोडे फरक आहेत. ही भाषा अल्पाक्षरी आहे.उदाहरणार्थ तो दुर्बलु – म्हणजे तो दुर्बल होता.एवढे लिहिण्याऐवजी थोडक्यात सांगितले.काही शब्द एकारान्त लिहिले आहेत.आता तसे लिहीत नाहीत.उदाहरणार्थ नामे,म्हणीतिले ,भुके (भुकेने),देखीले ,ब्राह्मणे इत्यादी. पूर्णविरामाऐवजी दंड म्हणजे उभी रेषा वापरली आहे.पण आपल्याला यातील मराठीचा अर्थ पूर्ण कळतो.

ही गोष्ट सांगितल्यावर विष्णू शर्मा राजकुमारांना विचारात-आता ब्राह्मण आडातून त्यांना कसे बाहेर काढील ?कोणाला आधी काढेल?का? यातून राजकुमारांच्या विचारशक्तीला चालना मिळत असे.

ज्ञानेश्वरी हा यादव काळातील शेवटचा ग्रंथ. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे अतिशय ज्ञानी वैराग्यसंपन्न होती. तत्कालीन समाजाने त्यांचा छळ केला. पण ज्ञानेश्वरांनी मात्र लोकांना पसायदान दिले. सर्वांसाठी ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो’ हेच मागितले. त्या पसायदानाने या भागाचा शेवट करूया.

पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

 

      

     

लेखिका – ©विद्या पेठे 
                     मुंबई
                pc – google 

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu