” जय जवान जय किसान ” चा मंत्र देणारे तेजस्वी , कणखर पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री यांचा ११ जानेवारी हा स्मृतीदिन . पकिस्तानचे नापाक इरादे धुळीला मिळवणाऱ्या ह्या धुरंधर योद्ध्याला मानाचा मुजरा ! ” मूर्ती लहान पण कीर्ति महान ” असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल अशा स्वतंत्र भारताच्या द्वितीय पंतप्रधानांना आदरपूर्वक अभिवादन !! भारताच्या जागतिक पातळीवरील प्रतिमेला उंचावर नेऊन ठेवणाऱ्या , भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांना निर्णायक वळण देऊन जगभरात भारताचा दरारा कायम करणाऱ्या या लोकोत्तर महापुरुषास त्रिवार मानाचा मुजरा !!!
दि.2 ऑक्टोबर 1904 रोजी लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे कायस्थ हिंदू परिवारात झाला . लाल बहादुर शास्त्रींचे वडील शारदा प्रसाद श्रीवास्तव हे शिक्षक होते . नंतर ते अलाहाबादच्या रेव्हेन्यू ऑफिसात नोकरीस लागले . शास्त्रीजींच्या मातोश्री रामदुलारी देवी मुघलसराय येथील रेल्वे स्कूलचे इंग्रजी शिक्षक व मुख्याध्यापक मुन्शी हजारीलाल यांच्या कन्या . लाल बहादुर हे या दंपतीचं दुसरं अपत्य . पहिली मुलगी कैलासीदेवी . एप्रिल 1906 मध्ये शास्त्रीजी जेंव्हा जेमतेम एका वर्षाचे होते , तेंव्हा त्यांच्या वडिलांचा प्लेगच्या साथीत दुर्दैवी मृत्यू झाला . छोट्या लाल बहादुरला घेऊन त्यांच्या मातोश्री मुघलसरायला आपल्या वडिलांकडे आल्या . तेंव्हा त्या तिसऱ्यांदा गर्भवती होत्या . जुलै 1906 ला त्यांनी सुंदरीदेवी या कन्येला जन्म दिला . लाल बहादुर आणि त्यांच्या भगिनी आजोळी वाढले . शास्त्रीजींचे शालेय शिक्षण मुघलसराय येथे झाले . इ.स.1917 ला श्रीवास्तव कुटुंब वाराणसी येथे स्थलांतारित झाले . कायस्थांमध्ये प्रचलित असलेले आपले श्रीवास्तव हे आडनाव त्यागण्याचा त्यांनी निर्णय घेतला .
हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये असताना निष्कामेश्वर प्रसाद मिश्रा या प्रखर देशभक्त गुरुजींच्या संपर्कात ते आले . मिश्रांच्या देशप्रेमाने प्रेरित होऊन लाल बहादुर शास्त्री यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली . स्वामी विवेकानंद , महात्मा गांधी , ॲनी बेझंट अशा महान व्यक्तीमत्वांच्या शिकवणूकीचा त्यांनी अभ्यास केला . शास्त्रीजी दहावीत असताना त्यांनी बनारस येथे पंडित मदन मोहन मालवीय आणि महात्मा गांधी यांची सभा ऐकली . त्यांच्या आवाहनानुसार सरकारी शाळेतील शिक्षण त्यांनी थांबवून असहकार चळवाळीत सक्रीय सहभाग घेतला . बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे व्याख्याते , गांधीजींचे अनुयायी , भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते आचार्य जे.बी.कृपलानी यांनी स्थापन केलेल्या ‘काशी विद्यापीठा ‘ तून लाल बहादुरना ‘ शास्त्री ‘ ही पदवी मिळाली . आणि ती त्यांच्या नावाबरोबर कायमचीच जोडली गेली . लाला लजपत राय यांच्या ‘ लोक सेवक मंडळा ‘ चे शास्त्रीजी सदस्य होते .
इ.स.1928 पर्यंत शास्त्रीजी ‘ इंडियन नॕशनल काँग्रेस ‘ चे प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले होते . इ.स.1930 च्या मीठाच्या सत्याग्रहातील सहभागामुळे , शास्त्रीजींना अडीच वर्षांचा कारावास भोगावा लागला . स्वातंत्र्य संग्रामात सुमारे नऊ वर्षांचा काळ शास्त्रीजींना तुरुंगवास भोगावा लागला . हा काळ त्यांनी पाश्चिमात्त्य तत्ववेत्ते , महान क्रांतिकारक , महान सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुस्तकांचा अभ्यास करण्यात सत्कारणी लावला .
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच शास्त्रीजी आपल्या उत्तर प्रदेश या राज्यात ‘ पार्लमेंटरी सेक्रेटरी ‘ होते . गोविंद वल्लभ पंत मुख्यमंत्री असताना शास्त्रीजी पोलिस आणि वाहतूक खात्याचा कारभार पहात होते . त्यांच्या काळातच स्त्रीयांना कंडक्टर म्हणून काम मिळण्यास सुरूवात झाली . जमावाला पांगवण्यासाठी लाठीमाराऐवजी पाण्याचे फवारे वापरण्याचे निर्देश त्यांनी सर्वप्रथम पोलिसांना दिले .
इ.स.1951 साली शास्त्रीजी ‘ ऑल इंडिया काँग्रेस कमिटी ‘ चे जनरल सेक्रेटरी होते . इ.स.1952 , इ.स.1957 , इ.स.1962 च्या जनरल इलेक्शन्स मध्ये काँग्रेसच्या अभूतपूर्व यशात शास्त्रीजींचा सिंहाचा वाटा होता . दि.13 मे1952 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात रेल्वेचे कॕबिनेट मिनिस्टर म्हणून पंडित नेहरूंनी शास्त्रीजींवर जबाबदारी सोपवली होती . इ.स.1956 साली झालेल्या एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता .
दि.27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू या आपल्या पहिल्या पंतप्रधानांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी लाल बहादुर शास्त्री यांनी समर्थपणे भरून काढली . मोरारजीभाईंच्या तुलनेत पसंती मिळून लाल बहादुर शास्त्रीजींच्या गळ्यात पंतप्रधान पदाची वरमाला पडली . स्वतः पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपला वारसदार म्हणून शास्त्रीजींना पसंती दिली होती . दि.11 जून 1964 रोजी पंतप्रधान पदाच्या आपल्या पहिल्या प्रसारित भाषणात शास्त्रीजी म्हणतात , ” There comes a time in the life of every nation when it stands at the cross – road of history and must choose which way to go . But for us there need be no difficulty or hesitation , no looking right or left . Our way is straight and clear – the building up of a secular – mixed economy democracy at home with freedom and prosperity , and the maintenance of world peace and friendship with select nations . “
नेहरू मंत्रीमंडळातले बरेचसे चेहरे शास्त्रीजींनी कायम ठेवले . टी.टी.कृष्णम्माचारी अर्थमंत्री , यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून कायम राहिले . परराष्ट्र व्यवहाराचा आपला पदभार त्यांनी स्वर्णसिंग यांना दिला . गुलझारीलाल नंदा यांचेकडे गृहखाते दिले . माहिती आणि प्रसारण खात्यात त्यांनी इंदिरा गांधींना संधी दिली .
पंडित नेहरूंच्या सोशलिस्ट इकॉनॉमिक पॉलिसीचा त्याग करून त्यांनी सेंट्रल प्लॕनिंग प्रमाणे आर्थिक धोरणे राबवण्यास प्रारंभ केला . व्हाईट रिव्होल्यूशन तसेच ग्रीन रिव्होल्यूशनचे ते जनक . दुधाचे उत्पन्न आणि पुरवठा वाढवण्यासाठी त्यांनी आणंद गुजरात येथे ‘ नॕशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना केली .
त्या काळात धान्योत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता . आज आपण स्वयंपूर्ण आहोत हा शास्त्रीजींच्या दूरदर्शी धोरणाचा परिणाम आहे . अन्नधान्य वाचवण्यासाठी त्यांनी आठवड्यातून एक वेळा अन्नत्याग , उपवासाची कल्पना मांडली आणि आपल्या कुटुंबापासून ती अमलात आणली . भारतीय जनतेनेही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . सोमवार संध्याकाळ तेंव्हा संपूर्ण भारतभरात ‘ शास्त्री व्रत ‘ म्हणून पाळली जात असे . अगदी हॉटेल , खानावळीसुद्धा बंद असत .
इ.स.1965 च्या भारत पाक युद्धात शास्त्रीजींची प्रतिमा उजळून निघाली . त्या बावीस दिवसांच्या संग्रामात हिंदुस्थान एक बलशाली राष्ट्र म्हणून जगासमोर आले . दि.19 ऑक्टोबर 1965 रोजी अलाहाबाद येथे त्यांनी केलेली ‘ जय जवान जय किसान ‘ ही घोषणा अजरामर झाली .
Under his leadership India faced and repulsed the Pakistani Invasion of 1965 . It is not only a matter of pride for the Indian Army but also for every citizen of the country . Shri Lal Bahadur Shastri’ s slogan ‘ JAI JAWAN JAI KISAN ‘ reverberates even today through the length and breadth of the country . Underlying this is the inner- most sentiments ‘ JAI HIND ‘ . The war of 1965 was fought and won for our self respect and our national prestige . For using our Defence Forces with such admirable skill , the nation remains beholden to Shri Lal Bahadur Shastri . He will be remembered for all times to come for his large heartedness and public service . “
पंडित नेहरूंची नॉन अलायनमेंट ची पॉलिसी कायम ठेवतानाच शास्त्रीजींनी सोव्हिएट युनियन बरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध घनिष्ट करण्यावर भर दिला . 1962 च्या हिंदी चिनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर , तसेच चीन व पाकिस्तान या अभद्र युतीचा धोका ओळखून शास्त्रीजींनी भारताच्या ‘ डिफेन्स बजेट ‘ मध्ये घसघशीत वाढ केली .
इ.स.1964 मध्ये श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमाओ बंदारनायके यांच्या बरोबर करार करून श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला . ब्रह्मदेशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले .
शास्त्रीजींचे जीवन चरित्र उजळून टाकणारी घटना म्हणजे इ.स.1965 चे भारत पाक युद्ध . या दरम्यान त्यांनी ज्या खंबीरपणे भारताचे नेतृत्व केले , त्याला तोड नाही . कच्छ च्या रणांगणावर युद्ध सुरू असताना लोकसभेच्या आपल्या भाषणात शास्त्रीजी म्हणतात , ” In the utilization of our limited resources , we have always given primecy to plans and projects for economic development . It would , therefore , be obvious for anyone who is prepared to look at things objectively that India can have possible interest in provoking border incidents or in building up an atmosphere of strife ….. In these circumstances , the duty of Government is quite clear and this duty will be discharged fully and effectively ….. We would prefer to live in poverty for as long as necessary but we shall not allow our freedom to be subverted . “
दि.1ऑगस्ट 1965 रोजी पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी सुरू झाली . भारतात सत्ता उलथवून टाकत भारतीय प्रदेश गिळंकृत करण्याची स्वप्नं पाकिस्तान पहात होता . तसं काहीही घडू शकलं नाही . भारत लाल बहादुर शास्त्रींच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखालील एक समर्थ राष्ट्र होते . भारतीय सेनेची लाईन ऑफ कंट्रोल वर आगेकूच सुरू झाली . लाहोर तोफांच्या टप्प्यात आले . युद्ध व्यापक प्रमाणावर पसरण्याआधीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते . सगळीकडे पाकिस्तानची जबरदस्त पीछेहाट झाली होती . ज्या पॕटन रणगाड्यांच्या जोरावर पाकिस्तानचा युद्धज्वर वाढला होता ते रणगाडे शूर भारतीय सेनेसमोर पाचोळ्यासारखे नष्ट झाले होते . खेमकरण क्षेत्रातच सुमारे 97 रणगाड्यांना मूठमाती मिळाली होती . पंजाबात अनेक ठिकाणी भारतीय फौजांनी पाकिस्तानी रणगाड्यांची धूळधाण उडवली होती . खेमकरण पाकिस्तानी रणगाड्यांची दफनभूमी झाली होती . काश्मीर मधील हाजी पीर सारखी महत्वाची ठाणी जिंकून भारत लाहोरवर कब्जा करण्याच्या बेतात होता .
दि.17 सप्टेंबर 1965 ला ऐन युद्धकाळात भारत चीनच्या प्रदेशात घुसखोरी करत आहे , असा कांगावा चीनने केला . पण शास्त्रीजींच्या कणखर नेतृत्वाखालील भारतीय सैन्याने त्याला भीक घातली नाही . इ.स.1962 चा भारत आणि इ.स.1965 चा लाल बहादुर शास्त्रींच्या सशक्त नेतृत्वाखालील भारत वेगळा होता . इतिहासापासून बोध घेत भारताने आपली शस्त्रसज्जता चोख ठेवली होती . आयुबखान यांचा शास्त्रींविषयीचा अंदाज सपशेल चुकला होता . रणांगणावर पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला होता . संयुक्त राष्ट्राच्या महासंघाच्या दबावाखाली युद्धबंदीची घोषणा झाल्यावर रशियन प्रधानमंत्री ॲलेक्सी कोसिजिन यांच्या पुढाकाराने तेंव्हाच्या सोव्हिएट युनियन मधील ताश्कंद येथे दि.10 जानेवारी 1966 रोजी शास्त्री आणि आयुबखान यांनी ‘ ताश्कंद करारा ‘ वर सह्या केल्या .
त्याच रात्री पहाटे दोन वाजता लाल बहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे संशयास्पद मृत्यू झाला . लाल बहादुर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असे जाहीर करण्यात आले . पण त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला असा संशय नंतर अनेकांनी व्यक्त केला . त्यामागे नक्की कुणाचा हात होता की , तो हृदयविकारामुळे ओढवलेला मृत्यू होता हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत .
जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र , सार्वभौम , निर्भय राष्ट्र म्हणून हिंदुस्थानातची ओळख निर्माण करणाऱ्या या ‘ मूर्ती लहान पण कीर्ति महान ‘ या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या या महान आदरणीय नेत्यास कोटी कोटी प्रणाम !
मुकुंद कुलकर्णी©
pc:google